

जालनामध्ये पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा ताफा अडवून निवेनाच्या माध्यमातून दाद मागणाऱ्या आंदोलकांना ही लाथ खुद पोलिस अधिकऱ्यानेच घातली. त्यामुळे आता दाद मागायची कुणाकडे? असा प्रश्न साहजिकच निर्माण झाला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार हे स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणासाठी बीडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी बीड विधानसभेचे राष्ट्रवादीचे नेते योगेश क्षीरसागर यांना झापले. तुम्ही काही काम करत नाही.. म्हणून मला इथं यावं लागतं, असा टोलाही अजितदादांनी क्षीरसागरांना लगावला.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आनंद पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी पवन चक्की ठेकेदार आणि शेतकऱ्यांची बैठक बोलवली होती. यावेळी पालकमंत्र्याच्या बैठकीमध्ये गोंधळ झाला.
राज्यात अवयवदानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवून महाराष्ट्राला या क्षेत्रात आघाडीवर नेऊया, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनीकरीत त्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्ह्यातील 117 पैकी 52 उपस्थित अवयवदात्यांना व त्यांच्या नातेवाइकांना प्रमाणपत्र देऊन गौरव केला. कोल्हापूर जिल्हा अवयवदानात प्रथम क्रमांकावर असून नेत्रदानात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सध्या राज्यात काही झालं की सरकारला आणि राज्याचा अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक प्रकारे राज्यात अराजकता पसरवण्याचे काम काही लोक करत आहेत. तशी अराजकता निर्माण व्हावी यासाठी काही शक्ती काम करताहेत का असा प्रश्न पडतोय असं वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. सांगलीमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित झेंडावंदन सोहळ्यानंतर चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलत होते.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सातपुडा बंगला प्रकरणी सरकारला नोटीस पाठवली आहे. माजी मंत्री धनंजय मुंडेनी ४८ तासात बंगला खाली करावा अशी मागणी त्यांनी सकारकडे केली होती. बंगला खाली न केल्यास कायदेशीर नोटीस पाठवेल असे दमानियांनी सांगितलं होतं. ४८ तास संपताच दमानिया यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना नोटीस पाठवली आहे.
अजित पवारांचा पक्ष कोकणातल्या एका नेत्याकडून हायजॅक करण्यात आलेला आहे, असा निशाणा रोहित पवार यांनी सुनील तटकरे यांच्यावर साधाला होता. सुरज चव्हाणांची नियुक्ती दादांना माहित नव्हती, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. त्यावर अशा बालिश वक्तव्याची दखल घेत नाही असं प्रत्युत्तर सुनिल तटकरे यांनी दिलं आहे.
29 तारखेला मराठे मुंबईत घुसणार आणि ओबीसीतूनच आरक्षण घेणार असा निर्धार मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी व्यक्त केला आहे. सगेसोयऱ्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय माघार नाही असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यावरुन मंत्री छगन भुजबळांनी जरांगे पाटील यांना टोला लगावला आहे. आंदोलन जालन्यात मुंबईत किंवा दिल्लीत कर, कोण आडवतंय असा टोला छगन भुजबळांनी लगावला आह.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काहीही फरक पडणार नसल्याची टीका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. सगळीकडे महायुतीचेच महापौर बसतील असं त्यांनी म्हटलं आहे.
प्रांजल खेवलकरांवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. पुणे सायबर पोलिस ठाण्यात एका महिलेने तक्रार दिली. महिलेचा चोरून व्हिडीओ काढल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्यावरुन पुणे सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहमती नसताना फोटो आणि व्हिडीओ काढल्याचा दावा महिलेने केला आहे.
आपल्या देशाची वाटचाल ही नॉर्थ कोरियाप्रमाणे हुकुमशाहीकडे सुरू असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. कल्याण डोंबिवली महापालिकेने 15 ऑगस्टसाठी लागू केलेल्या मांस विक्री बंदीच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी ते आज कल्याणात आले होते. त्यावेळी इथल्या जय मल्हार उपहारगृहात झालेल्या काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या स्नेहभोजन कार्यक्रमात सहभागी झाले होते.
मुंबई दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करताना, अनेक तरुण मंडळांनी संदेश देत दहिहंडी फोडली. गाजत असलेला मराठी मुद्दा त्याच बरोबर महायुती सरकारच्या मंत्र्यांचे कारनामे, वाढती महागाई, महायुती सरकारने पाडलेला मत चोरीचा पाऊस, अशा विविध मुद्द्यांवर दहीहंडी साजरी केली. अशाच प्रकारे भाजपने मतांची चोरी करून महाराष्ट्रात सत्ता मिळवल्याचा आरोप करत, काँग्रेस प्रवक्ते रविंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नेरूळ इथं काँग्रेस पक्षाने अनोखी ‘मतांची चोरी’ अशी दहीहंडी फोडली.
सोलापूर महापालिकेच्या ध्वजारोहणावेळी प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडून अर्ध नग्न आंदोलन केल्यानं गोंधळ उडाला. महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी बोगस जातीचा दाखला वापरून नोकरी मिळवण्याचा आरोप केला. सरकारने या बोगस दाखल्याची चौकशी करावी, या मागणीसाठी अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.
पश्चिम विदर्भातील महत्त्वकांक्षी असलेल्या जिगाव प्रकल्पात अनेक गावं पुनर्वसित झाली आहेत. त्यातील जळगाव जामोद तालुक्यातील आडोळ या गावाचं पुनर्वसनासाठी पुनर्वसन विभागाने रस्ता प्रस्तावित केला होता. मात्र नवीन रस्ता गावकऱ्यांना मान्य नसल्याने त्यांनी आज जुन्या रस्त्याच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन पुकारलं होतं. पूर्णा नदीला मोठा पूर आलेला असताना, या ठिकाणी आंदोलक व पोलिसांमध्ये झटापट होऊन दोन आंदोलनकर्त्यांनी पूर्ण नदीच्या पुरात उड्या घेतल्.या मात्र त्यातील एक विनोद पवार नामक आंदोलक वाहून गेल्याने या ठिकाणी जमा आक्रमक झाले आहेत.
उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येणार आणि जिंकणार, या संजय राऊतांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "कोणी कितीही युती करू द्या, काहीही बोलू द्या, महायुतीला काहीही फरक पडणार नाही. सगळीकडे महायुतीचे महापौर बसतील. मुंबई, ठाणे, पनवेल सगळीकडे महायुतीचे नगरसेवक निवडून येतील. दोन्ही ठाकरे एकत्र येण्याचा एकनाथ शिंदेंना काहीही फरक पडणार नाही."
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली आहे. "ओबीसीचा आणि मराठ्याचा खरा शत्रू असेल, तर तो छगन भुजबळ आहे. ओबीसीतून आरक्षण घेतलय म्हणतोय धक्का लागू देणार नाही. आमच्या हक्काचा नोंदी आहेत, गॅजेट आमच्या हक्काचे आहेत. याच्यामुळे देवेंद्र फडणीस पुन्हा अडचणीत येईल. तिन्ही पक्षाची सत्ता याच्या एकट्यामुळे अडचणीत येईल, तू नीट राहा दुसऱ्याला शहाणपण शिकू नको," अशी जहरी टीका जरांगे पाटलांनी मंत्री भुजबळांवर केली आहे.
संजय राऊत यांच्या वल्गना कशा असतात, हे सांगताना बा. सी. मर्ढेकर यांची, गणपत वाणी बिडी पिताना.., ही कविता म्हणत, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांना डिवचलं. यापूर्वी सरकार पडेल, असे बोलत होते. आता त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत. कार्यकर्ते थांबविण्यासाठी गमजा माराव्या लागतात. त्यांनी 100 जागा लढून 20 जागा जिंकल्या आहेत. संजय राऊत यांच्यावर थोडी राजकारण चालते का? असेही खासदार म्हस्के यांनी म्हटले.
स्वातंत्र्यादिनानिमित्ताने अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तीन डिजिटल उपक्रमांचा प्रारंभ भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाला. या उपक्रमांचा उद्देश नागरिकांशी थेट व तातडीचा संवाद अधिक मजबूत करणे आणि योजना अंमलबजावणीत पारदर्शकता वाढवणे हा आहे. ‘जिल्हाधिकारी कार्यालय – संवाद सेतू’ या सेवेमार्फत विविध विभागांच्या सेवा, आवश्यक कागदपत्रांची यादी व नजीकच्या सेतू केंद्रांची माहिती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने व्हॉट्सअॅपवर मिळणार आहे.
चिकन मटण विक्री बंदीविरोधात आज सकाळी विविध संघटनांकडून कल्याण-डोबिंवली महापालिकेसमोर विरोधकांकडून आंदोलन करण्यात आले. हातात निषेधाचे फलक, तसेच कोंबड्या घेत आणि या निर्णयाविरोधात घोषणा देत आंदोलनकर्ते, खाटीक संघटनेटेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली.
नवी दिल्ली: भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानीतील दोन्ही महाराष्ट्र सदनामध्ये निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोपर्निकस मार्ग स्थित आणि कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनामध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समूह राष्ट्रगीतासह राज्य गीताचे सादरीकरण आणि महाराष्ट्र सूरक्षा बलांचे पथसंचलन झाले.
शक्तीपीठ महामार्ग विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील बळीराजानं शेतातच तिरंगा फडकवला. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी तिरंगा फडकावून शक्तीपीठ नको आमच्या वावरात या टॅगलाईनखाली शक्तीपीठ महामार्ग ला विरोधी करण्यात येत आहे. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समितीच्यावतीने शेतात तिरंगा फडकवत अभिनव आंदोलन करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त आज मांसविक्रीबंदी करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात मांसविक्रीवरील बंदीमुळे तणाव निर्माण झाला आहे. मांसविक्री सुरू ठेवण्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
वाशिमचे पालकमंत्री, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासकीय इमारत येथे शासकीय ध्वजवंदन कार्यक्रम उत्साहात झाला. शहीद सैनिकांच्या पत्नी,पोलिस अधीक्षक, अधिकारी,कर्मचारी यांच्यासह जिल्ह्यातील नागरिक उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील प्रशासनात काम करणाऱ्या विविध अधिकारी,कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
देशाच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजवंदन केले. यावेळी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश पोलिसांकडून सलामी देण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात ज्योतिबा फुले यांचा उल्लेख केला. ते म्हणाले, महात्मा फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त आपण कार्यक्रम सुरू करणार आहोत. मागासवर्गीयांना प्राधान्य देऊन आपल्याला बदल घडवायचा आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, देश ‘सुदर्शन चक्र मिशन’ सुरू करणार आहे. हे सुदर्शन चक्र एक शक्तिशाली शस्त्र प्रणाली असेल, जी शत्रूचा हल्ला केवळ निष्फळ करणार नाही तर अनेक पटींनी जोरदार प्रत्युत्तरही देईल. आपण पुढील दहा वर्षांत सुदर्शन चक्र मिशनला प्रखरतेने पुढे नेऊ. या अंतर्गत २०३५ पर्यंत देशातील सर्व महत्त्वाच्या स्थळांना या राष्ट्रीय सुरक्षा कवचाखाली आणले जाईल. या सुरक्षा कवचाचा विस्तार सातत्याने होत राहील. देशातील प्रत्येक नागरिकाने सुरक्षित वाटावे, यासाठी मी २०३५ पर्यंत या राष्ट्रीय सुरक्षा कवचाचा विस्तार करण्याचा निर्धार केला आहे. म्हणूनच श्रीकृष्णांकडून प्रेरणा घेऊन आम्ही सुदर्शन चक्राचा मार्ग स्वीकारला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपण खूप वेगाने पुढे जायचे आहे. मी हे देशासाठी करत आहे, माझ्यासाठी करत नाही. कोणाचे वाईट करण्यासाठी करत नाही. "गेल्या दशकभरात भारताने सुधारणा केल्या, कामगिरी केली आणि परिवर्तन घडवून आणले आहे. पण आता आपल्याला आणखी मोठ्या ताकदीने पुढे जायचे आहे. अलीकडच्या काळात आम्ही अनेक सुधारणा केल्या आहेत त्यामध्ये एफडीआय, विमा क्षेत्रातील सुधारणा, आणि जागतिक दर्जाच्या विद्यापीठांना भारतात कार्य करण्यास परवानगी देणे यांचा समावेश आहे..."
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपल्या देशातील जनतेला आता स्पष्ट समजले आहे की सिंधु करार किती अन्यायकारक आणि एकतर्फी आहे. भारतातून उगम पावणाऱ्या नद्यांचे पाणी आपल्या शत्रूंची शेती सिंचन करत आले, तर माझ्या स्वतःच्या देशातील शेतकरी आणि जमिनी तहानलेली, पाण्याविना राहिली. हा असा करार होता ज्यामुळे गेल्या सात दशकांपासून माझ्या देशातील शेतकऱ्यांचे अमाप नुकसान झाले आहे. आता या पाण्यावरचा हक्क फक्त भारताच्या शेतकऱ्यांचा आहे..."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून भाषण करताना पाकिस्तानला इशारा दिला की अणुबाॅम्बची ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही. लष्कर त्यांच्या पद्धतीने उत्तर देईल. पाणी आणि रक्त वाहू देणार नाही. सिंधू प्रणालीच्या नद्यांवर फक्त भारताचा अधिकार.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग बाराव्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत आहेत. 2014 पासून पंतप्रधान मोदी यांनी सलग बाराव्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.