पटना उच्च न्यायालयाने काँग्रेसला मोठा दणका दिला आहे. काँग्रेसने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या स्वर्गीय आई हीराबेन मोदी यांच्यावरील कथित अपमानजनक AI व्हिडिओला न्यायालयाने तात्काळ हटवण्याचे आदेश दिले आहेत. 'न्यायालयाने स्पष्ट केले की, अशा प्रकारच्या बनावट व्हिडिओंमुळे समाजात दिशाभूल होते तसेच वैयक्तिक प्रतिष्ठेलाही धक्का पोहोचतो. पंतप्रधानांच्या कुटुंबीयांचा राजकारणात अपमान करण्याचा प्रयत्न हा निषेधार्ह असल्याचेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. या निर्णयामुळे काँग्रेसची अडचण वाढली असून न्यायालयाच्या आदेशानंतर व्हिडिओ हटवण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावर होते. जिजाऊ सृष्टी येथे नागरिकांनी त्यांना निवेदन दिल्यानंतर पवारांनी थेट जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना खडे बोल सुनावले. “चुकीची कामे खपवून घेऊ नका. कंत्राटदारांना वेळोवेळी सूचना करा, अन्यथा कारवाई करा. कामे दर्जेदार झाली पाहिजेत. मागचा पुढचा विचार करून कामांचा दर्जा वाढवा,” अशा शब्दांत पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावले. जिल्ह्यातील कामांमध्ये ढिलाई चालणार नाही, दर्जावर तडजोड होऊ देणार नाही, असा कडक इशाराही त्यांनी दिला.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. 26 लाख लाडक्या बहिणींना भाऊ असल्याचा विश्वास देऊन मतं मिळवली आणि सत्तेचा मलिदा खाल्ल्यावर अपात्र असल्याचा साक्षात्कार झाला, असा आरोप करत बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अॅड. हेमा पिंपळे यांनी आंदोलक केले. राज्यभरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असताना, तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत देण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे.
मुंबईतील शिवाजी पार्क इथल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाबरोबर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. हा प्रकार काल रात्री घडली असून, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस तपास करत आहे.
नक्षलवाद्यांशी संबंधित मोठी बातमी समोर आली असून, नक्षलवादी शस्त्रे सोडण्यास तयार आहेत. यासंदर्भात नक्षलवादी संघटनेचे प्रवक्ते अभय यांनी निवेदन जारी केले आहे. शस्त्र सोडून शांततेच्या मार्गाने चर्चेसाठी नक्षलवाद्यांनी एक महिन्यांचा वेळ मागितला आहे. व्हिडिओ काॅलद्वारे सरकारशी बोलण्यास तयार आहे. यासाठी एक महिन्याची युद्धबंदीची मागणी केली आहे. तसंच नक्षलवाद्यांनी शस्त्रसंधीवर लोकांची मत मागवली असून, यासाठी ई-मेल आयडी जारी केला आहे.
लातूरमध्ये धक्कादायक घटना घडली. जन्मदात्या बापालाच स्वतःच्या मुलाने जीव संपवला आहे. पोलिस भरतीसाठी पैसे दिले नाही. पण घरातील सिलिंडरसाठी पैसे दिले, या रागातून मुलाने हे कृत्य केल्याची पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे. लातूरच्या चाकूर तालुक्यातील हिंपळनेर इथं ही घटना घडली आहे. काशिनाथ पांचाळ (वय 70) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून, मुलगा अजय (वय 24) याने लाकडाने बेदम मारहाण केली होती.
कल्याण चिंचपाडा परिसरात जमिनीच्या वादातून एक व्यक्तीवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. दिपक म्हात्रे असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते केडीएमसी कर्मचारी आहेत. सहा हल्लेखोरांनी कोयता आणि तलवारीने दिपक म्हात्रे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. जमिनीच्या वादातून सुपारी देऊन हल्ला घडवून आणल्याचा त्यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर टीका केली आहे. राज ठाकरेंनी भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून अमित शहा आणि जय शहा यांच्यावर व्यंगचित्रातून टीका केली. पहलगामच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांचा आणि क्रिकेट सामन्याचा संदर्भ देत नेमकं कोण जिंकलं, असा सवाल राज ठाकरेंनी केला. राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंटवरुन एक व्यंगचित्र पोस्ट केले आहे. या व्यंगचित्राद्वारे राज ठाकरे यांचे पुन्हा फटकारे मारले आहेत.
मराठा कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करतात, कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांनी न्यायालयात हा निर्णय टिकेल किंवा नाही याची माहिती नसल्याचं वक्तव्य केलं. मंत्री झिरवळ हे हिंगोलीचे पालकमंत्री आहेत. मराठा समाजाला दिलेलं कुणबी जातीचं प्रमाणपत्र हे कायद्यात बसेल किंवा नाही सांगू शकत नाही, असं मंत्री झिरवळांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त अजित पवार बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. अजितदादांचा ताफा ध्वजारोहणासाठी पोलिस मैदानाकडे जात असताना, दोन युवकांनी त्यांच्या ताफ्याच्या समोर येत अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेतला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत या दोघा युवकांना ताब्यात घेतले. केज तालुक्यातील कुंभेफळ इथले हे युवक आहेत. कुंभेफळ ग्रामसभेची चौकशी करून कारवाईची प्रमुख मागणी आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेदरम्यान, ओबीसींवर अन्याय करू नका, असे म्हणत काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. यावेळी त्यांचं भाषण सुरू होताच काही लोकांनी जोरदार घोषणाबाजीला सुरूवात केली. त्यामुळे काहीकाळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा सुरू करण्याचे आदेश विशेष सत्र न्यायालयाने दिले आहेत. यामुळे आता भुजबळांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे मानहानी प्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयात आजपासून सुनावणी सुरू होणार आहे. कोकाटे यांनी विधिमंडळ अधिवेशनात रमी खेळल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी व्हायरल केला होता. या प्रकरणी कोकाटेंनी रोहित पवारांना नोटीस बजावली होती. नोटीसच्या माध्यमातून आठ दिवसात माफी मागण्याचा रोहित पवारांना इशारा दिला होता. मात्र, या नोटीसकडे रोहित पवारांनी दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर मानहानी दावा दाखल करण्यात आला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरातील डॉ. हेडगेवार चौकात स्वच्छता अभियान सुरू करण्यात आलं आहे. भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात हे अभियान सुरू करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने नागपूर शहर भाजप कडून 111 ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केल्यानंतर हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले. त्यानंतर जरांगेंच्या मागणीनुसार राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटचा जीआरही काढला. मात्र, या आंदोलनादरम्यान पाच मराठा आंदोलकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या आंदोलकांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी 25 लाखांची आर्थिक मदत दिली आहे. प्रत्येक मयत आंदोलकाच्या कुटुंबियांना त्यांनी पाच लाखांची मदत केली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांत 'चलो जीते है' हा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट देशभरातील लाखो शाळांमध्ये आणि काही चित्रपटगृहांमध्ये दाखवण्यात येणार आहे. 2018 मध्ये रिलिज झालेला हा चित्रपटात स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या मोदींच्या बालपणावर आधारित आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 75वा वाढदिवस आहे. या निमित्ताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबतची माहिती मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. या पोस्टमधून त्यांनी ट्रम्प यांचे आभार मानले आहेत.
Thank you, my friend, President Trump, for your phone call and warm greetings on my 75th birthday. Like you, I am also fully committed to taking the India-US Comprehensive and Global Partnership to new heights. We support your initiatives towards a peaceful resolution of the…
— Narendra Modi (@narendramodi) September 16, 2025
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.