
महाराष्ट्रातील मतदारयाद्यांत मोठा घोळ असल्याचा आरोप केलेल्या सीएसडीएसचे प्रमुख संजय कुमार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यानंतर निवडणूक आयोगानं आरोपांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. आता त्यांच्याविरोधात नाशिक व नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपप्रणित एनडीएने उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी दिलेल्या सी.पी. राधाकृष्णन यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट शेअर केली आहे. ज्यात मोदींनी, राधाकृष्णन हे एक उत्कृष्ट उपराष्ट्रपती असतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र शासनाने 12 ऑगस्ट रोजी 15631 पदांची पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला होता. त्या भरती प्रक्रिया संदर्भात मोठी अपडेट आली आहे. गृह विभागानं पोलीस शिपाई आणि कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी क्रांती दिनाचे औचित्य साधत ओबीसी मंडल यात्रा सुरू केली. यामुळे त्यांच्यावर महायुतीच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे. अशातच भाजपच्या एकेकाळचा मित्र पक्ष असणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाने शरद पवारांसाठी ढाल बनून उत्तर दिले आहे. माजी मंत्री महादेव जानकर यांनी पलटवार करताना, OBC हिताचा निर्णय पवारांनीच घेतला, असे सुनावले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्यायविभागाचे मंत्री संजय शिरसाठ यांच्याविरोधात गंभीर आरोप केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. शिरसाट यांनी पाचशे कोटी रुपयांच्या जमीन घोटाळा केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रोहित पवारांना चांगलेच फटकारले आहे. त्यांना पुरावे देण्याच्या सूचना केल्या आहेत. यावरून रोहित पवारांना पलटवार केला असून आपल्यालाही याबाबतचे सर्व पुरावे दिले जातील. आपण अभ्यासू आहात हे मान्य करतो, असे म्हणत टोला लगावला आहे.
बेस्ट पतपेढीच्या निवडणूकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी युती केली होती. पहिल्याच निवडणुकीत या युतीला तोंडावर पडावे लागले असून भोपळाही फोडता आलेला नाही. युतीचा एकही उमेदवार विजयी झालेला नाही. आता या पराभवावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं असून त्यांनी, अशाप्रकारच्या पतपेढीच्या निवडणूकीचे राजकीयकरण करायचे नसत. मात्र ठाकरे बंधुंनी राजकारण केलं.
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. राज्यातील पूर परिस्थितीमुळे या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. तर त्या 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबतची शासनाने परिपत्रक काढून दिली आहे.
मिरा-भाईंदरचे माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते गिल्बर्ट मेंडोसा यांचे निधन झाले आहे. एकीकडे दुःखाचे वातावरण असताना शिवसेना शिंदे गटाकडून चक्क भव्य मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावरून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
गंभीर गुन्हेगारी प्रकरणात अटक झाल्यास पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री किंवा मंत्री यांना पदावरून काढून टाकण्यासाठी केंद्र सरकार कायदा करणार आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत ३ विधेयके सादर केली. तिन्ही विधेयकांविरुद्ध लोकसभेत प्रचंड गोंधळ झाला. खासदारांनी तिन्ही विधेयकांच्या प्रती फाडत थेट अमित शाहांच्या अंगावर फेकल्या. त्यामुळे आणखी गदारोळ वाढला. लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी ससंदेचं काम स्थगित केलं.विरोधकांनी तिन्ही विधेयके मागे घेण्याची मागणी केली.
मुंबई भाजपचा अध्यक्ष आशिष शेलार यांनी बेस्टची निवडणूक जिंकताच शशांक राव, प्रसाद लाड यांच्यावर महत्वाची जबाबदारी दिली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या स्टार प्रचारकांची मोठी यादी जाहीर होईलच, पण स्टार प्रचारक म्हणून शशांक राव आणि प्रसाद लाड यांची नावे मी आज जाहीर करत आहे. या दोघांनीच बेस्ट च्या निवडणुकीत या दोन्ही भावांच्या पक्षाला मुंबईकरांचा आशीर्वाद कुठे आहे हे दाखवून दिले. मी या दोन्ही पक्षांना सांगतो की, आधी या दोघांशी निपटा आणि मग माझ्याकडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या.’
नाशिकमध्ये गोदावरी नदीला पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नदीपात्रातील पाणी पातळी वाढली असून रामकुंड व गोदाघाट परिसरातील मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा बसला आहे. दुतोंड्या मारुती मंदिरापर्यंत पाणी पोहोचले असून दुपारनंतर धरणातून विसर्ग आणखी वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने आवश्यक उपाययोजना सुरू केल्या असून नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत झालेल्या जोरदार पाऊसमुळे शहरातील अनेक भागात दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी साचले. या पावसामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. यातच अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील ‘प्रतीक्षा’ बंगल्याजवळील परिसरात साचलेले पाणी दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पावसामुळे शहरातील वाहतूक ठप्प झाली असून दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम झाला. प्रशासन आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरात सतत पाऊस सुरू असून, जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. कोयना धरणाचे सर्व वक्र दरवाजे 13 फूट उचलून दर सेकंदाला 95 हजार 321 क्यूसेक पाणी सोडले जात आहे. यामुळे कोयना व कृष्णा नदींची पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कराड शहरातील कृष्णाबाई मंदिर आणि मारुती मंदिर पाण्याखाली गेले आहेत. धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्याचे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची आढावा घेतला.
पुणे : पुण्यातील एकता नगर परिसरात काल मध्यरात्रीपासून पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. रात्री एक वाजता धरणातून वाढविण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे परिसरातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे. पाण्याचा दाब वाढू नये आणि पाणी इतर भागात न पसरता नियंत्रणात राहावे यासाठी पुणे महापालिका सतर्कतेने काम करत आहे. महापालिकेच्या आपत्कालीन पथकांना सतत तयारीत ठेवण्यात आले असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, सुरक्षिततेसाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
भांडुपमध्ये भर पावसात प्रवास करताना 17 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दीपक पिल्ले असे या मुलाचे नाव असून तो एल. बी. एस. मार्गावरून घरी परतत असताना पन्नालाल कंपाऊंड परिसरात उघड्या हाय टेन्शन वायरच्या संपर्कात आला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दीपकने कानात हेडफोन घातले होते. नागरिकांनी त्याला इशारा दिला मात्र तो ऐकू न आल्याने अपघात झाला. विजेचा जोरदार शॉक लागल्याने दीपकचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पुणे जिल्ह्यासह राज्यातील काही भागांसाठी हवामान विभागाने आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन तासांत अहमदनगर, पुणे, रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सतत बदलत्या हवामानामुळे दरड कोसळणे, पाणी साचणे यासारख्या घटना होऊ शकतात, त्यामुळे अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्लाही दिला आहे.
पुण्यात मुसळदार पावसाला सुरूवात झाली आहे. या पावसामुळे पुण्यातील सर्व धरणं भरली आहेत. अशातच आता खडकवासला धरणातून 39 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या पाण्यामुळे एकता नगर परिसरात पाण्याची पातळी वाढली आहे. खबरदारी म्हणून अग्निशमन दलाच्या गाड्या या परिसरात दाखल झाल्या आहेत.
दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. कारण या निवडणुकीत ठाकरे ब्रँडला एकही जागा मिळालेले नाही. शशांक राव यांच्या पॅनलचे 14 तर महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार विजयी झालेत. या निकालानंतर आता भाजपने ठाकरे बंधूंवर हल्लाबोल सुरू केला आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं की, एकाकडे गमावण्यासाठी काही राहिलेले नाही आणि दुसऱ्याकडे कमावण्यासाठी काही राहिलेले नाही, अशा ‘दोन शून्यां’ची बेरीज केली आणि त्यावर कितीही शून्ये जोडली तरी त्या गणिताचे उत्तर शून्यच येते, हे शाळा न शिकलेल्या मुलांनाही माहीत असलेले उत्तर ओळखले नाही तर काय होईल? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ‘बेस्ट कामगार पतपेढी’च्या निवडणूक निकालाकडे पाहा! कालपर्यंत दोन शून्ये आपली किंमत जोखण्याचे आव्हान देत होती, आज त्यांनाच त्यांची किंमत कळली आहे!!"
यंदाच्या हंगामातील मुसळधार पावसामुळे पुण्यातील चारही धरणे 100 टक्के भरली आहेत. सर्व धरणं शंभर टक्के भरण्याची ही पहिलीच वेळ आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर ही चारही धरणे शंभर टक्के भरल्यामुळे पुणेकरांची पाण्याची काळजी मिटली आहे. दरम्यान, मागील तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून 39 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या सरकारी बंगल्यावर जनता दरबार सुरू असताना त्यांना एका व्यक्तीने थप्पड मारल्याची आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
कोकण, ठाणे, पालघर सहित राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थिती जाणून घेतली. आपत्ती नियंत्रण कक्षातील यंत्रणा संपूर्णपणे सज्ज असून कोणत्याही परिस्थितीत तात्काळ मदत पोहचवली जात आहे. अतिवृष्टीमुळे जीवितहानी झाल्यास किंवा जनावरांची हानी झाल्यास जिल्हाधिकारी स्तरावर तात्काळ मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
पुणे–लोणावळा या उपनगरीय रेल्वे मार्गावर तिसरी व चौथी मार्गिका उभारणीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे औद्योगिक, निवासी व व्यावसायिक विकासाला नवी गती मिळेल. वाहतूक कोंडीतून सुटका होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचा जनता दरबार सुरू असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. व्यक्तीने तक्रारीचा बहाणा करत काही कागदपत्रे दाखवत रेखा गुप्ता यांच्या जवळ आला आणि त्यांच्यावर हल्ला केला. संबंधित व्यक्ती हा एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे समोर येत आहे. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
दी बेस्ट एम्प्लाॅईज को-ऑप क्रेडिट सोसायटी ली.पंचवार्षिक निवडणूक सोमवारी पार पडली होती. या निवडणुकीचा निकाल बुधवारी पहाटे जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे-राज ठाकरेंच्या पॅनलचा दारुण पराभव झाला तर शशांक राव यांच्या पॅनेलला विजय झाला आहे. त्यांनी 21 पैकी 12 जागा जिंकल्या.
पुढील दोन दिवस देखील पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे सातार जिल्ह्यातील पाटण, जावळी, वाई, महाबळेश्वर, कराड, सातारा या सहा तालुक्यांतील शाळांना आज बुधवार (ता.20) आणि उद्या गुरुवार (ता.21) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर, रायगड जिल्ह्यात देखील रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे आज रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. पालघरमध्ये देखील पावसाचा जोर कायम असून पालघरसह ठाणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर, सांगली, लोणावळा परिसरातील देखील शाळांना सु्ट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.