Maharashtra Political Live Updates : पाच दिवसांच्या आंदोलना दरम्यान मुंबईत सार्वजनिक मालमत्तेच्या झालेल्या नुकसान भरपाईचे काय? उच्च न्यायालयाने जरांगेंना विचारले..

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama

मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पाच दिवस बेमुदत उपोषण केले. आता आंदोलन संपले असले तरी या पाच दिवसाच्या आंदोलनादरम्यान मुंबईत सार्वजनिक मालमत्तेचे जे नुकसान झाले आहे, त्यांच्या भरपाईचे काय? अशी विचारणा उच्च न्यायलायाने आंदोलक मनोज जरांगे पाटील व आयोजकांना केली आहे. या संदर्भात प्रतिज्ञा पत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

Cabinet News : दिव्यांगांना मिळणाऱ्या रकमेत थेट 1000 रुपयांची वाढ

अनुसूचित जमातीतील नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना केंद्राची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू होणार आहे. तसेच श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधा योजनेअंतर्गत दिव्यांगांना मिळणाऱ्या रकमेत थेट 1000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या दृष्टीने मराठा व्यक्तीला कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा दाखला मिळावेत यासाठी नवा जीआर काढला. त्यानंतर आता ओबीसींसाठीही सरकारने एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ नये यासाठी मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीप्रमाणेच समिती आसावी असा सरकारचा विचार होता. ओबीसींच्या न्याय, हक्कांसाठी एक समिती असावी असे सरकारचे मत होते. अशी समिती स्थापन करण्याची मागणी अगोदरच मान्य झाली होती. आता ही समिती स्थापन करण्यात आली आहे.  

Atul Save :ओबीसींची समजूत काढण्यासाठी मंत्री अतुल सावे नागपूरला जाणार..

महाराष्ट्र सरकारचे मंत्री अतुल सावे यांनी ओबीसी समाजाच्या आंदोलकांशी भेटण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर ओबीसी समाजातही असंतोष निर्माण झाला आहे आणि त्यांचे साखळी उपोषण सुरू आहे. मंत्र्यांना कॅबिनेट बैठक संपल्यानंतर नागपूरला जाण्याची सूचना देण्यात आली आहे. ओबीसी समाजाच्या मागण्या समजून घेण्यासाठी आणि समजुती निर्माण करण्यासाठी ही भेट आयोजित करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर ओबीसी समाजाची नाराजी अधिक तीव्र झालेली दिसते. 

Devendra Fadnavis :मुख्यमंत्री नागपूरात ओबीसी आंदोलकांची भेट घेणार!

 नागपूरमध्ये ओबीसी समाजाने आंदोलनाला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून आंदोलक उपोषण करत आहेत. अशातच आता या आंदोलनाबाबत सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनाची दखल घेतली आहे. उद्या म्हणजेच गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस आंदोलकांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी मुख्यमंत्री ओबीसी नेते तायवाडे यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहेत. या चर्चेतून काय समोर येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

'पक्षाची भूमिका स्पष्ट आहे आरक्षण मिळालंच पाहिजे, पण...' : तटकरे

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सरकारने मार्गी लावला असतानाच ओबीसी भडकले आहेत. ओबीसी नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असून राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीच्या कॅबिनेट बैठकीला दांडी मारली. त्यामुळे ते या निर्णयावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. अशातच प्रदेशाध्य तथा खासदार सुनील तटकरे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता ही पक्षाची भूमिका आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला भुजबळ साहेब नव्हते याची कल्पना नाही. तर आता ओबीसी आरक्षणाला धक्का लागतोय की नाही यावर अभ्यास करावा लागेल एक दोन दिवसात तेही स्पष्ट होईल असे म्हटले आहे.

मोठी बातमी! जरांगेंचे आंदोलन मिटताच OBC नेते आक्रमक, थेट मराठी आरक्षणाचा GRचं फाडला, राज्यव्यापी आंदोलनाची हाक?

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या निर्णयामुळे ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाचा जीआर फाडत आपला संताप व्यक्त केला आहे. याचवेळी ओबीसी नेते प्रकाश सोळंके यांनी राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती दिली आहे.

आम्हालाही हैदराबाद गॅझेटिअर लागू करावा; बंजारा ब्रिगेडचे रविकांत राठोड यांची मागणी

मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागल्यानंतर आता ओबीसी आणि बंजारा समाज उठून बसला आहे. या दोन्ही समाजांनी आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यादरम्यान बंजारा समाजानेही आम्हालाही हैदराबाद गॅझेटिअर लागू करावा अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. राज्यात सध्या VJNT प्रवर्गामध्ये बंजारा समाजाला आरक्षण मिळतं. जर हैदराबाद गॅझेटिअर लागू केले तर एसटी प्रवर्गामध्ये बंजारा समाजाचा समावेश होईल, त्यामुळे राज्य सरकारने याचा तातडीने विचार करावा आणि न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

नगरसेवक निलंबनाबाबत आ. राणेंची सावध भूमिका

कुडाळ नगरपंचायतमधील सत्ताधारी भाजपचे आठ पैकी सहा नगरसेवकांचे भाजप जिल्हाध्यक्षांनी निलंबन केलं आहे. याबाबत आमदार निलेश राणे यांना विचारले असता त्यांनी, सावध भूमिका घेतली आहे. नगरसेवकांच्या निलंबनाचे अधिकृत जाहीररित्या स्टेटमेंट कुणी दिलं असेल तरच त्याबाबत मी बोलू शकतो, अन्यथा नगरसेवकांच्या निलंबनाबाबत मी बोलण्यास बांधील नाही, असे म्हणत त्यांनी बोलणं टाळलं आहे.

देशात मुदतपूर्व निवडणूक, तयारीला लागा, हर्षवर्धन सपकाळांचे कार्याकर्त्यांना आवाहन

भाजपने केलेली मतचोरी उघड झाली आहे. याचे सरकाराला याचे उत्तर द्यावेच आणि मोदी सरकारला पाय उतार व्हावेच लागणार असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. तसेच त्यांनी देशात मुदतपूर्व निवडूक होणार असल्याचे सांगत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले.

'ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही', भुजबळांची नाराजी दूर करू : एकनाथ शिंदे

मनोज जरांगे पाटील यांनी सलग पाच दिवस उपोषण केल्यानंतर सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करत थेट जीआर काढला. यावर राज्यातला ओबीसी समाजात आता संतापाची लाट उसळली आहे. ओबीसी नेत्यांनी या निर्णयाला विरोध केला असून न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. यावेळी ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. यावरून ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. भुजबळ नाराज असतील, तर त्यांना समजावून सांगू, त्यांची नाराजी दूर करू असे एकनाथ शिंदे म्हटले आहे.

कोल्हापूर महापालिकेतील प्रारूप प्रभाग रचना जाहीर

कोल्हापूर शहरातील अनेकांचे लक्ष लागून राहिलेल्या महापालिकेतील प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. पण प्रभाग रचना जाहीर होताच महानगरपालिकेचे संकेतस्थळ डाऊन झाले आहे. यामुळे अनेकांची महापालिकेत धावाधाव पाहायला मिळत आहे.

मराठा आंदोलकांनी मुंबई सोडण्याआधीच पोलिसांचा दणका; दाखल केले 9 ठिकाणी गुन्हे

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण यशस्वी आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारने 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. तसेच मुंबई सोडण्याचे आदेशही मराठा आंदोलकांना दिले. यानंतर मात्र मुंबई पोलिसांनी मराठा आंदोलकांवर मोठी कारवाई केलीय. मुंबईत आलेल्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले.

आगामी सांगली महापालिका निवडणुक ताकतीने लढवणार : विश्वजीत कदम

आगामी सांगली महापालिका निवडणुक ताकतीने लढवली जाईल,असा विश्वास काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी घेतलेल्या बैठकीत त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. यावेळी खासदार विशाल पाटील आणि काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना कामाला लागावे,असं आवाहन आमदार विश्वजीत कदम यांनी केले आहे.

पवार कुटुंबियांनी ओबीसींचे आरक्षण संपवलं, लक्ष्मण हाके यांचे गंभीर आरोप

सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करत थेट जीआर काढला आहे. यानंतर आता ओबीसींचा विरोध वाढला असून रोषही वाढला आहे. दरम्यान ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी पवार कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी, पवार कुटुंबियांनी ओबीसींचे आरक्षण संपवलं असा आरोप केला आहे.

ओबीसी समाजाला दिलासा देण्याचा प्रयत्न

राज्य सरकरकडून ओबीसी समाजाला दिलासा देण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारकडून ओबीसी समाजासाठी उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत सरकारमधील तीन मित्र पक्षाचे प्रत्येकी दोन मंत्री आणि दोन अधिकारी सदस्य असणार आहेत.

हैदराबाद गॅझेटचा जीआर देण्यात आल्याने व्यक्त केली नाराजी

मराठा आरक्षण आंदोलनावेळी मनोज जरांगे यांना राज्य सरकरकडून हैदराबाद गॅझेटचा जीआर देण्यात आला. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला असून ते या बैठकीस हजर राहणार नाहीत.

भाजप दुतोंडी मांडुळ

भाजप हा दुतोंड्या गांडूळासारखा पक्ष आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. ते म्हणाले, ज्या वेळी मनोज जरांगे पाटील मुंबईत आले त्यावेळी भाज नेत्यांची भाषा वेगळी होती. ते अगदी हीन शब्दात त्यांच्याबद्दल बोलत होते. पंतप्रधान मोदींनी ती भाषा ऐकायला हवी होती.

गणेशविसर्जनावेळी मुळशीतील तरुण बुडाला

पिरंगुट- हिंजवडी मार्गावरील भरे पूल येथे मुळा नदीच्या किनाऱ्यावर गणेशविसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. हा मुलगा एका खाजगी हॉस्पिटलमध्ये कर्मचारी म्हणून काम करत होता. लक्ष्मण हनुमंत चव्हाण असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे.तो मूळचा उदगीर तालुक्यातील असून सध्या तो पिरंगुट येथे राहत होता.

इलेक्टिक वाहनांना टोलमाफी 

राज्यातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला व वाहनधारकांना चालना देण्यासाठी टोल नाक्यावर टोलमाफी देण्याची धोरण CM देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने घेतले होते. त्यानुसार २१ ऑगस्ट पासून अटल सेतू सह मुंबई -पुणे द्रुतगती महामार्ग तसेच समृद्धी महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी करण्यात येत असल्याची अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे.

जीएसटी कौन्सिलची आज बैठक!

आज (बुधवार) जीएसटी कौन्सिलची बैठक होणार आहे. यामध्ये २ टॅक्स स्लॅब रद्द होण्याची शक्यता आहे. कपडे, शूज, कारच्या किंमती कमी होणार आहे. या बैठकीत १२ आणि २८ टक्के जीएसटी स्लॅब रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारच्या जीआरविरोधात ओबीसी नेते कोर्टात जाणार

सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात हैद्राबाद गॅझेटचा जीआर काढला आहे. या जीआर विरोधात ओबीसी संघटना एकवटल्या असून या जीआरला त्या न्यायालयात आवाहन देणार आहेत.

पुणे महापालिकेच्या प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर आज एका दिवसात ७८५ हरकती नोंदविल्या गेल्या आहेत. गेल्या १० दिवसात केवल ५९५ हरकती व सूचना नोंदविल्या गेल्या होत्या. पण एका दिवसात त्याच्या दुप्पटीपेक्षा जास्त हरकतींचा पाऊस पडला आहे. पुणे महापालिकेची निवडणूक जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

170 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा

 सोलापूरमध्ये प्रशिक्षणार्थी पोलीसांना अन्नातून ही विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. बाधित प्रशिक्षणार्थींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी संध्याकाळी दरम्यान काल सायंकाळच्या सत्रात या प्रशिक्षणार्थींना उलटी, जुलाब, मळमळ याचा त्रास सुरू झाला त्यानंतर जवळपास 170 पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मनोज जरांगे पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत मराठा आरक्षणासाठी पाच दिवसांचे उपोषण केले. मंगळवारी सरकारने जीआर काढल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. मात्र उपोषण काळात त्यांची प्रकृती ढासळली होती. त्यामुळे संभाजीनगरमधील गॅलॅक्सी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com