मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलनानंतर अखेर हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलं आहे. यावरून ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. अशातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी हैदराबाद गॅझेटसह मराठा आरक्षणावर मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी, ओबीसी समाजाला आधीच आरक्षण कमी मिळालं आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको, असे म्हटलं आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधीच धाराशिवमध्ये पारंपरिक विरोधक आमने-सामने आले आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यातील वादामुळे राजकारण तापण्याची शक्यता असून राणा पाटलांचे सुपुत्र मल्हार पाटील यांनी मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत.
दिल्लीतील एका न्यायालयानं अदानी एंटरप्रायझेस संदर्भात बदनामीकारक मजकूर पत्रकारांचा गट, कार्यकर्ते आणि विदेशी संबंध असणाऱ्या संस्थांना प्रकाशित करण्यास मनाई केली आहे. याबाबत न्यायालयानं शनिवारी आदेश काढला असून वरिष्ठ सत्र न्यायाधीश अनुज कुमार सिंग यांनी याबाबचे आदेश दिले आहेत.
मला तर सांगायला लाज वाटते, बीड जिल्ह्यामध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का? हे सांगा, असा प्रश्न उपस्थित करणारे माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जोरदार प्रत्युतर दिले आहे. दोष हा नाव, आडनाव आणि समाजामध्ये नसतो. तो कर्मामध्ये असतो. एक धनंजय मुंडे आणि दुसरे तुकाराम मुंडे कसे आहेत बघा. त्यांच्याकडून काहीतरी शिका. या वादात समाजाला खेचू नका, असा सल्लाही अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंना दिला.
ओबीसी समाजाच्या हक्कासाठी देवेंद्र फडणवीस यांनी जेवढे सोसलं आहे, ते अन्य कुणी सोसलं नाही. त्यांच्यावर झालेले शाब्दिक, वैचारिक आणि व्यक्तिगत हल्ले किंवा त्यांना आजपर्यंत केलं गेलेलं टार्गेट हे ओबीसीच्या हक्काचे रक्षण करताना केलं गेलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला न्याय देताना ओबीसी समाजाच्या हक्कावर कुठलीही गदा येणार नाही, अडचण येणार नाही. यासाठी आश्वस्त केले आहे, असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटले आहे.
बिहारप्रमाणेच देशभरातील मतदारयाद्यांचा फेरआढावा घेण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबत दहा सप्टेंबर रोजी बैठक बोलावली आहे. सर्व राज्यातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे. एक जानेवारी २०२६ ही तारीख गृहीत धरून मतदारनोंदणीही होणार आहे. त्यामुळे फेरआढाव्यात किती मतदार कमी होणार किंवा वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे आज (ता. ०७ सप्टेंबर) बीड दौऱ्यावर आहेत. बीडच्या मांजरसुंबा येथे मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमनेसामने आले होते. ओबीसी कार्यकर्त्यांनी वाल्मिक कराडच्या नावाने घोषणाबाजी केली. ओबीसी आणि मराठा समाजाच्या कार्यकर्त्यामध्ये या वेळी हमरीतुमरीही झाल्याचे दिसून आले. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून ही परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यार जोरदार टीका केली आहे. हाक्या तुझी केसं मात्र नकली आहेत हे सलून वाल्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. तुझी अवस्था पिसाळलेल्या कुत्र्यासारखी झाली आहे, हे तुझ्या एकंदरीत मीडियाशी बोलताना लक्षात येतंय .तूर्तास माझ्या मुळ प्रश्नाचं उत्तर दे. तू OBC नेता कधी झाला व ड्रायव्हरचा पगार कधी देतोस इतकंच, अशी टीका अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियातून केली आहे.
राज्यात गणेश विसर्जनाच्या विविध घटनांमध्ये ५ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली असून ११ व्यक्तींचे शोध सुरु आहेत. प्रशासनाकडून एनडीआरएफ आणि एसडीआरएफ यांना आपत्कालीन परिस्थितीकरता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा, मुंबई येथील प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार पालघर जिल्हा आणि नाशिक घाट परिसरास आज पावसाचा #ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 7, 2025
नंदुरबार, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, चंद्रपूर, गडचिरोली, रागगड हे जिल्हे… pic.twitter.com/e5vgtJvmUS
मुंबईतील लालबागच्या राजाचं विसर्जन रात्री १०.३० वाजल्यानंतर होणार असल्याची माहिती आली आहे. अरबी समुद्रात भरती असल्याने गणेशमुर्ती तराफ्यावर चढविण्यात अडचणी येत आहेत. भरती कमी होईपर्यंत अडथळे येणार असल्याने आता ओहोटीची वाट पाहावी लागणार आहे.
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक पूर्ण झाली आहे. नुकतेच अखेरच्या गणेश मंडळाचे अलका टॉकीज चौकात आगमन झाले आहे. ही मिरवणूक तब्बल ३१ तास चालली.
मुंबईतील लालबागचा राजा गणपतीचे विसर्जन अजूनही झालेले नाही. गणेशमुर्ती तराफ्यावर चढविण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे विसर्जनासाठी सायंकाळी सहा वाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे पुण्यातील विसर्जन मिरवणूक अजूनही सुरूच आहे. त्यामुळे मिरवणुकीचा मागील काही वर्षांतील विक्रम मोडित निघाला आहे.
अवैध वाळू अथवा मुरूम माफीयांना सोडले जाणार नाही, हा माझा शब्द आजही कायम असून त्याचमुळे कुर्डू येथे मुरूम माफियांवर कारवाई झाली आणि गुन्हे दाखल झाल्याचे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले आहे. अशा अवैध माफियांच्या सोबत सरकारमधले कोणीही पाठीशी उभे राहणार नाहीत, असे ठामपणे सांगत यापुढेही अशा कारवाया केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आज वाळू व मुरूम माफी यांच्याबाबत कठोर भूमिका घेताना अप्रत्यक्षपणे सरकार आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या पाठीशी असल्याचे संकेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत.
देवेंद्र फडणवीस हे वंचितांचे ओबीसींचे नेते नाही तर मराठ्यांचे पण नेते आहेत. त्यांनी ओबीसी विरोधी भूमिका घेतली नाही. फडणवीस यांनी कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलं आहे, हिमालयासारखे नेते फडणवीस आहेत, राजकारणासाठी त्यांनी समाजाचा वापर केला नाही, त्यामुळे आरक्षणासाठी कोण बोलत असेल त्याकडे दुर्लक्ष करा, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिंवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं आहे.
गणेशोत्सवानंतर संघर्ष यात्रा काढण्याची घोषणा ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केली आहे. त्यांनी राजकीय नेत्यांना या निर्णयाबाबत पुनर्विचार करण्याचे आवाहन केले. या प्रश्नासाठी कायदेशीर लढाईबरोबरच रस्त्यावरील आंदोलनाचाही इशारा दिला आहे. या निर्णयाने ओबीसी आणि भटके विमुक्त समाजावर होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष वेधले आहे. राजकीय नेते या प्रश्नाबाबत मौन बाळगत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे, तुम्ही दहा टक्के मतांच्या बेरजेसाठी या गोष्टी करत असाल तर 50 टक्के मतं वजा झालेली असतील. तुमचा डीएनए ओबीसीचा आहे असं सांगितलं, मात्र तो दिसून येत नाही," अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. हाके यांनी स्पष्ट केलं की हे प्रकरण कोर्टात जाणार असून, सुनावणी सुरू होईपर्यंत पंचायतराज निवडणुका होतील. हे सगळं निवडणुकीसाठी केलं जात आहे का? या जीआरला तातडीने स्थगिती मिळाली पाहिजे, अशी मागणी प्रा. लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेऊ नये. शरद पवार यांचा वारसा सांगू नये. अजित पवार तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोभता. यूपीएससी झालेल्या अधिकाऱ्याला दम देणे शोभत नाही त्यांनी भाषा सुधारावी. जर ते होत नसेल तर यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेऊन नका. अजित पवार तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर वगैरे कळणार नाही, तुमची ती कुवत किंवा लायकी नाही. तुम्हाला कारखाना चालवण्याशिवाय दुसरं काय जमतं?, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
मराठा समन्वयक आणि अभ्यासक डॉ. संजय लाखे पाटील यांनी मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली आहे. "मराठा आरक्षण हा जगन्नाथाचा रथ आहे, पण जरांगेंना वाटतं की हा रथ मी एकटाच ओढतोय.मनोज जरांगे स्वतःचे महत्व वाढवण्यासाठीच आंदोलन करतात. ते समस्त मराठा समाजाचे नव्हे तर कुणबी समाजाचे नेतृत्व करत आहेत. जरांगेंची एकही मागणी वैध, कायदेशीर, घटनात्मक आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे या पद्धतीची नाही. त्यांना कायदा आणि शासन आदेश यातला फरकच कळत नाही.
मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर असणार आहे. पुणे जिल्ह्यातील सासवडमध्ये भिवडी गावात आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहे. हुतात्मा उमाजी नाईक विद्यालयात हा कार्यक्रम होत आहे. भिवडी गावात आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक समाधी स्थळावर मुख्यमंत्री अभिवादन करतील.
सरकारने मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या जीआर संदर्भात हायकोर्टात कॅव्हेट दाखल करण्यात आलं आहे. शासन निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं. त्यामुळे मराठा समाजाची बाजु ऐकल्याशिवाय सुनावणी न करण्याची विनंती दाखल कॅव्हेट मधून करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या बीड येथील समर्थकाने हे कॅव्हेट दाखल केले आहे.
26 तासांपासून पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुका सुरु आहेत. पुणे पोलिस देखील गणपती मंडळांपुढे हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहेत. नियोजन करूनही पुण्यातील विसर्जन मिरवणूक रेंगाळली असून अलका टॉकीज चौकात गर्दीच्या ठिकाणी फटाके उडवण्यात आले. एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या पुरंदर दौऱ्यावरती आहे. परंतु या दरम्यान ओबीसी बांधवांनी त्यांना घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. धनगर समाजावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी ओबीसी समाजाने केली आहे. अन्यथा मुख्यमंत्र्यांना घेराव घालू असा इशारा ओबीसी समाजबाधंवांनी दिला आहे.
लालबागच्या राजाचं विसर्जन सुरु असताना समुद्राला भरती आल्याने ते रखडलं आहे. भरती आल्याने विसर्जन करण्यात अडचण येत आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आपली संघर्ष यात्रा 2.0 सुरू ठेवली आहे.या यात्रेदरम्यान गावागावांत जाऊन ते जनजागृती सभा घेत आहेत. धारूर तालुक्याच्या वतीने भोगलवाडी येथे ‘महा एल्गार सभा’चे आयोजन करण्यात आले आहे.
न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली.राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्या. चंद्रशेखर यांना पदाची शपथ दिली.शपथ दिल्यानंतर राज्यपालांनी व त्यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्या. चंद्रशेखर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
कर्डु गावकऱ्यावर खोटे 353 गुन्हे दाखल केले आहेत. मात्र अजिबात काळजी करू नका भावांनो तुमची बहीण वकील आहे.अख्खा वकील परिवार उभा करेल. कायद्याने आयपीएस मॅडमला कोर्टात खेचू आणि दाखवून देऊ कायद्याच्या पुढे नाही तुम्ही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, रूपाली पाटील ठोंबरे यांनी आयपीएस अंजली कृष्णा यांना दिला आहे.
शुक्रवारी सायंकाळी नाना पेठेत गोळीबार करून गोविंद उर्फ आयुष गणेश कोमकर याची हत्या करण्यात आली. या हत्येकमध्ये आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर, पुतण्या शिवम आंदेकर, नातू स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, वृंदावनी वाडेकर, लक्ष्मी आंदेकर, अमन युसुफ पठाण उर्फ खान, यश सिद्धेश्वर पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईमध्ये गणेश विसर्जन मिरवमुकीत विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे तर चार जण जखमी झाले आहेत. घाटकोपरमधील साकीनाका परिसरात दुर्दैवी घटना घडली आहे. खैराणी रोड परिसरात श्री गजानन मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूकीत ही घटना घडली.
शनिवारी सकाळी दहा वाजता पुण्यातील सार्वजनिक गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू झाली. मात्र, 20 तासानंतरही दुसऱ्या दिवशी (रविवारी) ही मिरवणूक सुरू आहे. शनिवारी मानाच्या गणपतींचे विसर्जन झाले तर पहाटे साडेतीनच्या सुमारास भाऊसाहेब रंगारी गणपतीचे विसर्जन झाले. मध्यरात्री 12 वाजता डिजे बंद झाल्याने मिरवणूक थांबली होती. ती सकाळी सहा वाजता पुन्हा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.