सरकारने घेतलेले निर्णय आपण केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवा असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. केलेल्या कामांची पोचपावती जनता देते. जे लोक लोकसभेत यश मिळालं तेव्हा ईव्हीएम, वोट चोरीवर बोलले नाहीत. मात्र, विधानसभेनंतर आक्षेप घेऊ लागले, हा मतदारांचा अपमान आहे. या स्थानिक निवडणुकीत त्यांन जनता धडा शिकवेल. विरोधीपक्ष नेता निवडावा इतकं पण त्यांच्याकडं संख्याबळ नाही, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली.
मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे या मनोज जरांगे यांच्या स्टेजवर गेल्याचं दिसून आलं तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षातून आता मराठा आरक्षणाला विरोध होत आहे. राज्य सरकारने काढलेल्या हैदराबाद गॅझेटियरच्या जीआरवर पक्षाचे नेते अनिल देशमुखांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्या माध्यमातून ओबीसींच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मराठा आरक्षणावर छगन भुजबळांची भूमिका ही योग्य असल्याचं मत देशमुखांनी मांडलं.
आगामी महापालिकेसाठी महायुतीमध्येच तिढा वाढण्याची शक्यता आहे. उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट आणि ओमी कलानी गटामध्ये युतीची घोषणा झाली. मात्र आमची युती फक्त शिवसेना शिंदे गटासोबत आहे, भाजपासोबत आम्ही नाही असं ओमी कलानी गटाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच भाजपमध्ये अनेक गुन्हेगार असल्याची टीकाही कलानी गटाकडून करण्यात आली.
वेगवेगळ्या संघटना आहेत ते त्यांच्या पद्धतीनं त्यांचं मत प्रदर्शित करत आहेत. मी ही माझ्या पद्धतीनं जाणार आहे, समता परिषद ही आपल्या पद्धतीनेच जात आहे. हैदराबाद गॅझेटचा जीआर आहे, त्याची शब्दरचना ओबीसीसाठी अडचणीची ठरणार आहे. खरं -खोटं काय आहे? ते बघायला पाहिजे, असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यांची मराठा एकच जात आहे, मात्र ओबीसीच्या 374 जाती आहेत, सगळ्यांचं मत एकच आहे आरक्षणाला धक्का लगता कामा नाही. गावागावात आंदोलनं तर होतच आहेत, पण आता संपूर्ण ओबीसी समाज आंदोलनात उतरेल, असा इशाराही यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.
उपराष्ट्रपती निवडणुकीला फक्त एक दिवस बाकी असताना बीआरएस (के. चंद्रशेखर राव) आणि बीजेडी (नवीन पटनायक) यांनी मतदानातून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन्ही पक्ष कोणत्याही राष्ट्रीय आघाडीचे सदस्य नाहीत, ना एनडीएचे ना इंडिया ब्लॉकचे. उपराष्ट्रपती निवडणुकीतून बीजेडी व बीआरएस बाहेर राहणार आहेत.
भारतीय सशस्त्र बलांची कमांडर्स कॉन्फरन्स 15 ते 17 सप्टेंबर 2025 रोजी कोलकात्यात होणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी 15 सप्टेंबरला कोलकात्यात कंबाइंड कमांडर्स कॉन्फरन्सचे उद्घाटन करणार आहेत. यावर्षीचा विषय आहे ‘सुधारांचा वर्ष - भविष्याकरिता परिवर्तन’. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान करतील. यात संरक्षणमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, सीडीएस, वरिष्ठ अधिकारी आणि इतर मंत्रालयांचे सचिव सहभागी होतील.
नेपालमध्ये Gen-Z च्या आंदोलनात हिंसाचार वाढला असून, जखमींची संख्या 100 वर पोहोचली आहे. पोखरातही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तरुणांच्या आंदोलना हिंसक वळण घेतल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीविरोधात तरुण-तरुणींनी जोरदार आंदोलन छेडले आहे. काठमांडूसह अनेक शहरांत हजारो आंदोलनकारी रस्त्यावर उतरले. संसद भवनात घुसून तोडफोड, आगजनी करण्यात आली. पोलिसांनी अश्रुधूर, पाणी फवारणी केली तर गोळीबारात अनेक जखमी झाले. या आंदोलनात मृतांचा आकडा 14 वर गेला असून शंभरहून अधिक लोक जखमी झाले आहेत. काठमांडूमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. पोखरा, इटहरीतही हिंसक घटना घडल्या असून गंडकी प्रदेशातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर दगडफेक झाली. तरुणाईच्या या ‘Gen-Z क्रांती’मुळे नेपाळमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
बुलढाणा नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कर्मचारी मुंबई मंत्रालयाकडे निघाले आहे. नगरपालिकेच्या स्वच्छता ठेकेदाराकडून आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप सफाई कर्मचाऱ्यांनी केला आहे. या सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन देणे बंधनकारक असताना ठेकेदार अर्धवट वेतन हातावर देत आहे. या आर्थिक पिळवणुकीविरोधात यापूर्वी जिल्हाधिकारी याना निवेदन दिले होते. मात्र त्यावर त्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने आज अखेर नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी मुंबईला मंत्रालयावर आंदोलनासाठी पायी निघाले आहेत.मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नसल्याचा पवित्रा या सफाई कर्मचाऱ्याने घेतला आहे.
उद्धव ठाकरे यांची काँग्रेस नेत्यांसोबत मनसेच्या युती संदर्भात मातोश्रीवर चर्चा झाली. मनसे आणि शिवसेना युती संदर्भात राज्यातील काँग्रेसकडून दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाची प्रतीक्षा असल्याचे बोललं जात आहे. मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येत असेल तर काँग्रेस पक्ष सोबत राहणार का? याबाबत दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करतील आणि त्यानंतरच राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मनसे संदर्भातील भूमिका स्पष्ट करतील, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
मराठा समाजाच्या पाठीमागे आता बंजारा समाजाकडून हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी करण्यात आली असून यासाठी आज बीडमध्ये बंजारा समाजाच्यावतीने मेळावा घेण्यात आला. बंजारा समाजाला मराठा समाजाप्रमाणे हैदराबाद गॅझेट लागू करण्यात यावे, आमच्याही कुणबी नोंदी आहेत, याकडे लक्ष वेधण्यात आले. या मेळाव्यामधून मोर्चाची घोषणा करण्यात आली असून, बीड जिल्हाधिकारी कार्यालयवर मोर्चा काढण्यात येणार आहे.
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. शरद पवार यांच्याशी देखील यावर भेट घेऊन चर्चा करणार आहोत. सतेज पाटील यांचे नाव या पदासाठी आघाडीवर असून, दिल्ली हायकमांड याबाबत निर्णय घेईल, असे संकेत माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिले. बाळासाहेब थोरात, अमरिश पटेल यांनी आज मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे. ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांना मात्र आमंत्रण दिलेले नाही. कारण त्यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नसल्याची भूमिका घेतली आहे. ती सरकारी चष्म्यातून घेतली आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
अकोल्यातल्या गँगवॉर प्रकरणातील 17 गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत (MCOCA) कारवाई करण्यात आली आहे. वर्चस्वाच्या लढाईसाठी झालेल्या गँगवॉरमध्ये बंदुकीसह तलवारी, लोखंडी पाईप, कुऱ्हाड, फरशी तसेच धारदार शस्त्राचा वापर झाला होता. घटनास्थळावरून रिकामी काडतूस, तसेच जिवंत काडतूस जप्त केल्या होत्या.
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले एकाच व्यासपीठावर आले. अलिबाग इथं सरकारी कार्यक्रमाला या दोघांनी हजेरी लावली. दोघेही शेजारी बसून गप्पा दंग झाले होते. रायगडचे सध्या पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांच्याकडे आहे.
हैदराबाग गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय लागू झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटी इथे पोहचले. गावकऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. जेसीबीने गुलाल उधळला. हे स्वागत पाहुन जरांगे पाटील प्रचंड भावूक झाले होते.
सरकारकडून मराठा व ओबीसी दोन्ही समाजाला खेळवण्याचा प्रकार सुरु आहे.कारण पात्र शब्द काढल्यानंतर तो जीआर सरसकट झाला आहे. सरकार ओबीसींच्या मुळावर उठलं आहे असा हल्लाबोल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
हैदराबाद गॅझेटिअरनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु करा. १७ सप्टेंबरच्या आत ही प्रोसेस सुरु झाली पाहीजे. अन्यथा दसरा मेळाव्याला मोठा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. अमंलबजावणी न झाल्यास दसऱ्या मेळाव्यात आम्हाला भूमिका जाहीर करावी लागेल असं जरांगे पाटील म्हणाले.
नाशिकमध्ये गंगापूर धरणातून ३ हजार क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गोदावरीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.
17 सप्टेंबरच्या आत मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरुवात झाली पाहिजे. हैदराबाद गॅझेट मधील नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा. प्रमाणपत्र वाटप करण्यात सुरुवात झाली पाहिजे. अन्यथा मला मोठा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
ओबीसी समाजाचे नुकसान होणारे काम सध्याच्या महायुती सरकारकडून होत असेल तर आता लढावे लागेल आणि आपल्या हक्काचे रक्षण करावे लागेल. या सरकारची ओबीसी विरोधी भूमिका हाणून पाडावी लागेल, असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
लक्ष्मण हाके यांनी बारामतीमध्ये मोर्चा काढून सरकारच्या जीआरला विरोध केला होता. त्यांनी बीडमधील गेवराई येथे सभा घेत ज्या आमदारांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा दिला त्यांच्यावर टीका केली. हाके यांनी ओबीसींच्या जागृतीसाठी तसेच ओबीसीमध्ये मराठा समाजाची होत असलेल्या घुसखोरी विरोधात संघर्ष यात्रा राज्यभर काढणार असल्याचे जाहीर केले आहे.
आयुष कोमकर खूनप्रकरणी पोलिसांनी 11 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आता पोलिसांनीआरोपी यश पाटील आणि अमित पाटोळे या दोघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
रामोशी-बेडर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दोन लाख रुपयांपर्यंतचे बिगर तारण कर्ज, तसेच समाजात उद्योजक व व्यावसायिक घडावेत यासाठी १५ लाख रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. रामोशी समाजाच्या विकासासाठी यापुढेही सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर हैद्राबाद गॅझेट लागू करण्यात आले आहे. त्यामुळे ओबीसी संघटनांनी मराठ्यांच्या ओबीसीत समावेश होत असल्याचा आक्षेप घेतला आहे. ओबीसी नेत्यांनी आज मुंबईत बैठकीचे आयोजन केले आहे. तर, मंगळवारी 9 सप्टेंबरला इतर मागास व बहुजन कल्याण मंत्र्यांनीही ओबीसींच्या प्रलंबित मागण्यांसाठी बैठक बोलावली आहे. आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये ओबीसी नेत्यांची बैठक होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.