देशात आजच्या घडीला काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी मतचोरीविरोधात आवाज उठवताना दिसत आहेत. त्यांना मतचोरी मुद्द्यावरून रान उठवले असून भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राज्यात देखील काँग्रेस अॅक्टिव्ह मोडवर आली असून विविध जिल्ह्यात आंदोलने केली जात आहेत. अशातच आता जेष्ठ नेते शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षही मैदानात उतरला आहे. पक्षाने सांगलीत याबाबत महत्वाची बैठक घेतली असून मतचोरीबाबत नागरिकांमध्ये जागृतीचा निर्णय घेतला आहे.
सध्या नेपाळमध्ये अराजक माजली असून सोशल मीडियावर घातलेल्या बंदीमुळे Gen Z रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी आंदोलन करत अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यास सुरूवात केली आहे. काही नेत्यांच्या घरांवर देखील हल्ला केला. त्यानंतर ओली सरकारमधील तीन नेत्यांनी राजिनामा दिला असून नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांना देखील राजिनामा देत पाय उतार व्हाव लागलं आहे. त्यांच्या राजिनाम्यानंतर आता काठमांडूमध्ये जल्लोष करण्यात आला असून बालेश शाह यांनी महापौर पदाचा राजिनामा देऊन देशाची धूरा सांभाळावी अशी मागणी Gen Z आंदोलकांनी केली आहे. शाह यांनी सिव्हिल इंजिनीअर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली असून ते रॅपरही बनले होते. आता ते काठमांडूचे महापौर आहेत.
गामी महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) उमेदवारी मिळवण्याचा मार्ग कोथरूडमधून जाताना दिसत आहे. उमेदवारीसाठी इच्छुक उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या घर अन् कार्यालयालकाडे गर्दी करत आहेत. तर भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूडमध्ये यंदा सर्वाधिक इच्छुक रिंगणात असल्याने आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकी रायगड जिल्ह्यातील शासकीय गायरानातील चार हेक्टर जमीन भारत सरकारच्या सब्सिडरी इंटेलिजन्स ब्युरोला देण्याचा निर्णय झाला आहे. ही जमिन सब्सिडरी इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता निवासस्थाने (रहिवास क्वार्टर्स) बांधण्यासाठी देण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही मौजे आसुडगाव (ता. पनवेल) येथील आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी, महिला, उद्योजक, विद्यार्थी, मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय इत्यादींना केंद्रस्थानी ठेवून महत्वाचे निर्णय घेतले आहेत. आजच्या बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला असून उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीला मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अतिउच्चदाब, उच्चदाब व लघुदाब उपसा जलसिंचन अशा सर्व प्रकारच्या 1 हजार 789 योजनांना वीज दरात सवलत मिळणार आहे.
पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्यानंतर नेपाळमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काठमांडूचे महापौर बालेन शाह केंद्रस्थानी असून ते पंतप्रधान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लष्करप्रमुखांशी चर्चा केल्यानंतर सरकारबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, शाह यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तर आंदोलकांनी नेपाळच्या संसदेतही धुमाकुळ घालत आग लावली आहे.
नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी राजीनामा दिला आहे. त्याआधी त्यांच्या मंत्रिमंडळातील दहा मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. देशातील युवकांनी सोशळ मीडियावरील बंदीच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी हे आंदोलन चिघळले. त्यानंतर मंगळवारी आंदोलकांनी थेट मंत्र्यांच्या घरावर हल्लाबोल केला. काही मंत्र्यांची घरे जाळली. राष्ट्रपतींच्या घरातही घुसखोरी केली. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने अखेर पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला आहे.
केंद्रात आणि राज्यात मतचोरी करून भाजप सत्तेवर आल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री महादेव जानकर यांनी यवतमाळ इथं केला. लोकशाही वाचवायची असेल तर, यापुढे निवडणूक ईव्हिएम मशीनवर नव्हे तर, बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी जानकर यांनी केली. अक्कलकोट इथले राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराला त्याच्या गावात शून्य मते मिळाली. याकडे त्यांनी लक्ष वेधले. सर्व समाजाला आरक्षण केंद्र सरकारने दिले पाहिजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 28सप्टेंबरला विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री जानकर यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिरातीवरून आमदार रोहित पवार आणि भाजपमध्ये सुरू झालेल्या आरोप प्रत्यरोपावरून माजी खासदार सुजय विखेंनी आमदार रोहित पवारांना मिश्किल टोला लागावला आहे. "रोहित पवार ज्या पद्धतीने आरोप करत आहे, त्याप्रमाणे त्यांचे झालेले गैरसमज दूर करून टाकू. ते देखील या अहिल्यानगर जिल्ह्याचे आमदार आहेत आणि आम्ही देखील याचा जिल्ह्यात आहोत. त्यामुळे त्यांचे गैरसमज दूर करायला किती वेळ लागेल!"
मराठा आरक्षणाच्या जीआरवर ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. "समता परिषदेने आठ पानी पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात काढण्यात आलेल्या जीआरसंदर्भात कायदेशीर मुद्दे उपस्थित करण्यात आलेले आहे. मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला आहे, तो प्रचंड दबावात काढला आहे. 350हून अधिक जातींचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्याचे देखील सुचवले होते. जीआरमधील मराठा समाज या शब्दावर आपेक्ष आहे, त्यामुळे जीआर मागे घ्या किंवा त्यात बदल करा, त्यातील " अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला उपराष्ट्रपती निवडणुकीवर म्हणाले, "भाजप आणि पंतप्रधानांनी आम्हाला सांगावे की, जर उपराष्ट्रपतींची निवडणूक मतपत्रिकेद्वारे होऊ शकते, तर देशातील खासदार आणि आमदारांची निवडणूक का नाही?" जर सरपंच आणि जिल्हा परिषदा मतपत्रिकेद्वारे निवडता येतात, तर खासदार आणि आमदार का नाही? हा आमचा प्रश्न आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा विचार केला तर, काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्ष, संविधान, सामान्य माणूस हक्कांच्या रक्षणाची लढाई लढत आहे. ही लढाई काँग्रेस आणि विरोधी पक्ष बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली लढत आहेत, म्हणूनच आम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहोत, असे काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले.
नेपाळ देशातील भ्रष्टाचाराविरोधात रस्त्यावर उतरलेल्या तरुणाईमुळे देशातील परिस्थिती हिंसक बनली आहे. हिंसक झालेला युवकांचा जमाव थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानी घुसला आहे. तिथं गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. तसेच राष्ट्रपती भवनाला देखील आग लावली गेली आहे. या परिस्थितीमुळे नेपाळच्या पंतप्रधानानी देश सोडण्याची तयारी केली आहे. तसेच पाच पेक्षा जास्त मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.
शिर्डीत भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे आणि त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे यांचे फोटो असलेले बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडल्याचा प्रकार समोर आला आहे. शिर्डी शहरातील लक्ष्मीनगर भागात हा प्रकार झाला. या अज्ञातांनी बॅनरसह परिसरातील दुचाकींची केली तोडफोड केली आहे. विखे समर्थकांची पोलिस ठाण्यात धाव घेत, तक्रार दिली आहे.
मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची खबरदारी म्हणून ओबीसी संघटना पदाधिकाऱ्यांचे नाव, पद आणि इतर माहिती गोळा करणार आहेत. ओबीसी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांसोबत पोलीस अधीक्षक बैठक असल्याची माहिती आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उद्या (बुधवारी) राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. जनसुरक्षा कायदा रद्द करा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. शिवाजी पार्क येथे हे आंदोलन होणार आहे.
सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. छगन भुजबळ हे न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे. या परिस्थितीत छगन भुजबळ व विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाची दिशाभूल करणे थांबवावे, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केली आहे.
उपराष्ट्रपतिपदासाठी निवडणूक मतदान सुरु झाले आहे. सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान केले. एनडीएचे महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात उपराष्ट्रपतिपदासाठी लढत होणार आहे.
रावेरचे माजी आमदार अरुण पाटील यांचा आज भाजपात प्रवेश होणार आहे. सकाळी ११ वाजता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पाटील यांचा पक्षप्रवेश होईल. अरुण पाटील यांच्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्षांचाही भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या मतदानासाठी संसद भवनात दाखल झाले आहेत. उपराष्ट्रपतिपदासाठी आज निवडणूक होत असून यासाठी एनडीएचे महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात उपराष्ट्रपतिपदासाठी लढत होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता नरेंद्र मोदी हे मतदानासाठी संसद भवानात दाखल झाले आहेत.
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या मतदानापूर्वीच माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी यांनी केंद्र सरकारला पत्र लिहित राजधानी नवी दिल्ली येथे एक बंगला द्यावा, अशी मागणी करणारं पत्र लिहिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धनखड यांनी आवास आणि शहरी कार्य मंत्रालयाला हे पत्र लिहिलं असून त्यामध्ये सरकारी निवासस्थान उपलब्ध करुन देण्याची मागणी केल्याचं सांगितलं जात आहे. जगदीप धनखड हे मागील आठवड्यात वीपी एनक्लेवमधून दक्षिण दिल्लीतील ठतरपूर येथील भारतीय लोकदलाचे नेते अभय चौटाला यांच्या खासगी फार्म हाऊसमध्ये शिफ्ट झाले होते.
पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. आयुष कोमकरवर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. या हत्येप्रकरणी आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकरसह अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे सगळे आरोपी फरार झाले होते. त्यातील सहा जणांना मध्यरात्री पोलिसांनी परराज्यातून अटक केली आहे.
नेपाळमध्ये तरुणांनी हिंसक निदर्शने केल्यानंतर आता केपी शर्मा ओली सरकारने फेसबुक आणि इंस्टाग्रामसह 26 सोशल मीडियावरील बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. काल नेपाळमधील आंदोलकांनी संसदेत प्रवेश करत सरकारविरोधात निर्दशने केली होती. यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या आंदोलनातील 20 जणांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी राजीनामादिला आहे.
सह्याद्री अतिथीगृहावर राज्य सरकारच्या ओबीसी विभागाची राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. मंत्री अतुल सावे यांनी ही बैठक बोलावली असून परिणय फुके , बबन तायवाडे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर या बैठकीला ओबीसी नेते छगन भुजबळ उपस्थित राहणार का? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर आज 9 सप्टेंबर रोजी नव्या उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपप्रणित एनडीएनं महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. तर इंडिया आघाडीनं सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश न्या. बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. तर अशातच आता इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कारण विरोधी पक्षातील दोन पक्षांनी त्यांना मतदान करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस आणि बिजू जनता दल अर्थात बीजेडी या दोन पक्षांनी आज होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे बी. सुदर्शन रेड्डी यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
देशाच्या नव्या उपराष्ट्रपतिपदासाठी आज निवडणूक होणार आहे. यासाठी एनडीएचे महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात उपराष्ट्रपतिपदासाठी लढत होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.