

Maharashtra Local Body Election : राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे असलेल्या ‘सॉफ्टवेअर’च्या माध्यमातून दुबार मतदारांची यादी तयार केली आहे. यादीसाठी सॉफ्टवेअरचा वापर झाला असल्याने प्रत्यक्ष पाहणी करूनच दुबार मतदारांच्या नावांची यादी निश्चित होणार आहे. त्यासाठी सर्व प्रभागांमध्ये दुबार मतदारांची यादी प्रत्यक्ष पाहणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आयोगातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. प्रत्यक्ष पाहणी होत नाही तोपर्यंत ही यादी अंतिम समजली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सॉफ्टवेअरच्या मदतीने तयार झालेल्या यादीमध्ये लाखोंच्या संख्येने दुबार मतदार असल्याचेही समजते. सदोष मतदारयाद्या दुरुस्त करण्यासाठी महाविकास आघाडी आणि मनसेने निवडणूक आयोगावर मोर्चा काढला होता. यावेळी राज्याच्या मतदारयादीत दुबार मतदारांचा मोठ्या प्रमाणात भरणा असल्याचा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. दहा लोकसभा मतदारसंघात नऊ लाख ४१ हजार ७५० मतदार असल्याचा दावा त्यांनी केला होता.
आता राज्य निवडणूक आयोगाने सॉफ्टवेअरच्या माध्यमातून दुबार मतदारांची यादी तयार केल्याने विरोधकांच्या आरोपाला पुष्टी मिळाली आहे. याविषयी आयोगातील वरिष्ठ सूत्रांनी अधिक माहिती देताना सांगितले की, मतदारयादीत दुबार मतदार नाहीत, असा आमचा दावा नाही. मात्र अनेकदा नावे सारखी असली तरी दोन स्वतंत्र व्यक्ती असू शकतात. राजकीय पक्ष थेट आरोप करू शकतात, मात्र आयोग म्हणून आम्हाला त्या मतदाराचे एकापेक्षा अनेक ठिकाणी नाव आहे का, की एकच नाव असलेल्या दोन स्वतंत्र व्यक्ती आहेत का? याची प्रत्यक्ष पाहणी करावी लागते.
आयोगाच्या निवडणूक कर्मचाऱ्यांनी सध्या प्रत्यक्ष पाहणी सुरू केली आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभागाला मतदारयादीसोबत दुबार मतदारांची यादी देखील पाठवण्यात आली आहे. मतदाराच्या पत्त्यावर प्रत्यक्ष पाहणी करून त्याविषयीची खात्री ते करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरपरिषद- नगरपंचायत निवडणुकांसाठी जाहीर झालेल्या मतदारयादीवर असंख्य हरकती असलेली मतदारयादी आयोगाने जाहीर केली आहे. या निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या मतदारयादीवर ५० हजारच्या आसपास हरकती आल्या होत्या. त्यापैकी ३० टक्के हरकती मतदारयादीत असलेली दुबार नावे, बोगस नावे, मृत व्यक्तींची नावे यादीत कायम असणे, मतदार यादीतील पत्त्यावर ती व्यक्ती राहत नसण्यासारख्या हरकती नोंदवण्यात आल्या होत्या. तर चुकीच्या प्रभागातील मतदारयादीत नाव असल्याच्या ७० टक्के हरकती होत्या.
मतदार यादीतील नावे वगळणे किंवा यादीत समावेश करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडे नाही. त्यामुळे आयोगाने ३० टक्के हरकतीचा निपटारा करण्याऐवजी त्यावर तात्पुरता उपाय स्वीकारला आहे. उदाहरणार्थ, मतदार यादीतील नाव दुबार असेल तर मतदार यादीतील त्याच्या नावासमोर विशिष्ट चिन्ह टाकले जाणार आहे. त्या मतदाराला निवडणुकीच्या पूर्वी संपर्क झाल्यास तो कुठे मतदान करणार याचा एक पर्याय त्याला निवडायला दिला जाणार असून तो एकाच ठिकाणी मतदान करणार हे त्याच्याकडून सुनिश्चित करून घेतले जाणार आहे. दुबार मतदार थेट निवडणुकीच्या मतदान केंद्रावर गेल्यास त्याच्याकडून हमीपत्र लिहून घेण्याचा मार्ग आयोगाने काढला आहे.
मतदार यादीतील दुबार मतदार ओळखण्याचे 'सॉफ्टवेअर' केंद्रीय निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे देखील आहे. तरीही दुबार मतदार न वगळता या याद्या राज्य निवडणूक आयोगाकडे सोपवल्या गेल्याचे समजते. त्यामुळेच १ जुलै ते १५ ऑक्टोबरपर्यंत नव्याने समावेश झालेले आणि वगळण्यात आलेल्यांची यादी मिळावी अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. मात्र ती परवानगी त्यांना अद्याप मिळालेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.