
विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसले जात आहेत.आता अहिल्यानगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले हे लवकरच मुंबईमध्ये आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
महायुती सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई समृद्धी महामार्गाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. समृध्दी महामार्गावरुन प्रवास करणार्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसून येत आहे. समृद्धी महामार्गावरुन आत्तापर्यंत 1 कोटी 85 लाखांहून अधिक वाहने धावली आहे.या वाहनांकडून टोलच्या माध्यमातून मोठा महसूल मिळत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं दिली आहे.
एकीकडे उन्हाच्या झळा बसत असताना सांगली,मिरज शहरासह अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला.अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं शेतीच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.तसेच जनजीवनही विस्कळीत झालं.विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं रस्त्याच्या कडेची छोटी-मोठी झाडेही कोसळल्याच्या घटना घडल्या.
महाराष्ट्रातील महायुती सरकारनं केंद्र सरकारकडे मोठी मागणी केली आहे. त्यात छत्रपतींच्या अद्वितीय पराक्रमाची साक्ष असलेले जे किल्ले आहेत यासंबंधीची ही मागणी असून राज्यातील 54 किल्ले केंद्रीय पुरातत्व खात्याच्या नियंत्रणात आहेत. तसेच 62 किल्ले हे राज्य सरकारच्या अधिपत्याखाली संरक्षित करण्यात येत आहेत. त्यामुळे महायुती सरकारकडून केंद्राकडे सर्वच किल्ले हे आपल्याकडे देण्याची मागणी केली आहे.
प्रत्येक गोष्टीचा संबंध माझ्याशी जोडला जातो, मी गृहमंत्री असल्याने मलाच जबाबदार धरलं जातं. पण लक्षात घ्या सगासोयरा जरी अपराधी असला तरी त्याला शिक्षा करायला मी मागेपुढे पाहणार नाही. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात आज सांगितलं.
महाराष्ट्रात आता वयाची 60 वर्षे ओलांडलेल्या बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन मिळणार आहे. दरमहा 12 हजार रुपये निवृत्ती वेतन दिले जाणार आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी ही माहिती दिली आहे.
माझ्या सोसायटीमध्ये एक नेपाळी वॉचमन आहे, तो अख्खी रात्र ओरडत असतो. जागते रहो आणि त्याला वाटत असतं की त्याच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित आहोत. तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय, त्याला असं वाटतंय की त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकला आहे. त्याचा असा समज झाला आहे, या शब्दांंत माजी मंत्री अनिल परब यांनी मंत्री नीतेश राणे यांची टर उडवली.
छावा चित्रपटाचे येत्या गुरुवारी संसदेत स्क्रीनिंग होणार होतं. मात्र, हे स्क्रीनिंग लांबणीवर गेल्याची माहिती आहे.
दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे आरोपी आहेत. त्यांनी गुन्हे लपविण्यासाठी पदाचा गैरवापर केला. आमच्याकडे प्रत्यक्षदर्शी पुरावे आहेत. केवळ सुरक्षेच्या कारणामुळे आम्ही प्रत्यक्षदर्शीचं नावं सांगू शकत नाही, असे सतीश सालियान यांचे वकिल ॲड नीलेश ओझा यांनी आरोप केले आहेत.
अहिल्यानगरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का बसला आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदेश कार्ले हे उद्धव ठाकरेंची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना साथ देणार आहेत. आपल्या कार्यकर्त्यांसह ते उद्या मुंबईत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात महत्वपूर्ण बैठक सुरू असल्याचे समजते. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित आहेत. बैठकीचा नेमका विषय काय आहे, याची माहिती समजू शकलेली नाही.
कॉमेडियन कुणाल कामरा याच्याकडून ट्विटवर नवीन व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हम होंगे कामयाब, हे गाणे या व्हिडीओमध्ये आहे. त्याने नवीन व्हिडीओ टाकत शिवसेनेला डिवचल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून प्रशांत कोरटकरला २८ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी कोरटकरला कोर्टातून बाहेर आणताच संतप्त जमावातून त्याच्या अंगावर चप्पल फेकण्यात आली. यावेळी पोलिस आणि शिवप्रेमींमध्ये झटापट झाली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याचे समजते.
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतला धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला मंगळवारी कोल्हापूर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले जाणार होते. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जवळपास अडीचशे पोलिसांचा बंदोबस्त होता. पण शिवप्रेमींचा संताप पाहून जुना राजवाडा पोलिसांनी कोरटकरला चोर मार्गाने न्यायालयात नेले. यावेळी आक्रमक शिवप्रेमींनी पोलीस ठाणे आणि व्हॅनवर चिल्लर उधळत या प्रकाराचा निषेध व्यक्त केला.
विधानसभेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवीदीचे आमदार अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. अण्णा बनसोड हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तर बुधवारी त्यांच्या निवडीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांचे निलंबन करण्यात आले आहे. कोविड काळात त्यांनी केलेल्या गैरव्यवहाराबाबत भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडली. त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची थोरात यांचे निलंबन केल्याचे विधिमंडळात जाहीर केले. त्यांची तीन महिन्यात विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरटकरला अटक होताच त्याचा निषेध करण्यासाठी शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. शिवप्रेमींनी जुना राजवाडा पोलीस ठाण्याकडे धाव घेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान कदापी आम्ही सहन करणार नाही. त्याला आम्हीच शासन करू. पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई करावी. या मागणीसाठी शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत
प्रशांत कोरटकर याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्याचा निषेध करणाऱ्या शिवप्रेमीना पोलिसांनी अडवले आहे. यावेळी पोलिस आणि शिवप्रेमी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.आज (ता. 25) त्याला न्यायालयात दुपारी 12.30 वाजता हजर केलं जाण्याची शक्यता आहे. सध्या येथे तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कुणाल कामरा यांच्यासोबतचा संजय राऊत यांचा फोटो विरोधकांनी प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर राऊतांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी अनेकदा त्याच्या शोसाठी गेलो आहे. कुणाल कामरासोबत माझे संबंध आहेत. त्याचा आणि माझा डीएनए सारखा आहे, असे राऊत यांनी म्हटलं आहे.
खार पोलिसांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला समन्स बजावलं आहे. कुणाल कामरा यांच्या कुटुंबियांकडे खार पोलिसांनी समन्स दिले आहे. कुणाल याला व्हॅाटस्अँपवरुन पोलिसांनी हे समन्स पाठवले आहे. आज सकाळी अकरा वाजता चौकशीसाठी हजर राहावे, असे पोलिसांनी समन्समध्ये म्हटलं आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आदेशाने महात्मा फुले कृषी विद्यापीठाची पुण्यातील हेरिटेज इमारतीत तोडफोड करून नवीन लक्झरी कार्यालय तयार करण्याचा घाट घातला जात आहे. असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या मंत्र्याचे प्रताप थांबवावा, अन्यथा उच्च न्यायालयात जावू असाही इशारा म्हणून जगतापांनी दिला आहे.
2014 मध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटली आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. जे अडीच वर्ष चालले. यानंतर एकनाथ शिंदे आणि भाजपच्या महायुतीचे सरकार सत्तेवर आले. पण युती का तुटली असा प्रश्न अनुत्तीर्णच होता. याला आता 10 वर्षांनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले असून युती का तुटली, याची इनसाइड स्टोरी सांगितली. तर फक्त चार जागांवरून युती तुटल्याचा राजकीय गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली आहे. कोरटकरने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनाही धमकी दिली होती. आज (ता. 25) त्याला न्यायालयात दुपारी 12.30 वाजता हजर केलं जाण्याची शक्यता आहे. सध्या येथे तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कराडचे कार्यमुक्त मुख्याधिकारी शंकर खंदारे लाच घेताना सापडले. त्यांना पाच लाख रुपये स्वीकारताना रंगेहात लाचलुचपतच्या पथकाने पकडले. शंकर खंदारे यांनी दहा लाख रुपयाची लाचेची मागणी केली होती. दरम्यान पाच दिवसांपूर्वीच राज्यपालांच्या आदेशाने त्यांना कार्यमुक्त केले होते.
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईला शाही बडदास्त देण्याचे प्रकरण बीड पोलिसांच्या अगंलट आले आहे. खोक्याभाईला खायला बिर्याणी आणि हात धुवायला पाण्याची बाटली देण्याची देण्याच्या कारणावरून दोन पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे.
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईवर मारहाणीचे गंभीर गुन्हे दाखल असून सध्या तो तरूणांत आहे. पण याची भाईगिरी येथेही जोमात सुरू असून खोक्या भाईची शाही बडदास्त पोलिसच राखत असल्याचे समोर आले आहे. पोलिसच त्याला खायला बिर्याणी आणि हात धुवायला पाण्याची बाटली देत असून आजुबाजूला नातेवाईकांचा गराडा असणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे आता बीड पोलिसांच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय.
नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी तिघांना पोलिसांनी अटक केली असून आरोपीची संख्या आता 113 वर पोहोचली आहे. ज्यामध्ये 12 अल्पवयींनांचा समावेश आहे. या तीनही आरोपींना न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली असून याच्याआधी 36 जणांना देण्यात आलेली पोलीस कोठडी आज संपली आहे. यासर्वांना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडावर भाष्य करून वादाच्या भोवऱ्यात कॉमेडियन कुणाल कामरा सापडला आहे. त्याच्या स्टुडिओची देखील तोडफोड शिवसैनिकांनी केली आहे. तर त्याने माफी मागावी अशी मागणी शिवसैनिकांची आहे. यावरून कुणाल कामराने आपण माफी मागणार नाही अशी ठाम भूमिका घेतली असून याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तर राजकारण्यांची खिल्ली उडवणं कायद्याविरोधात नसल्याची भूमिका ही त्याने घेतली असून तपास यंत्रणा, कोर्टाला सहकार्य करणार असून आपण धमक्यांना घाबरत नसल्याचं कुणाल कामराने म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली आहे. कोरटकरने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनाही धमकी दिली होती. त्याच्यावर कोल्हापुरात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आज (ता. 25) त्याला न्यायालयात हजर केलं जाणार असून तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
राज्यात शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे अनेकांना धक्का बसला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील अजित पवार यांनी बंडखोरी करत पक्ष फोडला. आता राष्ट्रवादी कोणाची? यावरून कायदेशीर लढाई सुरू असून आज (ता.25) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी दुपारी 12 वाजल्यानंतर होणार असून निर्णय येण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.