Maharashtra News Live Update: लाल किल्ल्याजवळील बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या 11 जणांवर होणार अंत्यसंस्कार,न्यायालयाची परवानगी

Marathi Breaking Live Headlines Updates: राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

लाल किल्ल्याजवळील बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या 11 जणांवर होणार अंत्यसंस्कार,न्यायालयाची परवानगी 

दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कार बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला होता. त्या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या 11 जणांवर दिल्ली न्यायालयाने सोमवारी(ता.13) ‘राष्ट्रीय तपास संस्थे’ला (NIA) अंत्यसंस्कार आणि या आत्मघातकी स्फोटातील कारचालक डॉ. उमर-उन-नबी याच्या शरीराचे अवशेषही दफन करण्यास परवानगी दिली आहे.

Vijay Vadettivar : निवडणुका संपल्याने सत्ताधारी मस्तीमध्ये वागताहेत

"आतापर्यंत 92 लाख महिलांना या योजनेतून वगळ्यात आलं आहे. आता हे जर पुन्हा मतदानाला जातील तर गावातील महिला ह्यांना जाब विचारतील. नितीमत्ता या सरकारची संपली आहे. त्यांना वाटतं की जवळपास निवडणुका नाहीत. सगळ्या निवडणुका संपल्या आहेत. तर आमचं कोण काय करेल? त्यामुळे सरकार मस्तीमध्ये वागत आहे", अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Aditi Tatkre : आदिती तटकरे यांची मोठी घोषणा

ज्या कुटुंबांचे आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा होतात. परंतु अनेक महिलांनी ई केवायसी केली, त्या या योजनेसाठी पात्र देखील आहेत, मात्र त्यांचा हाफ्ता बंद झाला होता. आता अशा महिलांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे सरकारने अशा अर्जांचं आता पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन सुरू केलं आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.

सोशल मीडियावरील अफवांना पूर्णविराम! स्मार्ट मीटरमध्ये कॅमेरा नसल्याचं महावितरणचे स्पष्टीकरण

नागपूर : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून स्मार्ट वीज मीटरबाबत विविध प्रकारच्या अफवा पसरविल्या जात असून, त्यामध्ये "स्मार्ट मीटरमध्ये कॅमेरा बसविण्यात आला आहे", "ग्राहकांच्या घरांवर नजर ठेवली जाते", "घरातील हालचालींचे चित्रीकरण केले जाते" अशा दिशाभूल करणाऱ्या संदेशांचाही समावेश आहे. या अफवांमुळे काही ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी या सर्व दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

सुनेत्रा पवारांच्या अध्यक्ष निवडीला राष्ट्रवादीतूनच आक्षेप; निवड अवैध असल्याचा दावा

सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षनिवडीला राष्ट्रवादीतूनच आक्षेप घेण्यात आला आहे. राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक अवैध असल्याचा दावा यासंदर्भात करण्यात आला आहे. ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलामार्फत ही नोटीस पाठवली आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेसह चौघांना १० दिवसांची न्यायालीन कोठडी

डोंबिवलीतील महिला डॉक्टरला मारहाण प्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेसह चौघांना २४ जुलैपर्यंत १० दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

भेसळींवर कारवाईनंतर गोकुळ दुधाची मागणी वाढली; दररोज २ लाख लिटरची अतिरिक्त मागणी 

राज्य अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर दूध भेसळ करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. या कारवाईमुळे अनेक भागांत दूधपुरवठ्यावर परिणाम झाल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या दुधाला ग्राहकांकडून अधिक पसंती मिळत असल्याचा दावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. मुश्रीफ यांच्या म्हणण्यानुसार, राज्यातील या कारवाईनंतर गोकुळ दूध संघाकडे दररोज सुमारे २ लाख लिटर दुधाची अतिरिक्त मागणी वाढली आहे. गोकुळ दूध संघात दररोज सुमारे १८ लाख लिटर दूध संकलित होत असून त्याचा पुरवठा पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई आणि पुणे या महानगरांमध्ये केला जातो. सध्या महानगरांमध्ये गोकुळ दुधाची मागणी वाढल्याचेही त्यांनी सांगितले. गोकुळच्या दुधाच्या गुणवत्तेवर ग्राहकांचा विश्वास असल्याने ही मागणी वाढल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

रमेश म्हात्रेला पुन्हा न्यायालयात उभं केलं जाणार; पोलिस कोठडी की न्यायालयीन कोठडी मिळणार

कल्याण डोंबिवलीमधील डॉक्टर आणि नर्स यांना मारहाण करणारा नगरसेवक रमेश म्हात्रे याला पुन्हा आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. तीन दिवसांची पोलिस कोठडी संपल्यामुळे म्हात्रेला पुन्हा न्यायालयात उभे केले जाणार आहे. म्हात्रे याला पुन्हा पोलिस कोठडी मिळते न्यायालयीन कोठडी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेतकरी कर्जमाफीमुळे कोल्हापूर जिल्हा बॅंकेला 611 कोटी मिळणार

शेतकरी कर्जमाफी योजनेमुळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला 611 कोटी रुपये मिळणार आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी दिली.

बनावट दूध रॅकेटचा पर्दाफाश; पाच जणांवर गुन्हा दाखल

फलटणमधील होळ येथील एका जनावरांच्या गोठ्यावर छापा टाकून बनावट दूध रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या ठिकाणी दुधाची एसएनएफ वाढविणारी चार किलो औद्योगिक पावडर, तीन किलो नॉन डेरी क्रिम आणि एक मिक्सर जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एकूण पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मातोश्रीवर काळी जादू करणारा बंगालचा जादूगर यायचा : शिरसाट तुमच्या घरातील प्रेमप्रकरण मला सांगायला भाग पाडू नका :  पौळ

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सर्वांना जादूटोणा करायची सवय आहे. काळी जादू करणारा बंगालचा जादूगर ‘मातोश्री’वर येत असे, हे सर्वांना माहिती आहे. विनायक राऊत तर त्यात मास्टर आहे. स्वतःच्या सुनेवर त्यांनी केलेले अघोरी कृत्य भयानक आहे. स्वतः जादूगाराला जवळ ठेवून जादूटोण्याच्या विरोधात बोलतात, अशा दुटप्पी लोकांवर आता गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी केली आहे. त्याला उबाठाच्या अयोध्या पौळ यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, तुमचा चठ्ठी बनियवरचा व्हिडिओ तुमच्या घरातील लोकांनी मला पाठवला होता. तुमच्या लेकराचं प्रेमप्रकरण तुम्ही कशा प्रकारे हाताळले, हे मला महाराष्ट्राला सांगायला भाग पाडू नका.

राम मंदिर चोरीप्रकरण विश्वस्त मंडळाला नोटीस;तपासाचे स्टेट्‌स रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश

अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरीप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने या चोरीप्रकरणी विश्वस्त मंडळाला नोटीस दिली आहे. मात्र, केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला न्यायालयाने नोटीस बजावलेली नाही. एसआयटीला तपासाबाबतचे स्टेट्‌स रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील सुनावणी येत्या सोमवारी (ता. २० जुलै) होणार आहे. याचिका कर्त्याचा तपासाचा स्टेट्‌स रिपोर्ट देण्याची मागणी फेटाळली आहे. पण न्यायालयाने तपासावर देखरेख ठेवावा आणि सीबीआयने तपास करावा, या दोन मागण्यांवर न्यायालयाने कोणताही निर्णय दिलेला नाही.

वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सतर्क; अपघातग्रस्तांना मदतीची घोषणा

वारकऱ्यांच्या अपघाताबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले. भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्व यंत्रणांनी अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची आर्थिक मदत देण्यात येणार असून, जखमींवर शासकीय खर्चातून उपचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नसरापूरची पुनरावृत्ती, मुंबईत 7 वर्षांच्या चिमुकलीवर शौचालयात अत्याचार; आरोपी ताब्यात

मुंबईत सात वर्षीय चिमुकलीवर शौचालयात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Sanjay Shirsat : लाडकी बहीण योजना सुरूच राहणार; अपात्रांची नावे वगळली जातील : संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत संजय शिरसाट यांनी विविध विषयांवर भूमिका मांडली. वारकरी अपघात दुर्दैवी असल्याचे सांगत त्यांनी खबरदारीचे आवाहन केले. तसेच लाडकी बहीण योजना कायम राहणार असून, फक्त नियमांनुसार अपात्र लाभार्थ्यांची नावे वगळली जात असल्याचे स्पष्ट केले.

अपघात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या कुटंबीयांना चार लाखांची मदत

आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावर जेजुरी जवळ वारकऱ्यांचा अपघात झाला. यामध्ये तीन वारकरी महिलांचा मृत्यू झाला आहे. तर, काही जण जखमी झालेले आहेत. जखमी झालेल्या वारकऱ्यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयात जात भेट घेतली. तसेच मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना चार लाखाची मदत जाहीर केली.

लाडकी बहीण योजनेतून ९२ लाख महिलांना वगळले

लाडकी बहीण' योजनेतून ९२ लाख लाभार्थी महिलांना वगळल्याचे समोर आले आहे. ई केवायसी न करणे, उत्पन्नाची मर्यादा आणि जास्त वयामुळे लाभार्थी महिलांना वगळ्याचे समोर आले आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक २८ लाख लाडक्या बहि‍णींना वगळण्यात आले आहेत.

सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्यात फडणवीस तिसऱ्या क्रमांकावर

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी सर्वाधिका काळ राहण्याच्या विक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. त्यांनी मुख्यमंत्रीपदावरचे २ हजार ४३० दिवस पूर्ण करतशरद पवार २ हजार ४१२ दिवस होते मुख्यमंत्रीपदावर राहण्याचा विक्रम मोडला, सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदी राहण्याचा विक्रम वसंतराव नाईक यांच्या नावावर आहे. ते सर्वाधिक ४ हजार ०९६ दिवस मुख्यमंत्री होते. तर, त्यांच्यानंतर विलासराव देशमुख 2 हजार 686 दिवस मुख्यमंत्रि होते. ते दुसऱ्या स्थानी आहेत.

जलसंपदा अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्यांनी थेट पूल उभारण्यास मंजुरी!

जलसंपदा विभागाच्या नावाने बनावट शासकीय मंजुरीपत्र तयार करून पुण्यातील एका नामांकित डेव्हलपर कंपनीची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण गैरव्यवहारात महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या एका सहायक अधीक्षक अभियंत्याचा थेट सहभाग असल्याचे समोर आले असून, या प्रकरणी कंत्राटदारासह संबंधित अधिकाऱ्यावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai:  देवेंद्र फडणवीसांच्या निवास्थानी आज बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी आज रात्री आठ वाजता हाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील व इतर नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. खासदार विनोद तावडे आणि खासदार अशोक चव्हाणही हेही बैठकीला हजेरी लावणार आहे.

यवतमाळ शहरात रात्री विचित्र अपघात, महिला जखमी

यवतमाळ शहरात रात्री विचित्र अपघात झाला. यवतमाळ ते धामणगाव मार्गावरील नवजीवन मंगल कार्यालयासमोर रात्री दरम्यान विचित्र अपघाताचा थरारक घटना घडली.या अपघातामध्ये एक महिला जखमी झाली आहे.

उत्तर भारतातील राज्यांमध्ये दोन दिवसांपूर्वीपर्यंत धुमाकूळ घालणारा पाऊस पुन्हा एकदा ओसरताना दिसत आहे.  हवामान विभागाने 14 राज्यांमध्ये वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 12 तासांत वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशाराही जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात  मुसळधार पावसानंतर आता पुन्हा तापमानात वाढ होत आहे. त्यामुळं चिंतेत वाढ झाली आहे. पावसाने ब्रेक घेतल्यानंतर उन्हाचा पारा वाढत आहे. आज 13 जुलै रोजी राज्यातील काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. धुळे, रत्नागिरी, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव या भागात सोमवारी पाऊस हजेरी लावेल. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com