

दुपारी ३ च्या सुमारास एकाच प्लेटफॉर्मवर २ लोकल आमने सामने आल्याची घटना घडली होती. ही घटना फार गंभीर असून, त्यामुळे मोठा अनर्थ झाला असता. हे लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने सीएसएमटी स्टेशन मास्तरवर कारवाई केली आहे. या स्टेशन मास्तरचे निलंबन करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचार सांगता सभेत बोलताना म्हणाल्या, अजित पवारांच्या अपघाती निधनाबाबत तुमच्या मनात ज्या शंका आहेत, त्या माझ्याही मनात आहेत आणि या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळालंच पाहिजे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच अजितदादांच्या अपघातामागे जर काही चुकीचं आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी मोदी-शाह यांच्याकडे केली असल्याचं पवार म्हणाल्या.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यात 1 मेपासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा येणं अनिवार्य राहणार असल्याचा निर्णयाची घोषणा केली आहे. तसेच याबाबत विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार असून नियमांची पायमल्ली करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं म्हटलं आहे. या निर्णयाविरोध करण्यासाठी राज्यातील 15 लाख रिक्षाचालक संपावर जाणार आहेत. येत्या 4 मेपासून हा संप पुकारला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेतून एक धक्कादायक अपडेट समोर येत आहे. महापालिका अतिक्रमण विभाग उपायुक्त कैलास गायकवाड हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यांना लाच स्विकारताना एसीबीनं रंगेहात पकडलं आहे.त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेत भाष्य केले. सत्य समोर येऊपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी, सुनेत्रा पवार यांनी भाषणाबाबत अपघाताच्या चौकशीचा मुद्दा उपस्थित केला होता.
बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सह काँग्रेसचे आभार मानले. सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी सर्व पक्षांचे आभार मानले.
भाषणादरम्यान सुनेत्रा पवार भावुक झाल्या. माझे सर्वस्व हरपले आहे. दादा गेले पण त्यांची स्वप्नं जिवंत आहेत. मी एका संघर्षयोध्दाची सहचारणी आहे. जनतेचा विश्वास कमी होऊ देणार नाही, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या सांगता सभेत उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आपल्या भाषणात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे विशेष आभार मानले. पवारांचे आशीर्वाद आपल्यासाठी खूप मोलाचे असल्याचेही त्या म्हणाल्या. निवडणुकीत पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी सर्व पक्षांचेही आभार मानले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीत दाखल झाले आहेत. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा सुरू आहे. काही वेळापूर्वीच महाविकास आघाडीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे सभास्थळी आल्या होत्या.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत होत असलेल्या पोटनिवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय. गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांनी बारामती पिंजून काढल्यानंतर आता सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठीची सांगता सभा पार पडत आहे. या सभेला मंत्री छगन भुजबळ संबोधित करत असतानाच खासदार सुप्रिया सुळेंची एण्ट्री झाली.
बारामतीतील शारदा प्रांगण येथे आज पोटनिवडणुकीची सांगता सभा होणार आहे. या सभेला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत. सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांसह अनेक नेते सहभागी होणार आहेत.
नाशिक येथील कपालेश्वर मंदिरात पुजारी आणि भाविकांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे. दर्शनाच्या वेळी झालेल्या किरकोळ कारणावरून हा वाद वाढल्याचं सांगितलं जात आहे. मंदिर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
रत्नागिरी, पुणे आणि नागपूर येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप सुरू केला आहे. रत्नागिरीत 50 पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत. किचन व वॉर्डमधील कामकाजावर परिणाम झाला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करणे व रिक्त पदे भरणे या प्रमुख मागण्या असून त्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे.
महिला आरक्षण विधेयकावरून ठाकरे गटात मतभेद उघड झाले आहेत. पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात मत व्यक्त केल्यामुळे माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर पक्षातीलच नेते सचिन अहिर यांनी उपरोधिक टीका केली. या वक्तव्यामुळे पक्षातील अंतर्गत नाराजी समोर आली असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
NCERTच्या आठवीच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा वगळण्यात आल्याच्या विषयावर बोलत असताना मंत्री शिवेंद्रसिंह राजेभोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या विषयाबाबत 100% संवेदनशील असून कोणती चुकीची गोष्ट घडली, तर ते खपवून घेणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकरिता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचे आज लोकार्पण करण्यात आले. यामध्ये राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या आरोग्यविषयक विविध योजनांचे एकत्रिकरण करण्यात येणार असून त्यासाठी प्रथमच राज्यात वॉर रूम स्थापन केली जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष केवळ आर्थिक मदतीचा स्रोत न राहता, रुग्ण, रुग्णालये आणि शासन यांना एकत्र आणणारे प्रभावी व्यासपीठ ठरत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
इराणमध्ये पडद्यामागे सुरू असलेल्या हालचाली आता समोर आल्या आहेत. अमेरिकेने केलेली युद्धबंदी बुधवारी संपत असताना आणि पाकिस्तानात चर्चेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होत असताना इराणमध्ये 'इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स' राजसत्तेवर पूर्णपणे कब्जा मिळविला आहे. आयआरजीसीचे मेजर जनरल अहमद वाहिदी हे इराणचे सर्वात शक्तिशाली नेते बनले आहेत. यामुळे जगावर महायुद्धाचे संकट घोंघावू लागले आहे.
हिंगोली जिल्ह्यात प्रशासनाला बालविवाह रोखण्यात मोठ यश मिळाले आहे, यंदाच्या वर्षी मार्च अखेरपर्यंत 42 पेक्षा अधिक बालविवाह प्रशासनाने रोखले आहेत, हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बालविवाह रोखण्यासाठी भटजी ते वाद्य चालक, अशा सगळ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
इराण-अमेरिकेच्या दुसऱ्या फेरीच्या चर्चेची तयारी सुरू असून, इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानला येणार असल्याचा दावा अमेरिकन माध्यमांनी दिला आहे. परंतु इराणकडून अजूनही अधिकृत याबाबत घोषणा करण्यात आलेली नाही. अमेरिकेचे शिष्टमंडळ इस्लामाबाद इथं दाखल झाले आहे. पण इराणमधील शिष्टमंडळ अजून आलेले नाही.
पंढरपूर इथला जिजामाता उद्यान लोकार्पण कार्यक्रमावरून भाजप शिवसेना आमने-सामने आल्याचे पहायला मिळाले. उद्यान लोकार्पण कार्यक्रमात भाजप आमदार समाधान आवताडे यांनी नगराध्यक्षा प्रणिता भालके आणि त्यांच्या नगरसेवकांवर टक्केवारीचा गंभीर आरोप केला आहे.
सांगलीच्या वाळवा इथल्या क्रांतिवीर नागनाथ आण्णा नायकवडी यांच्या हुतात्मा सहकारी साखर कारखान्या विरोधात सभासदांकडून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. कारखान्याचे चेअरमन व क्रांतिवीर नागनाथआण्णा नायकवडींची सुपुत्र वैभव नायकवाडी यांच्यावर गंभीर आरोप करत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. कारखाना कर्जमुक्त करण्याबरोबर विद्यमान चेअरमन वैभव नायकवडी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली असून, या आंदोलनामध्ये नागनाथ अण्णा नायकवडींचे नातू आणि वैभव नायकवडीचे पुतणे माजी सरपंच गौरव नायकवडी देखील सहभागी झाले आहेत.
लग्नास नकार दिल्याचा जुना राग मनात धरून एका नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला एक्स बॉयफ्रेंडने संपवल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये घडली आहे. सोनी गणेश रामपुरे असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बापू सुरेश आरगोड याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
चंद्रपूर महापालिकेच्यावतीने आयोजित 'हिराई महोत्सवा'च्या उद्घाटन सोहळ्यात राजशिष्टाचाराच्या (प्रोटोकॉल) मुद्द्यावरून मोठे नाराजीनाट्य पाहायला मिळाले. शासकीय कार्यक्रमात नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी थेट मंचावरूनच जिल्हा प्रशासन आणि मनपावर ताशेरे ओढले आणि कार्यक्रमातून 'वॉक आऊट' केले. याप्रकरणी आता त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे धाव घेत विशेषाधिकार भंगाची मागणी केली आहे.
भाजपचे नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरवातीला पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर मिरा रोड पोलिसांनी तत्काळ दखल घेत संबंधित गुन्हा नोंदवला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 69 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे कलम फसवणूक करून शारीरिक संबंध ठेवणे तसेच धमकी देणे या प्रकारांशी संबंधित आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री तसेच उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांच्या पुढाकाराने राबवण्यात येत असलेल्या 'खासदार मातृशक्ती अभियाना' अंतर्गत कांदिवली येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. षण आहार वाटप: कांदिवली येथील महापालिका रुग्णालयाच्या पटांगणात 125 गर्भवती महिलांना पोषण किटचे वाटप करण्यात आले.
कल्याणवरुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल सुमारे पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत असून मध्य रेल्वेच्या मार्गावर सलग दुसऱ्या दिवशी प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.
महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुतीचा आज जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार, जांबोरी मैदान ते वरळी डोमदरम्यान मोर्चा काढला जाणार आहे. मोर्चानंतर वरळी डोममध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.