

नीट पेपरफुटी प्रकणावरुन काँक्रोज जनता पार्टीसह आता काँग्रेसने देखील केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी लावून धरली आहे. याबाबत विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले. यानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यासह विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. तसेच नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे सांगत राहुल गांधी पेपरफुटीवरुन राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.
पालघर जिल्ह्यात आज सायंकाळपासून अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर ही परिणाम झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने उद्यासाठी पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने उद्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातील सर्व शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच अत्यावश्यक काम असेल तरच नागरिकांनी बाहेर पडावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
देशभर गाजत असलेल्या कथित NEET पेपरफुटी प्रकरणावरून सुरू झालेलं आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलं आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जनंतर या आंदोलनाने नवं राजकीय वळण घेतलं आहे. लाठीचार्जच्या निषेधार्थ विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली असून काँग्रेसने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक आक्रमकपणे लावून धरली आहे. या आंदोलनादरम्यान जेष्ठ नेते शरद पवार यांनी पंचप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावरून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली. आता या भेटीवर शरद पवार यांनी माहिती दिली आहे.
सण, उत्सव, विविध कार्यक्रम, मंत्रीमहोदय व इतर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे तसेच जातीय संवेदनशील वातावरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा महसूल हद्दीत २२ जुलै ते ४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३७ (१) व ३७ (३) अन्वये प्रभारी अपर जिल्हादंडाधिकारी सुभाष दळवी यांनी हा प्रतिबंधात्मक आदेश पारित केला आहे.
दिल्लीतील काँग्रेसच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर जे आंदोलन केलं त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत. एवढ्या मोठ्या जबाबदार पदावर असताना त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर असं आंदोलन करणं हे अतिशय बेजबबदार पद्धतीचं आहे. ज्या ठिकाणी कोणी आंदोलन करू शकत नाही, अशा ठिकाणी तुम्ही जाता आणि लोकांना आवाहन करता इकडे या म्हणून, म्हणजे तुम्हाला काय करायचं होतं? पंतप्रधानांच्या निवासस्थानी तुम्हाला काही घातपात करायचा होता का? तुमच्या मनामध्ये काय होतं? या देशात अराजकता पसरवायची आहे का तुम्हाला? असा सवाल यावेळी एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांना केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर संसदेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह आंदोलन केलं होतं. यावेळी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनावेळीच दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतलं. तीन तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली. या आंदोलनाविरोधात भाजपनंही देशभरात आंदोलनाला सुरुवात केली आहे. मुंबईचे भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वात काँग्रेसविरोधात आंदोलन करतानाच काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.
सोनम वांगचूक यांनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांना पत्र लिहिले आहे. आंदोलनकर्त्यांवर कोणतीही कारवाई करणार नाही, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर चर्चा आणि नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई, या मुद्दयांवर लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच आपण उपोषण मागे घेऊ, असे वांगचूक यांनी पत्रात म्हटले आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यांनी यावेळी तीन प्रमुख मागण्या केल्या. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी आणि विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.
दिल्लीत सुरु असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाला मुंबईतल्या विद्यार्थ्यांनी पाठिंबा दर्शवला असून आता चेंबूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन सुरु आहे.
दिल्लीतील आंदोलनकर्त्यांवर लाठी चार्ज केल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये मनसे रस्त्यावर उतरली आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेनं रास्ता रोको आंदोलन केलं आहे.
दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर सुरु असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये तरुणांना झालेल्या मारहाणीविरोधात विरोधकांनी आज संसदेत रान पेटवलं. या आंदोलनावर चर्चेची मागणी कालच मोदींच्या घराबाहेर आंदोलन करताना राहुल गांधींनी केली होती.
जंतर मंतरवर नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन केले जात आहे. मराठा समाजाचे नेते आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीत अभिजीत दिपके यांची भेट घेतली. सरकारला मोठा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, शांततेच्या आंदोलनात ताकद आहे, हे आम्ही सिद्ध करून दाखवले आहे. आम्ही सुद्धा तुमच्यासोबत आहोत. जागा फक्त सोडू नका, त्यांना आपण निवडून दिलेले आहे. आपण आपल्या मायबापांनी यांना मतदान केले आहे .
दिल्लीतील जंतर मंतरवर सुरु असलेल्या अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला ठाकरे यांच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट देत पाठींबा दर्शवला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. त्यानंतर दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाबाबत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली.
ठाण्यातील नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जांभळी नाका परिसरात असलेल्या 'महाराजा हॉटेल लॉज'मध्ये एका 23 वर्षीय युवती तिच्या प्रियकरानेच हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काल रात्रीच्या सुमारास ही माहिती ठाणे नगर पोलिसांना मिळाली. संध्या म्हस्के (वय 23) असे मयत तरुणीचे नाव असून तिची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनीआरोपी प्रियकर नंदकिशोर गाडेकर (वय 27) याला अटक केली आहे.
ठाण्यातील आनंदनगर येथील एम. के. प्लाझा जवळ सकाळी दोन घरांवर झाड कोसळल्याची दुर्घटना घडली. तर एका घराच्या छताचे पत्रे तुटून मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी हे सध्या घरांवर पडलेले झाड कापून बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
दिल्ली येथे विद्यार्थ्यावर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ जालन्यातील टेंभुर्णी येथील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला आहे. तसेच नीटच्या परीक्षेत झालेल्या गैरव्यवराबाबत न्याय मागण्यासाठी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. विद्यार्थी आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे उपोषण दडपण्याचा शासन प्रयत्न करीत असल्याचा आरोप देखील यावेळी ग्रामस्थांनी केला आहे.
साखळीचोरीच्या 2023 मधील एका प्रकरणात लातूर जिल्हा न्यायालयाने आरोपी सागर ऊर्फ टिल्लू भगवान सोनवणेला तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. तसेच ठरवून पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. सरकारी पक्षाने भक्कम पुराव्यांच्या आधारे आरोप सिद्ध केल्याचे न्यायालयाने नमूद केले. निलंगा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. गुंजावटे यांनी सोमवारी हा निकाल दिला.
उसनवारीचे 70 हजार रुपये परत न केल्याच्या रागातून शौकत शेख या मजुराने आपले वडील इसाक शेख इस्माईल शेख (वय 60) यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इसाक शेख इस्माईल शेख यांनी आपल्या धाकट्या मुलाच्या लग्नासाठी मोठा मुलगा शौकत शेख याच्याकडून पैसे उसने घेतले होते.
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह अन्य मागण्यांसाठी कॉक्रोच जनता पक्षाने (CJP) आंदोलन सुरू केले आहे. दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीमारामुळे पसरलेल्या तीव्र असंतोषाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, महापालिका मुख्यालय, आझाद मैदान, चर्चगेट स्थानक, मंत्रालय, विधान भवन, मुख्यमंत्री, उपमुख्यत्री, मंत्र्यांचे शासकीय निवासस्थान यासह अन्य ठिकाणी मंगळवारपासून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे.
परदेशी चलन आणि सोन्याचे दागिने असलेले पार्सल आल्याचे आमिष दाखवून कल्याणमधील एका 45 वर्षीय महिलेची आठ लाख 5 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ‘सायबर’ भामट्यांनी केलेल्या या कृत्याबाबत रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणमध्ये राहणाऱ्या एका ‘ब्युटिशियन’ महिलेकडून संशयितांनी विविध बहाणे सांगून आर्थिक फसवणूक केली.
राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) बसने दिलेल्या धडकेत रमेश घाग (वय 62) या दुचाकीस्वार व्यक्तीचा मृत्यू झाल्याप्रकरणी ठाणे मोटार अपघात विमा दावा लवादाने मृताच्या वारसांना 18 लाख 62 हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. चालकाच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात झाल्याचे निरीक्षण लवादाने नोंदवले आहे.
नीट परीक्षेच्या मुद्यावरुन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. अशातच आता धर्मेंद्र प्रधान यांनी एक्सवर पोस्ट करत पहिल्यांदाच या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. "पावसाळी अधिवेशनादरम्यान गोंधळ निर्माण करण्यासाठी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी विद्यार्थ्यांचा निर्लज्जपणे राजकीय साधन म्हणून वापर करत आहेत. सरकारने नीट प्रकरणावर संसदेत चर्चा करण्याची तयारी दर्शवली तरीही काँग्रेसने चर्चेपेक्षा राजकीय स्टंटबाजीला प्राधान्य दिलं", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं आहे. एक्सवर पोस्ट करत मोदींनी लिहिलं की, "अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण. समाजसेवा आणि महाराष्ट्राच्या विकासातील त्यांचे योगदान उल्लेखनीय होते. समाजातील सर्वच स्तरांत त्यांना मोठा आदर होता. राज्यातील एनडीए (NDA) सरकार त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे.", अशा शब्दात मोदींनी अजितदादांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना काल पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून तुम्ही पूर्ण ताकद लावा पण विद्यार्थ्यांच्या न्यायासाठीचा हा लढा आता थांबणार नाही, असं म्हटलं आहे. तर राहुल यांनी यावेळी त्यांच्या अटकेचे फोटो देखील शेअर केले आहेत.
आज दिवंगत नेते अजित पवार यांची जयंती आहे. त्यानिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दादांच्या आठवणीत एक ट्वीट केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी आठवणींना उजाळा देत अजित पवारांना अभिवादन केलं आहे. शिवाय त्यामनी अजितदादांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळी जाऊनही अभिवादन केलं आहे.
राज्यात पावसाने पुन्हा जोर धरला असून हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी आज सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुण्याच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. तसेच कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीसह नाशिक, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे.
मुंबईत पावसाने आज पुन्हा एकदा जोर धरला आहे. त्यामुळे हवामान खात्याने मुंबईसह कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सकाळपासूनच पावसाचा जोर वाढल्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याच आवाहन प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.