Maharashtra Live News Update: 'त्या' सर्व शेतकर्‍यांचे फार्मर आयडी बंद केले जाणार: महसूल मंत्री बावनकुळे

Political Breaking Live Marathi Headlines Updates:नरहरी झिरवाळ अडचणीत, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण,गॅस सिलिंडरचा तुटवड्याचे संकट,इराण-इस्त्राइल-अमेरिका युद्धाचे अपडेट, राज्यातील राजकीय घडामोडी, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

'माझ्या भावाचा विमान अपघात झाला. आज त्याला दोन महिने पूर्ण,मात्र...'; खासदार सुळे

लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 28 जानेवारीला माझ्या भावाचा विमान अपघात झाला. आज त्याला दोन महिने पूर्ण झाले, मात्र अजून न्याय मिळालेला नाही,” असं सांगत लोकसभेत अजित पवारांच्या अपघाताचा मुद्दा मांडला. त्या म्हणाल्या, जर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यालाच न्याय मिळत नसेल, तर सामान्य नागरिकांना न्याय कसा मिळेल?” असा प्रश्नही उपस्थित केला. तसेच अजित पवार यांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी,अशी मागणीही सुळे यांनी सरकारकडे केली आहे.

'त्या' सर्व शेतकर्‍यांचे फार्मर आयडी बंद केले जाणार: महसूल मंत्री बावनकुळे

राज्यात अनेक ठिकाणी सरकारी पांंणद रस्ता आहे आणि त्यावर अनेक शेतकर्‍यांनी अतिक्रमण केले आहे. जर हा सरकारी रस्ता अडवला किंवा त्यावर अतिक्रमण केलं, तर त्या संबंधित शेतकर्‍यांचे फार्मर आयडी बंद केले जाणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. तसेच त्यांनी अशा फार्मर आयडी बंद केलेल्या शेतकर्‍यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार नसल्याचा इशाराही बावनकुळेंनी दिला आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवनिका ट्रस्टला पाणी दिल्याचा आरोप दिशाभूल करणारा: अंधारे

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रकरणावरून रोज धक्कादायक खुलासे समोर येत आहे. तर दुसरीकडे आरोप-प्रत्यारोपांनी राज्याचं राजकारणही ढवळून निघालं आहे. अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टला पाणी देण्यात आल्याचा आरोप दिशाभूल करणारा असल्याचं म्हटलं आहे. त्या म्हणाल्या, 2020 मध्ये मिरगाव ग्रामसभेकडून पाणीपुरवठ्यासंदर्भातला ठराव केला होता. हा प्रस्ताव पुढे नेण्यासाठी रुपाली चाकणकर यांनी शिफारस केली होती. तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपसमितीकडून त्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती.

Beed Police : सिरसाळ्यातील पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी

रामनवमीच्या मिरवणुकीला परवानगी न मिळाल्याने बीडमध्ये राम भक्तांनी ठिय्या आंदोलन केले. या प्रकरणी सिरसाळ्यातील पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. नागरिकांनी आमदार महेश लांडगे, संग्राम जगताप यांच्याकडे व्यथा मांडल्या आहेत,

mawal Market comitte : बाजार समितीच्या निवडणुकीत नेमके काय झाले?

मावळ तालुक्यातील राजकारणात मोठा उलटफेर झाला असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला आहे. तालुक्यात स्पष्ट बहुमत असतानाही भारतीय जनता पक्षाचे सुभाष जाधव यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम कलवडे यांचा पराभव करत सभापतीपदावर विजय मिळवला आहे. या निकालामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलल्याची चर्चा सुरू झालीये.

Devendra Fadnavis : दरेकरसाहेब, आमचं असं काय चुकलं की तुम्ही आमचं घर उन्हात बांधलं : देवेंद्र फडणवीस

मुंबै बॅंकेच्या सहकार भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार तथा बॅंकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांना मिश्किल टोला लगावला. ज्या ज्या वेळी मी मुंबै बॅंकेच्या कार्यक्रमाला आलो, त्या त्यावेळी काहीतरी देऊन गेलो, असं सांगितलं. मी दरेकरसाहेब आम्हाला तुम्ही उन्हात का बसवलं. उन्हात बसवलं तर बसवलं पण कार्यक्रम अशावेळी घेतला की, सूर्याचे उन्ह सरळ माझ्या तोंडावर येऊन राहिलं. असं आमचं काय चुकलं की तुम्ही आमचं घर उन्हात बांधलं, असा मिश्किल सवाल फडणवीस यांनी केला.

Dhananjay Munde : जन्माला आल्यानंतर चार महिने डोळेच उघडले नाहीत, तर लिव्हरचा त्रास जन्मताच होता, कसा वाचलो देव जाणे :   मुंडे

माझ्या डोळ्याच्या संकटाच्या बाबत माजी आमदार भीमराव धोंडे यांनी इतरांनी सांगितले. पण जन्माला आल्यापासून माझ्या पाठीशी संघर्ष आहे. जन्माला आल्यानंतर चार महिने डोळेच उघडले नाहीत. जन्मताच लिव्हरचा त्रास होता. कसा वाचलो देव जाणो. अनेक संकटे आली, पण जनतेच्या आशीर्वादाने वेळ कधीच आली नाही. ज्यांना बोलायचं आहे, त्यांना बोलू द्या. मी सव्वा वर्ष बोललो नाही. आताही बोलणार नाही. कारण आपल्या गप्प राहण्यात एवढी ताकद आहे, तर बोलल्यानंतर काय होईल, असा सूचक इशाराही धनंजय मुंडे यांनी दिला.

Hemant Ghodse : अशोक खरातच्या दरबारात हेमंत गोडसेंची हजेरी; हात दाखवून भविष्य जाणून घेतानाचा व्हिडिओ व्हायरल

नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे हे अशोक खरात याला हात दाखवून भविष्य जाणून घेत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. खरात हा गोडसेंचे भविष्य सांगत असल्याचा त्या व्हिडिओमध्ये चित्रित झाले आहे. कोणत्या कोणत्या नेत्यांनी खरातच्या दरबारात हजेरी लावली याची चर्चा असतानाच हेमंत गोडसेंचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Ajit Pawar Death Case : माझ्या भावाच्या अपघाताला दोन महिने झाले तरी अद्याप आमच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही : सुप्रिया सुळे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा मुद्दा खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत उपस्थित केला आहे. माझ्या भावाच्या अपघाताला दोन महिने झाले, तरी अद्याप आमच्या कुटुंबाला न्याय मिळालेला नाही. माझा राज्याचा उपमुख्यमंत्री होता, त्यांना न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्यांना कसा न्याय मिळणार. एक एफआयआर करायला रोहित पवार यांना जंग जंग करावे लागले. महाराष्ट्र सरकारने तर एफआयआर घेतलाच नाही. अनेक राज्यांत जाऊन एफआयआरसाठी विनंती करावी लागली. उपमुख्यमंत्र्यांचा एफआयआर घेतला जात नसेल तर सर्वसामान्य माणसांनी कुठं जायचं, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांना लोकसभेत उपस्थित केला.

Devendra Fadnavis : लॉकडाऊन संदर्भात अफवा पसरविल्या किंवा पोस्ट फॉरवर्ड केल्या तर फौजदारी कारवाई होईल : मुख्यमंत्री

लॉकडाऊन होणार नसल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे, त्यामुळे अशा अफवा पसरविणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल. अशा प्रकारची खोटी माहिती सोशल मीडियात टाकणे किंवा अशा पोस्ट फॉरवर्ड केल्या तरी त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल. अफवांच्या आधारावर लोकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावू नये. अधिकच पेट्रोल-डिझेल साठवून ठेवलं तर कृत्रिम टंचाई निर्माण होते, त्यामुळे ग्राहकांनी आवश्यक तेवढंच पेट्रोल डिझेल भरावं, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Sambhajinagar News संभाजीनगर मनपाच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ

संभाजीनगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतून ठाकरेसेनेच्या ६ नगरसेवकांना बाहेर काढण्यात आलं.. पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेण्यावरुन मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला जात होता..यावेळी या योजनेसाठी उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्याची मागणी करत महापौरांसमोर ६ नगरसेवकांनी गोंधळ घातला...यावरुन ठाकरे सेनेच्या ६ नगरसेवकांना सभागृहाबाहेर काढण्यात आले. तर केवळ ठाकरेंचे नाव घेतल्यानेच ही कारवाई केल्याचा आरोप नगरसेवकांनी केलाय..

Pune News : कुणाल कुमार यांची स्वेच्छा सेवानिवृत्ती.

पुणे महापालिकेचे माजी आयुक्त तसेच विद्यमान व्यवस्थापकीय संचालक,शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मुंबई, श्री. कुणाल कुमार यांनी भारतीय प्रशासन सेवेतून (आयएएस) स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली. या मार्च अखेरीनंतर ते स्वेच्छा सेवानिवृत्त होणार असून राज्य सरकारकडून तसे आदेश देण्यात आले आहेत.

 ladki bahin yojana २-३ दिवसांत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. पुढील २-३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

Trump on Narendra Modi मोदी आणि मी काम पूर्ण करतो

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आठवडाभरात दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलंय. इराणवरील हल्ल्यांनंतर ट्रम्प यांनी मोदींना फोन करून जागतिक स्थैर्यावर चर्चा केली. 'आम्ही दोघे मिळून काम पूर्ण करतो' असे म्हणत त्यांनी भारताला विश्वास घेतलंय. होर्मुज जलमार्गातील व्यापार सुरक्षित ठेवण्यासाठी भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचं अमेरिकेनं मान्य केलंय.

Devendra Fadnavis : भारतात उत्तम मॅनेजमेंट, एक महिना पुरेल एवढा साठा

पश्चिम आशियातील स्थितीच्या पार्श्वभूमीवर इतर देशांमध्ये शटडाऊनसारखी स्थिती असून भारतात मात्र उत्तम मॅनेजमेंट सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पेट्रोल-डिझेलवरली उत्पादन शुल्क कमी केल्याने मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. आता सामान्यांना जास्त पैसे द्यावे लागणार नाहीत. आपल्याकडे एक महिना पुरेल एवढा इंधनसाठी असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

Chandrashekhar Bawankule : मोदी सरकारचा धाडसी निर्णय

केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जगभर इंधनटंचाई आणि दरवाढीचं संकट अधिक गडद होत असताना अनेक देशांनी पेट्रोल - डिझेलच्या किमती वाढवण्याचा मार्ग स्वीकारला. मात्र अशा कठीण काळातही देशातील सर्वसामान्य नागरिकांचा विचार करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एक्साईज ड्युटी कमी करण्याचा धाडसी आणि जनहिताचा निर्णय घेतला आहे. जागतिक दबावाच्या परिस्थितीतही नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये, यासाठी घेतलेलं हे पाऊल म्हणजे संवेदनशील, जबाबदार आणि जनकेंद्री शासनाची जिवंत साक्ष आहे.

Narhari Zirwal : झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी आता महायुतीतूनच

शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी यांनीही आता मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा, असे त्यांनी म्हटले आहे. विरोधकांकडून आधीपासून व्हिडीओप्रकरणी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

Ashok Kharat Case : रुपाली चाकणकरांना अटक करा...

अशोक खरातप्रकरणी एसआयटी पथकाची भेट घेणार असल्याची माहिती रुपाली ठोंबरे यांनी दिली. प्रश्नांची उत्तरे त्यांना भेटल्यानंतर मिळतील. रुपाली चाकणकर यांची आतापर्यंत चौकशी का केली नाही, असा सवाल एसआयटीला केला जाणार आहे. त्यांना अटक करण्याची मागणीही केली जाणार असल्याचे ठोंबरे यांनी सांगितले.

Ashok Kharat case : सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे नाशिकमध्ये

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील या नाशिकमध्ये दाखल झाल्या आहेत. अशोक खरात प्रकरणात त्यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली.

भोंदू अशोक खरात प्रकरणात तक्रारींचा वाढता पूर

भोंदू अशोक खरात प्रकरणात SIT कडून सुरू केलेल्या हेल्पलाईनवर मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. अनेक पीडितांनी पुढे येत धक्कादायक अनुभव सांगितले आहेत. या तक्रारींमुळे प्रकरण अधिक गंभीर बनले असून तपास यंत्रणा वेगाने कारवाई करत आहे. लवकरच आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

देशात कोरोनासारखा लॉकडाऊन लागणार नाही मोदी सरकारनेच दिली मोठी अपडेट

नाशिक दौऱ्यावर सुषमा अंधारे; महत्त्वाच्या भेटींकडे लक्ष

शिवसेना उबाठा नेत्या सुषमा अंधारे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. दुपारी सुमारे एक वाजता त्या नाशिकचे पोलीस अधीक्षक यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर त्या SIT प्रमुखांशीही चर्चा करणार आहेत. अशोक खरात प्रकरणाबाबत त्या कोणता नवा खुलासा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Manoj Jarange विखे पाटलांनी मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नये ,जरांगे पाटलांचा इशारा 

मराठ्यांच्या वेदना जाणून घ्यायला विखे पाटलांकडे वेळ नाही. त्यांनी समाजाचा रोष अंगावर घेऊ नये, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा उपसमिती बरखास्त करून मराठा-कुणबी स्वतंत्र मंत्रालय' स्थापन करावं अशी मागणीही त्यांनी केली.

Electricity Rates: वीज ग्राहकांना दिलासा, ऐन उन्हाळ्यात वीज दरात कपातीचा निर्णय

वीज वितरण कंपन्यांनी वीजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या एक एप्रिलपासून राज्यभरातील वीज दरांमध्ये ही कपात होणार आहे.

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात लक्षणीय कपात केली आहे, इंधनाच्या किमती कमी होणार आहेत. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 13 रुपयांवरून 3 रुपये करण्यात आले आहे. डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपयांवरून शून्य केले आहे. या निर्णयामुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होण्याची शक्यता आहे

अंधारे, ठोंबरे, संगीता तिवारी घेणार नाशिक पोलिस अधीक्षकांची भेट

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील आणि संगीता तिवारी आज नाशिकला जाऊन पोलिस अधीक्षक आणि एसआयटी प्रमुखांना भेटणार आहेत.

Captain Ashok Kharat case : भोंदूबाबा खरातची HIV टेस्ट

भोंदूबाबा अशोक खरात याची एचआयव्ही टेस्ट करण्यात आली आहे. त्याचा एचआयव्ही टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

Nashik: खरातची कोट्यवधींच्या व्यवहारांची कागदपत्रे ED कडे

भोंदूबाबा अशोक खरात यांची सध्या एसआयटी चौकशी करीत आहे. आता ED, फॉरेक्स आणि कस्टमच्या रडारवर खरात असल्याचे समजते. विदेश दौरे आणि विदेशी चलन व्यवहारांची सखोल चौकशी ते करणार आहेत.

West Asia conflict india response : पश्चिम आशियातील युध्दाच्या परिस्थितीचा मोठा फटका भारताला बसू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन बैठक बोलवली आहे. आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना मोदी काय सूचना देशात याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com