Maharashtra Political Live Update : गोकुळ दूध संघाच्या संस्था प्रारूप यादीच्या हरकतीवरून माजी संचालकांचा ठिय्या

Political Breaking Live Headlines Updates : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस असून, परभणीतील शिवसेनेच्या मेळाव्यावरून वादासह राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घेऊयात...
Live-Update-2
Live-Update-2Sarkarnama

गोकुळ दूध संघाच्या संस्था प्रारूप यादीच्या हरकतीवरून माजी संचालकांचा ठिय्या

गोकुळ दूध संघाच्या संस्था प्रारूप यादीच्या हरकतीवरून माजी संचालकांचा ठिय्या. हरकतीवरील सुनावणी पाच वाजेपर्यंत न दिल्याने संचालकांनी दुग्ध सहाय्यक निबंधक कार्यालयातच ठिय्या मारला. अधिकारीही दिवसभर उपस्थित नसल्याने संचालकांसह ठरावधारकांचा संताप झाला. गोकुळच्या प्रारूप यादीवर सुनावणी निकालाचा आज अंतिम दिवस होता. मात्र, निकाल वेळेत होत नसल्याने संचालकांनी संताप व्यक्त केला आहे.

शिवाजी महाराजांच्या शेजारी मोदींचा फोटो नको; अमित ठाकरेंनी घेतला आक्षेप

मनसे नेते अमित ठाकरे यांनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेजवळ लावलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर आक्षेप घेतला. ‘महाराजांच्या शेजारी मोदींचा फोटो नको,’ अशी भूमिका त्यांनी मांडली. विद्यार्थ्याने प्राध्यापकांच्या कार्यालयातील मोदींच्या फोटोबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर अमित ठाकरे यांनी फोटो काढण्यास सांगितले.

वाघोलीत स्कूल बसचा भीषण अपघात; 15 विद्यार्थी बचावले, सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

पुण्यातील वाघोली परिसरात स्कूल बसने विद्युत पोलला धडक दिल्याने अपघात झाला. बसमध्ये असलेले 15 विद्यार्थी सुदैवाने सुरक्षित बचावले, मात्र एका विद्यार्थिनीला गंभीर दुखापत झाली. बसचालक नशेत असल्याचा आरोप समोर आल्याने पालक संतप्त झाले असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल करा नवनाथ बन यांची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान करण्याचे काम अमित ठाकरे यांनी केले असून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली आहे. सरकारी कार्यालयात प्रोटोकॉल असतो. मोदींचा फोटो काढण्यापूर्वी अमित ठाकरेंनी प्रोटोकॉल वाचायला हवा होता, ते मनसेचे नवीन नेते आहेत, असंही बन यांनी म्हटलं.

पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवला

पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेशेजारी लावलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी काढालयाल लावला आहे.

JALGAON : खडसे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला राजकारण आणण्याची गरज नव्हती

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील कोथळीमध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना महादेव जानकर यांनी एकनाथ खडसे यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचे कौतुक केले.

खडसे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला राजकारण आणण्याची गरज नव्हती. हा सर्वपक्षीय कार्यक्रम असल्याने सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित राहायला हवे होते, अशी भूमिका महादेव जानकर यांनी व्यक्त केली. एकनाथ खडसे यांच्याबद्दल मला नेहमीच आदर असून, माझ्या राजकीय जीवनात त्यांचे स्थान वेगळे आहे. खडसे हे राज्याच्या राजकारणातील दीपस्तंभ आहेत, असे महादेव जानकर यांनी म्हटले.

रायगडच्या महायुतीत पुन्हा वाकयुद्ध; अनिकेत तटकरेंचा महेंद्र दळवींवर घणाघात

आमदार महेंद्र दळवी हे वारंवार सुनिल तटकरे आणि अनिकेत तटकरे यांच्यावर टीका करत आहेत. दळवी यांनी अनिकेत तटकरे यांना ‘सरोगशी बाळ’ म्हटले, तर सुनिल तटकरे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अस्तित्व संपले असल्याची टीकाही केली. या टीकेला आमदार अनिकेत तटकरे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलंय.

आमदार अनिकेत तटकरे यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. महेंद्र दळवी काय बोलतात, हा त्यांचा अधिकार आहे; मात्र त्यांच्या वक्तव्यांतून त्यांची संस्कृती दिसून येते, अशी टीका अनिकेत तटकरे यांनी केली. आम्ही जर संपलेलो असू, तर त्यांना वारंवार तटकरे यांचं नाव घेण्याची गरज काय? कुठेतरी त्यांना तटकरे यांची भीती वाटते. निवडणूक आली की त्यांना तटकरे आठवतात आणि निवडणूक संपली की ते विसरून जातात,” असा टोला अनिकेत तटकरे यांनी लगावला.

तसंच, “दळवी दोन टर्म आमदार झाले आहेत. त्यांनी ‘सरोगशी बाळ’ या शब्दाचा अर्थ लिहून दाखवावा किंवा आम्हाला समजावून सांगावा,” असं आव्हानही अनिकेत तटकरे यांनी दिलं.

Mumbra Ganpati Idol मुंब्य्रात मुस्लिम तरुणांनी सावरली गणेश मूर्ती

मुंब्रा येथून गणपतीची मूर्ती घेऊन जात असताना ट्रॉलीचे चाक अचानक निसटल्याने मूर्ती एका बाजूला झुकली... ही परिस्थिती पाहून काही मुस्लिम तरुण तातडीने पुढे सरसावले आणि त्यांनी मूर्तीला खाली पडू न देता ट्रॉलीचे चाक दुरुस्त केले... या अनुकरणीय घटनेमुळे राजकारण करणाऱ्यांना सलोख्याचा आणि ऐक्याचा एक मोलाचा संदेश मिळाला आहे...

Sanjay Raut On Eknath Shinde : फोडाफोडी केली नाही तर शिंदेंचं मन थाऱ्यावर नसतं, राऊतांचा टोला 

मुंबईच्या महापौरपदासाठी एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर सुरू केल्याची चर्चा आहे.. त्यावरूनच आता ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊतांनी शिंदेंवर हल्लाबोल केलाय... फोडाफोडी केल्याशिवाय शिंदेंचं मन थाऱ्यावर नसतं असा टोलाही त्यांनी लगावला आहे. त्यामुळे त्यांच्या चिरंजीवांनी त्यांच्यावर ताबडतोब उपचार करणं गरजेचं आहे. आमचे नगरसेवक कुठेही जात नाही म्हणून, अत्यंत चुकीच्या पद्दतीने दबावाखाली त्यांना ते बाद करू पाहत आहेत असही राऊत म्हणाले.

Manoj Jarange : उपोषणावर ठाम जरांगे म्हणाले,'मुंबईला जाणारच उपोषण सोडणार नाही

मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी उपोषण सोडणार नाही, काहीही झालं तरी मुंबईला जाणारच असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. तर मराठा आंदोलकांनी कुणालाही समजण्याआधी मुंबईत जायला सुरुवात करावी असं आवाहनही त्यांनी केलंय...

राहुल गांधी यांच्या विरोधातच ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

उत्तराखंड मधील हलद्वानीमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधातच ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी हलद्वानी येथील रामलीला मैदानातील शुद्धीकरण हवनला दलित विरोधी म्हटलं होतं. यावरूनच अनुसूचित वर्गाच्या भावना दुखावल्याचा गंभीर आरोप करत अमित कुमार नावाच्या तरूणाने राहुल गांधींविरोधात तक्रार केली आहे.

अधिकाऱ्यांना चोपून काढू म्हणणारे राजू शेट्टी राक्षस आहेत का? आमदार राजेश क्षीरसागर यांची आक्रमक प्रतिक्रिया

शक्तीपीठ महामार्गासाठीच्या मोजणीवरून आमदार राजेश क्षीरसागर यांचा माजी खासदार राजू शेट्टी यांना सज्जड दम दिला आहे. अधिकाऱ्यांना चोपून काढू म्हणणारे राजू शेट्टी राक्षस आहेत का? असा सवाल उपस्थित करत सरकारने एकदा मनात घेतलं तर तुम्हाला टांगून ठेवलं जाईल अशी आक्रमक प्रतिक्रिया क्षीरसागर यांनी दिली आहे.

उद्या मुंबई भाजपची कार्यकारिणीची बैठक पार पडणार

मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या अध्यक्षतेखाली उद्या मुंबई भाजपची कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. दादरमधील वसंतस्मृती कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे.

अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होमार आहे. जिल्हा व सत्र न्यायालयात ही सुनावणी होणार असून सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम कोर्टात युक्तीवाद करणार आहेत. नाशिक शहर, ग्रामीण आणि नगर जिल्ह्यात अशोक खरातविरोधात एकूण १७ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी १२ SIT कडे असल्याची माहिती आहे.

शिक्षक भरतीत महिलांना मोठी संधी

राज्यातील शासकीय आणि खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. पवित्र संकेतस्थळाच्या माध्यमातून मुलाखतीविना निवड प्रक्रियेत तब्बल १३ हजार १११ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, शिफारस झालेल्या उमेदवारांमध्ये सुमारे ६० टक्के महिला आहेत. त्यामुळे शिक्षक होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या ७ हजार ३०० हून अधिक महिला उमेदवारांना मोठी संधी मिळाली आहे.

मुंबै बँकेच्या निवडणुकीच्या मैदानात एकनाथ शिंदेंची शिवसेना उतरणार

भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आता सहकार क्षेत्रातील एका महत्त्वाच्या निवडणुकीवरून थेट सामना रंगण्याची शक्यता आहे. मुंबै मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना स्वतंत्रपणे मैदानात उतरणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे मुंबै बँकेच्या निवडणुकीत शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप अशी थेट लढत पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गोकुळची निवडणूक पुन्हा कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता

गोकुळची निवडणूक पुन्हा कायाद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. हरकतीमधील 1750 दूध संस्थेच्या सुनावणीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. निवडणूक अधिकारी नारायण परजणे आज निकाल देणार आहत. सत्ताधारी किंवा विरोधकांच्या विरोधात निकाल झाल्यास पुन्हा न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

मनसे नेते अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर

मनसेचे नेते अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर या दौऱ्यादरम्यान अमित ठाकरे पुण्यातील एकूण ७ महाविद्यालयांना भेटी देऊन जेन झी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात ते विद्यार्थ्यांच्या समस्या,अडचणी, शैक्षणिक प्रश्न आणि अपेक्षा जाणून घेणार आहेत.

El Nino In Maharashtra : एल नीनोचे रूपांतर ‘सुपर एल नीनो’मध्ये होण्याची शक्यता; भारतीय उपखंडावर मोठा परिणाम होणार

यावर्षीच्या अखेरीस निर्माण होणारा अत्यंत शक्तिशाली ‘एल नीनो’ समुद्राचे तापमान वाढवू शकतो. त्यामुळे आधीच कमकुवत झालेल्या प्रवाळ परिसंस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर ब्लिचिंग होऊन त्या नष्ट होण्याचा धोका वाढू शकतो. एल नीनोचे रूपांतर ‘सुपर एल नीनो’मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एल नीनोचा भारतीय उपखंडावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे, कारण एल नीनोमुळे मान्सून कमकुवत होऊ शकतो. याचा मोठा परिणाम सप्टेंबरपासून 2027च्या सुरुवातीपर्यंत जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Mumbai Bank Election : एकनाथ शिंदे शिवसेना मुंबै मध्यवर्ती सहकारी बँके निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील यशानंतर आता एकनाथ शिंदे शिवसेना मुंबै मध्यवर्ती सहकारी बँके निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात बँकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. मुंबै बँकेच्या निवडणुकीच्या मैदानात एकनाथ शिंदे शिवसेना उतरणार असून, यामुळे मुंबईच्या सहकार क्षेत्रात भाजपविरुद्ध शिवसेना, असा थेट सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

Sangli Crime : बँक व्‍यवस्थापकाच्या घरावर अंकलीच्या माजी सरपंचाने मारला डल्ला; राहुल पाटील याच्याकडून मुद्देमाल जप्त

सांगलीच्या मिरज तालुक्यातील अंकली येथील माजी सरपंच राहुल अनिल पाटील याने विश्रामबाग परिसरात राहणाऱ्या एका बँक व्यावस्थापकाच्या घरात घरफोडी केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. कारभारीच लुटेरा निघाल्याने खळबळ उडाली आहे. पाटील याला अटक केल्यानंतर त्याचा तात्काळ जामिनही मंजूर झाला असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, याप्रकरणाची पोलखोल एलसीबीच्या पथकाने केली असून स्वतःच तपास हाती घेतला आहे.

Ashok Kharat : भोंदू अशोक खरात याच्या जामिनावर आज न्यायालयात सुनावणी

नाशिकमधील भोंदू अशोक खरात याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे सरकार पक्षाची बाजू मांडणार आहेत. अशोक खरात याने भोंदूगिरीच्या नावाखाली महिलेंचे लैगिंग शोषण केल्याचा आरोप आहे. यात अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

Pune BJP Politics : पुण्यात आज भाजपची राज्य कार्यकारिणी बैठक होणार; मुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शन करणार

भाजपची पुण्यात आज राज्य कार्यकारिणीची बैठक आज सकाळी दहा वाजल्यापासून बैठक सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह प्रमुख उपस्थित राहणार आहे. फडणवीस सायंकाळी साडेचार वाजता बैठकीला मार्गदर्शन करणार आहे. या बैठकीत, वेगवेगळे ठराव घेतले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मंत्री, खासदार, आमदार, वरिष्ठ पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहे.

Jalna Big Update : जरांगे पाटलांना भेटण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ आज अंतरवाली सराटीत येणार

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आज आंतरवाली सराटीत सरकारचे शिष्टमंडळ येण्याची शक्यता आहे. जरांगे पाटील यांचे आंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू असून आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. या शिष्टमंडळामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई हे असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Dhangar Reservation : मोदी अन् फडणवीसांनी धनगरांची फसवणूक केली; 17 सप्टेंबरला परभणीत एल्गार मेळावा

धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी राज्यात पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाजाने दिला आहे. येणाऱ्या 17 सप्टेंबरला परभणी येथे एल्गार मेळावा आणि आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाजाने दिला आहे. नांदेडमध्ये पार पडलेल्या धनगर समाजाच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनगर समाजाची फसवणूक केल्याचा आरोप धनगर समाजाने केला आहे. सरकारला धनगरी हिसका दाखवण्याची वेळ आली आहे, असा इशारा धनगर समाज आंदोलक दीपक बोराडे यांनी दिला आहे.

Mumbai News : दूध अन् प्रवास उद्यापासून महागणार; म्हशीचे सुटे दूध नऊ रुपयांनी महाग

सध्या महागाईने सर्वसामान्यांना बराच मोठा दणका दिला आहे. साखरेसोबत स्वयंपाकघरातील रोजच्या गरजेच्या वस्तूंवर याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता 1 सप्टेंबरपासून म्हशीचे सुटे दूध नऊ रुपयांनी तर रिक्षा-टॅक्सी प्रवास अनुक्रमे एक आणि दोन रुपयांनी महागणार आहे.

Mumbai Big News : शहरी नक्षलवादप्रकरणी एनआयएला दणका; वरवरा रावसह चौघांचा जामीन कायम

मुंबई प्रेस क्लबमधील कार्यक्रमाला उपस्थित राहून जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप वरवरा राव, सुधा भारद्वाज, व्हर्नन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांच्यावर करण्यात आला होता. त्यांचा जामीन रद्द करण्याची एनआयएची मागणी विशेष सत्र न्यायालयाने नुकतीच फेटाळली. त्यामुळे चौघांचाही जामीन कायम राहिला.

Thane News : ठाणे येथील गणेश विसर्जन घाटाजवळ तिघांचा बुडून मृत्यू

ठाणे येथील गणेश विसर्जन घाटाजवळ रेतीबंदर येथील खाडीत रविवारी दुपारी बुडून आलम सय्यद (वय 42), रिझवान सय्यद (42) आणि साहिल पोलंदास (30) या तिघांचा मृत्यू झाला. मुंब्रा, ठाकूरपाडा येथील हे रहिवासी खाडीत पोहण्यासाठी गेले होते. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले.

Navi Mubai News : परदेशात चांगल्या नोकरीचे प्रलोभन दाखवून सहा बेरोजगार तरुणांची फसवणूक

नवी मुंबईच्या उलवे परिसरात एका टोळीने परदेशात चांगल्या नोकरीचे प्रलोभन दाखवून सहा बेरोजगार तरुणांची दहा लाख सहा हजार रुपयांची फसवणूक केली. आरोपींनी तरुणांना ‘टुरिस्ट व्हिसा’वर उझबेकिस्तान येथे पाठवून बांधकामाच्या ठिकाणी मजुरीची कामे करून घेतली. त्यांना डांबून ठेवले आणि त्यांच्या पगाराचे पैसेही लुटले. उलवे पोलिसांनी टोळीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Himachal Pradesh : हिमाचलमध्ये 67 धोकादायक तलाव; चार तलावांसाठी इशारा यंत्रणा उभारण्याचे काम सुरू

हिमाचल प्रदेश सरकारने हिमनद्यांपासून निर्माण झालेल्या 67 धोकादायक तलावांची ओळख पटवली असून त्यातील चार तलावांसाठी इशारा यंत्रणा उभारण्याचे काम सुरू केले आहे. किन्नौर आणि लाहौल-स्पितीमधील अतिउंच व दुर्गम भागातील तलावांवर उपग्रह प्रतिमा आणि वैज्ञानिक माहितीच्या आधारे देखरेख केली जात आहे. हे तलाव फुटल्यास अचानक मोठ्या प्रमाणात पाणी वाहून येऊन पूर येण्याचा धोका आहे. मात्र दुर्गम ठिकाणी नेटवर्क नसल्याने सेन्सर बसवणे आणि माहिती पाठवणे हे मोठे आव्हान आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com