Maharashtra Political Live Update : नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज उपोषणस्थळी दाखल, मराठा आंदोलक मनोज जरांगेंची घेतली भेट

Political Breaking Live Headlines Updates : मराठवाड्यात दुष्काळस्थिती, मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, मराठी आंदोलक आक्रमक, चलो मुंबईची हाक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ब्रिटीन दौऱ्यावर यासह महत्त्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घेऊयात...
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama
Published on: 
Updated on: 

केडीएमसीची महासभा तहकूब केल्याच्या निर्णयावर काँग्रेसची तीव्र नाराजी

केडीएमसीमधील महासभेदरम्यान भाजपच्या नगरसेवकांनी पुण्यातील घटनेचा निषेध करत मनसेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोचा मुद्दा उपस्थित करत सभा घेऊ नये, अशी भूमिका भाजपने घेतल्याने सभागृहातील वातावरण तापले. अखेर भाजपच्या मागणीनंतर महासभा तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला. महासभा तहकूब केल्याच्या निर्णयावर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

भाजपच्या आग्रहानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेची महासभा तहकूब

पुण्यात मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटविल्याच्या कथित प्रकरणाचे पडसाद आता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या राजकारणात उमटले आहेत. या प्रकरणावरून भाजपने आक्रमक भूमिका घेत नियोजित महासभा तहकूब करण्याची मागणी केली. भाजपच्या आग्रहानंतर केडीएमसीची महासभा तहकूब करण्यात आली.

बीएमसीच्या अभय योजनेत कथित भ्रष्टाचार सुरू, शिवसेनेच्या नगरसेवकाचा गंभीर आरोप 

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले यांनी बीएमसीच्या अभय योजनेत कथित भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी स्थायी समितीच्या बैठकीतूनही सभात्याग केला. त्यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी होईपर्यंत तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत स्थायी समितीच्या बैठकीत सहभागी होणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज उपोषणस्थळी दाखल, मराठा आंदोलक मनोज जरांगेंची घेतली भेट 

नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची उपोषणस्थळी अंतरवाली सराटीत भेट घेतली आहे. त्यांच्यासोबत आमदार विजयसिंह पंडित आणि आमदार राजेश विटेकर हेही जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करत आहे.

शेतकऱ्यांना प्रतिटन ५०० रुपये नुकसान भरपाई द्या - राजू शेट्टी

१५ ॲाक्टोबरपासून ऊसाचा गळीत हंगाम सुरु करणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने तोट्याचा निर्णय आहे. त्यामुळं जर या तारखेला गळीत हंगाम सुरु झाला तर शेतकऱ्यांना याकरिता प्रतिटन ५०० रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.

विद्यानंद बापट यांना मारहाण करणाऱ्या संतोष चव्हाणचा जामीन न्यायालयाने फेटाळला

पुणे : गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाविरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करण्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तपासाच्या प्राथमिक टप्प्यात आरोपीला सोडणे समाजासाठी घातक ठरू शकते, असा निष्कर्ष काढत न्यायालयाने हा आदेश दिला.

संतोष शंकर चव्हाण (वय ३२, रा. हनुमाननगर, राऊतवाडी, कोथरूड) असे जामीन नाकारलेल्या आरोपीचे नाव आहे. चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर कोथरूड पोलिस ठाण्यात दंगल, हाणामारी आणि घरफोडीचे एकूण सहा गंभीर गुन्हे दाखल असल्याचा अहवाल सहायक सरकारी अभियोक्ता अमर ननावरे यांनी पुराव्यानिशी न्यायालयात सादर केला.

chandrashekhar bawnkule : राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय

राज्यात गुंतवणूक आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी महाभूमी स्टॅक प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. आता जमिनींच्या खरेदी-विक्री व इतर व्यवहारांसाठी एकच एकात्मिक डिजिटल प्रवेशद्वार तयार करण्यात आलं आहे. विखुरलेल्या विविध प्रणालींचे एकत्रीकरण करून दहा प्रमुख भूमी सेवांसाठी ही एकच प्रणाली कार्यान्वीत असणार आहे. याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली आहे. या प्रणालीमध्ये ३.५ कोटींपेक्षा जास्त ७/१२ व ८-अ उतारे असणार आहेत. एकाच क्लिकवर तब्बल दीड कोटी भू-नकाशे, ४० कोटी जुने फेरफार आणि नोंदणी दस्त उपलब्ध असणार आहेत. ‘ईज ऑफ लिव्हिंग’ आणि ‘ईज ऑफ डुईँग बिझनेस’ला प्रोत्साहन देणारा हा महसूल विभागाचा महत्त्वाचा टप्पा आहे, नागरिकांना जमिनीचा सर्च रिपोर्ट आणि इतर सर्व माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे, असं यावेळी बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

ऊस गाळप हंगामाचे सन २०२६-२७ बाबत धोरण निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्री समितीची बैठक झाली. या बैठकीत यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ऊस गाळप हंगाम 2026-27 धोरणासंदर्भात मंत्रीसमितीची बैठक झाली. यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होणार आहे. त्यामुळे मतदान आणि निकाल कधी लागणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार १० ऑक्टोबरपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

MPSC च्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा

प्रथमेश देशमुखच्या मृत्यूला थेट सरकार जबाबदार आहे. प्रथमेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करत होता. आयोगाच्या अध्यक्ष व सचिवांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

नागपुरात युवक काँग्रेसचा मोर्चा

नागपूरमध्ये युवक काँग्रेसकडून आरएसएसच्या रेशीमबाग येथील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांनी मनुस्मृतीची प्रत जाळली. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून मोर्चा अडविला आहे. याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

'गृहराज्यमंत्री इंडियात जन्मलेत', डीजेवरून सदाभाऊ खोतांची मंत्री योगेश कदमांवर टीका

महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री हे इंडियात जन्मले आहेत, अशी टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी योगेश कदमांवर केली आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी राज्यात डीजेला परवानगी देणार, या केलेल्या विधानावरून सदाभाऊ खोत यांनी ही टीका केली आहे. आम्ही भारताल्या लोकांची मागणी घेऊन पुढे आलो आहोत. भारतीय लोककलेला राजाशय मिळाला पाहिजे पण एखादा मंत्रीच ग्रामीण भागातल्या कलेला कमी लेखत असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, अशी खंत देखील आमदार खोत यांनी व्यक्त केली आहे. ते सांगलीमध्ये डीजे वर बंदी आणावी आणि पारंपारिक वाद्यांचा वापर करावा या मागणीसाठी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

विद्यानंद बापट यांच्या मागणीला भाजपच्या आमदारांचे बळ

विद्यानंद बापट यांच्या डीजे बंदीच्या मागणीला राज्यभर बळ मिळताना दिसत आहे. दरम्यान आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर देखील डीजे बंदीच्या विरोधात मैदानात उतरले असून सांगलीच्या मारुती चौकात डीजे संस्कृती संपवूया, पारंपारिक संस्कृती जपूया, असा नारा देत दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत चूकीचा मॅसेज दिला जातोय : उदय सामंत

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा 12 वा दिवस असून त्यांनी सरकारवर आरोप केले होते. यानंतर आता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत सरकारची बाजू मांडली. यावेळी त्यांनी ओबीसींच्या हक्कावर दगा न येता मराठा आरक्षण देण्याचा सरकारचा मानस आहे. त्यासाठी सरकार काम करत आहे. पण मराठवाड्यात तब्बल 16 हजार प्रमाणपत्रांचे वाटप झाले असून फक्त 64 दाखले नाकारण्यात आले आहेत. तरीही अधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत असा चूकीचा मॅसेज मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहचवला जात असल्याचा दावा सामंत यांनी केला आहे.

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या होमपीचवरच कामगार आक्रमक

महिन्यातून केवळ १० ते १५ दिवसच काम देणे, नियमानुसार मिळणारा दुप्पट ओव्हरटाईम न देणे आणि ट्रेनिंगच्या नावाखाली १ ते २ वर्षे पीएफ कपात न करणे, अशा अनेक गंभीर आरोपांनंतर आता शिवांगी बेकर्सचे कामगार रस्त्यावर उतरले आहेत. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या मतदारसंघातील या कंपनीत सुमारे ४०० ते ५०० कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक आक्रमक, तहसीलदारांची खुर्ची पेटवली

धाराशिवच्या उमरगा तहसील कार्यालयात मराठा आंदोलक अत्यंत आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी तहसीलदारांच्या खुर्चीला आग लावून तीव्र निषेध केला. या धक्कादायक घटनेमुळे कार्यालय परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. आंदोलकांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आरक्षणाच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

खासदार संजय राऊत घेणार प्रताप सरनाईकांची भेट

खासदार संजय राऊत आज मंत्री प्रताप सरनाईकांची भेट घेणार असून ही भेट मंत्रालयात होण्याची शक्यता आहे. रिक्षा, टॅक्सी चालकांसंदर्भात ही भेट होणार असल्याची माहिती मिळत आहे.

भारतीय जनता पार्टी म्हणजे 'रझाकाराची अवलाद'  : अंबादास दानवे यांची जहरी टीका

ठाकरे गटाकडून मराठवाडा मुक्ती संग्राम दिना दिवशी 'तुमसे ना हो पयेगा' या टॅगलाईन खाली मराठवाड्यात आंदोलन करण्यात येणार आहे. या हिंदी नावावरून पक्षावर टीका होत आहे. यावरून आमदार अंबादास दानवे यांनी भारतीय जनता पार्टीला थेट रझाकाराची अवलाद असे म्हणत जहरी टीका केली आहे.

खासदार रवींद्र चव्हाण जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवालीमध्ये दाखल

नांदेडचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी येथे दाखल झाले आहेत.

भारताने फिनटेक मध्ये मोठी मजल मारली - फडणवीस

भारताने फिनटेक क्षेत्रात मोठी मजल मारली आहे. भारतात सर्वात जास्त डिजिटल व्यवहार होतात अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगरी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षक मिळणार

पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या ४१० प्राथमिक शिक्षकांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेत पदस्थापनेसाठी उपस्थिती नोंदवली आहे. या सर्व नवनियुक्त शिक्षकांना येत्या गुरूवारी (ता.१० रोजी)समुपदेशन केले जाणार असून यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगरी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षक मिळणार आहे.

जरांगेंच्या बारा मागण्या मान्य, उपोषण मागे घ्यावे; उदय सामंत यांचे आवाहन

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या तेरा पैकी बारा मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामुळे त्यांनी आता आपले उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन उद्योग मंत्री तथा मराठा आरक्षण उपमितीचे सदस्य उदय सामंत यांनी केले आहे.

सोमेश्वरच्या इतिहासात प्रथमच चौरंगी लढतीची शक्यता

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाल्याने इच्छुकांची धावपळ वाढली असून, कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने चार प्रमुख राजकीय प्रवाह आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), भाजप आणि शिवसेना यांनी स्वतंत्रपणे मोर्चेबांधणी सुरू केल्याने सोमेश्वरच्या इतिहासात प्रथमच चौरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे.

साउंड व्यावसायिकांचा पुण्यात मोर्चा

पुणे पोलिसांनी घालून दिलेल्या अटी आणि शर्ती चे पालन केल्यानंतर सुद्धा होते आहे कारवाई, असा आरोप साऊंड व्यावसायिकांनी केला आहे. दही हंडी उत्सव दरम्यान अनेक ठिकाणी नियम पाळून सुद्धा साउंड सिस्टिम जप्त केल्याचा व्यावसायिकांचा आरोप आहे. पोलिस प्रशासनाकडून होणाऱ्या जप्तीच्या कारवाई विरोधात व्यावसायिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. 10 सप्टेंबरला ते मोर्चा काढणार आहेत.

काँग्रेस मंत्र्याच्या घरावर ED चे छापे

कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोली आणि त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर अंमलबजावणी ED ने आज सकाळी छापे टाकले आहेतच मनी लाँड्रिंग, आबकारी विभागातील कथित गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई सुरू असल्याची चर्चा आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाचे टोकाचे पाऊल 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एका तरुणाने विहिरीत उडी घेत जीवन संपवले. सुनील बिरादार असे या तरुणाचे नाव आहे. लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सोमठाणा येथे ही घटना घडली. सुसाईड नोट लिहून तरुणाने जीवन संपवले

सिंहगड रोड, दत्तवाडी व मुंढवा वाहतूक विभागाअंतर्गत वाहतूक मार्गात बदल

: सिंहगड, दत्तवाडी व मुंढवा वाहतूक विभागाअंतर्गत वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार असून त्याबाबत नागरिकांच्या काही सूचना असल्यास पोलीस उप-आयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला नंबर ६, एअरपोर्ट रोड, पुणे यांच्या कार्यालयात २१ सप्टेंबर पर्यंत लेखी स्वरूपात कळवाव्यात.

या बदलांतर्गत भूमकर चौक, सर्व्हिस रस्त्याने स्वामीनारायण मंदिराकडे जाणाऱ्या वाहनांना व स्वामीनारायण मंदिराकडून भुमकर चौकाकडे जाण्यासाठी मंदिराच्या डाव्या बाजूने जाणारा सेवा रस्त्यावर एकेरी मार्ग करण्यात येणार आहे. तसेच स्वामीनारायण मंदिराच्या समोरील बाजूस असलेला सेवा रस्ता जोडणाऱ्या पुलावर फक्त भुमकर चौकाकडून स्वामीनारायण मंदिराकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश राहील. स्वामीनारायण मंदिराकडून येणाऱ्या वाहनांना या पुलावर नो एन्ट्री करण्यात येत आहे. वाहनांनी मंदिराच्या डाव्या बाजूकडील सर्विस रोड एकेरी मार्गाचा वापर करून भूमकर चौकाकडे जावे. वाहनांना एकेरी मार्ग करण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ब्रिटनच्या दौऱ्यावर

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या ब्रिटीन दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. ब्रिटनच्या संसदेतील कार्यक्रमात ''कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन','इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह २०२६',‘स्टेटस्मनशिप अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com