

आंबोलीत पर्यटनासाठी आलेल्या सावंतवाडी इन्सुली येथील तरूणाचा चिरेखाणीतील खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. संजय लक्ष्मण गावकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना आंबोली सतीचीवाडी येथे घडली. संजय गावकर हे माजगाव आणि इन्सुली येथील आपल्या काही सहकाऱ्यांसोबत पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आंबोलीत आले होते. सतीचीवाडी परिसरातील एका चिरेखाणीजवळ ते गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात बुडाले. आंबोलीतील रेस्क्यू टीमने खोल पाण्यात उतरून मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी आंबोली पोलीस अधिक तपास करत आहेत.
बीडच्या जिल्हा हिवताप विभागाला मोठी घटना समोर आली असून आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या एरीअर्सच्या तब्बल 90 लाख रुपये अतिरिक्त उचलल्या प्रकरणे जिल्हा हिवताप अधिकारी विजयसिंह शिंदे यांना निलंबित करण्यात आले आहे या कारवाई ने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.
हिंगोलीमध्ये भाजपच्या वरिष्ठ पदाधिकारी प्रीती जयस्वाल यांच्या नाश्त्यातील खिचडीमध्ये आळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस झाला आहे. हिंगोली शहरातील महाराज भजे सेंटरमध्ये नाश्ता करत असताना शिजवण्यात आलेल्या खिचडीमध्ये या अळ्या होत्या. दरम्यान या प्रकारानंतर प्रीती जयस्वाल चांगल्या संतप्त झाल्या तर दुकान चालकाने मात्र खिचडीमध्ये आळ्या नसून करपलेले तांदूळ असल्याचा दावा केला आहे. दरम्यान आता प्रीती जयस्वाल यांनी एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह हिंगोलीच्या जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना तातडीने या दुकानावरती कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
अनुसूचित जातीतील 59 जातींच्या पीएचडी नवसंशोधक विद्यार्थ्यांच्या फेलोशिपच्या जागा 300 वरून 100 करण्यात आल्याचा आरोप करत अनुसूचित जाती उपवर्गीकरण संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. फेलोशिपच्या जागा 300 कराव्यात, जुने शैक्षणिक धोरण लागू करावे तसेच HRA व कॉन्टिजन्सीचे लाभ पूर्ववत करावेत, अशी मागणी करण्यात आली. शासनाच्या नव्या धोरणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत असल्याचे समितीने म्हटले असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
मुंबईतील एका कार्यक्रमात टाटाचे व्यवसाय प्रमुख राजेश कौर यांनी थेट राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर माफी मागितली. या कार्यक्रमात बोलण्यासाठी उभे राहिल्यावर सर्वात आधी कौर यांनी माफी मागतो, कारण मी मराठी बोलू शकत नसल्याचं म्हटलं. यावर सरनाईकांनी 15 ऑगस्टपर्यंत आमचे मराठीचे वर्ग सुरू असून कौर यांनी त्यात मराठी शिकावं असा सल्ला दिला.
मुंबईच्या महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत विधान परिषदेचं उपसभापतीपद मिळवलेल्या सचिन अहिर यांना टोला लगावला आहे. त्या म्हणाल्या, सचिन अहिर यांची काम करण्याची पद्धत मला माहिती असून त्यांना पक्षाने जी जबाबदारी दिली आहे ती ते पूर्ण करत असल्याचं म्हटलं आहे. तसेच ते वरळीत लढतील की नाही माहिती नाही, पण आम्ही लढून जिंकणार एवढं नक्की असा विश्वास पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 8 खासदारांनी सोमवारी(ता.10) भेट घेतली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, पंतप्रधान हे देशाचे असतात कोणत्या पक्षाचे नसतात. त्यामुळे त्यांना कोणी भेटले तर त्यामध्ये काही वावगे नाही. मी सुद्धा मुख्यमंत्री आहे. मलाही अनेक विरोधी पक्षांचे लोक भेटतात आणि त्यांची कामे सांगतात. त्यामुळे या भेटीकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याचे कारण नाही. ते पंतप्रधानांना भेटायला जाणार असतील किंवा भेटले असतील तर ही चांगली गोष्ट असल्याचं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं.
आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघाशी संबंधित विविध प्रश्नांसंदर्भात आज नगरसेवकांसह महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेतली. कचरा व्यवस्थापनाच्या समस्या, पाणीपुरवठा, मिसिंग लिंक्स (ॲनी बेझंट ते ई. मोझेस रोड), महालक्ष्मी ब्रिज आणि चालण्यायोग्य पदपथ यासह इतर स्थानिक मुद्द्यांवर ह्यावेळी चर्चा झाली.
मुंबईत वरळीमध्ये भाजपकडून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले आहेत.
आंबेजोगाई न्यायालयाच्या गेटवर शेतीच्या जुन्या वादातून दोन वकिलांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. उपस्थित वकील आणि पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद थांबवला. न्यायालयाच्या परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिंपरी-चिंचवडमधील म्हेत्रे वस्ती परिसरात चार वर्षीय चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. घराबाहेर खेळत असताना दोन कुत्र्यांनी तिच्यावर झडप घातली. त्यानंतर 7 ते 8 कुत्र्यांनी तिला घेरले. या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
झारखंडमध्ये भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र झाले आहे. रांचीमध्ये विद्यार्थ्यांनी विधानसभेकडे मोर्चा काढत बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केला. सरकारने 98 टक्के मागण्या मान्य केल्याचा दावा केला असला, तरी विद्यार्थ्यांनी तो फेटाळला. 13 पैकी केवळ 3 परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांनी CBI चौकशीची मागणी कायम ठेवली आहे.
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध स्तरांवर आंदोलने केली जात आहेत. याच मागणीला पुन्हा एकदा जोर देण्यासाठी लोकसेवा काँग्रेसच्यावतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. अनेक वर्षांपासून विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये बेरोजगारी, उद्योगांचा अभाव, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. विदर्भातील अनेक तरुणांना रोजगाराच्या शोधात पुणे, मुंबई, नागपूर तसेच राज्याबाहेरील शहरांकडे स्थलांतर करावे लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
चंद्रशेखर बावनकुळे तुम्ही चूक केली आहे, मान्य करा अन्यथा तुम्ही आणि तुमच्यामुळे तुमचा पक्ष संपून जाईल, असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या मंत्र्यांची चूक झाल्याचे मान्य करावे, वेळ अजून हातातून गेली नाही, असे देखील मनोज जरांगेंनी स्पष्ट केले आहे. मराठा आरक्षण कुणबी नोंदीवरून जरांगे यांनी हा निशाणा साधला आहे.
मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींचे ओबीसीचे रद्द झालेले प्रमाणपत्र मंजूर करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांच्या या आंदोलनाला भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आर्थिक रसद पुरवली आहे, असा गंभीर आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. आमदार प्रसाद लाड हाच जरांगे यांचा मास्टरमाईंड आहे, असा हल्लाबोल करत जरांगेंना अटेंशनसेटिंग हा रोग झाला आहे, अशी टीका केली.
जालन्यात फिर्यादी अधिकारीच आरोपी निघाल्याने खळबळ उडाली. जालन्याचे बांधकाम कामगार उपायुक्त अमोल जाधव यांना परतूर पोलिसांनी अटक केली आहे. बांधकाम कामगार साहित्यात कोट्यवधींचा गैरव्यवहार प्रकरणी परतुर पोलिसांनी कामगार अधिकाऱ्यासह सात आरोपींना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी परतूर पोलिसांत अमोल जाधव यांनीच बांधकाम कामगार साहित्यात गैरव्यवहार झाल्याची फिर्याद परतूर पोलिसात दिली होती. त्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी मोठी कारवाई करत अमोल जाधव यांना अटक केली.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकनाथ शिंदे शिवसेनेने, अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांच्या अकोले मतदारसंघात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. आदिवासी ठाकर समाजाचे नेते मारुती मेंगाळ यांनी आयोजित केलेल्या आदिवासी दिनाच्या कार्यक्रमासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार अमोल खताळ यांनी हजेरी लावली. यावेळी अकोले शहरातून काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले होते. हे शक्ती प्रदर्शन म्हणजे आगामी निवडणुकांमध्ये अकोले तालुक्यात, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादीतील राजकीय संघर्षाची नांदी मानली जात आहे.
वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे जहरी टीका केली आहे. या लोकांनी बिल्डरच्या नादी लागून महाराष्ट्र 10 वर्ष मागे नेला आहे. माझं कोणत्या व्यक्तीशी वाद नाही. मात्र जनतेला गृहीत धरून जनता सहन करेल, असा समज ठेऊन कोणी नाटक करेल, तर त्याच्या नाटकाचा तमाशा कसा आहे, हे लोकांना दाखवायचं काम गणेश नाईक करेल, असा घणाघात केला.
जळगावच्या जामनेर आगारातून चोरांनी चक्क एसटी महामंडळाची नवी कोरी बस चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. मध्यरात्री 2 वाजता चोरांनी चोरून नेलेली ही बस आज सकाळी जामनेर तालुक्यातील शहापूर गावात मिळून आली आहे. बसचे चाक पंचर झाल्याने चोरांचा बस चोरीचा प्रयत्न अपयशी ठरला असून शहापूर गावाजवळ बस सोडून चोरटे पसार झाले आहेत. चक्क बस चोरून नेण्याच्या घटनेने खळबळ उडाली असून जामनेर आगारातील सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात जागतिक आदिवासी दिनाच्या दुसऱ्याच दिवशी आश्रमशाळेत सर्पदंशाची धक्कादायक घटना घडली आहे. माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्या गडचिरोलीतील कुपारलिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेच्या अनुदानित प्राथमिक/माध्यमिक आश्रमशाळा, जपतलाई येथे रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. सुमारे 79 विद्यार्थिनी जमिनीवर झोपलेल्या होत्या. याचदरम्यान काही विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची माहिती आहे. यात तीन विद्यार्थिनींचा मृत्यू, एक अत्यवस्थ, दोघी गंभीर असून, 14 विद्यार्थिनी निरीक्षणाखाली आहे.
राज ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली आज मनसेची मुंबईत बैठक होत आहे. नवीन नियुक्त्या आणि पक्षात बदल करण्याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अर्धा तास या खासदारांसोबत मोदींनी संवाद साधला.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीला आणखी 60 दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रशासक मंडळाने सुप्रीम कोर्टात ही मुदतवाढ मागितली होती. यामुळे गोकुळमधील सत्ताधारी संचालकांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जाते.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे 8 खासदार हे पंतप्रधान मोदींना आज भेटणार आहेत. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात ही सर्व खासदार हे पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहे. सर्व खासदार हे मतदारसंघातील प्रश्नांवरून बैठकीत चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. परंतु या भेटीवरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं. शरद पवार आणि त्यांचे खासदार एनडीएसोबत जाणार नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी चर्चा फेटाळून लावली.
पुणे महापालिकेच्या आणखी आठ शाळा खाजगी संस्थेला चालवल्यासाठी दिल्या जाणार आहेत. यापूर्वी पाच शाळा आकांक्षा फाउंडेशनला दिल्यानंतर आणखी आठ शाळेचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
पुणे महानगरपालिकेच्या पाच शाळा आकांक्षा फाउंडेशनला चालवण्यासाठी दिल्यानंतर आणखी आठ शाळा खाजगी संस्थेला चालवण्यासाठी दिल्या जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे शाळा येरवडा, संत गाडगे महाराज इंग्रजी माध्यम शाळा कोंढवा, पुण्यश्लोक आहिल्यादेवी शाळा औंध स्वर्गीय विठ्ठलराव तुपे शाळा हडपसर, पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळा कोथरूड आणि आचार्य विनोबा भावे शाळा गंज पेठ सम्राट अशोक विद्या मंदिर कर्वेनगर या शाळांचा समावेश आहे.
बुलढाणा जिल्ह्याचे नाव 'राजमाता जिजाऊनगर' करा भाजप आमदार श्वेता महाले यांनी बुलढाणा जिल्ह्याचे नाव 'राजमाता जिजाऊनगर' करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात आमदार महाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलं आहे. या निवेदनातून त्यांनी बुलढाणा जिल्ह्याचे नामकरण करण्याची मागणी केली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तिखट शब्दात हल्ला केला आहे. संघ हा आदिवासी संस्कृती संपविण्यासाठी काम करीत आहे. त्यांच्यापासून आदिवासींना सावध राहावे लागेल. जागतिक आदिवासी दिनानिमित्त नाशिक येथे आदिवासी मेळावा झाला. यावेळी सपकाळ यांनी संघ आणि राज्यातील भाजप सरकारवर टीका केली. राज्यातील सरकार आदिवासींच्या जमिनी आणि संपत्तीवर आक्रमण करीत असल्याचे ते म्हणाले.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. सकाळी ११ वाजता हे खासदार मोदींना भेटण्यासाठी जाणार आहेत.
ठाकरेंच्या शिवसेनेच्या सहा फुटीर खासदारांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. लोकसभा अध्यक्षांचा मंजुरीचा निर्णय चुकीचा असून या खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.