

मुंबईहून मालेगावच्या दिशेने अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची गुप्त माहीत मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक यांना मिळताच त्यांचे पथक व चांदवड पोलिसांच्या पथकाने चांदवड च्या मंगरूळ टोलनाक्यावर सापळा रचून गाडीची कसून तपासणी केली असता त्यामध्ये बंदी असलेले 'एमडी ड्रग्ज' आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ड्रग्ज आणि वाहनासह तीन आरोपींना ताब्यात घेतले.
म्यानमार-थायलंड-लाओस या तीन देशांच्या सीमेलगतच्या गोल्डन ट्रँगल परिसरात महाराष्ट्रातील 25 ते 30 तरुणांना ओलीस ठेवल्याचा प्रकार बीडमधील ज्या तरुणामुळे समोर आला त्या तरुणाच्या कुटुंबीयांनी सरकारकडे आमच्या व्यक्तीला सुखरूप आणावे अशी विनंती केली आहे. दरम्यान काल त्याच्याशी फोनवरून बोलणं झालं त्यांच्याकडून ऑनलाइन फसवणुकीचे काम करून घेतले जाते, टार्गेट कंप्लीट न झाल्याने त्याला करंट देऊन अमानुष मारहाण केली जाते, तसेच जेवण दिले जात नसल्याचा धक्कादायक प्रकार सांगितला. यानंतर आता संबंधित तरुणांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या जीवितास धोका आहे तरी सरकारने त्याला सुखरूप आणावे अशी विनंती केली आहे.
बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपून घरी परतताच वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड याने 45 लाखांची लाच घेतल्याचा खळबळजनक प्रकार काल उघडकीस आला. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लखमावाड यांना रंगेहाथ पकडले होते. लखमावाड याला आज बीड न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यांत आली आहे.
राज्य सरकारच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने नागरिकांना अत्याधुनिक आणि आरामदायक वातावरणात सेवा देण्यासाठी एक मोठा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. राज्यात तब्बल ६० हाय-टेक दस्तनोंदणी कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. या महत्त्वाकांक्षी उपक्रमातील राज्यातील पहिले मॉडेल हाय-टेक कार्यालय पुण्यातील कोथरूड येथे सुरू होत असून, १५ ऑगस्टपर्यंत ते कार्यान्वित करण्याचा नोंदणी विभागाचा मानस आहे.
बलात्कार करून करून खून केल्या प्रकरणी सांगली जिल्हा सत्र न्यायालयाकडून एका नराधमाला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जत तालुक्यातल्या करजगी येथे एका चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण खून केल्याचा प्रकार घडला होता,याप्रकरणी आरोपी पांडुरंग कळळी यास फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
राहाता न्यायालयाने भोंदू अशोक खरातला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून समता पतसंस्थेत बनावट खाते उघडून कोट्यावधीचा व्यवहार प्रकरणात ती सुनावण्यात आली आहे. समता पतसंस्थेत 57 लोकांच्या नावे 100 खाती उघडून या खात्यावरून 60 कोटींहून अधिकचा व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नीट पेपरफुटीविरोधात मुंबईसह राज्यात विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहले आहे. गुन्हे मागे घेण्याच्या कार्यपद्धतीची विचारणा केली आहे. अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही नोटीसा येत असून काही प्रकरणांमध्ये तपास अद्याप सुरु असल्याचा उल्लेख आदित्य ठाकरेंनी पोलीस महासंचालकांना लिहलेल्या पत्रात केला आहे.
Shirdi News : स्वतःला साक्षात देवाचा अवतार आणि स्वघोषित ज्योतिषी म्हणवून घेत भाविकांची फसवणूक आणि महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. समता पतसंस्थेत बनावट खाती उघडून कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद व्यवहार केल्याप्रकरणी राहाता न्यायलयाने अशोक खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात नदीत बुडाल्याने तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सततच्या पावसामुळे नदीची पाणीपातळी वाढल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर बचाव पथक आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचे सांगत त्यांनी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली. तसेच यूपीएससीचा पेपर कधी फुटत नाही, मग नीटचाच पेपर वारंवार कसा फुटतो, असा सवाल उपस्थित करत शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या भविष्यासाठी नव्या पिढीच्या सहभागाला महत्त्व दिले आहे. तरुणांनी केवळ प्रेक्षक न राहता राजकारणात सक्रिय भूमिका घ्यावी, समाजातील विविध प्रश्नांवर ठामपणे मत मांडावे आणि पक्षाची जबाबदारी स्वीकारून नेतृत्वाची धुरा सांभाळावी, असे आवाहन त्यांनी केले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर विविध राजकीय मुद्द्यांवरून निशाणा साधला. राज्यातील आणि देशातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करत त्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयांवर टीका केली आणि अनेक धोरणांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले.
काँग्रेसनंतर आता भाजपलाही धक्क्यांची मालिका सुरूच आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आणि शहजाद पुनावाला यांच्या निर्णयानंतर आता बिहारमधील भाजपच्या एका वरिष्ठ आमदारानेही अचानक राजीनामा दिला आहे. या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विविध चर्चांना उधाण आले आहे.
वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे चंद्रपूर-हैदराबाद महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. राजुरा बल्लारपूर येथील पूल पाण्याखाली गेला आहे, त्यामुळे चंद्रपूर-हैदराबाद मार्गावरील सर्वच वाहतूक सध्या बंद आहे. वाहनांच्या दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत.
गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी येथील साईबाबांच्या चरणी भक्तांनी भरभरून दान अर्पण केले आहे. ता. २८ ते ३० जुलै दरम्यानच्या गुरुपौर्णिमा उत्सवात ७ कोटी ८१ लाख रुपयांची देणगी मिळाली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल दीड कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
शैक्षणिक वर्ष सुरू झालं तरी राज्यातील ओबीसी वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू झालेले नाहीत, त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांची अडचण होत आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार असल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवडे यांनी सांगितले.
नीट पेपरफुटीच्या विरोधातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात मुंबईत पोलिसांची गाडी अडविणाऱ्या रिया अहिर आणि तिचा व्हिडिओ काढणाऱ्या तरुणाचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात जाहीर सत्कार करण्यात आला. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते या दोघांचा गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांवर आंदोलनाची वेळ आणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माफी मागितली आहे. विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. विद्यार्थिनीचे कपडे फाडले. तसेच नीटचा पेपर फुटला म्हणून ज्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली, त्यांचीही पंतप्रधान मोदी यांनी माफी मागितली पाहिजे. आपल्या देशात काय चाललंय?, याची माहिती पंतप्रधानांनी आपल्या विश्वासू सहकाऱ्यांकडून घ्यावी. ज्यांच्या मनावर ओळ उमटले आहेत, ते तुम्हाला माफ करतील का? त्यामुळे सध्या माफ करण्याची नव्हे; तर माफी मागण्याची वेळ आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.
अचानक अभिजीत दिपके यांची तब्येत खालावली आहे. अभिजीत दिपकेंना मळमळ आणि उलट्या सुरू झाल्याची माहिती आहे. भेटीसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधत असताना अभिजीत दीपके यांना अचानक मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला. तब्येत बिघडल्याने त्यांनी भेट अर्धवट सोडली आणि उर्वरित नागरिकांना न भेटताच दिपके घरी परतले. सध्या डॉक्टरांकडून अभिजीत दिपके यांच्यावर घरीच उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथे हा सोहळा पार पडत आहे. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. ते म्हणाले, अजित डोवाल यांनी राष्ट्रीय सुरक्षेला नवा आयाम दिला. एका धुरंधराला पुरस्कार देण्यासाठी दुसरे धुरंधर आले. डोवाल यांनी जीव धोक्यात घालून देशासाठी कार्य केलं. राष्ट्रीय सुरक्षेतील चाणक्याला दुसऱ्या चाणक्याकडून पुरस्कार मिळाल्याचे गौरद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथील या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थितीत आहे. रोहित टिळक यांच्या लोकमान्य टिळक ट्रस्ट कडून या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून त्यासाठी आज अमित शहा पुण्यात आले आहेत.
मनसेच्या विद्यार्थी सेनेचा मुंबईत मेळावा सुरू आहे. या मेळाव्यात राज ठाकरे बोलत आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राम मंदिराच्या चोरीबद्दल पंतप्रधांनांनी बोलायला नको का? असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला.
तसेच दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदींना शिविगाळ केली ती चुकीचीच आहे. पण दुसऱ्यांनाही आया असतात असा टोला त्यांनी लगावला. शिक्षण पद्दतीत बदल करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
अमित ठाकरे मनसे विद्यार्थी मेळाव्यात भाषण देताना भावूक झाल्याने काही क्षण ब्लँक झाले आणि भाषण विसरले. ‘मी परत येतो’ असे सांगून ते स्टेजवरून निघून गेले. मात्र, अवघ्या दहा मिनिटांत परत येऊन त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
जुलैअखेर झालेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. नाशिक जिल्ह्यात 204 घरांचे नुकसान झाले असून, एका व्यक्तीचा मृत्यू, दोन जखमी, पशुधनाची हानी तसेच गोठे, झोपड्या व शेतीचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाच्या अहवालातून समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील बहुतांश धरणे भरली आहेत.
अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातील 2022 मधील नवजात बालकाच्या मृत्यूप्रकरणी तब्बल चार वर्षांनंतर महत्त्वाची घडामोड घडली आहे. सर जे. जे. समूह रुग्णालय, मुंबई येथील पाच वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने सादर केलेल्या अहवालात तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियल रविंद्र शेंडे यांना कर्तव्यात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
एलन मस्क यांच्या 'स्पेसएक्स' (SpaceX) कंपनीचे एक भरकटलेले रॉकेट वेगाने चंद्राच्या दिशेने झेपावत आहे. ते लवकरच चंद्रावर आदळणार आहे. हे 'स्पेसएक्स'च्या 'फाल्कन 9' (Falcon 9) रॉकेटचा वरचा भाग असून, जानेवारी 2025 मध्ये दोन 'लूनर लँडर्स'सह त्याचे उड्डाण करण्यात आले होते. बुधवार, 5 ऑगस्ट 2026 हे रॉकेट प्रचंड वेगाने चंद्राच्या पृष्ठभागावर धडकणार आहे. या भीषण टक्करीमुळे चंद्रावर धुळीचे महाकाय लोट उठणार असून, या दुर्मीळ घटनेचा साक्षीदार होण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ उत्सुक आहेत.
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांचे वैयक्तिक सहाय्यक (पीए) आणि निकटवर्तीय सहकारी चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात भाजपचेच दोन कार्यकर्ते असल्याचा संशय व्यक्त करत सीबीआयने दोघांना अटक केली आहे. तपासात हे दोघे रथ यांच्यासोबत काम करत असल्याचे आणि त्यांचे एका प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाशीही संपर्क असल्याचे समोर आल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सागर सोनकर आणि साहिब सोनकर अशी आहेत. हे दोघेही चंद्रनाथ रथ यांच्या टीममध्ये काम करत होते. सीबीआयच्या माहितीनुसार, दोघांनाही कोलकात्यातील विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीचा यशस्वी अनुभव लक्षात घेऊन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी)ने पुण्यातील पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकासही निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर कार्गो कॉम्प्लेक्ससह विविध पायाभूत सुविधा आगामी कुंभमेळा-2027 पूर्वी पूर्ण करण्यासाठी आवश्यक यंत्रणा बळकट करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. दरम्यान, यावेळी पुरंदर विमानतळाच्या कामांसाठी हडकोमार्फत 6 हजार कोटी रुपयांच्या कर्जास मंजुरी देण्यात आली.
'नीट-यूजी 2026'ची प्रश्नपत्रिका तयार करण्याची जबाबदारी असलेल्या तीन मराठी शिक्षकांनीच त्यांना मिळालेल्या सवलतींचा गैरफायदा घेत या पेपरफुटीमध्ये मोठी 'कामगिरी' बजावल्याचा ठपका प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाने आरोपपत्रात ठेवला आहे. सीबीआयने आरोपपत्रात राष्ट्रीय परीक्षा संस्थेतील (एनटीए) त्रुटींवरही बोट ठेवले असून, अशा घटना रोखण्यासाठी सविस्तर अहवाल लवकरच 'एनटीए'ला देणार आहे. सीबीआयने अटक केलेले तिन्ही शिक्षक 'एनटीए'च्या 'पेपर सेटिंग पॅनल'चा भाग होते. या प्रकरणात अटक असलेल्या पी. व्ही. कुलकर्णी (रसायनशास्त्र), मनीषा गुरुनाथ मांडरे (भौतिकशास्त्र) आणि मनीषा संजय हवालदार (जीवशास्त्र) या तिघांनी अंतिम प्रश्नपत्रिकेतील प्रश्न लक्षात ठेवून ते पुण्यातील आपल्या कोचिंग क्लासमधील निवडक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले.
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. धोम धरणातून 4966 इतका पाण्याचा विसर्ग कृष्णा नदी पात्रात करण्यात आला आहे. वाईतील ऐतिहासिक महागणपती मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घातला असून, गणरायाच्या मूर्तीपर्यंत पाणी पोहोचले आहे. कृष्णा नदीवरील पूल धोक्याच्या पातळीवर असून, शहरातील प्रसिद्ध कृष्णा घाटासह सर्व घाट जलमय झाले आहे.
देशाच्या पश्चिम सागरी किनारपट्टीवर सर्वच राज्यात आजपासून मासेमारी सुरू झाली आहे. मात्र, महाराष्ट्र राज्यातील मच्छिमारांना आजपासून पुढील 15 दिवस 12 सागरी मैलापलीकडील राष्ट्रीय सागरी क्षेत्रात मासेमारीची परवानगी देण्यात आली आहे. किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यंतच्या महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात मात्र 15 ऑगस्टपर्यंत मासेमारीवरील बंदी असल्याने राज्याच्या सागरी क्षेत्रात मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करण्यास परवानगी नाही. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारी करताना मच्छिमारांना मर्यादेचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असणार आहे.
बीड तालुक्यातील श्री क्षेत्र चाकरवाडी येथे नारळ आणि पेढा विक्री करणाऱ्या महिलांच्या दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही गटांतील महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यावेळी महिलांनी एकमेकींना शिवीगाळ करत पाय तोडण्याची तसेच जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र, या घटनेप्रकरणी अद्याप कोणत्याही पक्षाकडून पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिसांनीही कोणताही गुन्हा नोंदवलेला नसून, तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) नाशिक जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने 1 ऑगस्ट 2026 रोजी जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, भूस्खलन तसेच वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून, पालक आणि विद्यार्थ्यांनी प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील तब्बल 23 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. यामध्ये भाजपचे 7 आणि एमआयएमचे 16 नगरसेवक समाविष्ट आहेत.पराभूत उमेदवारांनी केलेल्या तक्रारीनंतर महानगरपालिका प्रशासनाने संबंधित नगरसेवकांविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिर्डी पोलिसांनी पुन्हा घेतला भोंदू अशोक खरात याचा ताबा घेतला आहे. न्यायालयाच्या परवानगीने नाशिक कारागृहात असलेल्या खरात सध्या शिर्डी पोलिसांच्या ताब्यात आहे.
केंद्र सरकारने व्यावसायिक एलपीजी (LPG) वापरणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना मोठा दिलासा दिला आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 200 रुपयांची कपात करण्यात आली असून, नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. त्यामुळे हॉटेल, खानावळ, केटरिंग आणि लघुउद्योग क्षेत्राला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.मात्र, सामान्य घरगुती ग्राहकांसाठी कोणताही दिलासा जाहीर करण्यात आलेला नाही. कारण 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नसून, त्याचे दर पूर्ववतच कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे व्यावसायिक ग्राहकांना फायदा झाला असला तरी घरगुती गॅस वापरणाऱ्या ग्राहकांना सध्या जुन्याच दराने सिलिंडर खरेदी करावा लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.