
राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक स्वराज्य संस्थांचे विधान परिषदेचे आमदार विक्रम काकडे यांनी मंगळवारी (ता.4 ऑगस्ट) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्याची विनंती केल्याचं समोर येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरून काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. भिगवण चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पृथ्वीराज चव्हाण यांचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी चव्हाण यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करत 'जोडे मारो' आंदोलन केले. तसेच परिसर घोषणाबाजीने दणाणून गेला.
बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि शिक्षण महर्षी डी. वाय. पाटील यांचे आज निधन झाले. कोल्हापूरकरांना अंत्यदर्शन घेता यावे, यासाठी पाटील यांचे पार्थिव कोल्हापुरातील यशवंत निवास, कसबा बावडा येथे ठेवण्यात आले होते. त्यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी पाटील यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची उद्या बैठक आयोजित करण्यात आली आहे. शिवसेना कार्यालयात उद्या सायंकाळी पाच वाजता ही बैठक होणार आहे. बैठकीला विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहीर हे नगरसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा गावात जिल्हा परिषद निवडणुकीच्या कारणावरून सत्ताधारी महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटात तुफान राडा झाला. आमदार तानाजी सावंत आणि माजी आमदार राहुल मोटे समर्थकांमध्ये झालेल्या या संघर्षात इनोव्हा, थार, फॉर्च्युनरसह 10 ते 12 वाहनांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करत दोन्ही गटांतील 45 जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गावात तणावपूर्ण शांतता असून बंदुकधारी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
यवतमाळ : राज्य सरकारच्या अहिल्यादेवी होळकर कृषी कर्जमाफी योजनेंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १ लाख १ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिली. पहिल्या टप्प्यातील पात्र शेतकऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांना लवकरच कर्जमाफीचा लाभ मिळेल. दुसऱ्या टप्प्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य राहणार आहे. केवायसी पूर्ण केल्यानंतरच संबंधित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मिळणार आहे. यामुळे दुसऱ्या टप्प्यातील पात्र शेतकऱ्यांनी कोणताही विलंब न करता केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले.
जालना शहरातील ढवळेश्वर परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामावरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राजूर चौफुली उड्डाणपुलापासून ढवळेश्वरकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्याचे नवीन काम सध्या सुरू असून, काम पूर्ण होण्यापूर्वीच पावसामुळे रस्त्यावरील खडी उघडी पडून ठिकठिकाणी खड्डे पडत असल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केला आहे.
सदर रस्ता महानगरपालिका हद्दीत येत असला तरी हे विकासकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र, पावसामुळे रस्त्यावरील खडी उघडी पडली असून, वाहतूक सुरू होण्यापूर्वीच रस्त्याला तडे जात असल्याने कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे गोरंट्याल म्हणाले.
याप्रकरणी आपण महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, या रस्त्याच्या निकृष्ट कामाचा मुद्दा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणणार असल्याचे गोरंट्याल यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शासनाच्या निधीचा गैरवापर होत आहे का? विकासकामांच्या नावाखाली भ्रष्टाचार केला जात आहे का? कमिशनच्या नावाखाली निकृष्ट दर्जाची कामे केली जात आहेत का? असे गंभीर प्रश्न या रस्त्याच्या कामामुळे उपस्थित होत असून, संबंधित यंत्रणेने कामाच्या गुणवत्तेची तातडीने चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
दिल्लीत प्रथमच मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारचा सांस्कृतिक विभाग, चित्रपट महामंडळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर जनपथ यांच्या वतीने हा मराठी चित्रपट महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात मराठी चित्रपट दाखवले जाणार आहेत. मराठी चित्रपटाचा समृद्ध इतिहास यातून दाखवला जाणार आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि खासदार विनोद तावडे यावेळी उपस्थित राहणार आहेत.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील टीकेबाबत आमच्या तीन मागण्या आहेत. प्रथम, करण्यात आलेल्या टीकेबाबत स्पष्टीकरण द्यावे. दुसरे, हे ट्विट काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आहे का, हे स्पष्ट करावे. आणि जर ती पक्षाची भूमिका नसेल, तर काँग्रेसने जाहीर माफी मागावी. जोपर्यंत काँग्रेस माफी मागत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील. आज फक्त मुंबईत निदर्शने झाली आहेत. माफी न मागितल्यास संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येईल. माफी मागण्यास उशीर झाल्यास कायदेशीर मार्गाने कारवाई करण्यात येईल. महाराष्ट्रात महिलांबाबत अशा प्रकारची टीका होणे योग्य नाही, असेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक यांनी सांगितले.
सुप्रीम कोर्टात माणिकराव कोकाटे यांच्याबाबत विनंती करण्यात आली होती की, मंत्रीपद किंवा लाभांचे पद घेण्यास परवानगी द्यावी. परंतू आम्ही विरोध केला की कोणतेही लाभांचे पद देता येऊ नये, अशी माहिती माणिकराव कोकाटे विरोधातील याचिकाकर्ते तुकाराम दिघोळे यांचे वकील ॲड. आशुतोष राठोड यांनी दिली आहे.
शिवाय या प्रकरणाला उशीर लागत आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाला निर्देश दिले की सहा महिन्यात आदेश द्यावे. वर्षानुवर्षे खटले सुरू राहतात परंतू निष्पन्न काहीच होत नाही म्हणूनच सहा महिन्यात प्रक्रिया पूर्ण करण्यास कोर्टाने सांगितले. राज्य सरकारने अजून त्यांचे म्हणणे कोर्टात दिले नाही. न्यायाच्या दृष्टीने राज्य सरकारने आपलं म्हणणं मांडणे गरजेचे होते.
-तरुणांच्या प्रश्नांवर तरुण नेतृत्वाला संधी द्यावी; नवीन आणि सुशिक्षित चेहरे पुढे आणण्याची गरज.
-काही संघटनांनी संविधानावर भाष्य करू नये, अशी टीका.
-जंतर-मंतर आंदोलनाच्या पुढील रणनीतीसाठी दोन दिवसांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
-६ ऑगस्टला मोठी घोषणा (ब्रेकिंग) करण्याचे संकेत.
-माझ्यावर झालेल्या कथित मारहाणीबाबत नेमकी माहिती नाही. मात्र, माझ्याविरोधात तक्रार दाखल झाल्याचे समजले आहे.
-E20 इंधनाचा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर चर्चेत असल्याचा दावा.
-E20 इंधनामुळे वाहनांचे मायलेज कमी होत असल्याची नागरिकांची तक्रार असून, १०० टक्के पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी.
-E20 हा कोणत्याही एका पक्षाचा मुद्दा नसून सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न असल्याचे मत.
-भाजपच्या पाठिंब्याने निवडून आलेल्यांना शुभेच्छा; मात्र तरुणांना पुढे आणण्याचे आवाहन.
-शिंदे गटातील मंत्री केवळ शुभेच्छा देण्यासाठी भेटल्याचा दावा.
-शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे सरकारने -घाबरण्याचे कारण नाही. केंद्राकडे ED, CBI यांसारख्या यंत्रणा असल्याचा टोला.
आरक्षण हटवण्यापेक्षा गरीब विद्यार्थ्यांना अधिकाधिक शिक्षण मिळावे, यासाठी आंदोलन व्हावे.
झारखंडमधील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप.
झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा; शक्य ती सर्व मदत आणि त्यांच्या मागण्यांना समर्थन देण्याची भूमिका.
पुण्याला पाणीपुरवठा करणारी सर्व धरणं सुमारे १०० टक्के भरल्यानं पुणे महापालिकेने पाणीकपात मागे घेतली आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झाल्यामुळे पालिकेनं पाणी कपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. खडकवासला, पानशेत आणि वरसगाव १०० टक्के भरलं असून टेमघर ९८ टक्के भरलं आहे. पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली.
वाढीव घरपट्टीच्या विरोधात सांगलीमध्ये सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. सांगली–मिरज–कुपवाड शहर बंद पाळत सांगली महापालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. महापालिका प्रशासनाने महापालिका क्षेत्रात भांडवली मूल्याधारित करप्रणालीअंतर्गत घरपट्टी लागू केली आहे. मात्र, ही घरपट्टी वाढ अन्यायकारक असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील, अशी पोस्ट सोशल मीडियात केली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, काँग्रेसने आपला इतिहास तपासून पाहावा. काँग्रेसच्या मनात किती द्वेष आहे हे यातून दिसते. पत्रकार परिषद नसेल हे आधीच स्पष्टपणे सांगितलं होतं. बैठकीतील माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देत होत्या. भयंकर दु:ख पटवून दादांचा वारसा चालविण्यासाठी त्या पुढे आल्या. त्या भावूक झाल्या होत्या, हे मी पाहिलं, म्हणून मी पत्रकारांना थांबवलं, असे मुंडे म्हणाले आहेत.
परमबीर सिंग यांच्याविरोधात इतके पुरावे असतानाही एनआयएच्या आरोपपत्रात त्यांचे नाव आरोपी म्हणून का नाही, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे. चार वर्षांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके ठेवण्यात आली होती. एटीएसच्या तपासानंतर तत्कालीन पोलीस अधिकारी परमबीर सिंग आरोपी आढळले होते. त्यानंतर मी त्यांची बदली केली आणि पुढे त्यांना निलंबितही केले होते. एनआयएच्या तपासातही परमबीर सिंग यांच्याविरोधात पुरावे आढळले आहेत, असे देशमुखांनी सांगितले.
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने शिक्षण, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनाला दिशा देणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपल्याची शोकभावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.
माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन झाले आहे. अंत्यदर्शन बुधवारी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत यशवंत निवास ,कसबा बावडा येथे घेता येणार आहे. तर अंत्ययात्रा सायंकाळी 4 वाजता निघणार आहे. सायंकाळी 5 वाजता डी. वाय.पाटील मेडिकल कॉलेज , लाईन बाजार ,कसबा बावडा येथे अंत्यसंस्कार होतील.
देशातील महत्त्वाच्या शिक्षणसंस्थांचे प्रणेते, माजी राज्यपाल आणि पद्मश्री पुरस्कार विजेते ज्ञानदेव यशवंतराव पाटील अर्थात डी. वाय. पाटील यांचे कोल्हापूरमध्ये निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
अकोल्याच्या बाळापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर कुकृत्य करून तिला टोकाचं पाऊल उचलण्यास प्रवृत्त करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला अटक झाली आहे. आरोपी पवन वडगावे गेल्या 22 दिवसांपासून फरार होता... तो मोबाईल वापरत नसल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसाठी खूप कठीण झाले होते... मात्र तांत्रिक माहिती आणि इतर माहितीच्या आधारे पोलिसांनी अखेर त्याला नांदेडमधून शिताफीनं बेड्या ठोकल्या आहेत...
पुण्यातील भिडे पूल आजही वाहतुकीसाठी बंद आहे. खडकवासला धरणातून नदीत मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असून, भिडे पूल अद्यापही पाण्याखाली असून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय..यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनानं केलय....
इतरांचे घोटाळे उघडकीस आणणाऱ्या मुंबई पोलीस दलातच मोठा घोटाळा उघडकीस आलाय. पोलीस दलातील प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीच हा कोट्यवधींचा वेतन घोटाळा केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. बनावट पोलीस तयार करून त्यांच्या बँक खात्यांवर पगाराची रक्कम वळवण्यात आली. याद्वारे शासनाचे साडेसहा कोटी रुपये लाटण्यात आल्याचं समजतंय.या गंभीर प्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. साम टीव्हीने यांसदर्भात वृत्त दिले आहे.
पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ फेसबुकवर पाच तास ब्लॉक केल्याप्रकरणी संसदीय समिती आक्रमक झाली आहे... मार्क झुकरबर्गने देशाची माफी मागितली पाहिजे, अशी भूमिका घेत टेक कंपन्यांचे सेफ हार्बर संरक्षण काढण्याचा इशारा दिला आहे... दरम्यान, तांत्रिक प्रक्रियेत चुकून हा व्हिडिओ डिलीट झाल्याचे स्पष्टीकरण मेटानं दिलं आहे...
पुणे महानगरपालिका कचरा वाहतुकीसाठी 250 वाहने भाडेतत्त्वावर घेणार आहे. एक ऑगस्ट पासून झाडण काम करणाऱ्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. कर्मचारी वाढल्यामुळे शहरातील कचरा वाहतुकीसाठी आणखी वाहनाची गरज आहे. शहरात गोळा होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण लक्षात घेता 250 घंटा गाड्यांनी 30 कॉम्पॅक्टर वाहनाची गरज आहे. कचरा वाहतुकीसाठी ही वाहने भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप नायर यांनी दिली आहे.
सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत. रेकॉर्डवरील गुन्हेगार यश उर्फ दादाया कमलाकर घोलप त्याच्याकडेच गावठी पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सिंहगड रोड पोलीस स्टेशनने तात्काळ कारवाई करत आरोपीच्या ताब्यातील जिवंत काडतूस आणि पिस्तूल जप्त केलं.
एक कोटीच्या दरोडा प्रकरणी पोलीस कर्मचारी प्रमिला निकम आणि अजित मिस्त्री यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. याप्रकरणी आरोपी असलेल्या पोलीस हवलदार प्रमिला निकम आणि अजित मिस्त्री यांनी अटकपूर्व जामीनासाठी पुणे न्यायालयात अर्ज केला होता. आरोपीचा इतर संशयीता बरोबर समान उद्देश दिसत असल्याने जामीन फेटाळण्याचे न्यायालयाने म्हंटले आहे. या प्रकरणी सरकारी पक्षाला कारणे दाखवा नोटीस बजावली असून पुढील सुनावणी सहा ऑगस्ट रोजी होणार आहें.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बनावट पदवी प्रमाणपत्र प्रकरणी एका आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्रदीप महादेव खताते असं अटक केलेल्या आरोपीचे नाव असून न्यायालयाने आठ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. विद्यापीठात बी कॉमचे 70 हजारात पदवी दिल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर चतुःशृंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुख्य सूत्रधार रमेश मुखेकर याला अटक केल्यानंतर त्याच्या तपासातून प्रदीप खताते माहिती मिळाली आहे. खताते यांनी संबंधित पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका तयार केल्याचा तपासात उघड झाला आहे.
सोलापुरात बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा घोटाळा उघडकीस आला आहे. सोलापूर शहर गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई करत याप्रकरणी चौघांना अटक केली आहे. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील 45 टक्के अपंगत्वाची बोगस प्रमाणपत्रे लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमला बागची आणि व्ही मोहना यांच्या विशेष खंडपीठासमोर पार पडणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.