Maharashtra Politics Live Update : महायुती सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या गट 'क' व 'ड' कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : नारी शक्ती विधेयक नामंजूर, महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक यासह देशासह राज्यातील महत्त्वाचे राजकीय घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

महायुती सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या गट 'क' व 'ड' कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती

राज्यातील देवेंद्र फडणवीसांच्या महायुती सरकारनं जनगणनेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या गट 'क' व 'ड' कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे. जनगणनेशी संबंधित शिक्षकांसह सर्व कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांना स्थगिती दिली आहे.

'आमच्यासाठी देशहित प्रथम,  पण काही लोकांसाठी पक्षहित...'; मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल 

पंतप्रधान मोदी म्हणाले, विरोधकांकडून महिला आरक्षण विधेयक नामंजूर करत भारतीय महिलांच्या इच्छांना रोखण्यात आलं, त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर करण्यात आला. आमच्यासाठी देशहित सर्वात प्रथम आहे. पण काही लोकांसाठी पक्षहित हे सर्वात मोठं होतं, त्यामुळे देशातील महिलांना त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत.

'महिला विधेयक नामंजूर झाल्यानंतर काँग्रेस, डीएमके, टीएमसी, सारखे पक्ष आनंदानं टाळ्या वाजवत होते...'; PM मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर पहिल्यांदाच संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, काल देशातील करोडो महिलांचं लक्ष संसदेवर होतं. देशातील महिला पाहत होत्या. मलाही खूप दु:ख झालं. महिलांच्या हितासाठीचा हा प्रस्ताव मंजूर न झाल्यानंतर काँग्रेस, डीएमके, टीएमके, सपा यासारखे पक्ष आनंदाने टाळ्या वाजवत होते. महिलाकडून त्यांचे अधिकार हिसकावून घेऊन विरोधकांनी टाळ्या वाजवल्या. या पक्षांनी जे केले ते महिलांच्या सन्मानावर आघात आहे. महिला सगळं विसरतात परंतु त्यांचा अपमान कधीच विसरत नसल्याचं मोदी म्हणाले.

Devendra Fadnavis : नामांकित कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी उत्सुक

राज्यात डेटा सेंटर क्षेत्राला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. मध्य आशियातील अनेक नामांकित कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी उत्सुक असल्याच्या पार्श्वभूमीवर, संबंधित कंपन्यांना करारानंतर त्वरित जागा उपलब्ध करून द्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत डेटा सेंटर प्रकल्पांबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. या बैठकीत उद्योगमंत्री उदय सामंत हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते.

Chitra Wagh : 100 टक्के बुलडोझर फिरवा, TCS प्रकरणावर यांची रोखठोक भूमिका

"महिला आरक्षण कायदा मंजूर होऊ शकला नाही. अत्यंत दुःखद दिवस होता. 27 वर्षांचा हा संघर्ष होता. मोदी आम्हाला 33 टक्के आरक्षण देणार होते. मात्र हे यूपीएसचे घटक यांनी या बिलाला विरोध केला. देशातल्या मातृ शक्ती पुढे आलेला घास हिरावून घेतला गेला. विरोधी पक्षातील महिलाना देखील याचा फायदा होणार होता, असे चित्रा वाघ म्हणाल्या. त्यासोबत TCS प्रकरणावर बोलताना 100 टक्के बुलडोझर फिरवा, अशी रोखठोक भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली आहे.

नाशिक टीसीएस प्रकरण : आरोपी रझा मेमन आणि सफी शेख याच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर

नाशिक येथील टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणातील आरोपी रझा मेमन आणि सफी शेख याच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर झाल्याची माहिती मिळत आहे. या मोबाईलमध्ये पीडितांसोबत झालेले संवाद उघड होणार आहेत. हे आरोपी कट्टरपंथीय संघटनांच्या संपर्कात होते, याची माहिती समोर येत आहे.

राज्यातील गट क आणि ड वर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती

राज्याच्या जिल्हा परिषदेतील गट क आणि ड वर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आलेली. राज्यात सुरू असलेल्या जनगणनेच्या कामामुळे ग्रामविकास विभागाने हा निर्णय घेतला आहे. या विभागाचे मंत्री जयकुमार गोरे यांनी ही माहिती दिली आहे.

टीसीएसची एचआर निदा खानच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

नाशिक येथील टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणी फरार असलेल्या निदा खान हिच्या अटकपूर्व जमीन अर्जावर सोमवारी (ता. २० एप्रिल) नाशिकरोड न्यायालयात सुनावणी होणार आहे. गरोदर असल्याने अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज केला आहे.

अकोल्यात लव्ह जिहादने एका तरुणीचा बळी : अनिल बोंडे

अकोल्यात लव्ह जिहादने एका तरुणीचा बळी घेतला आहे, असा आरोप भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. जळालेल्या अवस्थेत तरुणी आढळले असून पीडिताचे नाव बदलल्याचा आरोपही बोंडे यांनी केला. ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून सादीक शाहाला आणि त्याला मदत करणाऱ्या त्याचे आई वडिल, भाऊ यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बोंडे यांनी केली आहे.

निदा खान ही 11 आणि 13 एप्रिल रोजी मुंब्र्यातील क्लिनिकमध्ये गेली होती

नाशिकमधील टीसीएस कंपनीची एचआर निदा खान ही 11 आणि 13 एप्रिल रोजी दोन वेळा मुंब्र्यातील ब्लॉसम क्लिनिकमध्ये गेली होती. तिने अस्वस्थ वाटत असल्याचे प्रमाणपत्र या क्लिनिकमधील डॉक्टरांकडे केली होती. त्यानुसार डॉक्टरांनी तिला एक आठवड्याची विश्रांतीची गरज असल्याचे लिहून दिले आहे. निदा खान ही वारंवार लोकेशन बदलून पोलिसांना गुंगारा देत असल्याची माहिती आहे. नाशिकमधील लैगिंक अत्याचार प्रकरणी आरोपींच्या विरोधात आता ॲट्रोसिटी कलमही लावण्यात आले आहे.

हेमा मालिनीच्या नेतृत्वाखाली भाजपचे दिल्लीत काँग्रेसच्या विरोधात आंदोलन

लोकसभेत महिला विधेयक नामंजूर झाल्यानंतर खासदार हेमामालिनी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत भाजपकडून काँग्रेस पक्षाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. महिला सशक्त होऊ नयेत, असं विरोधी पक्षांना वाटतंय, असा आरोपही हेमामालिनी यांनी केला आहे.

मुंबई युवक काँग्रेसतर्फे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी SIR विशेष प्रशिक्षणाचं आयोजन 

निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विशेष मतदार यादी पुनरिक्षणाची मोहिम (SIR) सुरू केली आहे. आतापर्यंत ज्या राज्यांमध्ये ही मोहिम राबवली गेली, त्या ठिकाणी लाखो मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली आहेत. मुंबईत कोणत्याही पात्र मतदाराचे नाव चुकीच्या पद्धतीने वगळले जाऊ नये, यासाठी मुंबई युवक काँग्रेसतर्फे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी SIR संदर्भात विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी दानिश शेखचा जामिनासाठी अर्ज 

- आयटी कंपनीतील धर्मांतर आणि महिला अत्याचार प्रकरण

- संशयित आरोपी दानिश शेखने जामिनासाठी न्यायालयात केला अर्ज दाखल

- दानिशच्या अर्जावर 2 मे रोजी पार पडणार सुनावणी

- दानिश शेखविरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावणे, बलात्काराचा आहे गुन्हा दाखल

महिला सुरक्षेसाठी झिरो टॉलरन्स धोरण लागू करणार; नाशिकमध्ये बैठकीला सुरुवात 

- महिला सुरक्षेसाठी नाशिकमध्ये मोठी बैठकीला सुरुवात

- आयटी कंपन्या, औद्योगिक संघटना, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची एकत्रित बैठक

- जिल्हा प्रशासन आणि महिला व बालविकास विभागाकडून बैठकीचं नियोजन

- भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यासह महिला लोकप्रतिनिधी उपस्थित

- खरात, एरंडे, TCS प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

- IT कंपन्यांसह सर्वच ठिकाणी विशाखा समिती तसंच पॉश कायद्याचे विशेष प्रशिक्षण आणि प्रबोधन करण्यावर चर्चा

- महिला सुरक्षेसाठी झिरो टॉलरन्स धोरण लागू करण्यावर चर्चा

खरातचा पाय खोलात, चौथ्या गुन्हात कोठडी, उद्या पुन्हा हजर करणार

अशोक खरातला VC द्वारे हजर करण्यात आले. चौथ्या गुन्ह्यात 30 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. पाचवा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्या संदर्भात त्याला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती वकिलांनी दिली आहे.

नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी राजेंद्र गडगे भोंदूबाबाला अटक

नाशिकमधील प्रकारानंतर संगमनेर तालुक्यात वडगावपान येथे ‘दत्तधाम सरकार’ नावाने दरबार भरवणाऱ्या राजेंद्र गडगे याच्यावर पोलिसांनी कारवाई केली. गंभीर आजार बरे करण्याचे खोटे दावे करून तो लोकांची फसवणूक करत होता. तक्रारीनंतर गुन्हा दाखल होऊन त्याला ताब्यात घेण्यात आले.

Rahul Gandhi FIR : राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा अलाहाबाद न्यायालयाचा आदेशानं खळबळ

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाच्या आदेशानंतर रायबरेली पोलिसांना राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. हे प्रकरण कथित दुहेरी नागरिकत्वाशी (ब्रिटिश नागरिकत्व) संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसकडून अद्याप या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

CYLINEDER ISSUE : भंडाऱ्यात संतप्त गॅस सिलिंडरधारकांनी नागपूर महामार्ग अडविला...

गॅस सिलिंडर ग्राहकांना वेळेत मिळत नसल्याने भंडाऱ्यात संताप बघायला मिळाला. भंडारा इथल्या खात रोड मार्गावरील एचपी गॅस एजन्सी गोडाऊनसमोर भल्या पहाटेपासून लांब रागांमध्ये उभ्या असलेल्या ग्राहकांनी सिलिंडर न मिळण्यावरून नागपूर महामार्ग अडवला. भंडारा ते नागपूर जिल्ह्यातील रामटेककडे जाणारा महामार्गावर रोखून धरल्याने वाहतूक कोंडी झाली. गॅस एजन्सीचा काळाबाजार थांबावा आणि गॅस एजन्सीची मान्यता रद्द करावी, अशा प्रचंड घोषणाबाजी या वेळी गॅस सिलिंडर धारकांनी केल्या.

Pune ST Bus : जुन्नर बसस्थानकात उभी असलेल्या एसटी बसला अचानक आग

जुन्नर बसस्थानकात उभी असलेल्या ठाणे मार्गावर जाणारी एसटी बसमध्ये चालकाच्या केबिनजवळ, इंजिन परिसरात अचानक आग लागली. बसमध्ये प्रवासी बसलेले असतानाच ही घटना घडल्याने घबराट पसरली. मात्र स्थानकातील नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवलं. आगीत बसचा पुढील भाग मोठ्या प्रमाणात जळून खाक झाला. दरम्यान, सीएनजी लाईन आणि इंजिनमधील इलेक्ट्रिक स्पार्किंगमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Mumbai Crime : नेस्को कन्सर्ट ड्रग्स प्रकरणी फरार आरोपीला रायगडच्या पोलादपूरमधून अटक

मुंबईतील गोरेगाव इथल्या नेस्को ड्रग्ज प्रकरणी फरार आरोपीला रायगडच्या पोलादपूरमधून अटक करण्यात आली आहे. या म्युझिक कन्सर्टदरम्यान ड्रग्सच्या अतिसेवनामुळे दोन युवकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी वनराई पोलिस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील फरार आरोपी आयुष विकी साहित्य (वय 24, रा. उल्हासनगर) हा मुंबई - गोवा महामार्गाने गोव्याकडे पळून जात असल्याची माहिती मिळताच पोलादपूर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

Dharashiv Update : तरूणाला बेदम मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, धाराशिवमध्ये खळबळ

शिवी दिल्याच्या कारणावरून तरुणाला बेल्ट, ऊस व लाकडी दांडक्याने निर्दयीपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ धाराशिवमध्ये व्हायरल झाला आहे. मुलाला वाचवण्यासाठी आई विनंती करत असतानाच, तिला देखील धक्काबुक्की करण्यात आली. हा व्हिडिओ धाराशिवच्या वाशी तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आहे. वाशी पोलिस व धाराशिव पोलिस व्हिडिओवरून तपासात गुंतले आहे.

Inflation : खाद्य तेलाचे भाव वाढले; सर्वसामान्यांचा वडापाव महागणार

खाद्यतेलाच्या वाढत्या दरामुळे आता सर्वसामान्यांना परवडणारा वडापाव महागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. सूर्यफूल व शेंगतेलाचा दर तब्बल 40 ते 50 रूपयांनी वाढून 150 रूपयांवरून 200 ते 250 रूपये लिटरवर गेलं आहे. त्यामुळे वडापाव विक्रेत्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली असून, तेल, गॅस आणि इतर कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे दर वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. सध्या 15 रुपयांना मिळणारा वडापाव लवकरच 20 ते 25 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Ahilyanagar Update : भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कूल बसवर कारवाई करा; सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांची मागणी

अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगरात पाईप लाईन रोड, गुलमोहर रोड, तपोवन रोड अन् कुष्टधाम रोड या मुख्य रस्त्यावरून सकाळ अन् दुपारी रोज स्कूल बसेस धावत असतात. पण या स्कूल बसेसचा वेगाची मर्याद ही ठरवून दिल्यापेक्षा अधिक असते. बसेसचा वेग एवढा असतो की, रस्त्याच्या मधी कोणी आडवे येईल, याचे भानही नसते, या मुळे नक्कीच मोठा अपघात होण्यापूर्वीच स्कूल बसेसचा वेग नियंत्रित करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी अहिल्यानगर पोलिस वाहतूक शाखेकडे केली आहे.

Kalyan Dombivli : कल्याण-डोंबिवलीत सफाई कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; पगाराच्या वेळेवर मिळत नसल्याने सामूहिक सुट्टी

कल्याण-डोंबिवली महापालिका कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी पगार वेळेवर न मिळाल्याच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे शहरातील घनकचरा व्यवस्थापनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागू शकतो.

Sharad Ponkshe : 'एक लाख खरात एकत्र केले, तर एक अकबर होईल'; शरद पोंक्षे यांचे विधान

'एक लाख खरात एकत्र केले, तर एक अकबर होईल', असं वक्तव्य सिने अभिनेता शरद पोंक्षे यांनी केले. नांदेडमध्ये भगवान परशुराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय ब्रह्मण महासंघातर्फे आयोजित परशुराम तेजोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शरद पोंक्षे यांनी मुगले आजम, जोधा अकबर, बाजीराव मस्तानी चित्रपटावर टीका केली. चित्रपटात खरा इतिहास लपण्यात आला आणि अकबर कसा सेक्यूलर होता हे दाखवण्यात आले. एका वेळेला हजारो महिलांचे आयुष्य बर्बाद करणारा अकबर हा सेक्युलर कसा? असा सवाल शरद पोंक्षे यांनी या वेळी केला.

हवाईदलाच्या विमानाला अपघात, ६५ विमाने रद्द

पुण्यात हवाईदलाच्या विमानाला अपघात झाल्याने विमान वाहतूक विस्कळीत झाली आहे. पुणे विमातळावर इंडिगोची येणारी ३१ आणि जाणारी ३४ अशी ६५ विमाने रद्द करण्यात आली आहेत. तर, एअर इंडियाची येणारी ३ आणि जाणारी ३ विमाने, स्पाईस जेटचीही येणारी २ दोन आणि जाणारी ३ विमाने रद्द करण्यात आली आहेत.एयर इंडिया एक्सप्रेसचीही १० विमाने रद्द करण्यात आली आहे.

आजी-माजी नगरसेविकेतील वाद तिसऱ्यानेच पेटवला - गणेश बीडकर

बाणेर येथे आदिवासी महिलांसाठी उभारण्यात येणाऱ्या प्रशिक्षण केंद्राच्या तीन कोटीच्या निविदेवरून भाजपच्या आजी-माजी नगरसेविकेमध्ये महापालिकेत शिव्यांची लाखोली वाहत झालेल्या जोरदार भांडणावर आज (ता. १७) पडदा टाकण्यात आला. या दोघींमध्ये तिसऱ्याच व्यक्तीने गैरसमज निर्माण करून भांडणे लावून दिली असा दावा सभागृहनेते गणेश बिडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये स्वतंत्र ‘सहकार’ विभाग, मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

सहकार क्षेत्राची ताकद वाढविण्यासाठी आणि कुशल नेतृत्व निर्माण करण्यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये स्वतंत्र सहकार विभाग सुरू करून अभ्यासक्रम राबविण्यात येतील. तसेच, राज्य सहकारी संघाला प्रशिक्षण निधी पूर्ववत सुरू करण्यासाठी सहकारी संस्थांकडून शुल्क आकारण्याबाबतचा निर्णय आगामी पावसाळी अधिवेशनात घेण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com