

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी बंगल्यावर आमदार यायला सुरुवात झाली आहे. सर्व नेते आणि आमदार बैठकीसाठी उपस्थित असणार आहेत. या बैठकीत रूपाली चाकणकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक दोन पोलीस पथकाने काळेवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील लकी बेकरी जवळील विकी फुटवेअर या दुकान आणि गोडाऊन वर धाड टाकून ही कारवाई केली आहे. या कारवाईत जवळपास आठ लाख तीस हजार 250 रुपये किमतीचे पुमा कंपनीचे बनावट फिलप्लॉप, शूज आणि चप्पल पोलिसांनी जप्त केले आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड गावात दोन गटात तुफान राडा झाला असल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडलीय. या राड्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र पोलिसांमध्ये अद्याप दोन्ही गटाकडून तक्रार दाखल करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिलीय .
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सावळेश्वर टोल नाक्यावर टोल घेण्यावरून कर्नाटक राज्यातील ट्रकचालक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार झटापटी झाल्यानंतर वाहन चालक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये तुफान झाला राडा झाला. यानंतर ट्रक चालक आणि त्याच्या साथीदारांकडून टोल नाक्याची तोडफोड केल्याचा आरोप आता केला जात आहे.
बलिदान आणि मृत्यू हे क्रांतिकारकांचे अंतिम स्थान आहे कारण कुर्बाणीशिवाय आमच्या हेतूपर्यंत पोहोचता येत नाही असे ठाम आणि स्पष्ट मत राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केले.
भोंदूगिरीतून कोट्यवधींची कमाई केल्याचा आरोप असलेल्या कॅप्टन अशोक खरात यांच्या मालमत्तेचे धागेदोरे पनवेलपर्यंत पोहचले असून याची माहिती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या निवेदनातून उघड झाली आहे. शिरढोण गावात त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर सातबारा नोंद झाल्याचे उघड झाले असून, या जमीन व्यवहारासाठी कोट्यवधी रुपये दिल्याची चर्चा आहे. नोंदणी प्रक्रिया तातडीने करण्यासाठी महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांनी मदत केल्याचाही आरोप होत आहे.
भोर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींमध्ये रिक्त झालेल्या ९ थेट सरपंच पदांसह ३४ सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी २८ एप्रिल रोजी मतदान होणार असून, २९ एप्रिल रोजी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाईल. उमेदवारांना ७ एप्रिल ते १३ एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. अर्जांची छाननी १५ एप्रिल रोजी होईल, तर १७ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल.
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या, या मागणीसाठी आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांनी मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले. आज आंदोलनाचा नववा दिवस आहे. हे आंदोलन पेट घेत असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी आज दीपक बोऱ्हाडे यांची भेट घेऊन धनगर आरक्षणाच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला
घरगुती गॅसची टंचाई होत असल्याने अनेक ठिकाणी रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच आता पेट्रोल आणि डिझेलसाठी देखील कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सकाळपासून रांगा लागल्याचे चित्र आहे. पेट्रोल डिझेल मिळणार नाही या शक्यतेनं नागरिकांनी पेट्रोल पंपांवर लांबच्या लांब रांगा लावल्या असून नागरिकांनी विनाकारण पेट्रोल पंपावर गर्दी करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं आहे. तसेच त्यांनी, जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा पुरेसा असून पेट्रोल डिझेलच्या कमतरते विषयी अफवा असल्याचेही जिल्हाधिकारी येडगे यांनी म्हटले आहे.
विधान परिषदेत मुदत संपणाऱ्या आमदारांना आज निरोप देण्यात आला. त्या वेळी झालेल्या भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडानंतर प्रथमच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साहेब असे म्हटले आहे. भाषणात त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असा उल्लेख केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी सहा वर्षे विधान परिषदेत काम केले आहे. मात्र, या काळात त्यांच्या कोट्या आम्हाला कमी ऐकायला मिळाल्या. ते पुन्हा विधान परिषदेत आले तर आम्हाला त्यांच्या कोट्या ऐकायला मिळतील. त्यांनी ठरवलं तर ते पुन्हा विधान परिषदेत येतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरेंचा स्वभाव राजकारणी नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये राजकारण कमी आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे उद्वव ठाकरेंचा स्वभाव रोखठोक आहे. निर्णय घेताना त्यांनी परिणामाची चिंता ठाकरे यांनी कधी केली नाही. पु. ल. देशपांडे यांच्यानंतर शब्दांचे ‘कोट्या’धीश म्हणून उद्वव ठाकरे यांचा नंबर लागतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंचे कौतुक केले.
अशोक खरात अत्याचार प्रकरणात त्याचा ऑफिस बॉय नीरज जाधव याचा सहभाग आढळला नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदनात सांगितले.
अशोक खरात याला पोलिसांकडून लूटआऊट नोटीस बजावण्यात आली आहे, खरात हा देश सोडून जाण्याच्या तयारीत होता. शिर्डीत खरातच्या विरोधात पहिल्यांदा गुन्हा दाखल झाला आहे. खरातचा मोबाईलमधील डाटा हस्तगत करण्यात येणार आहे. त्याची झाडाझडती घेतली असता खरातडे रिव्हाल्हर, पिस्तूल, जिवंत पिस्तूल, काडतूस रोकड जप्त करण्यात आली आहे. तीन पीडित महिलांची तक्रार दाखल करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
अशोक खरात याच्यावर सध्या पाच प्रकरणं दाखल करण्यात आली आहे. त्या महिलांच्या शोषणाचा मुद्दा आहे. सात दिवसांच्या तपासात मला शंका आहे, असं खरातच्या वकिलांनी म्हटले आहे. मात्र सरकरी वकिलांनी केलेल्या युक्तीवादानुसार पाच दिवसांची म्हणजे २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
अशोक खरात याने आतापर्यंत पाच नरबळी दिले असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे, याबाबतची माहिती सरकारी वकिलाने कोर्टात सुनावणीदरम्यान केला आहे, त्यामुळे खरात प्रकरणात नवनवीन प्रकार उघडकीस येत आहेत.
भोंदूबाबा अशोक खरातला नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्याची पोलीस कोठडी आज संपत असल्याने न्यायायक कोठडीत वाढ करणार की नाही, याबाबत उत्सुकता वाढली आहे. विशेष सरकारी वकील म्हणून अजय मिसर आज कोर्टात हजर राहण्याची शक्यता आहे.
आरटीईच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती शासनाकडून केली जाते. मात्र, कोणत्याही शाळेला आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क किंवा साहित्याच्या नावाखाली पैसे घेण्यास परवानगी नाही, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज विधिमंडळात स्पष्ट केले. शुल्क वसूल केले असेल, तर ते पैसे परत करण्याचे निर्देश दिले जातील, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत पश्चिम आशियातील युध्दजन्य स्थितीवर निवेदन दिले. यावेळी त्यांनी कोरोना काळात केंद्र सरकार व राज्य सरकारांनी मिळून केलेल्या कामाचे कौतुक करताना त्यांनी 'टीम इंडिया' असा उल्लेख केला. टीम इंडिया आताही असेच काम करायचे आहे, असे मोदी म्हणाले.
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांकडून थोड्याच वेळात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. मागील सहा दिवसांपासून एसआयटीकडून त्याची चौकशी केली जात आहे. पोलिसांकडून आज खरताच्या पोलीस कोठडीत आणखी वाढ करण्याची मागणी केली जाईल.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण बाजूला ठेवून घेतलेल्या भूमिकेचे मी स्वागत करते. अशोक खरात याच्यासारख्या विकृत माणसाला देवेंद्र फडणवीस पाठीशी घालणार नाहीत. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाभोलकरांचा वारसा पुढे नेत आहेत. त्यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर आभार मानते, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळेंनी केले आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार सुनील तटकरेंनी आपल्या बोटाच्या जखमेबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभेचा अर्ज भरण्याआधी गाडीच्या दरवाजात बोट चेपल्यामुळे जखम झाली होती, असं स्पष्टीकरण तटकरेंनी दिलं आहे. चाकणकरांसंदर्भातील निर्णय पक्षाच्या बैठकीत होईल. असंही त्यांनी म्हटलंय. काळी जादू करण्यासाठी तटकरेंनी बोट कापल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता. त्यावर तटकरेंनी हे स्पष्टीकरण दिले आहे...
नंदुरबार जिल्ह्यात इंधना टंचाईच्या अफवेनं पेट्रोल पंपावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केलीये. काल रात्रीपासून अफवा पसरल्यानं वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लावल्याय. अचानक गर्दी वाढल्याने वाहनधारकांना कमी प्रमाणावर पेट्रोल आणि डिझेलच वितरण केल जात असून, नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालेय.
सिद्धिविनायक मंदिराच्या पुजारी कक्षातील दानपेटीतून १० हजार रुपयांची चोरी झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. एका कर्मचाऱ्यानेच ही चोरी केली. गेल्या ८ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा प्रकार समोर आला. आरोपी कर्मचाऱ्याने गुन्हा कबूल केला असून न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या चोरीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत.
वडाळ्याच्या भाजप पदाधिकाऱ्याचे कार्यालय फोडले. वडाळा येथे भाजप पदाधिकारी विजयसिंह गायकवाड यांचं कार्यालय अज्ञातानी फोडले असून गुढीपाडव्याला या कार्यालयाचे उद्घाटन झाले होते. कार्यालय अज्ञातानी का फोडले याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांकडून चौकशीला सुरुवात कार्यालयाबाहेर फुटलेल्या काचांचा खच झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील ११४ ग्रामपंचायतीमधील रिक्त १७४ पदांसाठी ही निवडणूक २८ एप्रिलला होणार आहे.
कौटुंबिक वादातून नैराश्यात आलेले पोलीस हवालदार जयवंत झाडे यांनी घरातच विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना नागपुरात घडली. .ते सध्या वाठोडा पोलिसात कार्यरत आहे.
आखातात सुरू असलेले युद्ध थांबणार असल्याची चिन्ह आहेत.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली आहे. .सोबतच 9 एप्रिलला युद्ध संपवण्याची तयारी असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटले आहे. इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले 5 दिवसांसाठी पुढे ढकला असे आदेश डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या लष्कराला दिले आहेत.
धाराशिव जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवड 27 मार्च रोजी होणार आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील ऊर्जा प्रकल्पांवरील संभाव्य हल्ले पाच दिवस लांबणीवर टाकण्याची घोषणा सोमवारी केली आणि संपूर्ण जगाला मोठा दिलासा मिळाला. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानच्याऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर लगेचच काही तासांनी त्यांनी थेट युद्ध संपवण्याची तारीख देखील जाहीर केली आहे. याबाबतची माहिती इस्रायली माध्यमांनी दिली असून या माध्यमांच्या दाव्यानुसार अमेरिकेने युद्ध थांबण्यासाठी ९ एप्रिल ही संभाव्य तारीख निश्चित केली आहे.
भोंदू अशोक खरातची एसआयटीकडून (SIT) सोमवारी तब्बल दहा तास चौकशी करण्यात आली. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते (Tejaswi Satpute) यांनी अशोक खरातची स्वतः चौकशी केली. यावेळी त्यांनी खरातकडून इतर गुन्ह्यांचेही जबाब नोंदवून घेतले असल्याची माहिती आहे. आज अशोक खरातची पोलीस कोठडी संपणार आहे. त्यामुळे अशोक खरातला दुपारी दोन वाजेपर्यंत नाशिकच्या सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.