Maharashtra Breaking: मोदी सरकारनं पारदर्शकपणे गॅस सिलिंडरबाबत अडचण असल्याचं मान्य करावं: सुप्रिया सुळे

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: भोंदूअशोक खरात प्रकरण, रूपाली चाकणकरांच्या अडचणी वाढल्या , इराण-इस्त्राइल-अमेरिका युद्धाचे अपडेट, राज्यातील राजकीय घडामोडी, अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

मोदी सरकारनं पारदर्शकपणे गॅस सिलिंडरबाबत अडचण असल्याचं मान्य करावं: सुप्रिया सुळे 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारत सरकारनं गॅस सिलिंडरबाबतचं वास्तव स्पष्ट करावं. मागील आठवड्यात सर्वपक्षीय बैठक बोलवली होती; त्यावेळी आम्ही सहकार्याची भूमिका घेतली. देश अडचणीत असल्यास सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून सरकारला सहकार्य करायला तयार आहोत. सहकार्य करायचे असेल, तर सरकारने पारदर्शकपणे अडचण असल्याचे मान्य करावं,असं सुळे यांनी म्हटलं आहे.

माओवाद संपवणाऱ्या सी 60 कमांडोंचा विशेष सन्मान केला जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र माओवादापासून मुक्त करणाऱ्या सर्व पोलिसांचे अभिनंदन करतानाच मोठी घोषणा केली आहे. त्यात सी-60 मध्ये काम केले, त्यांना सी 60 पदक देण्यात येणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच आगामी काळात ड्रग्जविरोधात आणखी कठोर पावलं उचलणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी मोठं विधान; म्हणाले, 'कोणी कोणाला भेटणे गुन्हा...'

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी अशोक खरात प्रकरणी खळबळजनक आरोप करत शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, 39 आमदार किंवा पाच-पन्नास खासदार हे जे कोणी खरात किंवा भोंदूबाबाला भेटले असतील, त्यावरून कोणाचाही गुन्हा सिद्ध होत नाही. कोणी कोणाला भेटणे गुन्हा नसून गुन्ह्यात थेट सहभाग असणेच गुन्हा आहे, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.

आपला बॉस कोण आहे, हे या लोकांनी ठरवलं पाहिजे :  अमित ठाकरेंचा नाव न घेता नीतेश राणेंना टोला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि भाजपचे मोहित कंबोज यांच्या भेटीवर टीका करणारे कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांच्यावर अमित ठाकरे यांनी जोरदार पलटवार केला. कंबोज आणि राज ठाकरेंच्या भेटीवर जे टीका करतात, त्यांनी किती पक्ष बदलले..? अगोदर शिवसेनेत होते, मग काँग्रेसमध्ये गेले, त्यानंतर स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि मग भाजपमध्ये गेले. आपला बॉस कोण आहे, हे या लोकांनी ठरवलं पाहिजे, असा टोला नाव न घेता अमित ठाकरे यांनी राणेंना लगावला.

वीज बिल भरा नाहीतर अंधारात राहा : 43 कोटींच्या थकबाकीप्रकरणी महावितरण आक्रमक

नागपूर जिल्ह्यात ४३ कोटी रुपयांची विजबिलाची थकबाकी आहे. या थकबाकीदारांविरोधात महावितरण कडक भूमिका घेतली आहे. त्यात वीज बिल भरा नाहीतर अंधारात राहा, असा इशारा महावितरणने थकबाकीदारांना दिला आहे. पाणी पुरवठा योजनांकडेही १० कोटींची थकबाकी आहे, त्यामुळे ग्रामपंचायतींना पाणीपुरवठ्याची वीज खंडीत करण्याचा इशारा दिला आहे.

अशोक खरातचं कार्यलयाच मला माहिती नाही, त्यामुळे मी कशाला जाऊ : नीलम गोऱ्हे

अशोक खरातचं कार्यालय कुठं आहे, हेच मला माहिती नाही. त्यामुळे मी त्याला भेटायला कशी जाऊ. मी प्रोटोकॉल टाळून गेले, असा त्यांचा दावा आहे ना. मी निरोपाचं भाषण केलं आहे, त्यामुळे काही लोकं दुखावले आहेत. त्यामुळे दुखत असेल पोट तर दाखवतात डोकं, असंही असू शकतं. या प्रकरणातील तपशील पुढे आल्यानंतर सर्व सत्य बाहेर येईल, असे स्पष्टीकरण उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले.

दीपक केसरकर यांच्यावर शिवसेनेचे वरिष्ठ नेते नाराज

आमदार दीपक केसरकर यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर शिवसेनेचे वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती आहे. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी अशोक खरात याला ३९ आमदार भेटले, पण माझंच नाव का यात आणले जात आहे, असा सवाल केला होता. त्या विधानाबद्दल शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी आमदार केसरकर यांना समज दिल्याची माहिती आहे.

पंढरपुरमधील माजी लोकप्रतिनिधींच्या पुतळ्याचा विषय स्थगित

पंढरपूरच्या सर्व माजी दिवंगत आमदारांचे एकाच ठिकाणी पुतळे बसवण्याचा निर्णय तुर्तास लांबणीवर पडला आहे. काही वारसदारांनी याला विरोध केल्याने पुतळे बसवण्याचा विषय तुर्तास स्थगीत करण्यात आला आहे. आज पंढरपूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा झाली. या सभेत माजी दिवंगत लोकप्रतिनिधींचे पुतळे बसवण्याबाबत चर्चा झाली. यावर सर्वच नगरसेवकांनी हा विषय स्थगित करण्याची सूचना केली

परभणीत एलपीजी गॅस टंचाई पाचपैकी चार पंप बंद, गॅससाठी दोन किलोमीटरपर्यंत ऑटोची लांबच लांब रांग...

आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम कमी व्हायला तयार नाही. सर्वाधिक फटका हा एलपीजी गॅस पुरवठ्यावर झालेला दिसून येतोय. परभणीमध्ये जवळपास पाच एलपीजी गॅस पंप असून यातील चार पंप बंद आहेत. एकाच एलपीजी पंपावर गॅस उपलब्ध आहे. त्यामुळे जवळपास दोन किलोमीटर पर्यंत ऑटोच्या रांगा एलपीजीसाठी लागलेल्या आहेत. एलपीजी गॅस पंप चालक आणि ऑटो चालकांमध्ये यामुळे वाद होताना दिसत आहे. दरम्यान शंभर रुपये प्रति लिटर प्रमाणे गॅस मिळत असल्याने ऑटो चालक अडचणीत सापडले आहेत. यामुळे आता सरकारने तात्काळ तोडगा काढत गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी ऑटो चालकांनी केली आहे.

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने घेतला महत्त्वाचा निर्णय

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एक महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. यंदा प्रथमच हे दोन्ही एकत्रित स्वरूपात एकाच कागदावर देण्यात येणार आहेत. तर नवीन प्रणालीअंतर्गत विद्यार्थ्यांचे नाव 'पहिले नाव - वडिलांचे नाव - आडनाव' या क्रमाने छापले जाणार आहे. गुणपत्रक-प्रमाणपत्रावर विद्यार्थ्याचे अचूक छायाचित्र छापले जावे यासाठी मंडळाने आपल्या संकेतस्थळावर 'छायाचित्र सुधारणा' ही विशेष सुविधा उपलब्ध केली आहे.

पालखी सोहळ्याची 350 वर्षांची परंपरा धोक्यात?

आषाढी वारीसाठी आळंदीहून प्रस्थान केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पारंपरिक रीतीने दोन दिवस पुण्यातील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामाला असते. मात्र, 350 वर्षांची ही परंपरा मोडीत काढून पालखीच्या मुक्कामाचे ठिकाण बदलण्याचा प्रयत्न आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांकडून केला जात असल्याचे बोलले जात आहे.

"पत्नीच्या माहेरच्या मालमत्तेवर पतीचा हक्क नाही" : हायकोर्टाचा निकाल

एखाद्या हिंदू महिलेचा मृत्यू मृत्युपत्र तयार न करताच झाला असेल तर तिला वारशा हक्काने मिळालेली मालमत्ता तिच्या वडिलांच्या वारसांकडे जाईल. त्यावर तिचा पती किंवा त्याच्या वारसांचा कोणताही हक्क असणार नाही, असा महत्त्‍वपूर्ण निकाल आंध्र प्रदेश उच्‍च न्‍यायालयाने दिला आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे निदर्शने ; जादूटोणा विरोधी कायद्यात दुरुस्तीकरून फलज्योतिषालाही कायद्यात समाविष्ट करण्याची मागणी

महाराष्ट्रात गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक झाली असून, समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. यावेळी जादूटोणा विरोधी कायद्यात तातडीने दुरुस्ती करण्याची मागणीसह रुपाली चाकणकरांसहित सर्व संबंधित राजकारण्याची चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Beed Mahavitaran: आठ दिवसांपासून अंधारात पाली सर्कल; संतप्त ग्रामस्थांचा महावितरण कार्यालयाला घेराव

बीडच्या पाली सर्कलमधील ग्रामस्थ गेल्या आठ दिवसांपासून अंधारात जीवन जगत आहेत. सततच्या वीज खंडितामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज थेट बीड इथल्या महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर मोर्चा काढत घेराव घातला. यावेळी महावितरणचे अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालत असून कामात दिरंगाई होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला. आठ दिवसांपासून वीज नसल्यामुळे पाणीपुरवठा, शेती आणि दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. तात्काळ वीजपुरवठा सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

Ahlyanagar Update : जामखेड शेतकरी भवनासाठी 32 लाखांचा पहिला हप्ता वितरित, सभापती प्रा.राम शिंदे यांचा पाठपुरावा

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड मधील छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 'राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन' उभारण्यासाठी सरकारने 31 लाख 96 हजार 5 रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी या महत्त्वपूर्ण कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या महत्वपूर्ण निर्णयामुळे शेतीमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुक्कामाचा व मूलभूत सुविधांचा प्रश्न एकाच ठिकाणी सुटणार आहे.

Solapur MNS : अमित ठाकरेंनी दिवंगत पदाधिकारी सरवदे यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी सोलापूर दौऱ्यात पुन्हा एकदा पक्षाचे दिवंगत पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. सोलापूर मनपा निवडणुकीदरम्यान बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाली होती. बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी अमित ठाकरे यांनी उचलली आहे. मोहोळ तालुक्यातील पापरी-खंडाळी या भागात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांची अमित ठाकरे पाहणी करणार आहेत.

Washim Farmer : कृषिमंत्र्याच्या पालकत्व जिल्ह्यात शेतकऱ्यांची कोंडी, बाजार समिती 16 दिवस बंद ठेवल्यानं आंदोलन

कृषिमंत्र्यांनी पालकत्व स्वीकारलेल्या जिल्ह्यातच शेतमाल विकण्यासाठी शेतकऱ्यांची कोंडी केल्याचं समोर आली आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने नाणेटंचाई आणि आर्थिक वर्षाची जुळवा जुळव करण्याचे कारण देत 20 मार्चपासून वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवली आहे. पणनच्या परिपत्रकानुसार सलग तीन दिवसाच्या वर बाजार समिती बंद ठेवता येत नाही. मात्र, पणनच्या या आदेशाला वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीने देखील केराची टोपली दाखवली असून, या निर्णया विरोधात बाजार समिती चालू करण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीचे पुरुषोत्तम जाधव यांनी सहाय्यक निबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.

Buldhana Update : राष्ट्रपतींकडे नार्को टेस्टची मागणी; अशोक खरात प्रकरणातील सर्व मंत्री-अधिकाऱ्यांवर कारवाई करा

माजी मंत्री सुबोध सावजी यांनी द्रौपदी मुर्मू यांना लेखी पत्र देत अशोक खरात संबधित प्रकरणातील सर्व केंद्र व राज्यातील मंत्री व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. सावजी यांनी पत्रात नमूद केले की, या प्रकरणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाली असून, सत्य समोर येण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. नार्को टेस्ट झाल्यास तपास प्रक्रियेला गती मिळून वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. केंद्र व राज्य पातळीवरील संबंधित अधिकारी आणि मंत्र्यांचीही चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Beed Crime Update : बहिणीच्या जागी पत्नीला बुरखा घालून उभं केलं अन् जमीन नावावर करून घेतली...

बीडच्या माळापुरी इथल्या आबेद खान या व्यक्तीने आई-वडिलांच्या मृत्यूनंतर त्याच्या व्यतिरिक्त मृत्यू फेर प्रमाणे बहिणीच्या नावे झालेली जमीन 24 ऑक्टोबर 2024 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय (रजिस्ट्री ऑफिस) बीड इथं पत्नीला बुरखा घालून उभे केले आणि बहीण असल्याचे सांगितले. यानंतर पत्नीने खोट्या सह्या करून सोडपत्र नोंदवून घेतले आणि बहिणीच्या वाट्याची जमीन देखील स्वतःच्या नावे करून घेतली. ही बाब बहिणीच्या लक्षात आल्यानंतर तिने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आबेद खान आणि त्याची पत्नी वाहिदा यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dharashiv Politics : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसची शेतकरी संघर्ष न्याय पदयात्रा; हर्षवर्धन सपकाळ यांची सरकारवर टीका

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्यावतीनं तुळजापूरात भव्य शेतकरी संघर्ष न्याय पदयात्रा काढण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वातील तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव ते तुळजापूर, अशी पायी पदयात्रा सुरू आहे. यामध्ये मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. सुरत-चेन्नई महामार्ग जमीन बाधित शेतकऱ्यांना योग्य भाव द्यावा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, यासाठी सरकारला सद्बुद्धी द्यावी, अशी तुळजाभवानी मातेला साकडे घालणार असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं. भोंदू खरात प्रकरण किळसवाण असून, पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय आहे, अशी टिप्पणी देखील सपकाळ यांनी केली.

Ashok Kharat Case : अशोक खरातला 'अंनिस'चं आव्हान; राजकीय नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करा...

अशोक खरातने आमच्यासमोर दैवी शक्ती सादर करावी त्याला 80 लाख रुपये बक्षीस देऊ, असे आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अशोक खरातला दिले आहे. अशोक खरात यांच्यावर राजकीय वरदहस्त होता. अशोक खरात संबंधित राजकीय नेत्या विरोधात जादूटोणा प्रतिबंध विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी अंनिसचे हरीश केदार यांनी केली आहे.

Beed Crime : पोटच्या मुलाकडून वडिलांच्या डोक्यात दगड घालून हत्या

बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा बस स्थानक परिसरात पोटच्या मुलानेच वडिलांची हत्या केली. अनिल मुळे, असे मृत पित्याचे नाव असून आरोपी मुलगा किरण मुळे पसार झाला आहे. किरण मुळे हा कायम दारूच्या नशेत असायचा, त्यानेच आपल्या राहत्या झोपडीत झोपेत असलेल्या वडिलांच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिसादेवी इथले रहिवासी असलेले हे कुटुंब अनेक वर्षांपासून कडा शहरात मजुरीसाठी स्थायिक झालेले आहे.

पुण्यात भोंदूबाबा अशोक खरातविरोधात गुलाबो गँगचा तिरडी उठाव आंदोलन

पुण्यात गुलाबो गँगच्या महिलांनी भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे. तिरडी उठाव करत त्यांनी निषेध नोंदवला असून खरातच्या प्रतीकात्मक वरातीचे आयोजन केले. या आंदोलनातून महिलांनी संताप व्यक्त करत मुख्यमंत्रीांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.

बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आमदारकीचा राजीनामा! मोदी सरकारमध्ये मंत्रीपद मिळणार?

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानपरिषदेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यसभेवर निवड झाल्यानंतर हा घटनात्मक निर्णय घेतला गेला असून आता मोदी सरकारमध्ये मंत्रीपदाची शक्यता चर्चेत आहे.

नवी मुंबईतही 'अशोक खरात'! आदर्श म्हात्रेचे ४०महिलांवर लैंगिक अत्याचार

नाशिकच्या अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली असतानाच आता नवी मुंबईतून फसवणुकीचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. आदर्श म्हात्रे (वय ३५) नावाच्या एका भामट्याने इस्त्रोचा शास्त्रज्ञ (ISRO Scientist) किंवा आयपीएस-आयएएस अधिकारी असल्याचे भासवून राज्यातील अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे.

अकोल्यात काँग्रेस अन् AIMIM नगरसेवकांमध्ये राडा; हाणामारी, दगडफेक अन् धारदार शस्त्रानं वार

अकोल्यातील अकोट फैल भागात काँग्रेस आणि एमआयएमचे नगरसेवकांमध्ये मोठा राडा झाल्याची गंभीर घटना घडली आहे. याराड्या दरम्यान, दोन्ही पक्षाचे नगरससेवक एकमेकांवर भिडले होते. यानंतर झालेल्या राड्यादरम्यान एका व्यक्तीवर चाकूने हल्ला करण्यात आलाये. तो गंभीर जखमी असून अन्य चार जण यात जखमी झाले. त्यांच्यावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.

पूजाऱ्यांकडून मारहाण; कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा

कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा मंदिर परिसरात पुजाऱ्यांकडून भक्तांना झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर वातावरण अजूनही तापलेलं आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज करवीर तालुक्यातील परिते गावातील ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर न्याय मोर्चा काढला जाणार आहे.

आजपासून 'मुंबईचे डबेवाले' सहा दिवस सुटीवर नोकरदारांना जेवणाचे डबे पोहोचविण्याचे काम करणारे 'मुंबईचे डबेवाले' ३० मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत सुटीवर जाणार आहेत. मुंबई शहर आणि उपनगरातील विविध कार्यालयांमधील 'मुंबईचे डबेवाले' हे डबे पुरवत असतात.

अशोक खरात प्रकरणात आज खरात याचे सीए आणि पीएची तपासणी होणार आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभेचे काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या ताफ्याला भीषण अपघात

भोंदू अशोक खरातप्रकरणी आता रुपाली चाकणकरांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. रुपाली चाकणकरांना SITनं चौकशीसाठी समन्स बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com