Maharashtra Politics Live Update: एसटी महामंडळाची फडणवीस सरकारकडे मोठी मागणी

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. यासह आजच्या राज्यभरातील दिवसभरातील सर्व राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

एसटी महामंडळाची फडणवीस सरकारकडे मोठी मागणी 

राज्य परिवहन महामंडळानं सरकारकडे मोठी मागणी केली आहे. त्यात परिवहन महामंडळाकडून शिवाजीनगरच्या जागेसोबतच वाकडेवाडी येथील एसटी स्थानकाजवळील आरे डेअरीची संपूर्ण जागा बसस्थानकासाठी देण्याबाबतची आग्रही मागणी सरकारकडे केली आहे. ही जागेची मागणी मान्य झाली तर सुसज्ज बसस्थानक बांधता येणे शक्य होणार आहे.

'भाजपला एकनाथ शिंदेंचं आता ओझं वाटायला लागलंय...'; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी भाजपला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आता ओझं वाटायला लागलं आहे, असा दावा केला आहे. तसेच भास्कर जाधव यांनी रायगडची जागा राष्ट्रवादीला सुटण्यामागे भाजपची रणनीती असल्याचंही म्हटलं आहे. महायुतीत कोकणातील विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला सुटली आहे. याठिकाणी शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंच्या मुलीने अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीला ही जागा सुटल्यामुळे शिवसेना नेते नाराज असल्याचं जाधव यांनी म्हटलं आहे.

सोलापूरमध्ये काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद

सोलापूरमधील विधान परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी छाननीत बाद ठरविला आहे काँग्रेस उमेदवार फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून सही असणारे पंढरपूरचे नगरसेवक नागेश भोसले यांनी आपली सही बनावट असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे.

सुनील टिंगरेंनंतर सुरेश घुलेंचीही नाराजी दूर; उद्यापासून काकडेंच्या प्रचारात उतरणार

पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुनील टिंगरे यांच्यानंतर आता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश घुले यांचीही नाराजी दूर झाली आहे. उमेदवार विक्रम काकडे यांनी घुले यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर घुले यांनी आपण विक्रम काकडेंच्या प्रचारात उद्यापासून सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

कर्जमाफी शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोचेल एवढीच अपेक्षा : आदित्य ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी कोणतीही होर्डिंग व बॅनरबाजी न करता दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली होती. ती शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोचली होती. आता अपेक्षा आहे की ही कर्जमाफी शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोचेल. कोणतीही होर्डिंंगबाजी होणार नाही, कारण आपल्याला खर्च कमी करायचा आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

गुजरातमध्ये महाराष्ट्रातील दोन एसटी बसचा अपघात; सात जणांचा मृत्यू

गुजरातच्या सूरतमध्ये महाराष्ट्रातीन दोन एसटी बसचा अपघात झाला आहे. त्यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पाण्याच्या टॅंकरला वाचवताना या दोन्ही एसटी बसचा बारडोलीच्या उवा गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. अपघाताची तीव्रता पाहता मृताचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नाराज अब्दुल सत्तार घेणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

, विधानपरिषद निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपला सुटल्यानं सत्तार नाराज आहेत. सत्तरांनी उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर सत्तार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्या घरी भेट होण्याची शक्यता आहे

Manchar Farmer Protest कांद्याच्या हमीभावासाठी शेतकरी रस्त्यावर!

कांद्याच्या हमी भावासाठी शेतकरी आक्रमक झालेत. शेतकऱ्यांनी पुणे-नाशिक महामार्गावर मंचरमध्ये रास्तारोको आंदोलन केलं. शेतकऱ्यांनी बैलगाड्यांसह या आंदोलनात सहभाग नोंदवला. कांदा आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदे सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांनी जोरदार निर्दशने करत रस्ता रोखून धरला.

Ashok Kharat news : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी

भोंदू अशोक खरातला आज सिन्नर येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Jalgaon news : वादळी वाऱ्यामुळे आंदोलकांवर कोसळला मंडप

विविध मागण्यांसाठी जळगावमधील जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर अचानक मंडप कोसळला. वादळी वाऱ्यामुळे ही घटना घडली आहे.

Cabinet Meeting : मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीला मंजुरी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज शेतकरी कर्जमाफीला मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच याबाबतच्या अटी-शर्ती जाहीर केल्या जातील. त्यानुसार त्याची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे.

मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीला सुरूवात

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर आज मराठा आरक्षण उपसमितीची बैठक होत आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक होत आहे. आरक्षणासह अन्य काही महत्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

भाजप उमेदवार राजेंद्र राऊतांच्या अर्जावर शिंदेसेनेची हरकत

विधान परिषद निवडणुकीच्या अर्ज छाननी दरम्यान एक मोठी नाट्यमय घडामोड समोर आली आहे. भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारी अर्जावर शिंदे सेनेचे उमेदवार रमेश बारस्कर यांनी चार गंभीर आक्षेप घेतले आहेत. बारस्कर यांनी घेतलेल्या हरकतींमध्ये राजेंद्र राऊत यांच्या नावासमोर श्री लिहिण्यापासून ते त्यांच्या वयातील तफावतीचा समावेश आहे. यासोबतच राऊत हे आमदार असताना त्यांनी शासकीय निवासस्थानाची माहिती लपवल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच त्यांनी दाखल केलेल्या चारही अर्जांमध्ये वेगवेगळी माहिती दिल्याचा दावा बारस्कर यांनी केला आहे. या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली पाहायला मिळत आहे.

विक्रम काकडेंना मोठा दिलासा; उमेदवारी अर्ज वैध ठरला

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काकडे यांना महत्त्वाचा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या उमेदवारी अर्जाबाबत दाखल करण्यात आलेल्या हरकतीवर निवडणूक आयोगाने निर्णय देत अर्ज वैध असल्याचे स्पष्ट केले. शरद पवार गटाने उपस्थित केलेला आक्षेपही फेटाळण्यात आला. सर्व आवश्यक नियम आणि अटींची पूर्तता झाल्याचे नमूद करत निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज मंजूर केला. त्यामुळे आता विक्रम काकडेंच्या निवडणूक लढतीचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.

कांदा शेतकऱ्यांना थेट खात्यात अनुदान द्या; दिलीप वळसे पाटील यांची मागणी

कांदा उत्पादक शेतकरी सध्या कमी दरांमुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केंद्र सरकारकडे महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. कांद्याचा बफर स्टॉक 3 लाख टनांवरून 10 लाख टनांपर्यंत वाढवावा, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच नाफेड किंवा शासकीय संस्थांकडून खरेदी होणाऱ्या कांद्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावेत, जेणेकरून मध्यस्थांकडून होणारी फसवणूक टाळता येईल. कांद्याला चांगला भाव मिळावा यासाठी निर्यात धोरण सुधारून आधुनिक साठवणूक सुविधा उभारण्याचीही त्यांनी मागणी केली.

लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांकडून वसुली नाही; 14 हजार पुरुषांकडून रक्कम परत घेणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. योजनेसाठी अपात्र ठरलेल्या किंवा KYC प्रक्रिया पूर्ण न केलेल्या महिलांकडून यापूर्वी मिळालेली आर्थिक मदत परत घेतली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, चुकीची माहिती देऊन योजनेचा लाभ घेतलेल्या सुमारे 14 हजार पुरुषांकडून मिळालेली रक्कम वसूल करण्यात येणार आहे. तसेच KYC न केलेल्या महिलांना आणखी एक संधी देण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय लवकरच होईल, असेही त्यांनी नमूद केले.

मंचर कांदा आंदोलनात शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

हिरकणी एसटी बसची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील शासकीय रुग्णालय परिसरासमोरील राष्ट्रीय महामार्गावर हिरकणी बस आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. दुचाकीस्वार युवक बसखाली चिरडला जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार सुनील टिंगरे हे खासदार पार्थ पवार यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहे.  

पुणे-नाशिक महामार्गावर रास्तारोको

कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याच्या संतापातून शेतकरी आज मंचर येथे पुणे-नाशिक महामार्गावर रास्तारोको आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात आमदार रोहित पवार सहभागी होणार आहेत.

मला गृहीत धरू नका.., रामदास आठवलेंच महायुतीला इशारा

"दिलेला शब्द पाळणे हा माझा स्वभाव असल्यामुळे, माझ्याकडून महायुतीत कधीही दगाफटका होणार नाही. 'आठवले कुठेही जाणार नाहीत आणि ते दगा करत नाहीत' पण याचा अर्थ आम्हाला कोणीही गृहीत धरावे असा नाही", अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीला इशारा दिला आहे.

भिवंडीतील नरपोली पोलीस ठाण्याची रेकी

काही दिवसांपूर्वी वांद्रे गरीबनगर येथील अनधिकृत मशिदीच्या पाडकामाचा बदला घेण्यासाठी पोलिसांवर हल्ल्याचा कट रचल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या तपासात भिवंडीतील नरपोली पोलीस ठाण्याची रेकी करण्यात आल्याचे उघड झाले आहे. उत्तर प्रदेश एटीएसने अटक केलेल्या दोन आरोपींपैकी एकाने या पोलीस ठाण्याच्या परिसरातील 18 सेकंदांचा व्हिडिओ तयार करून पाकिस्तानस्थित हँडलर्सना पाठवल्याचा आरोप आहे.

कांद्याला हमी भाव देण्याच्या मागणीसाठी मंचरमध्ये आज शेतकऱ्यांचं आंदोलन

कांद्याला हमी भाव देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आज मंचर येथे पुणे-नाशिक महामार्गावर रास्तारोको आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला अनेक विरोधी पक्षातील नेते उपस्थिती लावण्याची शक्यता आहे.

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक

मंत्रालयात आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पाणी परिस्थितीचा आढावा आणि पेट्रोल आणि डिझेलचा साठ्याचा आढावा घेतला जाणार, असल्याची माहिती समोर आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com