Maharashtra Politics Live Update : 'ज्यांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारला, त्यांच्यावर कारवाई केली जाणारच..';मंत्री गिरीश महाजन यांचे संकेत

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : विधानपरिषद निवडणुकीसाठी भरलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे महायुतीतील बंडखोर उमेदवार आपले अर्ज मागे घेणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यासह आज दिनांक 04 जून रोजीच्या दिवसभरातील विविध घडामोडी जाणून घेऊया.
Girish Mahajan
Girish Mahajan Sarkarnama
Published on
Updated on

पक्षानं त्यांना काय कमी केलं, भाजपमध्ये त्यांनी प्रवेश का केला? निलेश लंकेंचा तनपुरेंना सवाल 

प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यावर मी काही त्यांच्याशी बोललेलो नाही. आज ते महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांच्याशी जेव्हा केव्हा माझी चर्चा होईल, तेव्हा मी त्यांना पक्षांतराबाबत विचारणार आहे असं विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी केलं आहे. तुम्हाला पक्षानं नक्की काय कमी केलं? तुम्ही भाजपमध्ये प्रवेश का केला? असं विचारणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.

'ज्यांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारला, त्यांच्यावर कारवाई केली जाणारच..';मंत्री गिरीश महाजन यांचे संकेत 

मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी महायुतीतील बंडखोरीवर कठोर शब्दांत भाष्य केलं आहे. ते म्हणाले, विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्रित चर्चा करून जागावाटप निश्चित करण्यात आले होते.यावेळी तीनही पक्षांच्या प्रमुखांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या भावना आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतले होते. मात्र,तरीदेखील काही ठिकाणी नाराजीमुळे बंडखोरी झाली. ही बाब पक्षशिस्तीच्या विरोधातील आहे. त्यामुळे संबंधित पक्ष आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय घेईल, ज्यांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारला, त्यांच्यावर कारवाई केली जाणारच असे स्पष्ट संकेत महाजन यांनी दिले आहे.

Annamalai news : अण्णामलाई शुक्रवारी साधणार संवाद

तमिळनाडूतील भाजप नेते के. अण्णामलाई हे पक्ष सोडणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर ते शुक्रवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुपारी १२ वाजता संवाद साधणार आहेत.

Anantrao Thopte news : अनंतराव थोपटे यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांच्या अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले. भाजप नेते संग्राम थोपटे यांचे ते वडील आहेत.

उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या देवयानी डोणगावकर यांची हकालपट्टी

छत्रपती संभाजी नगर येथील कृष्णा डोणगावकर व देवयानी डोणगावकर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्या बद्दल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.

गुंड सचिन घायवळला पुणे पोलिसांकडून अटक

पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत कुख्यात गुंड सचिन घायवळ याला अटक केली आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये नाव समोर आलेल्या घायवळच्या अटकेमुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे.

तटकरे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है! रायगडमध्ये कार्यकर्तांचा जल्लोष

अनिकेत तटकरेंचा विधानपरिषदेचा मार्ग मोकळा झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय. सुनील तटकरेंचे होमग्राउंड असलेल्या रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात जोरदार जल्लोष साजरा केला आहे. कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत “सुनील तटकरे आगे बढो” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या आनंदोत्सवात राज्याच्या मंत्री आदिती तटकरेदेखील स्वतः सहभागी झाल्या होत्या.

नाशिकमध्ये महायुतीत लढत, गोकुळ गिते विरुद्ध नरेंद्र दराडे फाईट

नाशिकमध्ये अर्ज माघारीवरून हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला...गणेश गीतेंनी निवडणुकीतून माघार घेतली...मात्र, गोकुळ गितेंनी माघार न घेतल्याने शिंदेसेनेच्या दराडेंना गोकुळ गितेंचं आव्हान आहे...नाशिकमध्ये भाजपच्या गोकुळ गितेंचं बंड कायम आहे...यामुळे आता नाशिकमध्ये महायुतीतच लढत होणार आहे.

गोंदियात काँग्रेसवर मोठी नामुष्की; अधिकृत उमेदवाराच्या माघारीने खळबळ

भंडारा-गोंदिया विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार दिलीप बनसोड यांच्यासह प्रफुल अग्रवाल यांनी माघार घेतली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे भंडारा जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे ईश्वरकर आणि महायुती भाजपचे अविनाश ब्राम्हणकर यांच्यात थेट लढत होणार आहे.

आदित्य ठाकरेंची साडेचार वाजता पत्रकार परिषद; बाळा मानेंच्या माघारीवर बोलणार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे हे आज दुपारी साडेचार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. पक्षाचे कोकण विधान परिषदेचे उमेदवार बाळा माने यांनी माघार घेतली असून त्यावर ठाकरे बोलण्याची शक्यता आहे.

नाशिकमधून भाजपचे गणेश गीतेंची निवडणुकीतून माघार, गोकुळ गीते लढण्यावर ठाम

नाशिक विधान परिषदेच्या निवडणकुत भाजपचे गणेश गीते यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी निवडणूक लढविण्यार ठाम आहेत, त्यामुळे नाशिकमध्ये निवडणूक होणार हे आता स्पष्ट झाले आहे. ही जागा महायुतीत शिवसेनेकडे गेलेली आहे

सोलापूरमधून दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार

सोलापूर विधान परिषदेच्या निवडडणुकीतून शिवसेनेचे महेश साठे, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा कुर्डूवाडीचे माजी नगराध्यक्ष धनंजय डिकोळे यांनी माघार घेतली आहे.

पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे अखेर बिनविरोध

पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनीही माघार घेतली आहे, त्यामुळे विक्रम काकडे यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पक्षाने आदेश दिल्याने माघार घेत असल्याच श्रीकांत पाटील यांचं म्हणणं आहे. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांना भेटल्यानंतर झालेली महत्वाची घडामोड आहे.

पुण्यातून भाजपच्या प्रदीप कंदांचीही माघार

पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीतून भाजपचे अपक्ष उमेदवार प्रदीप कंद यांनी माघार घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार राहुल कुल यांना सांगितलं की, महायुतीचा धर्म पाळला पाहिजं. आता आम्ही आमच्या नेत्यांचे ऐकलं आहे आणि अर्ज मागे घेतला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचासुद्धा मला फोन आला होता. महायुतीच्या नेत्यांचा आदेश पाळून निर्णय झाला आहे आणि अर्ज मागे घेतला आहे, असे प्रदीप कंद यांनी माघारीनंतर सांगितले.

‘सांगली-सातारा’मधून शिवसेनेचे तानाजी पाटील, राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील यांची माघार

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे अपक्ष तानाजी पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब पाटील यांनी माघार घेतली आहे त्यामुळे या ठिकाणी भाजपचे धैर्यशील कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अभय जगताप यांच्यात दुरंगी लढणार होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

परभणीत महायुतीचा तणाव संपला; बंडखोर उमेदवारांनी घेतली माघार

परभणी विधानपरिषद निवडणुकीआधी महायुतीसाठी दिलासादायक घडामोड घडली आहे. पक्षातील नाराजी आणि बंडखोरीचा प्रश्न अखेर मिटला असून काही नाराज नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यासाठी झालेल्या चर्चांना यश मिळाल्याने महायुतीतील मतभेद कमी झाले आहेत. परिणामी, निवडणुकीत महायुतीची भूमिका अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसत आहे.

कोकण विधानपरिषदेत मोठा ट्विस्ट! बाळ माने माघारी, तटकरेंची वाट मोकळी 

कोकण विधानपरिषद निवडणुकीत अनपेक्षित घडामोड घडली आहे. ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी उमेदवारी मागे घेतली. आवश्यक संख्याबळ आणि सूचकांची पूर्तता न झाल्याने तसेच कोणताही घोडेबाजार होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग अधिक सोपा झाला आहे.

विधानपरिषद निवडणुकीत मोठा सस्पेन्स! काँग्रेसचे करण ससाणे संपर्काबाहेर

विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपकडून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरू असताना काँग्रेसचे अपक्ष उमेदवार करण ससाणे सकाळपासून संपर्कात नसल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीत मतभेद उघड झाल्याने या निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला असून राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

गोकुळ संस्था अपात्र प्रकरणी आमदार सतेज पाटील उच्च न्यायालयात

गोकुळ मधील 427 संस्था अपात्र प्रकरणी आमदार सतेज पाटील उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 427 संस्था पूर्वकल्पना न देता अपात्र केल्याने कोल्हापूर सर्किट बेंच येथे याचिका दाखल होती. त्यावर आता सोमवारी 8 जून रोजी होणार सुनावणी होणार आहे. त्यामुळे गोकुळ दूध संघाची निवडणूक पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रवींद्र फाटक बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा

ठाणे विधान परिषदेचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. विरोधकांनी अर्ज मागे घेतल्याने त्यांनी निवड केवळ औपचारिकता राहिली आहे.

निवडणूक निरीक्षक म्हणून अश्विन अशोक मुदगल यांची नियुक्ती

महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाकरिता अश्विन अशोक मुदगल यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक शाखेकडून कळविण्यात आली आहे. मुदगल यांच्या निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, क्वीन्स गार्डन, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-१०४ असा असून त्यांचा संपर्क क्रमांक ९२२६३६३००२ आहे. नागरिकांना त्यांना सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत भेटता येईल. संपर्क अधिकारी सागर कोतकर (सं.क्र.९९२१७१५१५१) असा आहे. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने काही तक्रारी असल्यास त्या अनुषंगाने संपर्क साधण्याचे आवाहन मतदान निरीक्षक यांनी केले आहे.

पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट; 'एक दिवसाआड' पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव!

यंदा मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यामुळे पुणे शहरावर पाणी कपातीचे मोठे संकट ओढवले आहे. धरणामधील उपलब्ध पाणीसाठा ३१ ऑगस्टपर्यंत पुरविण्याच्या दृष्टीने पुणे महानगरपालिका आता खडबडून जागी झाली असून, पुढील आठवड्यापासून शहरात 'एक दिवसाआड' पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या संदर्भात महापालिका आयुक्तांकडे निवेदन सादर करण्यात आले असून, सर्व कार्यकारी अभियंत्यांना आपापल्या भागाचे मायक्रो-प्लॅनिंग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अन्न व औषध विभागाचे पुणे विभागात छापे

अन्न व औषध विभागाने पुणे विभागात 9 ठिकाणी केलेल्या छापेमारीतून 31 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसंच प्रतिबंधित अन्नपदार्थ साठा जप्त करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवलीतील ४ नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

डोंबिवलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत भाजपच्या चार माजी नगरसेवकांसह विविध पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.

खोणी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचासह ठाकरे गट आणि मनसेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

खोणी ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचासह ठाकरे गट आणि मनसेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केल्याने कल्याण ग्रामीण मधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आगामी निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने गावातील मोठे मासे गळाला लावून आपली राजकीय ताकद वाढविण्याची चाल खेळली असल्याचे मानले जात आहे. या घडामोडींचा फटका केवळ ठाकरे गट, मनसेला नाही तर महायुतीतील सहयोगी पक्ष असलेल्या शिंदे शिवसेनेला देखील बसू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. शिंदे सेनेतील धाकधुक यामुळे वाढली असून स्थानिक पातळीवर आपले वर्चस्व कायम राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर निर्माण झाले आहे.

पिंपरी पालिका आज विषारी दारु अड्ड्यांसह दारुची विक्री करणाऱ्याचं घर पाडणार

पिंपरी चिंचवड शहरात ज्याने विषारी दारुची विक्री केली त्या आरोपीसह यदारु अड्ड्यावर आज हातोडा पडणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आज अकरा वाजता विरकाचे घर आणि दारु अड्डा जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया सुरु करणार आहे.

चंद्रपुरात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

चंद्रपूर शहरात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई केली. यामध्ये शहरातील जटपुरा गेट परिसरात एका स्टोअरवर कारवाई करत नियमांचे उल्लंघन करणारा 45 हजार 970 रुपये किमतीचा औषधसाठा जप्त केला आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

विधानपरिषद निवडणुकीसाठी भरलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे महायुतीतील बंडखोर उमेदवार आपले अर्ज मागे घेणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com