Maharashtra News Live Update : राज्य परिवहन महामंडळाचा एसटी प्रवाशांना दणका, 13.56 टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावास मंजुरी

Marathi Breaking Live Headlines Updates: राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Sarkarnama Maharashtra Politics Live Update
Sarkarnama Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

राज्य परिवहन महामंडळाचा एसटी प्रवाशांना दणका, 13.56 टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावास मंजुरी

राज्य परिवहन महामंडळानं 13.56 टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. या एसटी भाडेवाढीमुळे याआधी करण्यात आलेली हंगामी 10 भाडेवाढ रद्द होणार आहे. मात्र, एसटी प्रवाशांना भाडेवाढीचा दणका देताना महामंडळानं युद्धजन्य परिस्थितीमुळे वाढलेले डिझेलचे दर, कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमधील वाढ यांसह विविध कारणं दिली आहे.

बारामतीच्या लेकीची अभिमानास्पद कामगिरी, नीट परीक्षेत मुलींमध्ये ऑल इंडिया रँक-1 पटकावला 

बारामतीच्या श्रावणी कृष्णा कुदळे हिने नीट परीक्षा 2026 मध्ये 720 पैकी तब्बल 710 गुण मिळवत ऑल इंडिया रँक (एआयआर) 5 क्रमांक मिळवला आहे. तसेच देशभरात सर्व मुलींमध्ये प्रथम क्रमांक आणि महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. श्रावणीचे आई-वडील हे पुणे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक पदावर कार्यरत आहे.

पुण्यातील काळेपडळ येथे 18 वर्षीय तरुणीची राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या

पुण्यातील काळेपडळ येथे एका 18 वर्षीय विद्यार्थिनीनं राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक तपासात संबंधित तरुणीला नीट (NEET) परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे तिनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. शुक्रवारी(ता.17) सकाळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. अनुष्का चौगुले असं आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. अनुष्काच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

सियाने नाही म्हणून सांगितलं असतं तर आम्ही लग्न मोडलं असतं : विशाल अग्रवाल

आमचे सख्खे चुलत मामा नरेंद्र जगनाथ मित्तल आणि रेणू मित्तल यांनी माझ्या मुलाचे केतन अग्रवालचे लग्न सियासोबत ठरवलं होतं. सिया कशी आहे, हे माहिती असूनही त्यांनी हे लग्न ठरवलं. त्यामुळे तेही या घटनेला जबाबदार आहेत. तसेच सियाने लग्नाला एकदा नाही म्हणून सांगितलं असतं तर आम्ही लग्न मोडलं असतं, असे केतन अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांनी सांगितले.

वांगचूक यांना पाठिंबा वाढला; उद्या अमित ठाकरे भेटीसाठी जाणार

नीट पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज २० दिवस आहे. पण केंद्र सरकारकडून अजूनही कोणीही चर्चेसाठी आलेले नाही. विरोधी पक्षांकडून मात्र त्यांना पाठिंबा वाढत आहे. त्यात काँग्रेसचे पवन खेडा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज वांगचूक यांची भेट घेतली. उद्या अमित राज ठाकरे हे दिल्लीत जाऊन वांगचूक यांना भेटणार आहेत.

संत गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

शेगावचे संत गजानन महाराज यांच्या पालखीने आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. पालखीचे जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी स्वागत केले. गजानन महाराजांची पालखीचा आज उळे (ता. दक्षिण सोलापूर) येथे मुक्काम असणार आहे, ती शनिवारी सोलापूर शहरात येणार आहे.

उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या रामदास कदमांना किशोरी पेडणेकरांचे प्रत्युत्तर : रामरक्षा काय रामदास कदमच्या बापाने लिहिली आहे का?

उद्धव ठाकरेंनी रामरक्षा म्हणावी, हा खूप मोठा विनोद आहे. जे उद्धव ठाकरे काँग्रेस, सोनिया गांधींसोबत गेले, तसेच ज्या राहुल गांधींना आदित्य ठाकरे रस्त्यात मिठ्या मारत आहेत, त्यांनी आता हिंदुत्वाचं बोलावं, हे हास्यास्पद आहे, अशी टीका माजी मंत्री रामदास कदम यांनी केली होती. त्याला मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेक यांनी जोरदार प्रत्युतर दिले आहे. रामरक्षा काय रामदास कदमच्या बापाने लिहिली आहे का? हे बोलायला कोणी अधिकार दिला आहे. अगोदर तुला बोलता येते का बघं. तुम्हाला केंद्रापासून राज्यापर्यंत अभय आहे, म्हणून काहीही बोलता का, असा सवाल पेडणेकर यांनी केला.

विश्वास नांगरे पाटलांचा नागपूरच्या वाहतूक पोलिसांसाठी मोठा निर्णय

नागपूरचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी वाहतूक पोलिसांना सर्व्हिस पिस्तूल जवळ बाळगणं बंधनकारक केले आहे. पोलिसांवरील वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आत्मसंरक्षण आणि गुन्हेगारांवर कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी नांगरे पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे. ड्रंक आणि ड्राईव्ह मोहिम, नाकाबंदी तसेच वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी पार पाडत असताना संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सोबत सर्व्हिस पिस्तूल जवळ ठेवणे आवश्यक आहे, असेही नांगरे पाटील यांनी निर्देशात म्हटले आहे.

लेबर पार्टीचे नेते अँडी बर्नहम बनले युकेचे नवे पंतप्रधान; सोमवारी होणार घोषणा

लेबर पार्टीचे नेते अँडी बर्नहम यांची शुक्रवारी युकेचे ५९वे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. सोमवारी त्यांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. लेबर्स नॅशनल एक्झिक्युटीव्ह कमिटी च्या (NEC) अध्यक्षा शबाना महमूद यांनी याची घोषणा केली.

भावली पर्यटक मारहाण प्रकरण; आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी

- इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरातील पर्यटक मारहाण प्रकरण

- मारहाण प्रकरणातील तीन मुख्य आरोपींना आज न्यायालयात केले हजर

- आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी मागितली सात दिवसांची पोलिस कोठडी

- मात्र न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सुनावली तीन दिवसांची पोलिस कोठडी

आरोपीलाच बसवले परिवहनच्या खुर्चीवर, कोल्हापूर महापालिकेचा निर्णय चर्चेत

केएमटीचे वार्षिक बजेट सुमारे ३० कोटींचे आहे. दररोज लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार होत असतो. अशा परिस्थितीत कोल्हापूर महापालिकेने घेतलेला एक निर्णय सध्या कोल्हापुरात चर्चेचा विषय बनत आहे. घरफाळा घोटाळ्यातील संशयित आरोपी संजय शिवाजीराव भोसले यांच्याकडेचं महापालिकेच्या परिवहन व्यवस्थापकाचे कारभार सोपावला आहे. आधीच घोटाळ्याचा आरोप असल्याने त्याकडे कोट्यावधीचा व्यवहार सोपावण्याचा निर्णय कोणाच्या सांगण्यावरून घेतला. असा सवाल उपस्थित होतं असून वरिष्ठ अधिकाऱ्यांवर शंका उपस्थित होतं आहे.

वेळेत खुलासा नाही, महावितरणचा जनसंपर्क अधिकाऱ्याच तडकाफडकी निलंबन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरणविरोधात व्हिडिओच्या माध्यमातून प्रसारित झालेल्या एका वृत्ताबाबत वेळेत अधिकृत खुलासा देण्यास विलंब केल्याने महावितरण प्रशासनाने अधिकाऱ्याबाबत महत्वाचे पाऊल उचलले आहे. महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलाचे जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले यांना निलंबित करण्यात आले असून, याबाबतचे आदेश मुंबई येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयातून जारी करण्यात आले.

वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून झेडपी शिक्षकानं दोन मुलांसह नदीपात्रात उडी घेत जीवन संपवलं

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका जिल्हा परिषद शिक्षकानं आपल्या दोन मुलांसह आमदुरा येथील पुलावरुन थेट नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुनील मोरे असं मृत शिक्षकाचं नाव आहे. टोकाचं पाऊल उचलण्याआधी त्यांनी वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं स्टेटस व्हाट्सअप वर ठेवलं होतं.

संभाजीनगरात धावत्या बसला आग

संभाजीनगरात धावत्या बसला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. बसला आग लागताच प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

पार्थ पवार मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात

सुनील तटकरे यांनी पार्थ पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ शकतात, असं वक्तव्य केलं आहे. या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, ते संसदेतील खासदार आहेत. ते देवेंद्र फडणवीस यांना भेटू शकतात. त्यामध्ये वावगं वाटण्याचं कारण नाही.  ते प्रशासकीय कामासोबत संघटनेच्या कामाची चर्चा करत असले  तरी वेगळं वाटण्याचं कारण नाही, असेही सुनील तटकरे यांनी म्हटले.

Congress Support to Sonam Wangchuk वांगचुकांच्या आंदोलनाला कॉंग्रेसचा पाठिंबा

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे आंदोलनाला राजकीय रंग चढण्याची चर्चा सुरू झाली आहे.

Chandrapur Accident : धावत्या बसवर झाड कोसळले; चंद्रपूर येथील घटना, बसमधील 40 प्रवासी थोडक्यात बचावले

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात तेलंगणा राज्य परिवहन प्रवासी बसवर अचानक एक मोठे झाड कोसळले. झाडाच्या मोठ्या फांद्यांनी सुमारे 40 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसची समोरची काच फोडली. सुदैवाने चालक मल्लेश यादवने वेळीच ब्रेक लावल्यामुळे सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. अपघातानंतर चंद्रपूर-तेलंगणा महामार्ग दीर्घकाळ बंद होता. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. जेसीबी, क्रेन आणि कटरच्या मदतीने भलेमोठे झाड युद्धपातळीवर तोडण्याचे काम सुरू करण्यात आले.

Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीसाठी 15 लाख बुंदी लाडू प्रसाद तयार

आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिर समितीच्यावतीने अल्प दरात लाडू प्रसाद दिला जातो. यावर्षीच्या सोहळ्यासाठी मंदिर समितीकडून सुमारे 15 लाख बुंदी लाडू प्रसाद तयार करण्यात आला आहे. तसेच एकादशीच्या दिवशी राजगिरा लाडू उपलब्ध करून दिला जातो. तोही जवळपास तीन लाख लाडू उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. बुंदी लाडू प्रसादामध्ये यावर्षी सुख्या मेव्याचा वापर करण्यात आला आहे. तसेच स्वच्छतेचे व अन्न व औषध प्रशासनाचे सर्व नियम पाळून हा बुंदी लाडू मंदिर समितीच्या लाडू प्रसाद केंद्रांमध्ये तयार केला जातो. यासाठी जवळपास 100 हून अधिक स्वयंसेवक काम करत आहेत.

Vishwas Nangre Patil : पोलिस अधिकारी अन् कर्मचाऱ्यांना 'सर्व्हिस गन' बाळगणे बंधनकारक; नागपूरचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरेंचा आदेश

नागपूर शहरात पोलिसांवर होणारे वाढते हल्ले आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता, नागपूरचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी एक अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. नागपूर शहरातील वाहतूक पोलिसांसह सर्व पात्र पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता कर्तव्यावर असताना 'सर्व्हिस गन' म्हणजेच पिस्तूल बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भातील अधिकृत आदेश गुरुवारी संपूर्ण पोलिस दलाला देण्यात आले आहेत.

Stock Market Updates : भारतीय शेअर बाजाराचे दोन्ही मुख्य निर्देशांक सेंसेक्स अन् निफ्टी शानदार वाढीसह उघडले

शेअर बाजारात आज चौफेर खरेदी पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारपेठेतून मिळत असलेल्या चांगल्या संकेतांच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराचे दोन्ही मुख्य निर्देशांक सेंसेक्स आणि निफ्टी-50 शानदार वाढीसह उघडले. व्यवहार सुरू होताच नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी पुन्हा एकदा 24,100 च्या पार गेला असून, यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. बाजाराच्या या सुरुवातीच्या तेजीला प्रामुख्यानं आयटी (IT) आणि फायनान्शियल क्षेत्रातील शेअर्सकडून मजबूत पाठबळ मिळत आहे.

FDA Action Parsi Dairy Farm Mumbai : मुंबईतील मरीन लाइन्स परिसरातील शतकभर जुनी अन् प्रसिद्ध पारशी डेअरी फार्मवर एफडीएची कारवाई

मुंबईतील मरीन लाइन्स परिसरातील शतकभर जुने आणि प्रसिद्ध पारशी डेअरी फार्मवर एफडीएने कारवाई करत संस्थेचा परवाना निलंबित केला आहे. बुधवारी करण्यात आलेल्या तपासणीत स्वच्छतेसंदर्भातील नियमांचे उल्लंघन आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे. 1916 मध्ये स्थापन झालेले पारशी डेअरी फार्म हे मुंबईतील ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित खाद्य आस्थापनांपैकी एक मानले जाते. मात्र, तपासणीत आढळलेल्या कथित स्वच्छतेच्या त्रुटींमुळे FDA ने ही कारवाई केली.

Aamir Khan On Sonam Wangchuk : "फुंसुक वांगडू आणि सोनम वांगचुक यांचा काही संबंध नाही"; अभिनेता आमिर खान यांची प्रतिक्रिया

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषण आंदोलनाचा आज 20 वा दिवस आहे. त्यांची प्रकृती ढासळत आहे. त्यांना देशभरातून पाठिंबा वाढत आहे. यातच '3 इडियट्स' सिनेमात आमिर खाननं साकारलेलं 'रँचो' हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारित असल्याचं बोललं जातं. आता सुपरस्टार आमिर खाननंही या विषयावर भाष्य केले आहे. आमिर खान म्हणाला की, "नाही. ते खरं नाही. उलट, हा एक गैरसमज आहे. आम्ही जेव्हा हा सिनेमा बनवत होतो, तेव्हा मला सोनम वांगचुक यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. मी नुकताच अभिनेता ओमी वैद्य याचा एक व्हिडिओ पाहिला, ज्यात त्यानं तसं म्हटलं. पण ते तसं नाही. त्याचा गैरसमज झाला आहे. चतुरला कदाचित तसं वाटलं असेल, पण मला हे स्पष्ट करायचंय की, राजकुमार हिरानी, अभिजात जोशी किंवा मी, आमच्यापैकी कोणालाही त्या वेळी सोनम वांगचुक यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती."

कुणाला सोबत घेण्याबाबतचा प्रस्तावच आमच्यासमोर नाही - चंद्रकांत पाटील

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील एकाचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेतली. तिघांनी एकत्र भेट घेतल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे एनडीए सोबत चर्चा समोर येत आहे. अशा परिस्थितीत या तिघांनी घेतलेली एकत्र भेटी मागे जयंत पाटील यांचा भाजप की ने काही घडामोडी घडत आहेत की काय अशी शंका निर्माण झाली आहे. त्यावर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण देत याची हवाच काढून टाकली आहे. तिघे एकत्र जाण्यामागे वेगळे काही कारण असेल असे वाटत नाही. त्यांचे काहीतरी सामायिक काम असेल. अन्यथा, कुणाला सोबत घेण्याबाबतचा प्रस्तावच आमच्यासमोर नाही, असे स्पष्टीकरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना दिले.

राज्य सरकारचा लाडक्या बहिणींना आणखी एक मोठा धक्का

राज्य सरकारने महिलांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. सरकारने आता तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२३ मध्ये ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेली एक मोठी योजना बंद केली आहे. शिंदे यांच्या सरकारने अंत्योदय शिधापत्रिकाधारक (रेशनकार्ड) कुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत देण्याची 'कॅप्टिव्ह मार्केट योजना' सुरू केली होती. मात्र ही योजना आर्थिक भार सोसत नसल्यामुळे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय वस्त्रोद्योग विभागाने जारी केला आहे.

शरद पवार यांच्या माजी आमदाराकडून महावितरणची कोंडी

महावितरण कंपनीकडून स्मार्ट मीटर बसविण्याचा आग्रह धरला जातो. ग्राहकांचा विरोध असतानाही मीटर बसविण्याच्या तक्रारी आहेत. या प्रश्नावर सटाण्यात वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे सटाणा येथे स्मार्ट मीटर विरोध होत आहे. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महावितरण विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यात मोठ्या संख्येने वीज ग्राहक आणि पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले.

नाशिक महापालिकेची आजची सभा वादळी ठरणार

नाशिक महापालिकेत स्टार रेट नावाखाली कंत्राटदारांवर 200 कोटी उधळण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावाची आज महासभेत कसोटी लागणार आहे. या प्रस्तावविरोधात बाजप आक्रमक आहे. इराक-अमेरिका युद्धामुळे डांबरीकरणाच्या दरात वाढ झाली. त्यामुळे कंत्राटदाऱ्यांना स्टार रेट म्हणून निधी अदा करणे हा विषय आहे.

पार्थ पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

पार्थ पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे वृत्त साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे मुख्यमंत्र्यांसोबत तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या झालेल्या भेटीबद्दल सुमित्रा पवार यांना कळवले नव्हते त्यामुळे पक्षात नाराजी असल्याचं दिसून आलं होतं या प्रकरणावरून स्वतः सुमित्रा पवार देखील नाराज होत्या. त्यामुळे महायुतीमध्ये ही नाराजी योग्य नसल्याचे मत पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सांगितल्याचे वृत्तात म्हटले आहे.

लोणावळा ग्रामीण भागात लागू कलम 163 रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील पर्यटनस्थळांसाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत लागू करण्यात आलेला आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी रद्द केला आहे.

लोणावळा ग्रामीण परिसरातील एकवीरा देवी मंदिर, कार्ला व भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड, विसापूर, तिकोणा व तुंग किल्ले, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट, पवना धरण आदी पर्यटनस्थळी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी व संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी ६ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत कलम १६३ लागू करण्यात आले होते.

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठींबा

वांगचुक यांच्या आंदोलनाबाबत काँग्रेस अखेर आपली भूमिका स्पष्ट करत त्यांना थेट पाठींबा दिला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केल आहे.

उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जाणार, सोनम वांगचुक यांचा आंदोलनात उपस्थित राहणार

उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.20 जुलैला ते दौऱ्यावर जाणार आहेत. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सुषमा अंधारेंनी यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com