

पुणे, पिंपरी चिंचवड पालिका, जिल्हा परिषद, पीडीसी बॅंक येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे, असे सांगताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीतील उमेदवारांबाबत भाष्य करणे टाळले आहे.
कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात कोसळल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. अहिल्यानगर येथील राहुल बहिरट यांनी गुजराती भाषेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. बहीरट यांनी अनेकदा मराठी भाषेत पत्र लिहिलेले आहे. पण त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना मराठी येत नसावं, असे समजून आता गुजराती भाषेत पत्र लिहिले आहे. कांद्या ३० रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी पत्रात केली असून दखल न घेतल्यास आम्ही आमचा ७/१२ पंतप्रधानांच्या नावे करू, असेही बहीरट यांनी म्हटले आहे.
प्रसाद लाड यांनी अगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा. कारण भाजपला निवडून द्यायचं काम ओबीसी आणि भटक्य जमातींनी केले आहे. तू जातीसाठी माती खा नाही तर शेण खा. पण तू ओबीसींच्या अन्नात माती कालवण्याचं काम करू नको. प्रसाद लाड आहे कोण. तो कार्पेरेट क्षेत्रातील पैसे कमवणारा एजंट आहे, असा हल्ला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आमदार प्रसाद लाड यांच्यावर केला.
सोशल मीडियातील कमेंटवरून पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावात दोन गटांत फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. कमेंटवरून गावातील दोन गट आमने सामने आले होते, त्या वादाचं रुपांतर हाणामारीत झाले आहे. यातील जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उदय सामंत येतात. तुमचेही मंत्री येतात, पण दिसत नाहीत. जे आहे, ते सांगतोय. मी काही बढाया मारत नाही. अजितदादांचे मंत्री येतात, ते बिचारे प्रामाणिकपणे काम करतात. सामंत, शंभूराज देसाई येतात. एकनाथ शिंदे हे प्रोटोकॉल सोडून येतात, तुम्हीही प्रोटोकॉल सोडा ना, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांना केले.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव शहरात डिझेल भरण्यावरून दोन गटात जोरदार राडा झाला आहे. शहरातील श्री गजानन पेट्रोल पंपावर दोन गटात हाणामारी झाली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समिती व प्राणी क्लेश प्रतिबंधक जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी घेतली. सण उत्साहात साजरा करताना कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होणार नाही, याची सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. प्राण्यांच्या वाहतुकीदरम्यान तसेच कत्तलीच्या प्रक्रियेदरम्यान प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन होणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष दक्षता घ्यावी. विनापरवाना जनावरांची वाहतूक, सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत कत्तल तसेच अस्वच्छता होणार नाही यासाठी संबंधित विभागांनी संयुक्तपणे कार्यवाही करावी. बकरी ईदच्या निमित्ताने काही तालुक्यांमध्ये तात्पुरत्या कत्तलखान्यांची मागणी होऊ शकते. त्या अनुषंगाने आवश्यक परवानग्या, स्वच्छता आणि नियमांचे पालन याकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत नाट्यमय आणि छुप्या घडामोडींना वेग आला आहे. मनपा आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये भाजपचा त्यांच्याच सत्तेतील 'मित्राकडून' घात झाला होता, हे निकालाअंती स्पष्ट झाले होते. आता नेमकी तीच भीती भाजपच्या गोटात पुन्हा निर्माण झाली आहे. आमदार रवी राणा यांनी बंधू सुनील राणा यांच्या विजयासाठी थेट महाविकास आघाडीच्या गोटात गुप्त 'फिल्डिंग' लावल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राणा यांनी चक्क काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी सलगी वाढविली आहे.
देशांतर्गत कमोडिटी बाजारात आज संमिश्र वातावरण होते. एका बाजूला सोन्याच्या दरात पुन्हा मोठी उसळी दिसून आली, तर दुसऱ्या बाजूला चांदीच्या किमतीत घसरण नोंदवली गेली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर जून डिलिव्हरीचे सोने वाढीसह सुमारे 1 लाख 59 हजार 674 रुपये प्रति 10 ग्रॅम या स्तरावर व्यवहार करत होते. दुसरीकडे, चांदीच्या दरात आज नफावसुलीचा परिणाम दिसून आला. चांदीचे दर जवळपास 1800 रुपये प्रति किलोने घसरून 2 लाख 75 हजार 824 रुपये प्रति किलो या स्तरावर पोहोचली.
कॉकरोच जनता पार्टीवर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सूचक विधान केलं आहे. “फॉलोअर्स वाढायलाही वेळ लागत नाही अन् कमी व्हायलाही वेळ लागत नाही. शेवटी आउटपुट काय आहे, ते महत्त्वाचं आहे,” असं वळसे पाटील म्हणाले. या विषयात मला फारसं बोलायचं नाही. पण हे सगळं क्षणिक असून त्याला फार महत्त्व नाही,” अशी टिप्पणीही त्यांनी केली.
रयत शिक्षण संस्थेच्या निवडणुका अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आणि बिनविरोध पार पडल्या आहेत. संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलने पुढील 3 वर्षांसाठी नवीन कार्यकारी मंडळाची स्थापना केली आहे. कर्मवीर अण्णा, यशवंतराव चव्हाण, वसंतराव दादा पाटील आणि 1990 पासून पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या संस्थेने साडेचार लाख विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवली आहे, हाच वारसा पुढे नेणार असल्याचा विश्वास दिलीप वळसे पाटलांनी व्यक्त केला.
नांदेडच्या बिलोली इथल्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना जेवण मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कंत्राटदाराच्या अडमुठ्या धोरणामुळे रुग्णालयातील रुग्ण मागील आठ दिवसापासून उपाशी आहेत. या रुग्णालयात सध्या जवळपास 50 ते 60 रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. परंतु या रुग्णांना सकाळचा नाश्ता चहा आणि दुपारचे आणि रात्रीचे जेवण मागील आठ दिवसापासून मिळाले नसल्याची प्रतिक्रिया रुग्णांच्या नातेवाईकांनी आणि रुग्णांनी दिली आहे. या सोबतच रुग्णालयात डॉक्टर्स कर्मचारी देखील गैरहजर राहत असल्याचा देखील धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
भीमाशंकर विकास आराखडा बैठकीत आंबेगावचा उल्लेख जोडण्यास खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी संमती दिल्याचा आरोप करत दिलीप मोहिते-पाटील आक्रमक झाले आहेत. “भीमाशंकर खेडचेच असून आंबेगावचं नाव जोडू देणार नाही,” असा इशारा देत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. “आईचं दूध प्यायले असाल तर…” अशी भाषा ही राजकारणाची नसून गुंडगिरीची भाषा असल्याचा पलटवार माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केला आहे.
विधान परिषद कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील जागा ही अजित पवार राष्ट्रवादीची असल्याचा दावा आमदार शेखर निकम यांनी केला. ही जागा पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. ही जागा आमची सिटिंग आहे. अनिकेत तटकरे तिथे आमदार होते. ही तिन्ही जिल्ह्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळावी, अशी आमची महायुतीकडे मागणी आहे, असेही शेखर निकम यांनी म्हटलं आहे.
राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणतीही घाबराट बाळगू नये, असे मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. अफवांमुळे लोक मोठ्या प्रमाणात इंधन साठवू लागल्यास कृत्रिम टंचाई निर्माण होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला. केंद्र आणि राज्य सरकार नागरिकांना नियमित इंधन पुरवठा करण्यास सक्षम असल्याचे सांगत त्यांनी संयम राखण्याचे आणि चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.
बोर्डाच्या कॉपीमुक्त परीक्षेच्या दाव्यांवर सिंधुदुर्गातील एका घटनेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. भुईबावडा परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षेत एका विद्यार्थ्याच्या पुरवण्या दुसऱ्याकडून लिहून घेतल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नऊपैकी सात पुरवण्या वेगळ्या हस्ताक्षरात असल्याचं तपासात आढळलं. या प्रकरणी बोर्डाने संबंधित शिक्षकांची तब्बल सात तास चौकशी केली. मुख्याध्यापकांच्या मुलाचं नाव चर्चेत असून त्याचा निकाल सध्या रोखून ठेवण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात इंधनटंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
पुण्यातील फुरसुंगी-उरूळी येथील कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा पेटला आहे स्थानिकांनी कचऱ्याच्या गाड्या अडवून आंदोलन सुरू केले आहे . जोपर्यंत ओपन डंपिंग बंद होत नाही तो पर्यंत कचऱ्याच्या गाड्या जाऊन देणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या चार महिलांचा वाघिणीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. याविषयी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, हा झालेला मृत्यू ही निव्वळ दुर्घटना नाही, तर तो प्रशासकीय अनास्थेने केलेला घात आहे! हे सरकार नक्की झोपलंय कुठे? ग्रामीण भागातील गरीब, कष्टकरी जनता पोटाची खळगी भरण्यासाठी जंगलात जाते. त्यांना सुरक्षा देणे हे वन विभागाचे आणि सरकारचे कर्तव्य नाही का? वाघ-मानव संघर्ष काही आज नवीन नाही. रोज कुठे ना कुठे हल्ले होत आहेत, निष्पाप गरिबांचे बळी जात आहेत, पण सरकार आणि वन विभाग अजूनही कुंभकर्णासारखे झोपेत आहे
निवडणूक आयोगाने 10 राज्यांतील 26 राज्यसभा जागांसाठी निवडणूक वेळापत्रक जाहीर केले आहे. 18 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणीही होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंह बिट्टू यांचासह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जागेचा समावेश या निवडणुकीत आहे.
सांगली पोलिसांकडून अमली पदार्थांची तस्कर करणाऱ्याचा थरारक पाठलाग करत बेड्या ठोकण्यात आल्या. या तस्कराकडून पोलिसांच्या पथकाच्या तावडीत सापडल्यानंतर वाहनासह गांजा पेट्रोल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. तर पाठलाग करताना एक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाला. पोलिसांनी अत्यंत शीताफिने आरोपीला अटक केली.विकी विजय कांबळे (वय ३२, रा. भीमनगर, पिंपळी रस्ता, जाळोची, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांच्याशी चर्चा करताना म्हटले की, मराठा-कुणबी एक असल्याचा जीआर होता. ८३ क्रमांकाला मराठा कुणबी एक असताना तो जीआर 2004 ला रद्द केला. तो का रद्द केला असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे ही प्रक्रिया अडकेल का? अशी शक्यता निर्माण झाली आहे.निवडणूक आयोगाकडून परवानगी घेऊन 30 जून पर्यंत कर्जमाफी होईल.कारण नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य हे कर्जमाफी मध्ये येत नाहीत. दोन लाखापेक्षा जास्त थकबाकी असेल तर वरची रक्कम भरल्यानंतर दोन लाखाचे कर्ज माफ होईल, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हणत दोन वर्षे नियमित कर्ज परतफेड केली त्याला पन्नास हजार रुपये अनुदान या दोन गोष्टी सध्या असल्याचे सांगितले.
भाजप आमदार प्रसाद लाड हे मनोज जरांगे पाटील यांना भेटले आहेत. दोघांमध्ये चर्चा सुरू आहे. प्रसाद लाड म्हणाले की, दादांच्या सात आठ मागण्या मी समजून घेणार आहे. मागण्या मान्य का होऊ शकल्या नाहीत हे समजून घेणार आहे.
इंधनटंचाईचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. शेतीच्या कामासाठी इंधनाची आवश्यकता असणाऱ्या शेतकरी पेट्रोलपंपावरून डिझेल घेऊन जात असतात. मात्र, परभणीत 7/12 दाखवला तरच इंधन मिळणार असल्याचे पेट्रोल पंप चालकांनी सांगितले आहे.
मागील चार दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात डिझेल टंचाईमुळे वाहतूक व्यवस्थेवर देखील मोठा परिणाम झाला आहे, डिझेल मिळत नसल्याने जिल्ह्यात एक हजार पेक्षा अधिक ट्रॅक चार ते पाच दिवसापासून अडकून पडले आहेत. परराज्यातील वाहनचालक देखील डिझेल मिळत नसल्याने अडकून पडले आहेत.
काँग्रेसने संघटनात्मक बांधणी करताना लातूरच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा अभय साळुंके यांची तर शहराध्यक्षपदी प्रा. शिवाजी जवळगेकर यांची निवड जाहीर केली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने देशभरात ‘संघटन सृजन अभियान’ राबविण्यात आले होते. या अभियानांतर्गत देशभरातील विविध सेलच्या अध्यक्षपदांची निवड करण्यात आली आहे.
मनोज जरांगे यांची भेट घेण्याआधी प्रसाद लाड छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलमध्ये थांबले होते. यावेळी प्रसाद लाड थांबलेल्या हॉटेलमध्ये दोघांनी शिरण्याच्या प्रयत्न केला. शिवाय याआधी लाड यांच्या पीएला धमकीचा फोन आला होता. या धमकी प्रकरणी योगेश शितोळे पाटील, गणेश उगले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अभिजीत दीपके या तरुणाने स्थापन केलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'ने देशभरात धुमाकूळ घातला आहे. अवघ्या 7 दिवसांत या पार्टीचे इन्स्टाग्रामवर 18 मिलियनहून जास्त फॉलोअर्स झाले आहेत. सोशल मीडियाद्वारे तयार झालेल्या या चळवळीचे राजकीय पक्षामध्ये रुपांतर होईल का? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात असतानाच "अभिजीतने राजकारणात जाऊ नये, चळवळ आता थांबवावी", अशी प्रतिक्रिया त्यांच्या वडिलांनी दिली आहे. अभिजीतचे वडील भगवान दीपके म्हणाले, "फॉलोअर्स वाढले तरी आम्हाला चिंता आहे. अभिजीतने राजकारणात जाऊ नये, आता चळवळ थांबवावी. प्रसिद्धीमुळं भीती वाटते, दुसरं काही नाही. उचलून नेतात, अटक करतात, आपल्याला याची काय सवय नाही, आपल्या मुलाला अटक करतील का असं वाटते" अशी भीती भगवान दीपके यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महत्वपूर्ण बैठक बोलावली असून या बैठकीत ते मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेणार आहेत.
इंधन धरवाढीचा फटका बसल्यामुळे नागपुरहून उडणारी अनेक विमानं एक जूनपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विमानाचा संचालन खर्च ५५ ते ६० टक्क्यांवर पोहोचल्याने नागपुरहून उडणारी अनेक विमानं बंद केली जाणार आहेत. याचा मोठा फटका प्रवाशांना बसणार आहे.
'एसआयआर' चा विषय सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. येणाऱ्या पिढीसाठी आणि तुमच्या आमच्या भवितव्यासाठी यावर लक्ष देणे खूप गरजेचे आहे. हैदराबादहून ओवेसी या शहरात येतो काय? आपल्या कार्यकर्त्यांना अॅप देऊन एसआयआरची माहिती दिली जाते, त्यांची कार्यशाळा होऊन ते कामालाही लागतात? मग असे काम आपल्यालाल का जमत नाही? असा सवाल करत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी एसआयआरच्या विषयावर एमआयएमने केलेल्या कामाचे कौतुक केले. त्यांची लोक मोठ्या प्रमाणात नोंदणी करत आहेत, त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत, आपण मात्र काहीच करायला तयार नाही, अशी खंत शिरसाट यांनी व्यक्त केली. शिवाय भाजपाच्या संघटनात्मक कामाकडे पहा. त्यांचा कोणताही कार्यकर्ता भेटला की तो म्हणतो, आमच्या मागे पक्षाने खूप कामे लावली आहेत. या पक्षाच्या दीडशेहून अधिक वेगवेगळ्या विंग पक्षासाठी काम करतात. आपण मात्र गाफील आहोत, असंही ते यावेळी म्हणाले.
उल्हासनगर शहरातील कॅम्प ५ परिसरातील कैलाश कॉलनी चौकात गुरुवारी रात्री जुन्या वादातून झालेल्या अंदाधुंद गोळीबारात दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी भाजप नेते प्रसाद लाड यांना मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी आंतरवलीमध्ये येण्याचं आवाहन केलं होतं. जरांगेंच्या आवाहनानंतर प्रसाद लाड आज मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी अंतरवली सराटीत येणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.