Maharashtra News Live Update : आता नितीन गडकरी यांचा राजिनामा घ्यावा ...

Marathi Breaking Live Headlines Updates: नीट पेपरफुटीवरून सीजेपीचे देशव्यापी आंदोलन, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama

शरद पवार हे अत्यंत अनुभवी नेते, मोदींनी त्यांचे म्हणणे ऐकले असावे : संजय राऊत

शरद पवार हे अत्यंत अनुभवी नेते असून, सध्या देशाच्या राजकारणातील ते ज्येष्ठ नेते आहेत. मोदींनी त्यांचे म्हणणे ऐकले असावे, त्यावर विचार केला असावा. मात्र, जो राजकीय धक्का द्यायचा होता, तो जंतर-मंतरवरून देण्यात आला आहे.

आता नितीन गडकरी यांचा राजिनामा घ्यावा ...

एकीकडे नीट परीक्षा भ्रष्टाचार प्रकरणात धर्मेंद्र प्राधानाचा राजीनामा झाला तर याचं आंदोलनात इथेनॉल चे सुद्धा पोस्टर झलकले होते. त्यामुळे गडकरी यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. इथेनॉल मिश्रित इंधणामुळे देशातील सर्वच वाहणांची क्षती झाली आहे त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी व मंत्री नितीन गडकरी यांचा सुद्धा राजिनामा घ्यावा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाचा पुन्हा भडका! व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; दोन भारतीय खलाशी बेपत्ता

रशिया-युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, काळ्या समुद्रात व्यापारी जहाजांवरील हल्ले अजूनही सुरू आहेत. युक्रेनच्या ओडेसा या प्रमुख बंदर शहरात एमव्ही एजीएन रॅग्नर या आणखी एका व्यापारी जहाजावर हल्ला झाला. जहाजावर चार भारतीय नागरिक होते. कीवमधील भारतीय दूतावासाने रविवारी एक निवेदन जारी करून चारपैकी दोघे भारतीय नागरिक सुरक्षित असल्याची पुष्टी केली आहे, तर उर्वरित दोन बेपत्ता भारतीय कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.

Rahul Gandhi : विद्यार्थी आंदोलकांवर लाठीचार्ज, राहुल गांधींचे अमित शाह यांना धाडले पत्र

दिल्लीत पारदर्शक शिक्षण व्यवस्थेच्या मागणीसाठी आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज कारवाईवरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून प्रश्न विचारले आहेत. 20 जुलैला झालेल्या या घटनेबाबत उत्तर देण्याची मागणी करत राहुल गांधींनी गृहमंत्रालयाला दोन प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबतचे त्यांनी पत्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केले आहे.

Dharmendra Pradhan Resign : धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची दोनदा तयारी दर्शवली होती

केंद्रीय शिक्षण मंत्री पदावरून धर्मेंद्र प्रधान यांनी कथितपणे NEET पेपर लिक वाद आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान दोनदा आपले पद सोडण्याची तयारी केली होती. मात्र, सरकारी नेतृत्वाने दोन्ही वेळेस त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही आणि त्यांना शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांवर काम सुरू ठेवण्यास सांगितले. ही माहिती सरकारी सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. 20 जुलैला वरिष्ठ मंत्र्यांची एक उच्चस्तरीय बैठक झाली होती. असा दावा केला जात आहे की, या बैठकीत धर्मेंद्र प्रधान यांनी पुन्हा एकदा राजीनामा देण्याबाबत आपले मत व्यक्त केले होते. मात्र सरकारने त्यांचा प्रस्ताव स्वीकारला नाही.

Karnataka congress : सिद्धारामैय्या यांची मोठी घोषणा! 2028ची कर्नाटक विधानसभेची निवडणूक लढवणार नाही

काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झालेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांनी केलेल्या एका घोषणेमुळे काँग्रेसच्याकर्नाटकमधील संघटनेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मी 2028 साली होणारी कर्नाटक विधानसभेची निवडणूक लढवणार नाही. हा माझा शेवटचा कार्यकाळ आहे, त्यानंतर मी निवडणुकीच्या राजकारणापासून दूर जाईन, असे सिद्धारामैय्या यांनी आज मंड्या येथे एका सभेला संबोधित करताना केली.

Gunaratna Sadavarte : ठाकरेंच्या मुंबईतील तिरंगा रॅलीवर गुणरत्न सदावर्ते यांची घणाघाती टीका

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये भव्य 'तिरंगा रॅली' पार पडली. या तिरंगा रॅलीला तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळाला असतानाच, दुसरीकडे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी या संपूर्ण आंदोलनावर आणि ठाकरे बंधूंवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, "हे विद्यार्थ्यांच्या भावना जपणारं सरकार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एसटी कर्मचारी मेला, तेव्हा आपली शपथ कुठे हरपली होती? भूमिका घेण्यासाठी धैर्य लागते. महाराष्ट्रात टीईटीसारखी घटना घडली होती, ते प्रकरण आता विशेष न्यायालयाकडे गेले आहे. अमित ठाकरे यांनी कोणतीही तक्रार दिली नाही, सरकारने स्वतः कारवाई केली आहे आणि आरोपींना ताब्यात घेतले आहे. ठाकरे हे आपल्या दोन लेकरांसाठी प्रमोशन करण्यासाठी आले आहेत," अशी टीका त्यांनी केली.

नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याने परळीतील विद्यार्थ्याने घर सोडले

नीट परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याने बीड जिल्ह्यातील परळी येथील विद्यार्थ्याने घर सोडले आहे. चांगला अभ्यास करूनही अपेक्षित गुण न मिळाल्यामुळे त्याने १७ जुलैपासून घरातून बेपत्ता झाला आहे, असा दावा मुलाच्या आईवडिलांकडून करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास घेत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर घातपात घडविण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न होता : एकनाथ शिंदे

नीट पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी ओळखून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. विद्यार्थ्यांचं आंदोलन हे अराजकीय होतं. पण काही लोकांनी ‘जंतर मंतर’ ऐवजी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. पंतप्रधानांच्या घराबाहेर कुठलंही आंदोलन करता येत नाही, याची माहिती असूनही त्यांनी जाणीवपूर्वक आंदोलन करणं, याचा अर्थ मोदी यांच्या निवासस्थानामध्ये घातपात घडविण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न होता, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

अकोला शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्यूप्रकरणी माजी जिल्हाप्रमुखावर खुनाचा गुन्हा

अकोल्याचे शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाप्रमुख मोहसीन शेख यांचा मृत्यू प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांनीच शेख यांच्या गाडीला मागून धडक देऊन त्यांचा खून केल्याचा आरोप मोहसीन शेख यांच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे. काळे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी मृत शेख यांच्या कुटुंबीयांनी खदान पोलिस ठाण्यात धडक दिली होती.

संपूर्ण अंगाला बॅंडेज बांधून तरुण मुंबईतील रॅलीत सहभागी

‘जंतर मंतर’वर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ एक तरुण आज संपूर्ण अंगाला बॅंडेज बांधून मुंबईत काढण्यात आलेल्या रॅलीत सहभागी झाला होता. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पुरेसा नाही तर भाजपला हटवा, अशी मागणी त्या तरुणाने केली आहे.

आम्हीदेखील आनंदी आहोत; कारण असे प्रश्न कुठल्या व्यक्ती किंवा पक्षाचे नसतात : देवेंद्र फडणवीस

ठाकरे बंधूंना सेलिब्रिशेन करायला काहीतरी कारण मिळालं, याचा मला आनंद आहे. शेवटी आम्ही देखील आनंदी आहोत. शेवटी अशा प्रकारचे प्रश्न हे कुठल्याही व्यक्ती किंवा पक्षाचे नसतात, तर हे तरुणाईला भेडसावणारे प्रश्न आहेत. त्यासंदर्भात नरेंद्र मोदी यांनी देशाहितासाठी निर्णय केले आहे. तरुणाईचे भवितव्य सुरक्षित राहण्यासाठी येत्या सोमवारी संसदेत कठोरातील कठोर कायदा केला जाणार आहे. त्याबद्दल मी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ठाकरे बंधूंचे पुन्हा एकदा मनोमिलन,तिरंगा रॅलीत युवकांचा जल्लोष

मुंबईत ठाकरे बंधूंनी काढलेल्या तिरंगा रॅलीत युवकांचा उत्स्फूर्त जल्लोष पाहायला मिळाला. हातात तिरंगा घेऊन घोषणाबाजी करत हजारो युवक रॅलीत सहभागी झाले. उत्साह, देशभक्ती आणि एकजुटीचं दर्शन घडवणाऱ्या या रॅलीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या मोर्चाच्या निमित्ताने ठाकरे बंधूंचे पुन्हा एकदा मनोमिलन

तिरंगा जल्लोषात अमित ठाकरेंनी विद्यार्थ्यांना साष्टांग नमस्कार घातला

अमित ठाकरेंनी तिरंगा जल्लोषात विद्यार्थ्यांना साष्टांग नमस्कार घातला. विद्यार्थ्यांच्या सहभागाचं आणि त्यांच्या लढ्याचं कौतुक करत त्यांनी तरुणाईला सलाम केला.

मी, मुंबईतच आहे, महाराष्ट्रातच आहे : देवेंद्र फडणवीस 

धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल तत्काळ दिल्लीला रवाना झाले होते. दरम्यान ते प्रधान यांच्याजागी शिक्षणमंत्री होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या. त्यावर सीएम फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना मी, मुंबईतच आहे, महाराष्ट्रातच आहे अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के 

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागाला आज पुन्हा भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी हादरा बसला. सुरगाणा आणि कळवण तालुक्यातील विविध भागांत काल रात्रीच्या सुमारास दोन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कालही सुरगाणा तालुक्यात सलगे चार धक्के बसले होते.

Uddhav Thackeray at Shivtirth उद्धव ठाकरे शीवतीर्थवर दाखल

उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. तिरंगा जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थ परिसरात कार्यकर्ते आणि समर्थकांची मोठी गर्दी जमली असून, कार्यक्रमाबाबत उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. ते जमलेल्या जमावाला मार्गदर्शन संबोधत आहेत.

MNS UBT Tiranga Jallosh Dadar दिपकेंनी अमेरिकेतील नोकरी सोडल्याची चर्चा 

दिपकेंनी अमेरिकेतील नोकरी सोडून सामाजिक आणि विद्यार्थी प्रश्नांसाठी काम करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं आहे. MNS-UBT तिरंगा जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर दादरमध्ये त्यांच्या भूमिकेची आणि संघर्षाची चर्चा रंगली आहे.

Arvind Sawant on Tiranga Jallosh : विद्यार्थ्यांच्या ताकदीचं अरविंद सावंतांकडून कौतुक!

अरविंद सावंत यांनी तिरंगा जल्लोषातील विद्यार्थ्यांच्या ताकदीचं कौतुक केलं आहे. विद्यार्थ्यांचा सहभाग, त्यांचा उत्साह आणि आंदोलनातील भूमिका यावर भाष्य करत त्यांनी तरुणाईच्या एकजुटीचं कौतुक केलं.

Dharmendra Pradhan धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर

Dharmendra Pradhan यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. NEET पेपर लीक प्रकरण आणि परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकारांवरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे.

लाखांची खंडणी मागणाऱ्या एका भामट्याला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने पकडलं

राजकोट गुजरात येथील एका धान्य व्यापाऱ्याचे बँक खाते ऑनलाईन व्यवहारातून फ्रीज करून, स्वतःला गुन्हे अन्वेषण विभागाचा रॉचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून खाते पूर्ववत सुरू करून देण्याच्या मोबदल्यात लाखांची खंडणी मागणाऱ्या एका भामट्याला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने रंगेहात पकडले आहे. परेश प्रवीण कोठारी (वय ४२, रा. हॉटेल पंचमीजवळ, सातारा रस्ता, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो स्वतःला रॉ एजंट म्हणूनही मिरवत होता. या प्रकरणी एका ४२ वर्षीय व्यापाऱ्याने पुणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार नोंदवली होती. त्यावरून पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPSC गट 'क' ची पदसंख्या दुप्पट; आता ५,७०७ जागांवर भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करणाऱ्या परीक्षार्थींसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आयोगाने 'महाराष्ट्र गट 'क' सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६' संदर्भात एक शुद्धीपत्रक जारी केले असून, महसूल व वन विभागातील तलाठी पदांच्या तब्बल १,५३९ जागांचा यामध्ये नव्याने समावेश करण्यात आला आहे.

बंगालमध्ये पहिल्यांदाच 'गुंडा कायदा' लागू

नीट फुटीविरोधात पश्चिम बंगालमध्ये शुक्रवारी मोठा हिंसाचार झाला. या आंदोलनादरम्यान हिंसाचार घडवल्याचा आरोप असलेल्यांविरुद्ध 'गुंडा कायद्या'ची अंमलबजावणी केल्याचं मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी सांगितलं आहे.

विद्यार्थ्यांना भडकावून राजकीय लाभ मिळवण्याचे प्रयत्न -आशिष शेलार

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित आंदोलनाबाबत शेलार म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देण्याऐवजी काही पक्ष या विषयाचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांच्या भावना भडकावून राजकीय लाभ मिळविण्याचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असा दावा त्यांनी केला.

आमदाराला भाजप कार्यकर्त्याकडून धमकी,

चंदगडचे भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी माजी आमदार संजय घाटगे यांच्या अन्नपूर्णा कंपनीला कर्ज दिल्या प्रकरणात जिल्हा बँकेला झालेल्या 13 लाखाच्या दंडावरून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली. ही टीका भाजपचे नेते माजी आमदार संजय घाटगे यांच्या कार्यकर्त्यांना चांगलीच जिव्हारी लागली. भाजपच्या कार्यकर्त्यांकडूनच आमदारांना थेट टार्गेट केल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्याचे पडसाद शनिवारी दिवसभर उमटले. आमदार शिवाजीराव पाटील यांनी माजी आमदार संजय घाटगे यांच्या बाबत बोलू नये. बोलण्याचे धाडस केले तर आमदार शिवाजीराव पाटील यांना कोगनोळी नाका ओलांडू देणार नाही, असा इशारा घाटगे यांचे कार्यकर्ते धनराज घाटगे यांनी दिला.

पुण्यातील गोळीबार प्रकरण पोलिस अधिकाऱ्यांना भोवले

खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गोळीबाराच्या दोन घटनांची पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतली गंभीर दखल घेतली असून त्यांनी या गोळीबार प्रकरणी खडक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांसह गुन्हे शाखा युनिट एकच्या निरीक्षकांची बदलीचे आदेश दिले आहेत.

राष्ट्रवादीच्या  विलीनीकरणास सुनेत्रा पवारांचा विरोध नाही? आदिती तटकरेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

जळगाव येथे माध्यमांची बोलताना मंत्री आदिती तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याबाबत विधान केले. त्या म्हणाल्या, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अथवा पक्षनेते पार्थ पवार यांनी विलीनीकरणाबाबत नकारात्मक भूमिका घेतलेली नाही. या संदर्भात तथ्यहीन आरोप होत आहेत, असं वक्तव्य केलं आहे.

उद्धव अन् राज ठाकरेंचा आज मुंबईत तिरंगा मार्च

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही सीजेपीची प्रमुख मागणी मान्य झाली असली तरीही मुंबईत रविवारी (ता.२६) ठरल्याप्रमाणेच शिवाजी पार्कहून सिद्धिविनायक मंदिराकडे तिरंगा मार्च जाईल. ज्या तरूणांमुळे या आंदोलनाला यश मिळाले. त्या तरुणांचे अभिनंदन या मोर्चातून केले जाईल. मोर्चात कोणताही बदल झालेला नाही, असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज यांच्या नेतृत्वात आज मुंबईत तिरंगा मार्च निघणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com