Maharashtra Politics Update: दिवसभरात देश-विदेश काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लीकवर

Political Breaking Live Headlines Updates : चंद्रकांत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र समोर, गोकुळवर चार शासकीय सदस्य नेमण्याची मागणी, इंडिया आघाडीचे दिल्लीतील रॅली यशस्वी, मोदी-शहाविरोधांत आक्रमक रणनीती, उजनी धरण परिसरातील डेटा सेंटरला विरोध, यासह महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama
Published on: 
Updated on: 

पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, तापमानात आठ अंशांची घट; शहरासाठी ‘यलो अलर्ट’ जाहीर

पुणे : बंगालच्या उपसागरातील तीव्र चक्रीवादळ ‘मुरासू’ आणि अरबी समुद्रातील चक्रीय स्थितीमुळे पुणे शहर आणि परिसरात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी रात्रीपासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे कमाल तापमानात एकाच दिवशी आठ अंश सेल्सिअसने घट झाली. सोमवारी (ता. २) सकाळीही शहराच्या विविध भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. तर पुढील दोन दिवस शहरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

उद्या राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षाची बैठक; तटकरेंची माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी या बैठकीत कुठल्या गोष्टींवर चर्चा झाली याची माहिती त्यांनी दिली. तसंच उद्या पक्षाच्या कोअर ग्रुपची अर्थात विधीमंडळ पक्षाची बैठक पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असल्याचं सांगितलं.

DCC bank Election : विखे-थोरात विरुद्ध लंके गटाच्या प्रतिष्ठेची लढाई

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया सोमवारी पार पडली असून मंगळवारी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत विखे-थोरात विरुद्ध खासदार नीलेश लंके असा सामना रंगला आहे. खासदार नीलेश लंके यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून भाजपचे राहुल शिंदे यांच्यासाठी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी ताकद लावली आहे.

NCP News : कोअर कमिटीच्या बैठकीपूर्वी नेतेमंडळी एकत्र

Summary

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून आल्यानंतर सर्व नेते छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. छगन भुजबळ, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ बैठकीला उपस्थित आहेत. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीपूर्वी होत असलेल्या या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

अभिनेता इमरान खानने न्यायालयात बिनशर्त माफी मागितली, हमीपत्रही दिलं

अभिनेता इमरान खान यांच्या मुंबईतील आंदोलनातील सहभागावरून दाखल याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना बिनशर्त माफी मागण्याचे निर्देश दिले. ‘लीव्ह इंडिया’ नोटीसला आव्हान देणाऱ्या इमरान खान यांनी न्यायालयात बिनशर्त माफी मागितली असून, यापुढे आंदोलनात सहभागी होणार नसल्याचं हमीपत्रही दिलं आहे.

महाराष्ट्रात कोणीच फायनान्स वाल्यांचे पैसे भरायचे नाहीत : जरांगे पाटील

क्रांतिकारी शेतकरी संघटनेने फायनान्स कंपनीचे कार्यालय फोडले त्यावर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय.नांदेडमध्ये शेतकऱ्याचा खाजगी फायनान्स कंपनीवाल्यांनी खून केला आहे. त्या कुटुंबाची मी भेट घेणार आहे. हा विषय सरकार दरबारी लावून धरणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. संकट आपल्या पाठीला पूजली असून शेतकऱ्यांना हात जोडून विनंती आहे. आत्महत्या करू नका. दुष्काळाचं हेही संकट जाईल, आत्महत्या करू नका. तुमच्या पाया पडतो, लेकरा बाळाचे लई हाल होतात, असे भावनिक आवाहन देखील जरांगे पाटील यांनी केले आहे. दरम्यान फायनान्सवाल्यांना रुपया द्यायचा नाही, बघू कोण येतं ते. महाराष्ट्रात कोणीच पैसे भरायचे नाहीत, असेही आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचा मेल

सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात बॉम्ब असल्याचा मेल आल्याने एकच खळबळ उडाली. या मेल नंतर न्यायालयातील वकील व कर्मचाऱ्यांना इमारती बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर तत्काळ बॉम्ब विरोधी पथक ही जिल्हा न्यायालयात दाखल झाले असून संपूर्ण जिल्हा न्यायालयाच्या इमारतीची कसून तपासणी करण्यात येत आहे. रत्नागिरी येथील मुख्य न्यायालयाच्या परिसरात बॉम्ब असल्याचा मेल आल्यानंतर सिंधुदुर्ग न्यायालयातही बॉम्ब ठेवल्याचा मेल आल्याने खळबळ उडाली आहे. सध्या सिंधुदुर्ग पोलीस घटनास्थळाची कसून तपासणी करत आहेत.

भंडारा जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर शिक्षकांचे धरणे आंदोलन

विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षकांवर शिक्षणा व्यतिरिक्त अशैक्षणिक कामांचा मोठ्या प्रमाणात बोजा वाढलेला आहे, यासह ऑनलाइन प्रक्रियेच्या कामातून शिक्षकांची मुक्तता करावी यासह विविध ४२ मागण्यांना घेऊन भंडाऱ्यात जिल्हा परिषद शिक्षक आंदोलनावर उतरले आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून हे आंदोलन जिल्हा परिषद भंडाराच्या प्रवेशद्वारावर करण्यात येत आहे. दिवसभर चालणाऱ्या या आंदोलनानंतर प्रशासनाने दखल घेतली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे. दरम्यान, आंदोलनात सरकारच्या विरोधात शिक्षकांनी घोषणा दिल्यात.

भंडाऱ्यात नगरपालिका अस्थायी कामगारांचं वैनगंगेत जलसमाधी आंदोलन

भंडारा नगरपालिकेतील अस्थायी कामगार भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीत जलसमाधी आंदोलनासाठी उतरले आहे. मागील महिनाभरापासून या कामगारांना कामावरून कमी केल्यानं कंत्राटदारांना त्यांना पुन्हा कामावर रुजू करावा, यासह नगरपालिका प्रशासनानं त्यांची दखल घेऊन त्यांना कामावर कायमस्वरूपी करावं, या मागणीला घेऊन आज भंडाऱ्यात वैनगंगा नदीत जलसमाधी आंदोलन करण्यात येत आहे. जोपर्यंत प्रशासन दखल घेणार नाही तोपर्यंत नदीपात्रातून निघणार नाही अशी भूमिका या अस्थाई कामगारांनी केली आहे.

नांदेड न्यायालय उडवून देण्याची धमकी; पोलिसांकडून परिसर करण्यात आला रिकामा

नांदेड शहरातील न्यायालयाची इमारत उडवून देण्याची धमकी आल्याची माहिती आहे. त्यानंतर तातडीने न्यायालय परिसरात पोलिस दाखल झाले. पोलिसांनी परिसर रिकामा केला असून या ठिकाणी बॉब शोधक पथकाकडून तपासणी सुरू आहे. धमकी कोणी दिली याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही. दरम्यान राज्यातील अनेक न्यायालय उडून देण्याच्या धमक्या आल्या आहेत.

राज्यातील न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

राज्यातील अनेक जिल्हा न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. ठाणे, सातारा, सोलापूर आणि बीडसह सांगली, हिंगोली, परभणी व अमरावती जिल्हा न्यायालयांनाही धमकी मिळाल्याची माहिती आहे. दरम्यान या धमकीनंतर तातडीने शोध मोहिम राबविली जात असून न्यायालयांच्या इमारती रिकाम्या केल्या गेल्या आहेत.

पुणे सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

पुणे सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. राज्यातील अनेक जिल्हा न्यायालयांना एकाच वेळी धमकीचे ई-मेल प्राप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून न्यायालय परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढेपासून शेतकरी मदतीपर्यंत; वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात!

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात राज्य सरकारवर विविध मुद्द्यांवरून जोरदार हल्लाबोल केला. तुकाराम मुंढेंच्या निर्णयातील हस्तक्षेप, शेतकऱ्यांना मदत न मिळणे, वाढत्या आत्महत्या, ध्वजारोहणावरील 16 कोटींचा खर्च आणि भोंदू बाबांना मिळणारे समर्थन अशा मुद्द्यांवर त्यांनी सरकारला धारेवर धरले.

महाराष्ट्रात खळबळ! 8 हून अधिक न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी

ठाणे, सातारा, सोलापूर, सांगली, बीडसह 8 हून अधिक जिल्हा न्यायालयांना बॉम्बस्फोटाचे धमकीचे ईमेल आले. खबरदारी म्हणून न्यायालये रिकामी करण्यात आली असून बॉम्बशोधक पथकांकडून तपास सुरू आहे.

पुण्यात पावसामुळे वाहतूक कोंडी; विद्यापीठ ते शिवाजीनगर 3 किमी वाहनांच्या रांगा

पुण्यातील पावसामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते शिवाजीनगर मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

'राष्ट्रवादीत कोणतेही मतभेद नाहीत'; उमेश पाटलांचं स्पष्टीकरण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अंतर्गत मतभेदांच्या चर्चांना प्रवक्ते उमेश पाटील यांनी पूर्णविराम दिला. पक्षात कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट करत त्यांनी नियुक्त्या आणि संघटनात्मक निर्णयांवरील चर्चांना उत्तर दिलं.

गडचिरोलीत लोहखनिजाच्या सर्वेक्षणाला राज्य सरकारची परवानगी

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील वेलमागड गावाजवळील तब्बल 624 हेक्टर राखीव वनजमिनीवर लोहखनिजाचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने मे. ओमसाईराम स्टील्स आणि अलॉय प्रा. लि. या खासगी कंपनीला परवानगी दिली आहे.

गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी १० नोव्हेंबर रोजी पुन्हा सभा घेण्याचे आदेश

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षात समविचारी आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी १० नोव्हेंबर रोजी पुन्हा सभा घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिले आहेत. न्यायमूर्ती अभय अहुजा आणि न्यायमूर्ती नीरज धोटे यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी यापूर्वी झालेल्या घडामोडींनंतर समविचारी आघाडीकडून ३ नोव्हेंबर रोजी सभा घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, आता उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे अध्यक्ष निवडीची पुढील प्रक्रिया १० नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सुरू असलेल्या राजकीय हालचालींना नवे वळण मिळाले आहे.

जिल्हा बँकेच्या पहिल्याच ठरावात बँकेचे नाव बदलणार: सुजय विखे

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी ११ जागा बिनविरोध झाल्या असून, त्यातील १० जागांवर सहकार पॅनलने विजय मिळवला आहे. उर्वरित जागांवरही विजय मिळवत बँकेच्या पहिल्याच ठरावात बँकेचे नाव बदलण्यात येईल, असा विश्वास भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

दिवाळीआधी दुष्काळग्रस्तांना दिलासा; शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांसह पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अग्रीम मदत म्हणून प्रत्येकी ५ हजार रुपये जमा करण्यास सुरुवात झाली आहे. या आर्थिक मदतीमुळे दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना सण उत्साहात साजरी करण्यास मदत होणार असून, शासनाच्या या निर्णयाचे शेतकऱ्यांमधून स्वागत होत आहे.

सातारा न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ

सातारा जिल्हा न्यायालय ई-मेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी आल्याने परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे. या सूचनेनंतर सुरक्षेचा उपाय म्हणून न्यायालयाची संपूर्ण इमारत तातडीने रिकामी करण्यात आली. बॉम्ब शोधक-नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. सुरक्षेच्या दृष्टीने न्यायाधिश, वकील आणि कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राम मंदिर देणगी चोरी प्रकरण:  पुढील कायदेशीर कार्यवाहीचे आदेश

सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने अयोध्या राम मंदिरातील देणगी चोरीच्या कथित प्रकरणावरील याचिकांवर महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणातील दंडाधिकाऱ्यांना (मॅजिस्ट्रेट) कायद्यानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेशामुळे या प्रकरणाचा तपास व पुढील कायदेशीर कारवाईला गती मिळण्याची शक्यता आहे.

AAP  News: निवडणुकीआधी AAP मध्ये मोठी घडामोड; तीन आमदार भाजपच्या गोटात

Punjab AAP Political Crisis:  AAP ला तिसरा मोठा धक्का!

पंजाबमध्ये 2027 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. आमदार कुंवर विजय प्रताप सिंह यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची आरोग्य केंद्राला अचानक भेट

राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी काल रात्री नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सोनखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी मंत्री आबिटकर यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. तर आरोग्य सेवेत हलगर्जीपणा आणि कर्तव्यात कसूर होत असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तातडीने कारवाईचे निर्देश दिले.

संभाजीनगरमध्ये खाद्यतेलाच्या रिपॅकिंग युनिटवर FDA ची कारवाई

छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील मे. रवी ऑइल इंडस्ट्रीजवर अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई केली आहे. तब्बल २ हजार ७१० किलो रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. तपासणीदरम्यान अन्नसुरक्षेच्या गंभीर त्रुटी आढळून आल्याची माहिती आहे. या गंभीर त्रुटींमुळे अन्न व औषध प्रशासनाने संबंधित उद्योगाचा FSSAI परवाना तात्काळ निलंबित केला आहे.

गोकुळच्या अध्यक्ष निवडीबाबतच्या याचिकेवर थोड्या वेळात सुनावणी

गोकुळच्या अध्यक्ष निवडीबाबत केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये थोड्या वेळात सुनावणी पार पडणार आहे.

पुणे शहरात पहाटेपासून पावसाची जोरदार हजेरी

पुणे शहरात आज पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचलेल्यामुळे पुणेकरांना प्रचंड वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. पुणे शहरातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते शिवाजीनगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागलेल्याचं पहायला मिळत आहे.

शरद पवारांचा दुष्काळ पाहणी दौरा पावसामुळे स्थगित

बारामतीसह पुणे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढत असल्याने ज्येष्ठ नेते शरद पवा यांचा नियोजित दुष्काळ पाहणी दौरा स्थगित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेबुब शेख यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षाचा समर्थकांसह वंचितमध्ये प्रवेश

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. अकोटमधील पक्षाचे शहराध्यक्ष संदेश घनबहादुर यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत बारी समाजाचे राज्यस्तरीय नेते डॉ. श्याम नेमाळे यांनीही वंचितचा झेंडा हाती घेतला. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला

कशाची हेडलाईन होईल हे राज ठाकरेंना माहिती - अमृता फडणवीस

राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत जे म्हणाले ते त्यांनी मिश्किलपणे म्हटलं होतं. कशाची हेडलाईन होईल हे राज ठाकरेंना माहीत आहे त्यामुळे ते बोलत असताना हेडलाइन होईल असंच बोलतात असं अमृता फडणवीस यांनी राज ठाकरेंबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे.

गोकुळच्या संचालकांची संख्या वाढवा, चंद्रकांत पाटलांचं पत्र आलं समोर

गोकुळच्या निवडणुकीपूर्वीच लिहिलेल्या या पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनी १६ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे पत्र लिहिल्याचा दावा केला जात आहे. तीन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळावरील नामनिर्देशित संचालकांची संख्या वाढवण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. सध्याच्या तरतुदीनुसार शासनाकडून दोन आणि संस्थेकडून दोन संचालक नामनिर्देशित केले जातात. मात्र, ही संख्या प्रत्येकी दोनवरून चार करण्यात यावी, अशी सूचना चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

सुनील तटकरेंची पार्टनरशीप, कारखान्याला विरोध - महेंद्र थोरवे

कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर घणाघात करताना म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारने टोरंटला मंजुरी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेतील पक्ष आहे.सत्तेत बसून मलिदा खायचा आणि सरकारने टोरंटला विरोध करायचा. खालापूर तालुक्यातील चिलठण येथे सुनील तटकरे आणि त्यांचा साडू, मुलगा यांची पार्टनरशिप असलेला कारखाना येत आहे.

खऱ्या मुद्यांवर लक्ष केंद्रीत केल्यास देशाची प्रगती - अमृता फडणवीस

इंडिया आघाडीच्या मोर्चाबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस म्हणाल्या, “माझ्या मते, विरोधकांनी खऱ्या आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करायला हवे. असे केल्यास ते आपल्या देशासाठी अधिक चांगले ठरेल.”

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत तोतया निरीक्षकाचा प्रवेश; दहिवडीत पुणेकर महिलेला अटक

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत दहिवडी येथील मतदान केंद्रावर तोतया निवडणूक निरीक्षक बनून आलेल्या वैशाली अक्षदा देशपांडे (रा. पाषाण-सुस रोड, पुणे) या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. २०२३ मधील निवडणूक आयोगाचे जुने ओळखपत्र गळ्यात अडकवून ती केंद्रावर वावरत असताना, संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिचे बिंग फुटले. सद्यस्थितीत या नावाच्या कोणत्याही निरीक्षकाची नियुक्ती नसल्याचे स्पष्ट होताच, पोलीस हवालदार अजय झुंजार यांच्या फिर्यादीवरून दहिवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २०४ आणि २०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

14 जिल्ह्यांना अलर्ट, पावसाचा जोर वाढणार!

महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. ‘मुरासू’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशच्या दिशेने पुढे सरकत असलेले हे चक्रीवादळ अधिक शक्तिशाली होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.