स्थानिक स्वराज्य निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची मुंबईक बैठक सुरु आहे. या बैठकीत आगामी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची मागणी वरिष्ठ नेत्यांकडून होत आहे.
बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू यादव, माजी मुख्यमंत्री राबड़ी देवी व विधानसभेतील विरोधी नेते तेजस्वी यादव यांना दिल्लीच्या राउज अव्हेन्यू कोर्टाने आईआरसीटीसी घोटाळा व ‘लँड फॉर जॉब’ प्रकरणात आरोप निश्चित करण्याचा निर्णय दिला. त्यांच्या राजकीय आणि कायदेशीर संकटात मोठी वाढ झाली आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव व्हीलचेअरवर कोर्टात हजर झाले. आयआरसीटीसी घोटाळा आणि ‘लँड फॉर जॉब’ प्रकरणातील आरोपपत्रावर आज निर्णय होणार आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये लालू यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत, त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यवतमाळच्या कळंब तालुक्यातील पिंपळखुटी इथं 6 वर्षीय बालकाचा सर्दी खोकल्याची औषध घेतल्यानंतर मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेताना प्रकृती बिघडल्यानंतर पुढील उपचारासाठी यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात रेफर केल्यानंतर मृत्यू झाला. मेडिकलच्या औषधांची तपासणी केली जात आहे. मध्यप्रदेशच्या प्रकरणानंतर खबरदारी म्हणून दोन ब्रँडच्या कफ सिरपचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले असून, तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे.
राज्याचे कृषी मंत्री आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता भरणे यांची धाराशिव जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याच्या दृष्टीने पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी भरणे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकारी, प्रवक्ते आणि नेत्यांची आज बैठक शिवतीर्थावर बोलावली आहे. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाशी युतीवर राज ठाकरे काय भाष्य करतात, यावर आता चर्चा रंगली आहे.
अमरावतीमध्ये भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा बैठक घेणार आहे. यानिमित्ताने जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. भाजपचे शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शेखर भोयर यांनी लावलेल्या बॅनरवर युवा स्वाभिमानी पक्षाचे नेते तथा आमदार रवी राणा यांचे फोटो झळकले आहेत. भाजपच्या बॅनरवर रवी राणांचा फोटो असल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी वेत्ये गावातील कलेश्वर मंदिरलगत असलेल्या ओढ्यात तब्बल 12 फुट लांब महाकाय मगरीला पकडण्यात आलं. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाच्या रेस्क्यू टीमने या मगरीला पकडलं. वनविभाग या मगरीला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याची पुढील कार्यवाही करणार आहे.
'महायुतीने निवडणूक काळात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची हमी दिली होती. अतिवृष्टीमुळे शेतकरी आता संकटात आहे. आशावेळी कर्जमाफीची गरज आहे. ती घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,' असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.
बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) काल रविवारी जागा वाटप केले. विधानसभेच्या 243 जागांपैकी भारतीय जनता पक्ष व संयुक्त जनता दल प्रत्येकी 101 जागा लढणार आहेत. लोकजनशक्ती पक्षाला 29 जागा देण्यात आल्या आहेत. संयुक्त जनता दल पहिल्यादांच भाजपपेक्षा जास्त लढवणार आहे.
अहमदनगरचे आता अहिल्यानगर नामांतर झाले आहे. मात्र अद्याप अनेक ठिकाणी अहमदनगरच्या पाट्या दुकानांवर दिसत आहे. अशा दुकानांचे परवाने रद्द करण्याची कारवाई महापालिकेने करावी, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्री निवासस्थानी जावून रविवारी सहकुटुंब स्नेहभोजन केले. या दोघांमध्ये यानिमित्ताने राजकीय चर्चा झाल्याचे समजते. गेल्या तीन महिन्यात ठाकरे बंधूंची ही सहावी भेट आहे.
अंबरनाथ-बदलापूर पालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये युती झाली आहे. मात्र, या युतीमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला स्थान देण्यात आलेले नाही. अंबरनाथ-बदलापूर पालिकेत यापूर्वी शिवसेनेची सत्ता होती. त्यामुळे एकनाथ शिंदे येथे स्वबळावर लढण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.