
शुक्रवारी बीडमध्ये झालेल्या ओबीसींचा महाएल्गार मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताना जहरी टीका केली होती. विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला, असे ते म्हणाले होते. यावर आता मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी, मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या जीआरचा निर्णय एकट्या समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांचा नाही. तो समितीचा सामूहिक निर्णय आहे. त्यामुळे कोणाला टार्गेट करणे योग्य नाही. सरकार म्हणून तो निर्णय घेतल्याचेही महाजन म्हणाले.
बिहार विधानसभा निवडणुकीवरून राजकारण आता चांगलेच तापण्यास सुरूवात झाली आहे. एकीकडे एनडीएमधील जागा वाटपाचा प्रश्न सुटलेला असतानाच दुसरीकडे राष्ट्रीय पातळीवरील इंडिया आघाडीत जागावाटपांचा गुंता वाढत आहे. अशावेळी हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चानं स्वतंत्रपणे 6 जागा लढवण्याची घोषणा केली आहे. यामुळे काँग्रेस आणि राजदला धक्का बसल्याचे मानले जात
आहे.
केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना 20 हप्त्यांचे वाटप करण्यात आले आहे. आता राज्यातील नुकसानग्रस्त शेतकरी 21 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. हा हप्ता ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबर 2025 मध्ये अपेक्षित आहे. केंद्र सरकारने अद्याप यावर अधिकृत घोषणा किंवा तारीख जाहीर केलेली नाही. पण केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 26 सप्टेंबर 2025 रोजी पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता जारी केला आहे. तर याचे कारण या राज्यांमध्ये अलिकडेच झालेल्या पूर आणि भूस्खलनाचे दिले जात आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बार उडला आहे. त्या पुढील काही दिवसांमध्ये होणार आहेत. मात्र या निवडणुकांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यांच्या पक्षाचे नेते राजन पाटील यांनी राष्ट्रवादीची साथ सोडण्याचे संकेत दिले आहेत.
मला टार्गेट करण्याचं काम करण्यासाठी भाजपने आपल्या फॅक्टरीतील एका नेत्याला (छगन भुजबळ) पुढे केलं आहे', असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. भुजबळांनी एक व्हिडिओ दाखवत वडेट्टीवारांवर दुटप्पी भूमिकेचा आरोप केला आणि एकच भूमिका घेण्याचे आव्हान दिले. याला उत्तर देताना वडेट्टीवार यांनी म्हटले की, लातूरमधील ओबीसींच्या मोठ्या मोर्चाला घाबरून भाजपने भुजबळांना पुढे केले आहे.
दोन दिवसापूर्वी कंत्राटदाराकडून 10 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी जालना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून आयुक्त खांडेकरला अटक केली होती. या प्रकरणी आरोपी खांडेकरला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, आज अंबड येथील सत्र न्यायालयाने खांडेकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान, आयुक्त महाशयांनी तात्काळ आपला जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, अंबड न्यायालयाने आरोपी लाचखोर आयुक्तांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
मराठा समाजाला तुमच्या मार्गदर्शनाची गरज नाही. तुम्ही तुमच्या पुरतं मर्यादित बोलावं, इतर समाजाला सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नये. मला धनंजय मुंडेंना गतकाळाची आठवण करून द्यायचीयं, आम्ही त्यांना निवडून आणलं हे त्यांनी आठवावं, त्यांनी जरा जमीनीवर राहावं, अशा शब्दात आमदार प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये घोडेस्वारीचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी काळा चष्मा घातला आणि गळ्यात भगवा पंचा घेतला होता. याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.बीडमध्ये काल झालेल्या ओबीसींच्या महाएल्गार सभेत धनंज मुंडे यांनी जरांगे पाटील यांच्यावर परळीचा चष्मेवाला टीकेला उत्तर दिले. माझा चष्मा आवडला असेल तर घेऊन टाक म्हणत टोला लगावला होता. त्यानंतर आज जरांगे पाटील यांचा हा काळ्या गाॅगलमधील लूक मुंडेंना प्रत्युत्तर असल्याची चर्चा आहे.
माझी भूमीका स्पष्ट आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षणाचा विषय सोडवला आहे, भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा आदर करत आलो आहे. सार्वजनिक जीवनात काम करत असताना ओबीसी मराठा वातावरण कधी वाटलं नाही. आता सध्या कोर्टात पाच जनहीत याचिका दाखल झाल्या आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात सगळे एकत्र राहतात सार्वजनिक कार्यक्रम एकत्र करतात. आता दिवाळी साजरी करत आहोत, ओबीसी दिवाळी आणि मराठा दिवाळी असं कधी झालं आहे का? असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी भुजबळांना केला आहे.
कोणी काय बोलावे हे ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी कोणाला काय मेसेज द्यायचा आहे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र मुख्यमंत्री हे मराठा समाजासोबतच ओबीसींच्या हक्काचे संरक्षण करण्यास समर्थ आहेत. त्यांनी ते वारंवार सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी अशी अनेक संकटे परतवून लावली आहेत. मुख्यमंत्र्यावर करण्यात आलेले डाव त्यांनी अनेकदा उलटवले आहेत. त्यामुळं त्याची चिंता करण्याची गरज नसल्याचा टोला मंत्री जयकुमार गोरे यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता लगावला.
कोणत्याही भाषणावर मी बोलत नाही. बोलू शकते पण मी बोलत नाही. मी दुसऱ्यांच्या भाषणावर कधी टिपा-टिपणी केली नाही. ते चांगले वक्ते आहेत, काय चांगले बोलले असेल ते सांगा, असे पंकजा यांनी म्हटले. भुजबळ साहेबांनी यापूर्वीही असे मिळावे केले होते, त्यांची बाजू त्यांनी मांडली असावी, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी ओबीसी मेळाव्यावर दिली.
बोगस मतदार याद्यांबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठं विधान केलं आहे. बोगस मतदार यादींची चौकशी होईल आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. मात्र, विरोधक फेक नरेटीव्ह सेट करत असल्याचा टोला मुश्रीफांनी लगावला आहे.
बीडमधील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणातील आरोपी पूजा गायकवाडची दिवाळी तुरूंगातच जाणार आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी नर्तकी पूजा गायकवाडला जामीन नाकारण्यात आला आहे. तीने बंगला आणि ५ एकर जमीन नावावर कर म्हणून मानसिक त्रास दिल्याने बर्गे यांनी सप्टेंबरमध्ये आत्महत्या केली होती.
कुख्यात गुंड निलेश घायवळचा जामीन रद्द करण्यासाठी पुणे पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. घायवळने अटी-शर्तींचे उल्लंघन केल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्याने पोलीस ठाण्यात नियमित हजेरी लावली नाही, तसेच पासपोर्टही जमा केला नाही. त्यामुळे त्याचा जामीन त्वरित रद्द करावा, अशी मागणी पुणे पोलिसांनी याचिकेद्वारे केली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला काँग्रेस पक्षाच्या बळावर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत यश मिळाले आहे. त्यांचं स्वतःचं नव्हतं. त्यांना काँग्रेसचं मतदान मिळालं आहे. आता काँग्रेस पक्षाला बाजूला ठेवून दुसऱ्याबरोबर चूल मांडण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत, त्यामुळे काँग्रेस त्यावर आक्षेप घेणं साहजिकच आहे. उद्धव ठाकरे यांना आपल्या गाडीचं स्टेअरिंग कोणाच्या हाती द्यायचं हे कळंना झालं आहे. त्यांचं कन्फ्युझन झालं आहे. त्यांचा ड्रायव्हर सारखा बदलतो आहे, असे विधान खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय, असे विधान करणारे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पुन्हा एकदा मजेशीर विधान केले आहे. नाही कधी म्हणायचं नाही. आपल्याजवळ जे आहे, ते द्यायला आपण कमी पडायचं नाही. म्हणून लोक तुमच्याकडे येतात. तुम्ही आतापासूनच नरकासूर काढला तर यातील अर्धे लोक उठून जातील ना. आपल्याकडे नाही, असं कधीच बोलायचं नाही. अजितदादा आहेत, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आहे, बॅंका खाली करून टाकू तुमच्यासाठी. विकासासाठी बॅंका खाली करू म्हणालो, तुम्ही भलतंच समजाल, असे मजेशीर विधान सहकार मंत्री पाटील यांनी केले आहे.
ज्यांना कॉन्ट्रक्टर बनायचं आहे, त्यांनी राजकारणात येऊ नका. कारण आमचीही पंचायत होते, चांगलं काम झालं नाही तर आम्ही फडाफडा बोलतो. आम्ही निधी दिलेला असतो. आम्हाला निधीचा पै अन पैचा हिशेब लागतो, अशी आमची कामाची पद्धत आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत बोलताना सांगितले.
आमचे नेते राज ठाकरे जो आदेश देतील, त्याचं पालन करणं आमचं काम आहे. साहेब सांगतील त्यांच्यासोबत आम्ही काम करणारच नाही. आमच्या ठाण्याला एक नाव पडलं आहे, भ्रष्टाचाराची राजधानी. ठाणे ही महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराची राजधानी झाली आहे. हे पुसायचं असेल तर आम्हाला मनसे आणि शिवसेनेला एकत्र यावं लागेल. त्यादृष्टीने आम्ही कामाला सुरुवात केली आहे.
माझं राजन पाटील यांना आव्हान आहे, माझ्याविरोधात लढा. जिल्हा परिषद निवडणुकीत मी माझा नरखेड गट सोडून लढतो, तुम्ही अनगर सोडून माझ्याविरोधात लढा. जर माझा पराभव झाला, तर मी माझं राजकारण सोडून देतो, असे चॅलेंज राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी आपल्याच पक्षाचे माजी आमदार राजन पाटील यांना दिले आहे.
बुलडाण्यात शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराव शिंदे यांच्यात जोरदार वाद रंगला आहे. आमदार गायकवाड यांचे नाव न घेता ‘दीड कोटी रुपयांची डिफेंडर गाडी कोणत्या कामाचं कमिशन म्हणून मिळाली आहे,’ असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
जालन्यात बंजारा समाजाचा मोठा आंदोलन! विजय चव्हाण यांनी एसटी प्रवर्गातील आरक्षणाची मागणी करत झाडावर चढून आमरण उपोषण सुरू केले. पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही बंजारा समाज आक्रमक होत असून, मागणी न मानल्यास येणाऱ्या निवडणुकीत महायुतीला इशारा देण्याची धमकी दिली आहे.
उत्तर प्रदेशच्या लखनौतमध्ये देशाच्या सामरिक सामर्थ्याला नव्या उंचीवर नेणारी मोठी घडामोड घडली आहे. येथे उभारलेल्या ब्रह्मोस एयरोस्पेस युनिटमधून सुपरसोनिक ब्रह्मोस मिसाइल्सचा पहिला बॅच आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रवाना केला. ही युनिट फक्त पाच महिन्यांतच तयार झाली असून दरवर्षी 80 ते 100 ब्रह्मोस मिसाइल्सचे उत्पादन करण्याचे लक्ष्य ठरवले आहे. हा प्रकल्प उत्तर प्रदेश डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडोरमधील लखनौनोचा भाग आहे, ज्यामुळे भारताच्या संरक्षण निर्मितीत नवा कीर्तिमान स्थापन झाला आहे.
पुण्यात डिजिटल फसवणुकीचा भयंकर प्रकार समोर आला आहे. बनावट NIA चीफ असल्याचं सांगून 70 वर्षीय वृद्ध फिर्यादीला फसवण्यात आले. बनावट आरोपींनी फिर्यादीला धमकी दिली की, पहलगाम हल्ल्यातील अतिरेक्यांना पैसे पुरवले आहेत, तसेच वेगवेगळ्या बँक खात्यांतून पैसे पाठवले असल्याची खोटी माहिती दिली. यामुळे एकूण 1 कोटी 45 लाख रुपये फिर्यादीकडून उकळले गेले. पुण्यातील सायबर पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही फसवणूक डिजिटल काळातील गंभीर धोका दाखवते.
सातपुड्यातील अस्तंबा यात्रेवरून परत येणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला घातला आहे. यात्रेहून परत येणाऱ्या भाविकांच्या पिकअप गाडीला अपघात झाला. चांदशैली घाटात झालेल्या अपघातात 6 भाविकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तसंच अपघातात 15 पेक्षा अधिक भाविक गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामधील मृत्यूच्या आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींना मदत केली जात आहे. तळोदा पोलिस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे.
प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने बीड इथल्या लुखामसला गावचे उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली होती. याप्रकरणातील आरोपी नर्तकी पूजा गायकवाड हिचा जामिनाचा अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. एस. मलकलपत्ते-रेड्डी यांनी फेटाळून लावला. पूजा गायकवाड हिने बंगला आणि ५ एकर जमीन नावावर कर म्हणून मानसिक त्रास दिल्याने बर्गे यांनी सप्टेंबरमध्ये आत्महत्या केली होती. तिला जामीन मिळाल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल,शिवाय अशा महिलांकडून इतर पुरुषांची आर्थिक, मानसिक आणि शारीरिक छळ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील डॉ. प्रदीपसिंग राजपूत यांनी केला.
ओबीसींसाठी स्वतंत्र मतदारसंघावर बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं भाष्य केले. ते म्हणाले, "इतरांसाठी राखीव मतदार संघ आहेत. ओबीसीसाठी वेगळा मतदार संघ नाही. जरांगे माझ्या मतदारसंघात येऊन गेले. पण तरी देखील काहीच फरक पडला नाही. जरांगेंना डोकं नाही. अभ्यास नाही. त्याच्याकडे लक्ष देत नाही."
राज्यातील महायुती सरकारने सप्टेंबरमधील अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी 3 हजार 258 कोटी 56 लाख 47 हजार रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. लाभार्थ्यांना मदत मिळाल्यानंतर त्यांची यादी, जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.
जळगावच्या सराफ बाजारात धनत्रयोदशीच्या दिवशी आज सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात तब्बल 3 हजार रूपयांनी घसरण झाली असून तर चांदीच्या दरात तब्बल 5 हजार रुपयांनी घसरण झाली आहे. धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर सोन्या-चांदीची खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी आहे.
पंढरपुरात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे यांचे बंधू संजय साठे यांचा उपसरपंचपदाच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. महाविकास आघाडीचे समाधान देठे उपसरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. समाधान देठे यांना 11, तर शिवसेनेचे संजय साठे यांना अवघी सहा मते मिळाली आहे.
धाराशिवमध्ये लोकनाट्य कला केंद्रांवर जिल्हाधिकाऱ्यांचा कारवाईचा बडगा उचलला आहे. उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणानंतर जिल्ह्यातील लोकनाट्य कला केंद्रांवर प्रशासनाचा कारवाईचा धडाका लावला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी कालिका आणि गौरी लोकनाट्य कला केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्दची कारवाई केली. आतापर्यंत धाराशिव जिल्ह्यातील चार लोकनाट्य कला केंद्रांवर कारवाई झाली असून, त्यात तुळजाई, पिंजरा, साई आणि कालिका या केंद्रांचे परवाने रद्द झाले आहेत.
"मतदार याद्यांमधील बोगस आणि दुबार नावे ही अधिकारांच्या सहमतीने टाकण्यात आलीत. ही नावे टाकण्यासाठी अधिकाऱ्यांनी पैसे देखील घेतलीत," असा गौप्यस्फोट भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी केला आहे.
77 लाखांचे विद्युत साहित्य चोरी प्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. साई संस्थानच्या विद्युत विभागातील लाखो रुपयांचे साहित्य चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शिर्डी पोलिसांनी 47 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी 2022 मध्ये चोरी प्रकरणाबाबत न्यायालयात याचिका दाखल केली होती. साई संस्थानच्या तत्कालीन विभाग प्रमुखांसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांचे माजी आमदार राजन पाटलांना खुलं आव्हान दिलं आहे. जिल्हा परिषदेला मी माझा नरखेड गट सोडून लढतो, तुम्ही अनगर सोडून माझ्या विरोधात लढा. जर माझा पराभव झाला, तर मी माझं राजकारण सोडून देतो, असं खुलं आव्हान देताना, मी अनगर गावात गेल्यावर माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला, पण 'अपने गली मे कुत्ता भी शेर होता है', असं म्हणत उमेश पाटलांनी राजन पाटलांना डिवचलं आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपने राजकीय डावपेच केले. त्याचे पडसाद पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघात उमटलेत. त्यामुळे आता जळगावात महायुतीत फूट पडली आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार किशोर पाटील यांनी शुक्रवारी स्वबळावर निवडणुका लढविण्याचे घोषित केली आहे.
शुक्रवारी रात्री पाकिस्तानने पुन्हा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात अनेक तरुण क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला. स्थानिक क्लबचे तीन क्रिकेटपटू कबीर, सिबगतुल्लाह आणि हारून यांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना तेव्हा घडली, जेव्हा हे खेळाडू प्रांतीय राजधानी शराना येथे स्थानिक स्पर्धा खेळून घरी जात होते. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
राज्यातील पूरग्रस्त भागातील सर्व जिल्ह्यांचे पंचनामे शासनाला सादर झाले असून कृषी विभागाकडून हे अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे आज शनिवार (ता. 18) पासून शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम वितरीत होणार असल्याची माहिती कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या गाडीवर कल्याणमध्ये हल्ला करण्यात आला आहे. कार्यालयासमोरील भांडण मिटवून जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेत असताना अज्ञाताकडून हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात माजी नगरसेवक उमेश बोरगावकर जखमी झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.