पुण्यातील शनिवारवाडा परिसरात नमाज पठण झाल्याचा व्हिडिओ भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. शनिवार वाड्यात नमाज पठण चालणार नाही, हिंदू समाज जागृत झाला आहे असं त्यांनी म्हटलं आहे. या घटनेवरुन सकल हिंदू समाज आणि पतित पावन संघटनेने तीव्र निषेध नोंदवला आहे. नमाज पठण झाल्याच्या निषेधार्थ दोन्ही संघटना आज शनिवार वाड्याजवळ 'शिव वंदना' करणार आहेत.
शनिवार वाड्यात नमाज पठण चालणार नाही, हिंदू समाज आता जागृत झाला आहे ! 🚩🚩
— Dr. Medha Kulkarni (@Medha_kulkarni) October 19, 2025
🚩चलो शनिवार वाडा! 🚩
रविवार, 19 ऑक्टोबर 2025
📍 शनिवार वाडा, कसबा पोलीस चौकीसमोर
🕓 सायंकाळी 4 वाजता
---
🔥 पुण्याचे वैभव – शनिवार वाडा
ऐतिहासिक वारसा स्थळ की गैर हिंदू प्रार्थना स्थळ?
सारसबाग येथे… pic.twitter.com/EObcXMZ6Rt
१ नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी हे जाहीर केलं. सर्वपक्षीय विरोधकांच्या वतीने हा मोर्चा काढला जाणार आहे.
शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या प्रभारी नाशिक जिल्हा संघटन प्रमुख पदी आमदार सुहास कांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एक वर्षांसाठी ही नियुक्ती केली आहे.
मतदारयादीत घोळ असल्याचं निवडणूक आयोगाने मान्य केले आहे, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केला आहे. त्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यादी तपासण्याचे आदेश दिले आहेत, असेही नांदगावकर यांनी म्हटले आहे.
निवडणूक आयोगाच्या विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद सुरू आहे. त्यात महाविकास आघाडीच्या तथा सर्वपक्षीय नेत्यांनी बनावट/बोगस मतदाराच्या प्रकरणावरून विरोधकांनी एकत्रित येऊन लढण्याचे काम करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मतदारयादीतील घुसखोरांना बाहेर काढण्यात येईल, असे म्हटले होते. शाह यांनी घुसखोर मतदारांना बाहेर काढावे. पण ते होणार नसल्याने आम्ही एक नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाच्या विरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चातून मतदारांची ताकद पंतप्रधानपदापासून सर्व यंत्रणेला दाखवण्यात येईल, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
शिवसेना आमदार संजय गायकवाड वापरात असलेल्या दीड कोटी रुपयांच्या डिफेंडर कारबाबत कारचे मालक कंत्राटदार नीलेश ढवळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ही डिफेंडर कार आपलीच आहे, ती कार कोणालाही कमिशनपोटी देण्यात आलेली नाही. आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार आहोत, असेही ढवळे यांनी म्हटले आहे. भाजप नेते विजयराज शिंदे यांनी कोणत्या कमिशनपोटी ही डिफेंडर कार घेतली, असा सवाल त्यांनी नाव न घेता आमदार संजय गायकवाड यांना केला होता.
आपल्याला महायुतीमधूनच निवडणूक लढवायची आहे. मात्र कुणाला खुमखुमी असेल तर आपला धनुष्यबाणही कसा चालतो, हे दाखवण्याची व्यवस्था केली जाईल, असे विधान उद्योग मंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांनी केले. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी उत्तर दिले आहे. स्थानिक स्तरावर करण्यात आलेले भाषण, विधानं यांना महत्व देण्याची गरज नाही, असे पटेल यांनी स्पष्ट केले.
रवींद्र धंगेकर यांनी केलेले सर्व आरोप निराधार आहेत, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळातही या व्यक्तीने खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले होते. मी तेव्हाही सांगितले होते की, मी या माणसावर (रवींद्र धंगेकर) एकही शब्द बोलणार नाही. आजही मी या व्यक्तीवर एकही शब्द बोलणार नाही कारण तो वैफल्यग्रस्त आहे, असे उत्तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. धंगेरकर यांनी ‘काय म्हणता धंगेकर; जमीन चोर निघाला मुरलीधर’ अशी एक पोस्ट आपल्या एक्स अकाउंटवरून केली आहे. पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या व्यवहारातून धंगेकरांनी मोहोळ यांच्यावर निशाणा साधला आहे. निवडणुकीच्या वेळी जेव्हा मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंग हाऊसची जमीन बघितली. तेव्हापासून त्यांची ही जागा खायची, अशी सुरुवात झाली. संस्थेतील दोन संचालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. एका संचालकाने कालच राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीचे सर्व व्यवहार संशयास्पद आहे, आरोप धंगेकर यांनी केला.
नाशिकमधील भाजपचे पदाधिकारी मामा राजवडे यांच्यासह त्यांच्या साथीदारावर विनयभंग, खंडणीसह जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचवटीतील एका बारचालकाकडून ५० हजार रुपयांचा हप्ता उकळण्यासाठी राजवडे यांनी हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. गंगापूर रोड प्रकणातील गोळीबारप्रकरणी ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
मी विकासाच्या आड येणारा माणूस नाही. पण मराठी माणसाच्या थडग्यावर हा विकास होणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. केंद्र, राज्य हातात आहे. उद्या जिल्हा परिषदा, महापालिका हातात आल्या तर रान मोकळं मिळेल. हे सहज सुरू नाही. मुंबई महाराष्ट्राला मिळू नये, यासाठी वल्लभभाई पटेल यांनी विरोध केला होता. हे जुनं आहे. आता बोगस मतदानाच्या माध्यमातून जिल्हा परिषदा, महापालिका ताब्यात घेत आहेत. एकदा जमीन हातातून गेली की परत मिळणार नाही. त्यासाठीच ही सगळी रचना आहे. महाराष्ट्रातील मतदारांनी सतर्क राहावे.
मतदान यादी जोपर्यंत स्वच्छ होत नाही, जोपर्यंत सर्व राजकीय पक्षांच्या शंका दूर होत नाहीत, तोपर्यंत या राज्यात निवडणुका घेऊनच दाखवा, असे आव्हान राज ठाकरेंनी दिले. जे मतदान होईल, ते खरं होईल, याच दृष्टीने निवडणुका झाल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. सर्वांनी मतदारयाद्यातील मतदारांची पडताळणी करा, कोण कुठे राहतंय, किती जण राहतात, हे शोधा. प्रत्येक घरात जाऊन, सर्वच पक्षांनी हे तपासले पाहिजे. हे स्वच्छ होईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत. मतदारयाद्या स्वच्छ व्हायला हव्यात. आधीच पाच वर्षे गेली आहेत. आणखी एक वर्षे जाऊ द्या, असेही राज ठाकरे म्हणाले.
ठाणे जिल्हा हातात आल्याशिवाय मुंबईला हात घालता येणार नाही, म्हणून हे सगळं चाललं आहे. बुलेट ट्रेनला याचसाठी विरोध केला होता. वाढवण बंदर, विमानतळ येतेय. हे कशासाठी? ह्यांचा प्लॅन काय तो लक्षात ठेवा. मुंबई विमानतळावरील सर्व ऑपरेशन्स कमी करून नव्या विमानतळावर नेण्यात येईल. कार्गो वाढवणला नेण्यात येईल. अदानी, अंबानी, गुजरातचा वरंवटा महाराष्ट्रावर फिरेल तेव्हा ते तुम्हालाही बघणार नाहीत. शहरे अदानी, अंबानीला आंदण म्हणून देण्याचा प्लॅन आहे. सगळे अदानीला दिले जात आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदानातील कथित घोळावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, व्यासपीठावरून मतदारांचा अपमान करत आहेत. २० हजार मते बाहेरून आणल्याचे त्यांचेच नेते करत आहेत. आमदार सतिश चव्हाण, संजय गायकवाड आणि मंदा म्हात्रे यांचे व्हिडीओ मेळाव्यात दाखविण्यात आले. त्यांनी मतदारयाद्यांमधील घोळाबाबत भाष्य केले. हे व्हिडीओ दाखवत राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
मनसेचा आज मुंबईतील गोरेगावर येथे मेळावा होत आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे मेळाव्याच्या ठिकाणी दाखल झाले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होत आहे. मतदारयाद्यांमधील घोळ, निवडणुकीची तयारी आदी मुद्द्यांवर ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे समजते.
भाजप महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलेली मदत खूपच तुटपुंजी आहे. शेतकऱ्यांना भरीव मदत आणि संपूर्ण कर्जमाफीसाठी उद्या (ता. २०) सोमवारी राज्यभरात काँग्रेस पिठले, भाकरी आंदोलन करणार आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांबरोबर घेऊन, करणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर आंदोलनाचे नियोजन करण्यात आलं आहे.
युवकाला लग्नाचे अमिष दाखवून लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीविरुद्ध कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. युवकाचे सव्वादोन लाख रुपये घेऊन लग्नाच्या पहिल्या रात्री नवरी पसार झाली आहे. पुढील काळात अशा घटना वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रलोभनाला बळी न पडता, खातरजमा करूनच लग्नगाठ निश्चित करता, असे आवाहन पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी केलं आहे.
काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा भाजपत प्रवेश निश्चित झाला आहे. दिवाळीनंतर मुंबई इथं कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. या प्रवेशानंतर सोलापुरात कार्यकर्त्यांचा मेळावा होईल. कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर दिलीप माने यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देऊन भाजपत जायचा निर्णय घेतला आहे
राज्याचे मुख्यमंत्री असताना, एकनाथ शिंदेंनी बेरोजगार युवक-युवतींना प्रशिक्षणार्थी योजना सुरू केली होती. परंतु आता या योजनेतील युवकांना घरी बसवण्यास सुरुवात केली आहे. लाडक्या मामांचे भाचे यांना कायम स्वरुपी सेवेत घ्यावे, अशी मागणी करत ऐन दिवाळीत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवक-युवतींनी ठिय्या आंदोलन केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं पारनेरच्या सुपा इथं आगमन झालं असून, शरद पवारांच्या हस्ते रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नूतन इमारतीचं उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली वाहिली. खासदार नीलेश लंके, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार राहुल जगताप उपस्थित होते.
कल्याण APMC मार्केटमध्ये दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात फुल विक्रीसाठी शेतकरी आणि व्यापारी दाखल झाले आहेत. विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या वाहनासाठी 520 रुपये प्रवेश शुल्क आकारले जात असल्याची माहिती मिळत आहे. मात्र इतक्या मोठ्या शुल्कानंतरही शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधांचा अभाव जाणवतो. यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
ऐन दिवाळीत बीडच्या आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाणे हद्दीत एका युवकाच्या छातीत गोळी लागून, त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या युवकावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला की, त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली, याबाबत संदिग्धता आहे. मयूर उर्फ बाळा रामदास चव्हाण, असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.
समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात झाले आहेत. शहापूर तालुक्यातील वाशेळा बोगदा ते शहापूर दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी ऐकून चार अपघात झाले आहे. या सर्व अपघातात जखमी झालेले चालकांना पोलिसांच्या मदतीने जीवरक्षक टिमच्या सदस्यांनी उपचारासाठी शहापूर इथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वाशिम जिल्ह्यातील मेहकर – मालेगाव या राष्ट्रीय महामार्गावरील पिंपरी सरहद्द गावाजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे नागरिक आणि वाहनधारक त्रस्त झाले आहेत. दिवाळीमुळे या रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ वाढली आहे, प्रशासनाकडून खड्ड्याची दुरुस्ती न झाल्याने अखेर पिंपरी सरहद्द गावातील युवक नाझीम शहा, हसन बागवान, पप्पू शहा, अल्ताफ पठाण, हुसेन शहा, अकिल शहा आणि मजहर हुसेन या सात युवकांनी एकत्र येऊन स्वतःच्या खर्चाने खड्डे बुजवण्याचे काम केले.
धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसह अनेकांचे नुकसान झाले होते. याचाच परिणाम दिवाळी सणानिमित्त सजलेल्या बाजारपेठेवर पाहायला मिळत आहे. ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह कमी दिसतो आहे. ग्राहकांची संख्या कमी असल्याने व्यापारी व्यवसायिकामध्ये चिंतेचं सावट आहे.
पुण्यातील जैन हाॅस्टेलच्या जमीनच्या व्यवहारात गैरप्रकार झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यावर माजी आमदार, शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी फेसबूकवर पोस्ट करत 'काय म्हणता धंगेकर , जमीन चोर निघाला मुरलीधर..!', अशी पोस्ट केली आहे.
काय म्हणता धंगेकर ,
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarRavii) October 18, 2025
जमीन चोर निघाला मुरलीधर..!
Stay tuned..!#saveHND #punelandscam @ANI
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा आज मुंबईत होणार आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष असणार आहे.
महाराष्ट्र ऑलिंपिंक संघटना निवडणूकीत अजित पवार-मुरलीधर मोहोळ अशी थेट लढत होणार आहे. संघटनेच्या अध्यक्षपदासाठी दोघांनी अर्ज केले होते. शनिवारी (ता.18) अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र, दोघेही आपल्या उमेदवारीवर ठाम राहिले. त्यामुळे अध्यक्षपदासाठी दोघांमध्ये थेट सामना होणार आहे
कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशी पळून गेल्यापासून त्याच्याविरोधात आत्तापर्यंत दहा गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे त्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. एका कंपनीकडून 45 लाखांची खंडणी मागण्याबाबत त्याच्यावर नुकताच गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर दाखल झालेल्या दहा गुन्हांपैकी आठ गुन्हे हे वारजे आणि कोथरुड पोलिस ठाण्यात दाखल आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.