Maharashtra Political Live Update: 'गणेशोत्सवाला कुठलेही विघ्न येऊ नये,एवढीच आमची अपेक्षा...'; मुख्यमंत्री फडणवीस

Political Breaking Live Headlines Updates : मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी आज एकटेच मुंबईत आंदोलन करण्यासाठी निघणार तसेच दिशा सालियन मृत्यूप्रकरणी सीबीआयकडून दाखल गुन्ह्यासह राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घेऊयात...
Live Update
Live UpdateSarkarnama
Published on: 
Updated on: 

'गणेशोत्सवाला कुठलेही विघ्न येऊ नये,एवढीच आमची अपेक्षा...'; मुख्यमंत्री फडणवीस 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आंदोलनासाठी मुंबईकडे निघाल्यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, कोणाला आंदोलनाला परवानगी द्यायची आणि कोणाला नकार द्यायचा याबाबत अर्ज पोलीस घेतात. जरांगे यांचा आलेला अर्ज पोलिसांनी नाकारला आहे. जरांगे यांनी पुन्हा अर्ज केला आहे. त्यावर पोलीस विचार करतील. पण मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरात गणेशोत्सव हा प्रचंड मोठा सण असतो. हिंदू समाजातील हा खूप मोठा सण आहे. हा सण सार्वजनिकरित्या साजरा केला जातो. या सणाला कुठलेही विघ्न येऊ नये,एवढीच आमची अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं.

सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील संवादात आम्ही दिलेला प्रत्येक शब्द पाळला: शंभूराज देसाई 

गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी जरांगे पाटलांनी उपोषण टाळावे. मराठा आरक्षणाच्या उपसमितीचा सदस्य म्हणून सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील संवादात आम्ही दिलेला प्रत्येक शब्द पाळला आहे. तरीही सरकारची चर्चेची दारे नेहमीच उघडी असल्याचा दावा मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे.

'दिशा सालियन प्रकरणात दाल मे बहुत कुछ काला है...'; नवनीत राणा यांचा गंभीर आरोप 

माजी खासदार नवनीत राणा यांनी राज्यात पुन्हा आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापवलेल्या दिशा सालियन प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सत्तेचा गैरवापर करून दिशा सालियन प्रकरणाची फाईल बंद करण्यात आली होती. मात्र, आता सीबीआयनं ही फाईल पुन्हा उघडली असून, दाल मे बहुत कुछ काला है हे त्यातून स्पष्ट होत आहे,असा आरोप राणा यांनी केला आहे.

मी आता शिक्षक ठेवून मराठी भाषा शिकणार : संजय दत्त

अभिनेता संजय दत्त याने दहिहंडीच्या दिवशी मी पुण्याच्या येरवडा कारागृहात होतो, पण मराठी शिकू शकलो नाही, असे विधान केले होते. त्यावरून त्याच्या जोरदार टीका झाली. त्यानंतर संजय दत्त याला आता उपरती आली असून मी मराठी भाषेवर प्रेम करतो. मी आता शिक्षक ठेवून मराठी शिकणार आहे, असे संजय दत्त याने म्हटले आहे.

दुष्काळात शेतकऱ्यांना जी मदत करावी लागते, ती मदत केली जाईल : देवेंद्र फडणवीस

राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा ताण ३० दिवसांवर गेला आहे. दुष्काळी परिस्थितीवर सरकार लक्ष ठेवून आहे. मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत दुष्काळी उपाययोजनांवर चर्चा झाली. दुष्काळाच्या उपाय योजना करायची तयारी सरकारने केली आहे. संकाटाच्या काळात शेतकऱ्यांना जी मदत करावी लागते, ती केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना : मराठा समन्वयकांकडून आझाद मैदानाची पाहणी

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उपोषणासाठी मुंबईकडे रवाना झाले आहे. दुसरीकडे मुंबईत मराठा समन्वयकांकडून आझाद मैदानाची पाहणी केली. ज्या सुविधांची मैदानावर गरज आहे, त्या सुविधा आम्ही उपलब्ध करत आहोत. कोर्टाचा अवमान करून पोलिस आम्हाला परवानगी देत नाहीत. पण हेच पोलिस खासगीत आमच्या मागण्यांचे समर्थन करतात, असे मराठा समन्वयकांनी सांगितले.

ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर पडणार; नव्या कारभाऱ्यांसाठी जानेवारी 2027 उजाडणार

एसआयआर प्रक्रियेमुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. अंतिम मदारयादी ४ नोव्हेंबरला प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या जानेवारी २०२७ मध्ये होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विकासकामांमध्ये अडथळे येऊ नयेत; म्हणून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

विधानसभा अध्यक्ष-निवडणूक आयोगाचा शिवसेनेबाबतचा निर्णय योग्यच : ॲड नीरज कौल

विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाने शिवसेनेबाबत दिलेला निर्णय योग्यच आहे. यामध्ये घटनेचे कोणतेही उल्लघंन झालेले नाही, त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला, असा युक्तीवाद ज्येष्ठ विधिज्ज्ञ नीरज किशन कौल यांनी केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी कालही होतो, आजही आहे आणि उद्याही असणार : आमदार संदीप क्षीरसागर

मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे निघाले असून त्यांचे बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. ते सकाळपासूनच त्यांचा मतदारसंघ असलेल्या बीडमध्ये स्वागताची तयारी करत आहेत. यावेळी त्यांनी, सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यात तात्काळ पूर्ण कराव्यात. त्यांना वारंवार रस्त्यावर उतरण्याची वेळ येत असून मी कालही, आजही आणि उद्याही त्यांच्या पाठीशी ठाम असणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटलांची मुंबईकडे कूच, फडणवीस पोलिसांच्या परवानगीबाबत स्पष्टच बोलले

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील उपोशनाच्या 18 व्या दिवशी मुंबईकडे रवाना झाले असून, आझाद मैदानावर ते आंदोलन करण्यावर ठाम आहेत. दरम्यान त्यांनी परवानगीसाठी मागणी केलेले तीन अर्ज नाकारण्यात आले आहे. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही पोलिसांची जबाबदारी असून तेच या संदर्भातील निर्णय घेतात. मेरिटप्रमाणे पोलीस कार्यवाही करतील.'

SET परीक्षा पुन्हा लांबणीवर, तिसऱ्यांदा पुढे ढकलली; पुणे विद्यापीठाकडून नवी तारीख जाहीर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागामार्फत सहायक प्राध्यापक पदासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी घेण्यात येणारी ४१ वी महाराष्ट्र-गोवा राज्य पात्रता परीक्षा (सेट) पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. तिसऱ्यांदा परीक्षेची तारीख बदलण्यात आली असून, आता ही परीक्षा २५ ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला लातूरमधून पाठिंबा; छावा संघटनेचा ताफा पाटोद्याकडे रवाना

मनोज जरांगे पाटील यांच्या चलो मुंबई या आंदोलनाला लातूरमधून पाठिंबा देण्यात आला आहे. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते पाटोद्याच्या दिशेने रवाना झालेत.

मनोज जरांगे पाटील यांची सरकारने उपोषणाची परवानगी नाकारल्यानंतर बीडच्या गेवराई रस्ता रोको

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्यासाठी सरकार आणि मुंबई पोलिसांना तीन वेळेस परवानगीसाठी अर्ज केला होता. मात्र तीनही वेळा हा अर्ज नाकारण्यात आला आहे. तरिही जरांगे पाटील मुंबईत जाण्यात ठाम असून ते निघाले आहेत. यामुळे बीडच्या गेवराईमध्ये समाज बांधव आक्रमक झाले असू गेवराईचा महामार्गावरती रस्ता रोको आंदोलन केले.

धनंजय मुंडे यांची प्रकृती अचानक बिघडली, रुग्णालयात उपचारासाठी दाखल

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांची अचानक तब्बेत बिघडल्याचे समोर आले आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या उपचार सुरू आहेत. परळी येथील शासकीय विशेष अतिथीगृहात मुंडे यांचा 'जनता दरबार' सुरू होता. यावेळी अचानक त्यांना त्रास सुरू झाला.

जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; हेक्टरी १ लाखांची नुकसानभरपाई द्या...

बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषानुसार शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, तसेच हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी असंख्य शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. शेतकरी संघटना आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारविरोधात घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. आठ दिवसांच्या आत या मागण्या मंजूर करा; अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र शेतकरी आंदोलन छेडू, असा इशारा संघटनांनी शासनाला दिला आहे.

तर त्यांची थोबाडं काळी झाली असती; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिंदी भाषेसंबंधी केलेल्या वक्तव्यावर विरोधकांकडून टीका होत असताना मुख्यमंत्र्यांनी आता त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. अमित शाहांचं भाषण विरोधकांनी पूर्ण ऐकलं असतं तर अशी टीका झालीच नसती. अमित शाह काय बोलले हे पूर्ण ऐकले असते तर यांची थोबाडं काळी झाली असती, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

Manoj Jarange : जरांगे पाटलांच्या कुटुंबियांचा सरकारवर संताप 

जरांगे पाटलांच्या कुटुंबियानं सरकारविरोधात रोष व्यक्त केलाय. सरकारमुळेच जरांगेंवर मुंबईला जाण्याची वेळ आलीय. त्यामुळे आता सरकारकडून आम्हाला कोणतीच अपेक्षा नाही. अशी प्रतिक्रिया आता जरांगेंच्या पत्नीनं आणि मुलीनं दिलीय.

Police Bharti Update पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी

पोलीस भरती करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जून 2027पर्यंत रिक्त होणाऱ्या सुमारे 8 हजार 100 पोलीस अंमलदारांच्या जागांसाठी नववर्षात म्हणजेच जानेवारीपासून ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. यात एकट्या सोलापूर जिल्ह्यातील 117 पदांचा समावेश आहे. मागील बॅचचे प्रशिक्षण फेब्रुवारी 2027मध्ये संपत असल्यामुळे प्रशासनानं आतापासूनच या नव्या भरतीच्या नियोजनास सुरुवात केली आहे.

मुंबई-मराठवाडा कनेक्टिव्हिटीचा मास्टरप्लॅन! 35 हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

मुंबई आणि मराठवाड्याची कनेक्टिव्हिटी आता अधिक वेगवान आणि बळकट होणार आहे.यासाठी राज्य सरकारनं तब्बल 35 हजार कोटींच्या जनकल्याण एक्स्प्रेसवे प्रकल्पाला मंजुरी दिलीय. साडेचारशे किलोमीटरहून अधिक लांबीच्या या प्रकल्पांतर्गत माळशेज घाटात 8 किमी लांबीचा भव्य बोगदा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ आता वाचणार आहे.

MPSC कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या मूल्यमापनावर गंभीर आक्षेप! विद्यार्थ्यांचा संताप

मूल्यमापनावर विद्यार्थ्यांनी गंभीर आक्षेप घेतलाय... एकाच उत्तरपत्रिकेतील गुणांमध्ये मोठी तफावत आढळलीय.. त्याचसह काही विद्यार्थ्यांना अवाजवी गुण मिळाल्याचा दावा केल्यानं परीक्षा व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय.. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी सर्व उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करण्याची मागणी करण्यात येतेय...

दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे ईमेल मिळाल्याने खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले असून शाळा परिसरात कसून तपास सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून धमकीचा स्रोत शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Manoj Jarange Update : मनोज जरांगे मुंबईकडे रवाना

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील आंतरवली सराटी येथून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली असतानाही जरांगे आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे त्यांच्या मुंबईकडे होणाऱ्या प्रवासादरम्यान काय घडणार, सरकारची भूमिका काय असेल आणि आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे

मिरवणुकीत कंटेनर शिरला;  2 जणांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरातील जालना रोडवर मिरवणुकीत कंटेनर शिरल्यामुळे 2 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहेत.

उद्धव ठाकरेंचे वकील बाजू मांडणार

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुनावणी पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. उद्धव ठाकरेंच्या वकिलांकडून बाजू मांडल्यानंतर आता एकनाथ शिंदेंचे वकील नीरज कौल युक्तिवाद करणार आहेत.

Pune: मदन बाफना यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी शरद पवार थोड्याच वेळात पोहचणार

माजी मंत्री मदन बाफना यांचे काल निधन झाले. त्यांचा पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार हे बाफना यांच्या पुण्यातील बाणेर येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी थोड्याच वेळात पोहचणार आहेत.

Amravati News : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना 'भारतरत्न' मिळवण्यासाठी राज्यस्तरीय जनआंदोलनाची हाक; 28 सप्टेंबरला अमरावतीत महारॅली!

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्कार प्रदान करण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी आता गुरुदेव भक्त आणि सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या मागणीसाठी आगामी काळात राज्यस्तरीय तीव्र जनआंदोलन उभारण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला असून, येत्या 28 सप्टेंबर रोजी अमरावती शहरात भव्य महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली.

Sangamner Drugs Crime : काशिफ कुरेशीला MD ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवले; संगमनेर पोलिसांविरोधात पोलिस अधीक्षकांकडे तक्रार

संगमनेर येथील काशिफ कुरेशी या तरुणाला MD ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा गंभीर आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी संगमनेर पोलिस ठाण्यातील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी असद कुरेशी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तौसीफ कुरेशी, गुलाम कुरेशी आणि इम्रान सौदागर यांच्याशी काशिफचा पूर्वी वाद झाला होता. हा वाद मिटवण्याच्या बहाण्याने काशिफला बसस्थानक परिसरात चहासाठी बोलावण्यात आले.

Ahilyanagar Agri Update : कृषी अधिकाऱ्यांनी परत केले लॅपटॉप; आकृतिबंध रद्दचे आंदोलन पेटणार

कृषी विभागासाठी तयार करण्यात आलेल्या आकृतिबंधाविरुद्ध कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरूच आहे. हा आकृतिबंध रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा निर्धार कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातील सहाशेहून अधिक कृषी अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील लॅपटॉप जमा केले असल्याने विभागातील ऑनलाइन कामांवर त्याचा परिणाम होत आहे.

Heroin Drugs : पाच कोटींचे ‘ड्रग्ज’ जप्त; दोन कथित तस्करांना अटक

मणिपूरमधील चुराचांदपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी अमली पदार्थविरोधी विभागाच्या सहकार्याने केलेल्या कारवाईत सुमारे पाच कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले. त्याचप्रमाणे, दोन कथित तस्करांनाही अटक केली. लष्कराच्या स्पिअर कोअरने ‘एक्स’वर पोस्ट करत या कारवाईबद्दल माहिती दिली. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन वाहनांतून अडीच किलो हेरॉईन जप्त करण्यात आले.

Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये गणेशोत्सवाच्या गर्दीत 40 पेक्षा अधिक मोबाईल आणि आठ मंगळसूत्रे चोरली

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिसांनी स्थानिक 350 रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर आधीच प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र, परराज्यातून आणि इतर जिल्ह्यांतून आलेल्या अल्पवयीन तसेच महिला चोरांच्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. या टोळ्यांनी गर्दीत 40 पेक्षा अधिक मोबाईल आणि आठ मंगळसूत्रे चोरली.

TMC : तृणमूल काँग्रेसमधील बंडखोर 20 पैकी 17 खासदार एनसीपीआयमधून भाजपमध्ये प्रवेश करणार

तृणमूल काँग्रेसमधील बंडखोर व आता नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया (एनसीपीआय) सोबत असलेल्या 20 लोकसभा खासदारांपैकी 17 खासदार दुर्गापूजेपूर्वी किंवा त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा त्यांच्यापैकी एक खासदार जगदीशचंद्र बर्मा बसुनिया यांनी सोमवारी केला. मात्र, त्यांच्या या दाव्याचे सहकारी बंडखोर खासदार, भाजपने तत्काळ खंडन केले.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील आज एकटेच मुंबईच्या दिशेने निघणार

मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील आज एकटेच मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनास पोलिसांनी परवानगी दुसऱ्यांदा परवानगी नाकारली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com