Maharashtra Political Updates : दिवसभरात राज्यात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Sarkarnama breaking Updates : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष, 124 नगरपालिका ताब्यात, काँग्रेसची विदर्भात चांगली कामगिरी, आता तयारी महापालिका निवडणुकीची यासह 22 डिसेंबर रोजीच्या विविध राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

कोण म्हणतं मुस्लिम समाज भाजपसोबत नाही? मेघना बोर्डीकरांनी आकडाच दिला

परभणी जिल्ह्यात आतापर्यंत खान पाहिजे की बाण? अशा चुकीच्या पद्धतीने प्रचार केला गेला. पण आता हे मतदारांना मान्य नाही. मुस्लिम समाज भाजपला मतदान करत नाही, हा समाज हिंदुत्ववादी पक्षासोबत कधीच नसतो हा समज परभणीतील मतदारांनी चुकीचा ठरवला आहे. भाजपच्या कमळ चिन्हावर बारा मुस्लिम नगरसेवक निवडून आले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपची हीच रणनिती असणार आहे, असे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट केले.

महापालिकेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु; निवडणूक कार्यालय उभारण्यासाठी धावपळ

उद्यापासून निवडणूक अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे परंतु ही प्रक्रिया सुरू होण्याआधी निवडणूक कार्यालय उभारण्याची धावपळ सध्या सुरू असल्याचं दिसून येत आहे. त्यात भांडुप एस प्रभागाअंतर्गत येणाऱ्या दहा प्रभागांसाठी कार्यालय विक्रोळी कन्नमवार शाळा क्रमांक एक दाखविण्यात येत होते त्यानंतर अचानक यामध्ये बदल करून एस वॉर्ड मध्ये कार्यालय बनविण्यात येत आहे रात्रीपर्यंत तरी या ठिकाणी कार्यालय बनविण्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांची धावपळ दिसून येत होती. त्यामुळे उमेदवारी अर्ज नेमका कुठे भरावा यासंदर्भात उमेदवार देखील सभ्रमात आहेत.

कल्याण डोंबिवलीत भाजपचा स्वबळाचा नारा; रविंद्र चव्हाण वक्तव्यावर ठाम

नुकताच नगरपालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदांमध्ये भाजपने जोरदार धक्का दिला होता. येथील मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीतही भाजपकडून स्वबळाचे संकेत दिले जात आहेत. त्यासाठी, रविंद्र चव्हाण यांनीच ठाम भूमीका घेतल्याचे समोर येत आहे.

मुनगंटीवार यांच्या कार्यक्रमाला पक्षातूनच विरोध?

भाजपमध्ये सुधीर मुनगंटीवार यांना अडचणीत आणण्याचे काम पक्षातीलच आमदार कसे करतात, हे एका पत्रावरून समोर आले आहे. आज चंद्रपुरात कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते पार पडले. या रुग्णालयासाठी अर्थमंत्री असतानापासून मुनगंटीवार यांनी प्रयत्न केले, निधी मंजूर केला. त्याचे लोकार्पण करण्यासाठी मुनगंटीवार प्रयत्नरत होते. त्याला यश आले आणि आजचा मुहूर्त निघाला. मात्र त्यांच्याच पक्षाचे चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी हा सोहळा होऊ नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. रुग्णालयात अनेक कामे शिल्लक असल्याने घाई करू नका, असे जोरगेवार यांनी पत्रात म्हटले आहे. हे पत्र आता बाहेर आले असून, सरसंघचालकांच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा हा प्रकार जोरगेवार यांनी केल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली.

रोहित पवारांची बोचरी टीका, बाळासाहेब थोरातांनी शांतपणे कान टोचले

नगरपरिषदा निवडणुकीत जामखेडमध्ये रोहित पवारांना धक्का बसल्यानंतर त्यांनी याचा खापर सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसवर फोडला आहे. भाजपाची बी टीम म्हणून काँग्रेसने काम केल्याचा आरोप पवारांनी केल्यानंतर त्यांना उत्तर देत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांनी पवारांना उत्तर दिलें आहे. खरंतर जामखेड संदर्भात मी पवारांना सांगितलं होतं की स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद ठेवा. मात्र त्यांची विधानसभेनंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत नाराजी होती. निवडणुकांना सामोरे जाताना आपले मुद्दे बाजूला ठेवावे लागतात तडजोड करावी लागते, असा माझा आग्रह होता. मात्र त्यांनी माझा देखील आग्रह मान्य केला नाही.

जेजुरीत भेसळयुक्त भंडाऱ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

अखंड महाराष्ट्राचा कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरीत काल रविवारी विजय मिरवणूक सुरू असताना भंडाऱ्याची उधळण केली जात होती. यावेळी भंडाऱ्याचा भडका उडाला. या घटनेत तब्बल नवनिर्वाचित दोन नगरसेवकांसह 16 जण भाजले गेले. त्यामुळे पुन्हा एकदा भेसळी युक्त भंडाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दुर्राणींचे संस्थान शिवसेनेकडून खालसा

पाथरी नगरपालिकेवर तब्बल पस्तीस वर्ष एकहाती वर्चस्व राखलेल्या माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे संस्थान शिवसेनेचे सईद खान यांनी खालसा केले आहे. गेल्या दोन वर्षापासून पाथरीत दुर्राणी विरुद्ध सईद खान यांच्यात अनेकदा संघर्षाचा भडका उडाला होता. यानंतर आता नगरपालिकेच्या हाय व्होलटेज लढतीत दुर्राणींचे संस्थान शिवसेनेकडून खालसा झाले आहे.

महापालिकेत भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढली

नगर पालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने इतिहास घडवला. न भूतो न भविष्यति असे यश मिळवले. एकछत्री अंमल असताना काँग्रेसलाही साठ वर्षांत जे जमले नाही ते भाजपने करून दाखवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील ३० वर्षातील निवडणुकीचे स्टॅस्टेस्टिक तपासले आणि भाजपचा स्ट्राईक रेट काढला. या निवडणुकीत महायुतीचे ७५ टक्के नगराध्यक्ष निवडून आले. त्यात भाजपचा वाटा ६५ टक्के इतका आहे याकडे लक्ष वेधून फडणवीस यांनी विरोधकांसह आपल्या मित्रपक्षांनाही भाजपचा स्ट्राईक रेट सांगितला. हे बघता महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे.

'जानेवारीमध्ये पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल'

रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. रायगडचे पालकमंत्रीपद शिंदे गटाला मिळावे, अशी मागणी एका नेत्याने केली आहे. तसेच, 'जानेवारीमध्ये पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल', असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. शिंदे गटाकडून आणखी एक मंत्री या पदासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. हा वाद लवकरात लवकर सोडवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी निर्णय घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे आता हा तिढा नेमका कधी सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Palghar BJP : भाजप नगरसेवकाची मिरवणूक, गाडीवर फोडले फटाके अन् महिलांना जबर मारहाण

पालघर जिल्ह्यातील वाडा नगरपंचायत निवडणूक निकालानंतर भाजप नगरसेवक यांच्या मिरवणुकीत सीएनजी गाडी समोर फटाके वाजविण्यास विरोध करणाऱ्या दोन महिलाना मारहाण झाल्याची घटना घडली. या महिलांवर वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाडा पोलिस ठाण्यामध्ये महिलांच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली आहे. आरोपींना अटक तात्काळ करण्यात यावी अशी जखमी महिलांची सरकारकडे केली आहे. भाजपचे विजयी नगरसेवक तेजेश पाटील यांची मिरवणूक आमच्या घरासमोर आल्यानंतर आमच्या गाडीवर फटाक्याची माळ फोडली. या प्रकाराला विरोध केल्यावर त्यांनी आम्हला शिवीगाळ करून मारहाण केली, असे जखमी महिलांचे म्हणणे आहे.

Solapur Congress : महापालिका इच्छुकांच्या मुलाखती उद्यापासून सुरू करणार; प्रणिती शिंदे यांची माहिती

सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या इच्छुकांच्या आज आणि उद्या आम्ही मुलाखती घेत आहोत, अशी माहिती खारदार प्रणिती शिंदे यांनी दिली. लोक पक्ष सोडून जाण्याची ही कांही पहिली वेळ नाही, जेंव्हापासून भाजप सत्तेत आहे, तेंव्हापासून त्यांची व्होट चोरी नव्हे, तर लोक चोरी चालूच आहे, असा टोला देखील प्रणिती शिंदे यांनी लगावला.

Buldhana Accident : मुंबई-नागपूर हायवेवर भीषण अपघात; तीन ठार, तर दोघे गंभीर जखमी

मुंबई नागपूर हायवेवर मालकापूर नजीक कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या अपघातात कारमधील तिघेजण जागीच ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील धुपेश्र्वर मार्गावर हा अपघात झाला आहे.

Anand Paranjpe On Anjali Damania : अंजली दमानिया वारंवार चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतात

अंजली दमानिया नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांवरती नेहमीच आरोप करतात. अंजली दमानिया यांच्याकडे जर पुरावे असतील, तर त्यांनी उच्चस्तरीय समिती सरकारच्या माध्यमातून नेमण्यात आलेली आहे, त्यांच्याकडे पुरावे द्यावेत. अंजली दमानिया वारंवार चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतात. फक्त माध्यमांमध्ये चर्चेत असण्यासाठी आरोप करायचा. अंजली दमानिया फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विरोधात फेक निगेटिव्ह सेट करत राहतात, असे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी म्हटले आहे.

BMC Election : जबाबदारी मलिकांकडे, पण जागा वाटपावर तटकरे महायुतीशी चर्चा करणार

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नवाब मलिक यांना सदस्य म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे. ज्यावेळी मुंबई महापालिकेबद्दल जागा वाटपासंदर्भात बैठक बोलवण्यात येणार, त्याचवेळी आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे हे मुंबई महापालिका जागा शेअरिंग बद्दल महायुती नेत्यांबरोबर चर्चा करणार आहेत, अशी माबिती आनंद परांजपे यांनी दिली.

Eknath Shide Shvsena : रायगडचे पालकमंत्री पद शिवसेनेला मिळावं; उद्योगमंत्री उदय सामंत

रायगडचे पालकमंत्री पद शिवसेनेला मिळाव, असा आग्रह पुन्हा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज महाडमध्ये माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. 'माझं स्पष्ट मत आहे की, रायगडचे पालकमंत्री शिवसेनेला मिळावं. मात्र निर्णय हा राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतात आणि त्यांनी तो घ्यावा. हा प्रश्न लवकर मार्गी लावतील, येत्या नवीन वर्षात हा प्रश्न सुटेल,' असा विश्वास शिवसेना नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

Crime News : भोसरीतील बैलगाडा शर्यत घाटात तरुणाचा खून

पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी इथं बैलगाडा शर्यत घाटात, एका चाळीस वर्षाच्या तरुणाचा खून करण्यात आला आहे. दीपक कुमार (वय 40) असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. दीपक कुमार ही मूळचा बिहार राज्याचा रहिवासी असून, तो मागील काही महिन्यापासून इंद्रायणी नगर भागात वास्तव्यास होता. दीपक कुमारचा खून नेमका कोणी आणि का केला? याचा तपास सध्या भोसरी पोलिस करत आहेत.

Harshwardhan Sapkal : रोहित पवार यांच्या जामखेड नगरपालिकेतील पराभवावर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

'जामखेडमध्ये आघाडीत दोन्ही पक्ष लढणे आवश्यक होते. मात्र चर्चा शेवटपर्यंत गेली नाही. दोघांनाही समजून घेण्यात संवादाचा अभाव राहिला असेल, त्यामुळे आघाडी होऊ शकली नाही. आगामी काळात आघाडीच्या अनुषगाने प्रयत्न राहील. जामखेडमध्ये रोहित पवारांचे चांगले काम आहे. महाविकास आघाडीचे ते जबाबदार नेते आहेत. आगामी काळात त्यांना सहकार्याची भूमिका काँग्रेसची राहील,' अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

ShivsenaUBT : शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांची डोकी फोडली

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक संदर्भात कार्यकर्त्यांच्या मुलाखत सुरू असताना आपापसात हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कल्याण शहर शाखाप्रमुख निशिकांत ढोणे यांना मारहाण झाली, तर ढोणे यांनी भागवत बैसाने यांना देखील मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. दोघे जखमी झाले असून दोघांनीही एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.

Nagarparishad Election : भाजपने केले दोन विक्रम

नागपुरात नवनियुक्त नगराध्यक्षांच्या सत्कारप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. नगरपालिका निवडणुकीत भाजपने राज्यात दोन विक्रम केले आहेत. भाजपचे तीन हजारांहून अधिक नगरसेवक निवडून आले आहेत. मागील ३० वर्षांत एवढे यश कोणत्याही पक्षाला मिळाले नव्हते. त्याचप्रमाणे भाजपचा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील स्ट्राईक रेट ६५ टक्के राहिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Congress News : मुख्तार शेख यांना राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे शहरात काँग्रेसला धक्का बसला आहे. शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष मुख्तार शेख यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी मुलासह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ते माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे निवडणुकीआधी काँग्रेससाठी हा झटका मानला जात आहे.

Devendra Fadnavis news : नवनियुक्त नगराध्यक्षांचा सत्कार

विदर्भात नगरपालिका निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. पक्षाचे १०० पैकी ५५ ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. आज या विजयी नगराध्यक्षांचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. नागपुरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Mumbai Election News : भाजपच्या २७ समित्या सज्ज

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने २७ समित्या सज्ज केल्या आहेत. मुंबईत १५० हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले असून त्यासाठी घरोघरी जाऊन प्रचार करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहे.

Manikrao Kokate News : नामधारी आमदार राहणार

सुप्रीम कोर्टाने माणिकराव कोकाटे यांच्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे कोकाटेंची आमदारकी वाचली आहे. मात्र, हा निकाल देताना कोर्टाने त्यांना आमदारकीचे कोणतेही अधिकार वापरता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोर्टाचा अंतिम निकाल येईपर्यंत कोकाटे केवळ नामधारी आमदार राहणार आहेत.

NCP News: माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा

राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री, आमदार माणिकराव कोकाटे यांना न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. त्यांची आमदारकी जाणार नसल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे. कोकाटे यांची आता अटक ठरली आहे.

PMC Election: पुण्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस युती करणार, अजितदादांचा सतेज पाटलांना फोन

पुणे महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसला एकत्र येण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. महाविकास आघाडीला सोबत घेण्यासाठी अजित पवारांकडून चाचपणी सुरु आहे. काँग्रेसला सोबत घेण्यासाठी अजित पवार आणि सतेज पाटील यांची फोनवरून चर्चा केली आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींसह महाविकास आघाडीची सोबत मोट बांधण्याचे अजित पवारांचे प्रयत्न सुरू आहे. अजितदादा यांच्यासोबत संपर्क झाल्याच्या वृत्ताला सतेज पाटलांनी दुजोरा दिला आहे.

Shiv Sena-MNS News: ठाकरेंच्या युतीची घोषणा कधी?

ठाकरे सेना अन् मनसेची युती उद्या मंगळवारी जाहीर होणार आहे युतीची घोषणा एकत्रित आणि धुमधडाक्यात होणार असल्याचे ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. 'मातोश्री'वर याबाबत महत्त्वाच्या नेत्यांची बैठक असल्याची ते म्हणाले.

Shiv Sena live: शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे निधन

यवतमाळच्या वणी विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे निधन झाले. त्यांच्यावर गेल्या एक महिन्यांपासून मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. नांदेकर हे आक्रमक शिवसैनिक म्हणून परिचित होते. तालुका प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा प्रवास होता. विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना शिंदे गटात नांदेकर यांनी पक्षप्रवेश केला होता. ते चंद्रपूर यवतमाळ लोकसभा समन्वयक होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली होती. वणी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

मुश्रीफांच्याबाबत विचारू नका, संजय मंडलिक भडकले

मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबद्दल मला काहीच बोलायचे नाही. कारण त्यांच्या विचारांवर मी राजकारण करत नाही. मुश्रीफ काय हिटलर लागून गेले नाहीत? मुश्रीफ यांच्याबद्दल विचारू नका, मरू देत तिकडे, अशा शब्दात माजी खासदार संजय मंडलिक यांनी संताप व्यक्त केला.

सोलापूरमध्ये काँग्रेसच्या हाती भोपाळ

सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसला एका नगराध्यक्षपद जिंकता आले नाही. अक्कलकोट नगपंचायतीमध्ये केवळ दोन नगरसेवक काँग्रेसचे विजयी झाले आहेत.

122 जागा निवडून दिल्या तर स्वप्न पूर्ण होईल – रवींद्र चव्हाण

कल्याण–डोंबिवली महापालिकेवर भाजपचा महापौर बसावा, ही येथील नागरिकांची अनेक वर्षांची इच्छा असून ती पूर्ण करण्याची ताकद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. मात्र त्यासाठी 15 जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत भाजपचे 122 नगरसेवक निवडून देण्याची जबाबदारी मतदारांनी घ्यावी, असे स्पष्ट आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले.

उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भावना घाणेकर

उरण नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा फडकला असून नगराध्यक्षपदी भावना घाणेकर विजयी झाल्या आहेत.या नगर परिषद निवडणुकीदरम्यान उरणचे भाजप आमदार बादली व शरद पवार पक्षाचे भिवंडी लोकसभा खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा या दोघांमध्ये टोकाचा वाद झाला होता.या दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना आव्हान देण्यात आले होते.

भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष, 117 नगराध्यक्ष विजय

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपचे 117 जागांवर नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. तर, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 53, अजित पवारांची राष्ट्रवादी 37 तसेच काँग्रेस 28, ठाकरेंची शिवसेना 9, शरद पवारांचे राष्ट्रवादीची 7 नगराध्यक्ष विजयी झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com