Maharashtra Live Update : रेल्वे स्टेशनवर साफसफाई करणाऱ्या महिलेला एकाच महिन्याचे 2 लाख 18 हजार रुपये विजेचे बिल

Maharashtra News Live Update: पावसाळी अधिवेशनाच आज अमित शाह बोलण्याची शक्यता, सुप्रीम कोर्टात शिवसेना कुणाची? यावर सुनावणी होणार, राज्यातील राजकीय व प्रशाशकीय घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live Politics Update
Maharashtra Live Politics UpdateSarkarnama
Published on
Updated on

अण्णासाहेब पाटील महामंडळाला ३०० कोटींचा निधी प्राप्त

राज्यातील पात्र लाभार्थी आणि नवउद्योजकांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी महाराष्ट्र शासनाने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी केलेल्या ७५० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी आणखी ३०० कोटी रुपयांचा निधी महामंडळाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात महामंडळाला आतापर्यंत एकूण ४५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त एकनाथ शिंदेंमध्येच : बच्चू कडू

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या न्यायालयीन संघर्षावर आमदार बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे. त्यामुळे न्यायालयालाही माहिती आहे की, हे चिन्ह शिंदेंशिवाय दुसरं कोणी पेलू शकत नाही. यामुळे अखेर न्यायालयाचा निर्णयही एकनाथ शिंदे यांच्या बाजूनेच लागेल, असा दावा आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. ते चंद्रपूरमध्ये बोलत होते.

दोन विद्यार्थ्यांचा 'नीट' फेरपरीक्षेचा रोखलेला निकाल घोषित करण्याचे खंडपीठाचे निर्देश!

'नीट' फेरपरीक्षेचा निकाल रोखण्यात आलेल्या दोन विद्यार्थ्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा दिलासा दिला आहे. त्यांचे निकाल जाहीर करण्याचे निर्देश राष्ट्रीय परीक्षा संस्थेला (एनटीए) देण्यात आले आहेत. न्या. नितीन सूर्यवंशी आणि न्या. आबासाहेब शिंदे यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले.

पोलादपूर-महाबळेश्वर आंबेनळी घाट मार्ग १६ ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंद

भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला असून आंबेनळी घाट परिसरातील भौगोलिक परिस्थिती आणि संभाव्य नैसर्गिक आपत्ती लक्षात घेता पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) राज्य महामार्ग क्र. १३९ हा दि. १६ ऑगस्ट २०२६ पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत.

रेल्वे स्टेशनवर साफसफाई करणाऱ्या महिलेला एकाच महिन्याचे 2 लाख 18 हजार रुपये विजेचे बिल

हिंगोलीत रेल्वे स्टेशनवर साफसफाईचे काम करणाऱ्या एका महिलेला तिच्या घरातील विजेचं तब्बल दोन लाख 18 हजार रुपये बिल एकाच महिन्यात आले आहेत. प्रभावती सिद्धार्थ श्रावने असे या महिलेचे नाव असून ती हिंगोली शहरातील सिद्धार्थ नगर परिसरामध्ये वास्तव्यास आहे. तर रेल्वे स्टेशनवर दरमहा आठ ते साडेआठ हजार रुपये पगारावर ही महिला साफसफाईचे काम करते. दरम्यान आता अचानक लाखो रुपये देण्यात आल्याने या महिलेच्या पायाखालची वाळू सरकली असून तातडीने विजेचं बिल भरा अन्यथा घराचा वीज पुरवठा खंडित करू असा संदेश मिळत असल्याने ही महिला वैतागली आहे.

 दिल्लीत विद्यार्थ्यांवर कोणाच्या आदेशाने लाठीहल्ला झाला : काँग्रेस झारखंडमधील मारहाणीवर राहुल गांधींनी बोलावे : भाजप

‘जंतर मंतर’वरील आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले, हे गेल्या १८ दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेत येऊन सांगत नाहीत, असा आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी केला. तर झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्यावर राहुल गांधी यांनी बोलावे, यासाठी सत्ताधारी भाजप आक्रमक झाला आहे. त्यामुळे संसदेत भाजप आणि काँग्रेस पुन्हा आमने सामने आले आहेत.

जैन मुनी नीलेशचंद्र यांचे पुन्हा वादग्रस्त विधान : तर अहिल्यानगरध्ये न भूतो ना भविष्यती असे तांडव होईल

अहिल्यानगर महापालिकेतील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर कर्तव्य बजावत असताना प्राणघातक हल्ला झाला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यावरून जैन मुनी नीलेशचंद्र यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. आपल्या प्राणाची रक्षा करण्याठी प्रत्येक घरात तलवार ठेवणं आवश्यक आहे. परदेशीला न्याय मिळाला नाही तर लक्षात ठेवा अहिल्यानगरमध्ये न भूतो ना भविष्यती असे तांडव होईल, असे नीलेशचंद्र यांनी म्हटले आहे.

जात प्रमाणपत्राचे काम महसूलकडे; पण व्हॅलिडिटी आमच्याकडे येत नाही

जात प्रमाणपत्र देण्याचे काम आमच्या महसूल विभागाकडून करण्यात येतो. मागील तीन वर्षांत २२ लाख २० हजारापेक्षा जास्त प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, जात वैधता प्रमाणपत्राचे काम आमच्याकडे नाही, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा आज सुटणार

येत्या १५ ऑगस्ट रोजी रायगडमध्ये मीच झेडावंदन करणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंंत्री यांची आज बैठक झाली आहे. त्या बैठकीनुसार पालकमंत्रिपदाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे, अशी माहिती रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी दिली.

नाशिक,पालघर भूकंपावर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

नाशिक भूकंपाबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेयत...सेंटर फॉर सेस्मिक टेक्नॉलॉजी अभ्यास सुरू आहे...आणखी चांगल्या संस्था आणा आणि सर्वंकष मूल्यमापन करा...लोकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना दिल्यायत...

AMRAVATI | स्वतःच्याच घरावर गोळीबाराचा कट; तलाठ्याने दिली दीड लाखांची सुपारी

अमरावतीच्या अर्जुन नगर परिसरात घरावर देशी कट्ट्यातून गोळीबार करून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला आहे. या प्रकरणात वडाळी येथील बादशहासिंग अजबसिंग टांक, राजुरा येथील अजय नुरजेम भोसले, वडाळी येथील राजासिंग अजबसिंग टांक आणि चंद्रसिंग उर्फ शेरुसिंग जोधसिंग शाकला या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांच्या चौकशीत फिर्यादीचे पती आणि तलाठी असलेले विपुल ठाकरे यांनीच स्वतःच्या घरावर गोळीबार करण्यासाठी आरोपींना दीड लाख रुपयांची सुपारी दिल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणातील फरार मुख्य आरोपी तलाठी विपुल भानुदास ठाकरे यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. देशी कट्ट्यातून गोळीबार करण्यामागचा नेमका उद्देश काय होता, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.

BJP Tiranga Rally Pune : पुण्यात भाजपाची तिरंगा रॅली, कार्यकर्त्यांकडून शहरात शक्तिप्रदर्शन

पुण्यात भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. देशभक्तीचा संदेश देत मोठ्या संख्येने कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले आहेत. हातात तिरंगा घेऊन भाजप कार्यकर्त्यांनी शहरात शक्तिप्रदर्शन केलं.

Chakan Traffic Jam News चाकणमध्ये 8 तासांपासून वाहतूक कोंडी

चाकण औद्योगिक वसाहतीत गेल्या आठ तासांपासून वाहतूक कोंडी कायम असून वाहनांच्या तब्बल पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्यात... कामगारांच्या बस, शाळकरी विद्यार्थ्यांच्या बस आणि औद्योगिक वाहतूक करणारी अवजड वाहनं वाहतुक कोंडीत अडकलीत... त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय...

धनुष्यबाण शिंदेंना का दिला? कपिल सिब्बलांचा आयोगाच्या निर्णयावर सवाल

शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल युक्तिवाद करत आहेत. यावेळी त्यांनी आयोगाने धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला का दिले, असा सवाल उपस्थित केला. मागील प्रकरणांचे दाखले देत आजच्या सुनावणीत काय युक्तिवाद होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिवसेना पक्षचिन्हावर ठाकरे गटाचा जोरदार युक्तिवाद; कपिल सिब्बल यांनी मांडली बाजू

शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. यापूर्वीच्या न्यायालयीन प्रकरणांचा दाखला देत त्यांनी आपली बाजू मांडली. सिब्बल यांच्यानंतर अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करण्याची शक्यता असून, आजच्या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम कायद्यानुसार पुण्यात पहिला गुन्हा दाखल

महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम कायदा नुकताच महाराष्ट्रच्या विधिमंडळात मंजूर झालाय. या कायद्याअंतर्गत पहिला गुन्हा पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात नोंद झाला आहे. ब्रिटनहून आलेल्या एका धर्मगुरूकडून पुण्यातील गुरुवार पेठेतील चर्चमध्ये प्रवचन दिले जात होते. मात्र या प्रवचनाच्या माध्यमातून धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आणि पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर ब्रिटिश नागरिक असलेल्या या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सांगलीत भाजपचा डाव उधळला, बाजार समिती त्रिभाजनाला २०६ संस्थांचा विरोध

सांगली जिल्ह्यातील बाजार समितीचे त्रिभाजन करण्याचा भाजपचा डाव अखेर उधळला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्वांची मते जाणून घेण्यासाठी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे ठराव दाखल करण्यात आले. या ठरावांमध्ये 224 पैकी 206 ग्रामपंचायत आणि विविध संस्थांनी त्रिभाजनाच्या विरोधात ठराव दाखल केले असून केवळ अठरा ग्रामपंचायत आणि संस्थांनी त्रिभाजनाला पाठिंबा दिल्याचे समोर येत आहे.

राऊतांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचे आव्हान स्वीकारले

कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या या आरोपाला प्रतिउत्तर दिले. कुंभमेळ्याचे काम पारदर्शी होत असल्याचा दावा त्यांनी केला. संदर्भात संजय राऊत यांनी एकदातरी मोर्चा काढावा असे आव्हान मंत्री महाजन यांनी दिले होते. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री महाजन यांचे हे आव्हान स्वीकारले आहे. येत्या 17 ऑगस्टला शिवसेना ठाकरे पक्षातर्फे खासदार राऊत आणि उपनेते रवींद्र नेर्लीकर आणि यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येईल. शिवसेना कार्यालयापासून सकाळी अकराला हा मोर्चा महापालिका कार्यालयावर काढण्यात येणार आहे.

कराडात मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर फाडले

आज कराड तालुक्यातील मसूर आणि पाचवड फाटा येथे मनोज जरांगे पाटील यांची बैठक होणार आहे. त्याच्या स्वागतासाठी शामगाव घाट ते मसूर मार्गावर उभारण्यात आलेले बॅंनर अज्ञाताकडून फाडण्यात आल्याने मराठा समाज आक्रमक झाला असून त्यांनी मल्हारपेठ- पंढरपूर आणि कराडकडे जाणाऱ्या शामगाव घाटातील रस्त्यावर रास्तारोको केला आहे. मसूर पोलिसांनी आंदोलकांना विनंती करत हटविले आहे. सध्या मसूर पोलिस ठाण्यात बॅंनर फाडणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी मराठा समाज दाखल झाला आहे. आज कराडला मनोज जरांगे पाटील मुक्कामी आहेत.

बुलढाणा जिल्ह्यात लोकनियुक्त सरपंचाची आत्महत्या

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. करमोडा गावचे लोकनियुक्त सरपंच दीपक उगले यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ तयार केला असून, या व्हिडिओमध्ये राजकीय विरोधकांकडून होत असलेल्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे म्हटले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा सध्या पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू आहेत. त्यांचा हा दौरा सांगली जिल्ह्यात आला असता त्यांच्या ताफ्यातील वाहनांना अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सांगलीतील कडेगाव येथून विटा शहराकडे त्यांचा ताफा निघाला असताना ही अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये मनोज जरांगे यांचे समर्थक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात जखमी झालेल्यांना मनोज जरांगे यांनी स्वत: आपल्या कारमध्ये बसवून रुग्णालयात दाखल केलं आहे.

गडचिरोलीतील मृत्यूंवरून राजकारण तापलं; संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

गडचिरोलीतील साप-विंचू चावल्याने झालेल्या मृत्यूंच्या घटनांवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली. “मंत्र्यांच्या घरात साप-विंचू सोडा, मग मृत्यूचं भय कळेल,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. आदिवासींच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही केली. दरम्यान, काँग्रेस संस्थाचालकांच्या आश्रमशाळांवर प्रश्न उपस्थित करत भाजपने राऊतांवर पलटवार केला.

TET पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन; सोलापूरच्या प्रशिक्षण संस्थाचालकाला अटक

TET पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचला आहे. भिवंडी पोलिसांनी सोलापूरमधील स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण संस्थेचा चालक प्रकाश पवार याला अटक केली. तपासात त्याने यापूर्वी अटक केलेल्या आरोपींना विद्यार्थ्यांची कागदपत्रे दिल्याचे समोर आले. ही कागदपत्रे का पुरवली, याचा शोध पोलीस घेत आहेत. प्रकरणातील अटकसंख्या 16 झाली आहे.

चाकणच्या विकासासाठी 150 कोटींची तरतूद - उदय सामंत

पुण्यातील औद्योगिक विकासावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. चाकणमधून उद्योग बाहेर जाण्याच्या चर्चेवर त्यांनी प्रश्न सोडवण्यासाठी बैठका सुरू असल्याचे सांगितले. चाकणमधील रस्त्यांसाठी 100 ते 150 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

संसदेत पुन्हा गदारोळ; लोकसभेचं कामकाज पुन्हा तहकूब

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज पुन्हा गदारोळ पाहायला मिळाला. विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून जोरदार घोषणाबाजी करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लोकसभेतील कामकाजात अडथळा निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात न आल्याने अध्यक्षांनी लोकसभेचं कामकाज काही काळासाठी तहकूब केलं. त्यामुळे सभागृहातील कामकाज पुन्हा ठप्प झालं.

Sanjay Raut : नक्षलवाद उद्योगपतींसाठी संपवला; संजय राऊतांचा सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूवरून सरकारविरोधात संताप

गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई निवासी आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू, तर तीन विद्यार्थिनी जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेवरून शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात आदिवासींचा मृत्यू इतका स्वस्त झाला आहे का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी महायुती सरकारवर कडाडून टीका केली आहे. "नक्षलवाद कोणासाठी संपवला? तर या उद्योगपतींसाठी संपवला, आदिवासींसाठी नाही. आदिवासींचा मृत्यू या मार्गाने सुरूच आहे. यातूनच एखादा नक्षलवादी परत निर्माण झाला तर त्याला गोळ्या घातल्या जातात," अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली.

Akola Big Politics Development : अकोल्यात मोठी राजकीय उलथापालथ; डाॅ. अभय पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

अकोल्यात एकनाथ शिंदे शिवसेनेकडून मोठा राजकीय मासा गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 2024 मध्ये काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार असलेल्या डॉ. अभय पाटील यांनी नुकतीच मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दोघांच्यात तासभर चर्चा झाली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. अभय पाटील हे तब्बल 4 लाख 16 हजार मते घेत दुसऱ्या स्थानावर राहिले होते. काँग्रेसच्या कार्यपद्धतीला कंटाळून वर्षभरापूर्वी डॉ. पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. त्यानंतर त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षामध्ये प्रवेश केलेला नव्हता.

Navi Mumbai : नवी मुंबई दलाल-बिल्डरांच्या घशात घालू देणार नाही; सागर नाईक यांचा इशारा

नवी मुंबई शहरात सध्या धोकादायक इमारतीच्या पुनर्वसनाचे वारे वाहू लागले आहे. सर्वसामान्य लोकांना मोठी घरे मिळावीत, यासाठी सरकारने क्लस्टरसारख्या योजना लागू केल्या. मात्र क्लस्टर योजनेचा खरा फायदा बिल्डरांना होत असून सर्वसामान्य जनतेच्या माथी परत एकदा लहान घरे मारली जात आहे. त्यामुळे बिल्डरांच्या घशात जाणारी नवी मुंबई वाचविण्यासाठी क्लस्टर योजनेत बदल करणारा प्रस्ताव आणला असल्याचा दावा भाजप सभागृह नेते सागर नाईक यांनी केला.

Akola News : आदिवासीनिमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत पोलिसांना मारहाण करणाऱ्या 20 जणांना अटक

अकोल्यातल्या महान गांवात आदिवासी दिनानिमित्त आयोजित भव्य मिरवणुकीच्या वादादरम्यान एका PSIसह एका पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण झाली होती. या प्रकरणात अकोला पोलिसांनी 20 जणांना अटक केली. महान येथे मिरवणुकीतील वाद मिटवण्यासाठी गेलेल्या एका PSI आणि पोलिस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. पोलिसांना मारहाण करताना त्यांच्या मागे मिरवणुकीतील लोकांनी पाठलाग केला. याचेच हे VIDEO आणि CCTV समोर आले होते. या प्रकरणात अकोला पोलिसांनी आता 20 जणांना ताब्यात घेतले आहे.

Gadchiroli News : आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवी एसओपी; जपतलई सर्पदंश दुर्घटनेनंतर राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचा निर्णय

गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील आश्रमशाळेत झालेल्या सर्पदंश घटनेनंतर आता आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन एसओपी निश्चित करण्यात येणार आहे. सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी आज घटनास्थळाला भेट देत मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Beed Politics : 11 नगरसेवकांनी फेसबुक प्रोफाइलवरून आमदार विजयसिंह पंडित यांचे फोटो हटवल्याने बीडच्या राजकारणात खळबळ

बीडच्या नगरपालिकेमध्ये अजित पवार राष्ट्रवादीच्या गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली एक हाती सत्ता मिळाली. मात्र आता या सत्तेला सुरुंग लागताना पाहायला मिळत आहे. 11 नगरसेवकांचा एक गट आमदार विजयसिंह पंडित यांच्या विरोधात गेल्याचे चर्चा आहे. अशातच बीड नगरपालिकेत सत्ता स्थापन होऊन अवघे सात महिने उलटत नाहीत, तोच सत्ताधारी अजित पवार राष्ट्रवादी अंतर्गत गटबाजीचा मोठा भडका उडाला आहे. ज्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पालिकेवर झेंडा फडकवला, त्या विजयसिंह पंडित यांचेच फोटो 11 नगरसेवकांनी आपापल्या सोशल मीडिया प्रोफाईलवरून हटवल्याने बीडच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

America Iran War : इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनीवर केवळ अमेरिकेच्या नौसेनेचेच नियंत्रण; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनीवर केवळ अमेरिकेच्या नौसेनेचेच नियंत्रण आहे. तसेच या युद्धात झालेले नुकसान आम्ही इराणकडून वसूल करू. इराणला कोणतीही नुकसान भरपाई मिळणार नाही. त्याऐवजी या युद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई इराणने अमेरिकेला द्यावी, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.

Thane News : ठाण्यातील मुंब्रा येथे रेल्वेतून पडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू

ठाण्यातील मुंब्रा रेल्वे ब्रिजजवळ रेल्वेतून पडून 27 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. साईराज बेणारे असे मृत युवकाचे नाव असून, रेल्वेतून पडल्यानंतर तो मुंब्रा खाडीतील लोखंडी रॉडला अडकला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, रेल्वे पोलीस आणि मुंब्रा पोलस घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल करण्यात आला आहे.

मुंबई मेट्रोचा विस्तार होणार, आता थेट विमानतळाला जोडणार

नवी मुंबईतील बेलापूर ते पेंधर मेट्रो 1 मार्गिकेचा विस्तार बेलापूर ते सागर संगम मेट्रो 1 अ व पेंधर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो २ मार्गिके अंतर्गत केला जाईल. या मार्गिकेच्या अंमलबजावणीसह संपूर्ण जबाबदारी मुंबई मेट्रो रेल कॉपेरिशनवर (एमएमआरसी) असेल. त्यानुसार आता मेट्रो 1 अ व मेट्रो 2 अशा एकूण 17.09 किमीच्या मेट्रो मार्गिकेचा प्रस्ताव एमएमआरसीकडून तयार केला जात आहे.

Nashik : नाशिक महापालिकेच्या 13 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस

नाशिकमधील खड्ड्यांचा प्रश्नावरुन राजकारण तापलं आहे. खड्ड्यांच्या मुद्द्यावरून पालिका आयुक्त आक्रमक झाले आहेत. महापालिकेच्या 13 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीसला सात दिवसात उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहे.

पुणे-सातारा महामार्गावर शिरवळमध्ये भीषण अपघात; मावळ-तळेगावच्या ४ तरुणांचा मृत्यू

पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. भरधाव कार आयशर ट्रकला धडकल्यामुळे हा अपघात झाला. वेदांत वारिंगे, सोनलिंग ठाकूर, आदित्य गरुड आणि निखिल राऊत अशी मृत तरुणांची नावे आहेत

चोपड्यात तृतीयपंथीयांचा दशामाता आगमन सोहळा उत्साहात

जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात तृतीयपंथीयांच्या वतीने दशामाता आगमन सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात दशामातेच्या मूर्तीचे मुखदर्शन आणि आरती करण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुण्यात तिरंगा बाईकच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे शहरातील एफसी रोड दुपारी दोनवाजेनंतर वाहतुकी साठी बंद राहणार आहे. वाहनधारकाने पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. एफसी रोड वरील ललित महाल हॉटेल चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक, तुकाराम महाराज पादुका चौक, गरवारे चौक या मार्गाने तिरंगा रॅली निघणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com