

नांदेड शहरात देखील पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने विक्री केली जात असल्याचा प्रकार उघड झाला.रात्री FDA आणि नांदेड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनाचा मोठा साठा जप्त केला. नांदेड शहरातील मन्यार गल्ली येथे ही कारवाई करण्यात आली.
नाशिकच्या देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील आहेर वस्ती जवळ काल रात्री च्या सुमारास ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूच्या तस्करीचा मोठा पर्दाफाश झाला. संशयास्पद हालचाली करणारी मारुती सुझुकी इरर्टिगा ग्रामस्थांनी अडवून देवळा पोलिसांच्या ताब्यात दिली. त्यानंतर वाहनाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. या कारवाईत १४ लाख ९२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे. या कारवाईतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गुटखा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान. वाहनाच्या पुढील व मागील दोन्ही नंबर प्लेटसमोर रिमोटद्वारे नियंत्रित होणारा काळा पडदा बसविण्यात आला होता.
वैद्यकीय (MBBS, BAMS आदी) व अभियांत्रिकीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात घेतलेल्या बीए, बीएससी, बीकॉम, डिप्लोमा किंवा इतर बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर शिष्यवृत्ती किंवा फ्रीशिपचा अर्ज भरताना दक्षता घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.
पिंपरी-चिंचवडच्या मोशी येथील इमारत दुर्घटनेत अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी बचाव पथकाचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. मात्र, प्रतिकूल परिस्थितीमुळे जवानांना आतपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत असल्याने आता इमारतीचे एक-एक मजले पाडून शोध व बचावकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार यंत्रणांकडून पुढील टप्प्यातील बचावमोहीम सुरू करण्यात आली आहे.
टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी आणखी दोन संशयितांना अटक केली आहे. पवन यादव आणि हरिओम अशी त्यांची नावे असून त्यांना उत्तर प्रदेशातील आग्रा येथून ताब्यात घेण्यात आले. या कारवाईनंतर अटक आरोपींची संख्या 12 वर पोहोचली आहे. दोघांना पुढील चौकशीसाठी भिवंडी येथे आणण्यात येत असून न्यायालयात हजर केले जाणार आहे.
जालना जिल्ह्यातील रेवगाव येथे कृषी विभागामार्फत वितरित करण्यात आलेल्या सोयाबीन बियाण्यांबाबत गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. बियाण्यांची उगवण न झाल्याने १५ शेतकऱ्यांची सुमारे २५ एकरवरील पेरणी वाया गेली. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले असून मोठा आर्थिक फटका बसला आहे. संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
मंत्रालयातील दूषित पाणीपुरवठ्यामुळे कर्मचाऱ्याना अतिसार आणि उलट्या होत असल्याची तक्रार समोर येत आहे. टाकीतील पाणी कशामुळे दूषित झाले, याची चर्चा रंगली आहे. मंत्रालयातील सर्व फिल्टरमधील पाणी दूषित झाले असून कर्मचारी वारंवार आजारी पडत असल्याची तक्रार होत आहे. महिनाभरापूर्वीसुद्धा अशी घटना घडली होती, असे सांगण्यात येत आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याचे पुढे आले आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये ३० ते ४० मिनिटे राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती आहे. या चर्चेत नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि आसपासच्या जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्याच्या दिशेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. समान नागरी कायद्याबाबत नियमावली तयार करण्यासाठी उच्च स्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची समावेश या समितीत असणार आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा आणि अशैक्षणिक कामाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने आज (ता. ०९ जुलै) अमरावतीमध्ये मोर्चा काढण्यात आलेला आहे. अमरावती शहरातील इरवीन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा निघालेला आहे.
शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांची आज दुपारी चार वाजता सरसकट कर्जमुक्ती, हमीभाव, शेतकरी सन्मान योजना, पीकविमा यांसह विविध कृषी प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा होणार आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी तसा निरोप तुपकर यांना दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील भाषणातून काल फ्रस्टेशन दिसून आलं आहे. त्यांनी भाषणातून खूप थाप्पा मारल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री म्हणून कदाचित हे शेवटचं अधिवेशन असेल. कदाचित त्यांना लवकरच केंद्रात कॅबिनेट मंत्री केले जाईल. फडणवीस यांना जबरदस्तीने केंद्रात मंत्री केलं जाईल, असा दावा आमदार आदित्य ठाकरे यांनी दावा केला आहे.
* महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना, सर्व शिक्षक संघटना समन्वय समिती नाशिक यांच्या वतीने राज्यव्यापी शाळा बंद धरणे आंदोलन
* ईदगाह मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शिक्षकांचा पायी मोर्चा, हजारोंच्या संख्येने मोर्चात शिक्षण सहभागी
* कार्यरत शिक्षकांवरील टीईटी अट तात्काळ रद्द करावी
* तामिळनाडू, तेलंगणा व उत्तर प्रदेश प्रमाणे कार्यरत शिक्षकांबाबत निर्णय घ्यावा
* विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख पदवीधर यांची झालेली पदोन्नती रद्द करावी, मुख्याध्यापक पदोन्नती अन्याय दूर करावा
* संच मान्यता धोरण तात्काळ रद्द करावे
* शिक्षकांना बीएलो व एसआयआरसी यांसारखी अशैक्षणिक कामे देणे बंद करावी, पदोन्नती करताना प्रथम विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक या क्रमानेच करावी अशा विविध मागण्या घेऊन प्राथमिक शिक्षक यांचे आज राज्यव्यापी धरणे आंदोलन
राज्य सरकारकडून अधिसूचना निघू दे किंवा जमीन मोजणी होऊ द्या, कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, अशी भूमिका माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मांडली आहे.
शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात वारीचं नियोजन करण्यात आलं असून 18 जुलै रोजी विठ्ठलाला साकडं घालण्यासाठी सद्बुद्धी दिंडीचं नियोजन करण्यात आलं आहे. वाखरी ते पंढरपूर अशी ही दिंडी निघणार आहे. या दिंडीमध्ये 13 जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित राहणार आहेत. शिवाय शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्या सर्व नेत्यांना यावेळी निमंत्रित केलं जाणार आहे.
नागपूरच्या महापालिकेतील काँग्रेसचा गोंधळ अद्याप सुरुच असून वडेड्डीवार आणि धानेरकर या दोन्ही गटांच्या नगरसेवकांनी आज विभागीय आयुक्तांसमोर हजेरी लावत आपलं संख्याबळ नोंदवलं. या संख्याबळाच्या आधारेच पालिकेतील गटनेता निश्चित केला जाणार आहे.
दरम्यान, कोर्टाने दिलेल्या सूचनेनुसार आज आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयात येऊन संख्याबळ सादर केलं. यावेळी 16 नगरसेवक होते अशी माहिती खासदार धानोरकर यांनी दिली.
विभागीय आयुक्त यांनी आज आमचं म्हणणं ऐकून घेतलं. त्याचबरोबर दुसऱ्या गटाचं देखील म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. सोमवारपर्यंत त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी वेळ दिला आहे. ज्यांचं संख्याबळ असेल त्यांचा गट नेता असेल. आमचं संख्याबळ असलं आमचा गट नेता असला तरी तो 27 काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसाठी काम करेल. यामध्ये वरिष्ठ पातळीवर कुठलाही हस्तक्षेप नसेल. काँग्रेसच्या नगरसेवकांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळं अगोदरच आम्ही सुरेंद्र अडबाले यांचं गटनेता म्हणून पत्र दिलेलं आहे, असंही यावेळी धानोरकर यांनी सांगितलं.
कोल्हापुरात ऐतिहासिक छत्रपती शाहू मिलची पडझड सुरूच
मुसळधार पावसामुळे शाहू मिलची संरक्षक भिंत ढासळली
कोटीतीर्थ तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याकडील भिंतीचा काही भाग कोसळला
कोल्हापुरात सुरू असणाऱ्या पावसाचा परिणाम
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या ऐतिहासिक ठेव्याचं जतन आणि संवर्धन करण्याची गरज
सावंतवाडीतील न्हावेली गावात गेल्या 3 दिवसांपासून वीजपुरवठा खंडित आहे. गावासाठी स्वतंत्र वायरमनची मागणी करणाऱ्या सरपंचांवर महावितरणच्या अधिकाऱ्याने अरेरावीची केलीय. वायरमन देणार नाही, काय करायचे ते करून घ्या, अशा मुजोर भाषेमुळे ग्रामस्थ संतापलेत. अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी नागरिक करतायत.
विधानभवनासमोर क्रांतीकारी संघटना आक्रमक, सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी, रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात आंदोलन, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने आज पुण्याच्या दिशेने प्रस्थान ठेवलंय... आळंदीतील गांधी वाड्यातील मुक्कामानंतर सकाळी 6 वाजता पालखी मार्गस्थ झालीय... पिंपरी-चिंचवड आणि विश्रांतवाडी मार्गे पालखी संगमवाडीत येणारय... तिथे दोन्ही माऊलींचा पालखी संगम होणारय... टाळ-मृदंगाच्या गजरात हजारो वारकरी वारीत सहभागी झाले आहेत.
राज्यात शिक्षक संघटनांनी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने कडक भूमिका घेतली आहे. आज ९ जुलै रोजी होणाऱ्या या आंदोलनात जर कोणी शाळा बंद ठेवून सहभागी झाले, तर संबंधितांवर थेट कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
यवतमाळ ग्रामपंचायत निवडणूक सदस्यांचे आरक्षण जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानुसार ग्रामपंचायत सदस्यांचे अंतिम आरक्षण जाहीर होणार आहे.
खालापूर तालुक्यातील मुठा (ठाकूरवाडी) गावाच्या डोंगरावरून भूस्खलन झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून गावातील ५०० लोकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे.
हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात काल मध्यरात्री भूकंपाचे तीन धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरली हे गाव असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता अनुक्रमे 4.6, 3.6 आणि 3.9 एवढी नोंदवण्यात आली आहे.
संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं आज ९ जुलै रोजी पुणे शहरात आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता पालखी मार्गावरील अनेक रस्त्यांवर सकाळपासून वाहतुकीवर तात्पुरते निर्बंध असणार आहेत. त्यामुळे बोपखेल फाटा ते विश्रांतवाडी चौक आणि पालखी मार्गावरील विविध रस्ते टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी धानोरी रोड तसेच इतर पर्यायी अंतर्गत मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिकच्या चांदवड-देवळा तालुक्याच्या हद्दीतील चोर चावडी बधब्यावर पर्यटनासाठी आलेल्या एका 21 वर्षीय तरुणाचा डोहाच बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ऋषिकेश शशिकांत संसारे असे मृत तरूणाचे नाव आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.