ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतानं वापरलेल्या एअर डिफेन्स सिस्टिमची जगभरात चर्चा झाली, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
काँग्रेसचा भारतीय सैन्याच्या ताकदीवर विश्वास नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली. तसंच कुठल्याही सैन्य करावाईचे काँग्रेस पुरावे मागत असल्याचंही मोदी यावेळी म्हणाले.
केवळ राजकारणासाठी काँग्रेसनं ऑपरेशन सिंदूरवर प्रश्न उपस्थित केले, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्यामुळं तुम्हाला हेडलाईन मिळू शकते पण तुम्हाला देशवासियांचं समर्थन मिळणार नाही, असंही मोदी यावेळी म्हणाले.
पहलगाम हल्ल्ल्यानंतर आम्हाला ऑपरेशन सिंदूर करण्यापासून कोणत्याही देशानं भारताला कारवाई करण्यापासून रोखलं नव्हतं, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात दिली.
ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांनी योगेश कदम यांच्यावर केलेल्या सर्व आरोपांचे पुरावे दिले. या पुराव्याच्या आधारे योगेश कदम यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट कॅबिनेट घेत मंत्र्यांची कानउघडणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे, शिवसेनेचे योगेश कदम आणि संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे, सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. यापुढे जर पुन्हा सरकारला अडचण निर्माण होईल, अशी कृती झाली तर मला विचार करावा लागेल, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिला आहे.
घुसखोर बांगलादेशींची नावे मतदार यादीतून हटवण्यासंदर्भात आज शिवसेनेच्या प्रतिनिधीमंडळाने दिल्ली येथील भारतीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त मा. ज्ञानेश कुमार, माहिती आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू, मा. विवेक जोशी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत घुसखोर बांगलादेशी मतदारांचा मुद्दा उपस्थित करत त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्याची मागणी केली.
वैद्यनाथ बँकेच्या 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. निवडणुकीतून यशश्री मुंडे यांनी माघार घेतली आहे. तत्कालीन संचालक मंडळाने माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्याकडेच नेतृत्व देण्याचा निर्णय घेतलाय. दोन महिलांमध्ये प्रीतम मुंडे आणि सुरेखा मेनकुदळे बिनविरोध निवडून आल्या आहेत.
करुणा शर्मांनी महादेव मुंडे यांच्या पत्नीची ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला.पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी देखील येथे भेटायला यायला पाहिजे, तुम्ही जातीच्या नावावर राजकारण केलं पण तुम्ही त्यांना भेट द्यायला येत नाहीत असं त्या म्हणाल्या.
वरिष्ठ पोलीस अधिकारी दया नायक यांना अखेर सहायक पोलीस आयुक्त (ACP) पदावर बढती मिळाली आहे. विशेष बाब म्हणजे ही बढती त्यांना निवृत्तीच्या अवघ्या दोन दिवस आधी मिळाली आहे. 31 जुलै 2025 रोजी ते पोलीस खात्यातून सेवानिवृत्त होत आहेत.
प्रांजल खेवलकर यांच्यासह सात आरोपींना पोलीस कोठडी संपल्याने पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात हजर करण्यात आलं आहे. या सुनावणीसाठी रोहिणी खडसे या स्वत: वकिलीचा कोट घालून न्यायालयात आल्या आहेत. त्या पती प्रांजल खेवलकर यांच्यासाठी न्यायालयात वकील म्हणून युक्तीवाद करण्याची शक्यता आहे. रोहिणी खडसे यांच्याकडे वकिलीची सनद आहे.
काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर आणि शोभा बच्छाव यांनी संसदेत भाजपचे खासदार निशीकांत दुबे यांना घेरल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी प्रसिध्द झाल्या होत्या. दुबेंनी मराठी लोक, महाराष्ट्राविषयी वादग्रस्त विधाने केल्यानंतर या खासदारांनी त्यांना जाब विचारला होता. त्यावर आत दुबेंनी लॉबीमध्ये कुणी चालता-फिरता हसले तर त्याच्या बातम्या बनविल्या जातात, असे म्हटले. त्याला गायकवाड यांनी लगेच प्रत्युतर दिले.
आमदार एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी कथित रेव्ह पार्टीप्रकरणी अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाईचा व्हिडीओ लीक केल्याचा आरोप खडसेंनी केला होता. हा आरोप पुणे पोलिसांनी फेटाळून लावला आहे. असा कोणताही व्हिडीओ लीक केला नसल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
पिंपरी-चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसंच वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सोशल मीडियातून ही माहिती दिली. पिंपरी-चिंचवडकरांसाठी दिलासादायक आणि ऐतिहासिक ठरणाऱ्या या निर्णयाला आज मूर्त स्वरूप मिळालं आहे, ही अतिशय समाधानाची बाब आहे. मी मुख्यमंत्री महोदय यांसह संपूर्ण मंत्रिमंडळाचे मनापासून आभार मानतो. पिंपरी-चिंचवडसारख्या वेगानं विकसित होणाऱ्या महापालिकेला स्वतंत्र जिल्हा व सत्र न्यायालयाची नितांत गरज होती. नागरिकांना आता पुण्याला न जाता स्थानिक न्यायालयांतूनच न्याय मिळेल, याचा आनंद आहे, असे अजित पवारांनी म्हटले आहे.
ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याबाबत सूचक विधान केले. मुंबई हल्ल्यानंतर त्याची जबाबदारी स्वीकारत केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला, असे सांगत प्रियांका यांनी अमित शाह यांनी जबाबदारीही घेतली नाही, अशी टीका केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. कोकाटे यांचाही राजीनामा घेतो पण त्यापूर्वी शिवसेनेच्याही मंत्र्यांचा राजीनामा घ्या, अशी अट टाकल्याची माहिती आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या 78 व्या वर्धापनदिन सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेही सहभागी होणार आहेत. ते शेकापच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. नुकतेच शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना आमंत्रण दिले होते.
शहराध्यक्षपदावरून पायउतार झालेले भाजप नेते स्वप्निल शाह हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. शहर भाजपमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत कलहातून हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. शहा यांनी नुकतीच शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर मंत्री माणिकराव कोकाटे यांची सुरू असलेली बैठक संपली असून, त्यात काय झालं, यावर भाष्य करण्याचे मंत्री कोकाटे यांनी टाळले. दरम्यान, मंत्री कोकाटे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी लावली. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यावर काय निर्णय होणार, हे अद्याप समोर आलेलं नाही. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतील आणि मंत्री कोकाटे यांच्यावरील निर्णय जाहीर करतील.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यात गेल्या अर्धा तासांपासून चर्चा सुरू आहे. यात त्यांनी दिलगिरी व्यक्त करताना, भविष्यात अशी विधान करणार नसल्याची ग्वाही दिली. मंत्री कोकाटे यांच्या या दिलगिरीवर अजितदादा काय निर्णय घेणार, याचा उत्सुकता वाढली आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावर निर्णय होणार की, नाही होणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
'आम्ही व्यक्तीविरोधात नाही. प्रवृत्ती विरोधात आहोत. माणिकराव कोकाटे विधिमंडळात रमी खेळत होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मंत्री कोकाटे किती असंवेदनशील आहेत, हे दिसते. अजितदादांनी त्यांचे खातं काढून माणिकरावांना द्यावं. त्यांना मुख्यमंत्रीपदावर बसावं, याला आमचा विरोध नाही. परंतु शेतकऱ्यांशी निगडीत असलेल्या खात्यावर संवेदनशील व्यक्ती असावी, एवढी अपेक्षा आहे. अजितदादांनी आम्हाला तसा शब्द आहे. त्यामुळे निर्णयाकडे लक्ष आहे. निर्णय झाला नाही, तर आम्ही राज्यभरात अजितदादांना फिरू देणार नाही', असा इशारा छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावर निर्णय घेत असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील मंत्रालयात दाखल झाले आहेत. दरम्यान, मंत्री छगन भुजबळ देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी पोचले आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावर अजितदादा काय निर्णय घेतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.
'कितीदा चुकणार, कितीवेळा माफ करणार. सतत चुका करत असल्याने, किती वेळा माफ करायचे', असा सवाल अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याचे संकेत दिले. नाशिकमधील शेतकरी संघटनेने मंत्री कोकाटे यांची बाजू घेत, अजितदादांची भेट घेतली. कोकाटे यांचा राजीनामा घेऊ नका, अशी मागणी या शेतकरी संघटनांनी अजितदादांकडे केली. त्यावर अजित पवार यांनी हे विधान केले. मंत्रिपद देताना आम्ही निर्णय घेतला होता. त्यावेळी तुम्ही आले नव्हता. आता राजीनामा घेत आहोत, तर आला, असेही अजित पवार यांनी शेतकरी संघटनेला म्हटले.
धाराशिव मधील शिवसेनेचे राज्य समन्वयक राजन साळवी यांच्या बैठकीत राडा झाला आहे. माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बॅनरवरील फोटो हटवल्यानंतर नाराज झालेल्या सावंत समर्थकांनी साळवी यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली. तानाजी सावंत जिल्ह्यातील एकमेव शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांचा बॅनर वर का फोटो नाही? असा सवाल करत कार्यकर्त्यांनी साळवी यांच्या समोर जोरदार घोषणाबाजी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे वादग्रस्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पदाचा आज फैसला होणार आहे. पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई मंत्रालयात त्यांनी भेट घेतली. अजितदादांच्या दालनात मंत्री कोकाटे आता भेटीला पोचले असून, तिथं काय चर्चा होते, अन् काय निर्णय होतो, याकडे आता लक्ष लागले आहे.
पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांची कारवाई म्हणजे, निव्वळ बदनामी करण्याचे कटकारस्थान आहे. पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले आहे. प्रांजल खेवलकर याने मद्य घेतल्याचा रिपोर्ट आला, मग ड्रग्स घेतल्याचा का आला नाही. वैद्यकीय अहवाल माध्यमांमध्ये कसा आला. महिलेकडे ड्रग्स सापडले असून,तिला पहिले आरोपी का करण्यात आले. तिथं प्रांजल खेवलकर याला पहिलं आरोपी केलं. त्याला मुख्य आरोपी करण्याचं कारण काय? मोबाईलमधील फोटो बाहेर कसे आले. पोलिस कुणाच्या तरी सांगण्यावरून काम करत आहेत. रेव्ह पार्टीची व्याख्या काय ते पोलिसांनी सांगावी. सत्य काय ते बाहेर येईलच, असे सांगताना माझ्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज ऑपरेशन सिंदूरसंदर्भात लोकसभा आणि राज्यसभेमध्ये चर्चा होणार आहे. या चर्चेसाठी काँग्रेसला सुमारे दोन तासांचा वेळ देण्यात आला आहे. विरोधी पक्षाकडून चर्चेला सुरुवात करण्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे, अखिलेश प्रसाद सिंह, रेणुका चौधरी, रजनी पाटील हे इतर संभाव्य वक्ते सहभागी होणार आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परळीतील व्यापारी महादेव मुंडे खून प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून ते मुंडे कुटुंबीयांची परळीत तर देशमुख कुटुंबियांची केजमध्ये भेट घेणार आहेत.
यमनमधील केरळची नर्स निमिषा प्रिया हिला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. या वृत्ताला ग्रँड मुफ्ती कार्यालयाने पुष्टी दिली आहे. निमिषा ही सध्या यमनची राजधानी सना येथील कारागृहात आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरी जाणार आहेत. राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थावर भेटीचे नियोजन आहे, पण भेट किती वाजता होणार, याची माहिती अद्याप समजलेली नाही.
Pune rave party: डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यासह ६ जणांना आज पुन्हा न्यायालयात हजर करणार
पुणे ड्रग्स पार्टी प्रकरणी अटकेत असलेले एकनाथ खडसे यांचे जावाई डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यासह ६ जणांना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ६ जणांची पोलिस कोठडी आज संपत असल्याने त्यांना न्यायालयात पुन्हा हजर करणार येणार आहे. त्यांच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ होणार की त्यांना न्यायालयीन कोठडी मिळणार हे दुपारी समजेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.