Maharashtra Politics Live : भयंकर, हस्ताक्षर खराव आहे म्हणत 8 वर्षाच्या विद्यार्थ्याला मेणबत्तीचे चटके; हातच पोळला, गुन्हा दाखल

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर..
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama

Malad Crime News : भयंकर, हस्ताक्षर खराव आहे म्हणत 8 वर्षाच्या विद्यार्थ्याला मेणबत्तीचे चटके; हातच पोळला, गुन्हा दाखल

मालाड पूर्व भागात असणाऱ्या गोकुळधाम फिल्म सिटी रोडवर एका खाजगी ट्युशनमध्ये शिक्षकेनं 8 वर्षाच्या विद्यार्थ्याला मेणबत्तीचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हस्ताक्षर खराब असल्याचे कारणाने मारहाण करत लहान मुलाच्या हातावर मेणबत्तीने चटके दिले आहेत. यामुळे मुलाचा दोन्ही हातांवर भाजल्याच्या जखमा झाल्या असून शिक्षिका राजश्री राठोड विरोधात कुरार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

CM Devendra Fadnavis News : अण्णासाहेब डांगे यांचा भाजप प्रवेश, चर्चा मात्र जयंतरावांचीच; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?

आगामी स्थानिकच्या तोंडावर राज्यात मोठ्या प्रमाणात महायुतीत प्रवेश होताना दिसत आहे. भाजपमध्ये सध्या इन्कमिंग वाढले असून सांगलीतही भाजपने दुसऱ्यांदा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अण्णासाहेब डांगे यांनी हातात कमळ घेतल्यानंतर राज्यात राजकीय चर्चांना उधान आले आहे. पण चर्चेच्या केंद्रस्थानी होते ते जयंत पाटील. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या प्रश्नावर सूचक उत्तर दिले. कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशाचे संकेतही त्यांनी दिले. यावेळी ते म्हणाले, तुम्हाला अपेक्षित असलेला प्रवेश आमच्या मनात सध्या तरी नाही. त्यांच्या या उत्तराने उपस्थित असलेल्यांमध्ये एकच हशा पिकला. तसेच अनेकांनी टाळ्यांचा कडकडाटही केला.

Pune Crime News : जेवणासाठी 'थांबा' घेतलेल्या बसमधील प्रवाशाला मारहाण करत लुटले; 95 लाखांचं सोनं लंपास

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कराड तासवडे टोलनाका परिसरात असणाऱ्या श्रावणी हॉटेल येथे लुटमारीची घटना उघडकीस आली आहे. जेवणासाठी 'थांबा' घेतलेल्या बसमधील प्रवाशाला मारहाण करत 95 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात जमावाने एकाला पकत पोलिसांच्या स्वाधीन केलं असून तीन ते चार चोर पसार झाले आहेत. तर याचा तपास तळबीड पोलीस करत असून परिसरात खळबळ उडाली आहे.

एकनाथ शिंदे खासदारांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना; देशभरातील राज्यप्रमुखांचीही घेणार भेट

पावसाळी अधिवेशनादरम्यान दिल्लीत शिवसेना खासदारांसोबत शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक होणार आहे. तसेच देशभरातील राज्य प्रमुखांचीही भेट यावेळी शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे घेणार असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.

अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफचा लगेचच बाजारावर परिणाम होणार नाही - अर्थतज्ज्ञ

अमेरिकेनं भारतावर लावलेला टॅरिफचा लगेचच बाजारावर इम्पॅक्ट होणार नाही, त्यांचे डेलिगेशन येणार आहे त्यानंतर याबाबत स्पष्टता होईल. ही फक्त प्रोविजन आहे, यानंतर अजून ॲनालिसिस होईल मग खरा निर्णय होईल. टॅरिफपेक्षा जास्त १८ टक्के टॅक्स आहे. अमेरिका बाजारात अनियमितता तयार करत आहे. त्यामुळं नेहेमी अमेरिकन बॉण्डमध्ये गुंतवणूक होते, त्यानं डॉलर आणखी मजबूत होतो. त्यामुळं लोकांनी टेन्शन घ्यायची गरज नाही, अशी माहिती अर्थव्यवस्था विश्लेषक केदार ओक यांनी माहिती दिली आहे.

Maharashtra Politics Live : रोहिणी खडसेंनी घेतली पुण्याच्या आयुक्तांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. त्यांचे पती प्रज्वल खेवलकर यांना खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा दावा त्यांनी केला. तसेच या प्रकरणचा सखोल तपास करावा अशी मागणीही त्यांनी केली.

Maharashtra Politics Live : शिवभोजन थाळी बंद होणार?

2020 मध्ये उद्धव ठाकरे सरकारने सुरु केलेली शिवभोजन थाळी योजना बंद होणार का? असा सवाल विचारला जात आहे. न मिळणारे अनुदान, ग्रामीण भागात बंद केंद्र यामुळे या योजनेला घरघर लागली आहे.

Maharashtra Politics Live : तुम्हाला अपेक्षित असलेला प्रवेश आमच्या मनात नाही : फडणवीस

तुम्हाला अपेक्षित असलेला पक्षप्रवेश आमच्या मनात नाही, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

Anna Dange News : अण्णा डांगे यांचा भाजपमध्ये प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. डांगे यांची ही घरवापसी आहे. त्यांनी आपल्या मुलांसह भाजपचे कमळ हाती घेतले आहे.

Rohit Pawar News : दोषी अधिकाऱ्यांची पाठराखण नको

परभणीमध्ये सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू हा पोलीस कारवाईत झाला, हे आम्ही वारंवार सांगत होतो. आज सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणात उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले त्याबद्दल मा. सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार. आतातरी सरकार दोषी अधिकाऱ्यांची पाठराखण न करता त्यांच्यावर ठोस कारवाई करेल, अशी अपेक्षा आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.

Lok Sabha News : देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डाचा समावेश

देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डाचा समावेश पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत करावा आणि केंद्र सरकारने वेळच्या वेळी कॅन्टोनमेंट बोर्डाला आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आज लोकसभेत केली.

Malegaon Blast : उद्या निकाल लागण्याची शक्यता

महाराष्ट्राज गाजलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल गुरूवारी लागण्याची शक्यता आहे. तब्बल १७ वर्षांनंतर हे प्रकरण निकाली निघणार आहे. बॉम्बस्फोट सहा जणांचा मृत्यू झाला होता. भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या प्रकरणात आरोपी आहेत.

ED Action : कर्नाळा बँकेची मालमत्ता परत 

अंमलबजावणी संचालनालयाच्या मुंबई विभागीय कार्यालयाने पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या प्रकरणात सक्षम प्राधिकरण, एमपीआयडी (महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेले) यांना ३८६ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता परत केल्या आहेत. बँकेच्या ठेवीदारांचे पैसे बुडाले आहेत त्यांना त्यांचे पैसे परत करता यावेत, यासाठी ईडीने हा निर्णय कोर्टाच्या आदेशानुसार घेतला आहे.

Shirdi Update : साईबाबांच्या 9 नाण्यांचा वाद पेटला; अरुण गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानानं शिर्डी ग्रामस्थं आक्रमक

साईबाबांच्या 9 नाण्यांविषयी माहिती देताना अरुण गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केल्याने शिर्डी ग्रामस्थं आक्रमक झाले आहेत. साईबाबांचा DNA दाखवण्याबाबतचे गायकवाड यांनी केलेले विधानावरून वाद उफळला आहे. साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदेंना दिलेली 9 नाणी आपल्याकडे असल्याचा दावा अरुण गायकवाड यांनी केला. पत्रकार परिषद घेऊन धर्मादाय आयुक्तांच्या अहवालाचा संदर्भ देत हा दावा केला आहे. वादग्रस्त विधान केल्याची चूक लक्षात आल्यानंतर गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली.

Ajit Pawar And Chava Sanghtana : 'अजितदादा शब्दाचे पक्के नाहीत'; मंत्री कोकाटेच्या राजीनाम्यावरून 'छावा'चा हल्लाबोल

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्या संदर्भात शब्द दिला होता. मात्र आता अजित पवार शब्दाचे पक्के नाहीत, हे यातून दिसून आलं आहे. कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांच्यासोबत पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्ट्या करणे हे राज्यातील शेतकरी आता सहन करणार नाही. राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद करण्यासाठी मराठवाडा, विदर्भ, खानदेश, असा दौरा छावा आणि शेतकरी प्रश्नावरती समाविचारी असणाऱ्या संघटनासोबत घेऊन काढणार आहोत. अजित पवारांच्या शब्दाला सरकारमध्ये देखील किंमत राहिलेली नाही, असा टीका छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी केली.

Latur Update : मंत्री कोकाटे अभय देण्याच्या अजितदादांच्या निर्णयावर छावा संघटना आक्रमक

महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्री माणिकराव कोकाटे यांना अभयाचे संकेत मिळाल्याने, छावा संघटना आक्रमक झाली आहे. लातूर इथं आंदोलन करत, कृषिमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 'दादाचा वादा खोटा.. अजित पवार क्या हुआ तेरा वादा', अशा घोषणा देत छावा संघटना आक्रमक झाली.

Nilesh Lanke : केंद्रीय विश्वविद्यालयासाठी खासदार लंकेंनी घेतली केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांची घेतली भेट

अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय विश्वविद्यालयाची स्थापना करण्याची मागणी करत खासदार नीलेश लंके यांनी एक महत्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा प्रस्ताव केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्याकडे सादर केला. महाराष्ट्रात सर्वसामान्यांसाठी एकही केंद्रीय विश्वविद्यालय नसताना खासदार लंके यांनी अहिल्यानगरमध्ये केंद्रीय विश्वविद्यालय स्थापना करण्याची औपचारिक मागणी केली आहे.

Sambhaji Brigade : प्रवीण गायकवाडांवर हल्ला, संभाजी ब्रिगेडच्या दोन्ही संघटना एकत्र येणार; मनोज आखरी यांची मोठी माहिती

ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या घडामोडी घडत असतानाच, राज्यातील आणखी दोन संघटना एकत्र येणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. संभाजी ब्रिगेडच्या दोन संघटना एकत्र येणार असल्याची चर्चा असून, तसं सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल झालं आहे. राजकारणात सक्रिय होण्यासाठी दोन्ही संभाजी ब्रिगेडचे एकत्रीकरण होईल. याबाबत थोड्याच दिवसात घोषणा होईल. प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला झाल्यानंतर दोन्ही संघटना एकत्रित करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मनोज आखरी यांनी दिली.

Somnath Suryawanshi Case : विजयाबाई सूर्यवंशी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मानले आभार

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणांमध्ये दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिले होता. महाराष्ट्रातील राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याला आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने देखील हा आदेश कायम ठेवला. यावर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. प्रकाश आंबेडकर एका भावासारखे माझ्या पाठीशी उभे राहिल्याची प्रतिक्रिया दिली. 'संविधानासाठी माझ्या मुलाची हत्या झाली, त्याला आता न्याय मिळेल', असा विश्वास विजयाबाई यांनी व्यक्त केला.

Somnath Suryawanshi Case Update : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणावर 'सर्वोच्च' निर्णय; सुरेश धस यांची प्रतिक्रिया

परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचे निर्णय कायम ठेवत पोलिसांवर गुन्हे नोंदवण्याचा आदेश दिला आहे. यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी एवढ्या मोठ्या प्रकरणावर मी भाष्य करणं योग्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यावर निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया दिली.

Baramati Police live: बारामती वाहतूक पोलिसांनी घेतला मोठा निर्णय 

बारामतीत रविवारी झालेल्या भीषण अपघातानंतर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. अवजड वाहनांना सकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत बारामतीत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे.

Sanjay shirsat live: सफाई कर्मचारी यांच्या हक्काच्या घरांबाबत धोरणावर चर्चा 

शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले असून निधीबाबतच्या मुद्यावर शिरसाट हे अजित पवारांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. सफाई कर्मचारी यांच्या हक्काच्या घरांबाबत धोरण निश्चित करण्याबाबतचा मुद्दा अधिवेशनात मांडण्यात आला होता. यावर चर्चा करण्याचे आश्वासन अजितदादांनी दिले होते.यावर बैठकीत चर्चा होणार आहे.

Nashik live:  त्र्यंबकेश्वर मंदिराच्या माजी विश्वस्थ ललिता शिंदे यांना न्यायालयानं ठोठावला लाखाचा दंड 

मुंबई : शिवसेनेच्या महिला शाखेच्या नाशिक तालुका अध्यक्षा आणि नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या माजी विश्वस्थ ललिता शिंदे यांना मुंबई उच्च न्यायालयाने एक लाखांचा दंड ठोठावला आहे. उच्च न्यायालयाने ललिता शिंदे यांना दाखल केलेल्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या याचिकेबद्दल तीव्र शब्दांत निषेध नोंदवत एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाचा वेळ वाया घालवणाऱ्या याचिका लोकशाही प्रक्रियेचा गैरवापर करतात आणि त्यामुळे गंभीर कारवाई आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटलं आहे.

BJP Live: आण्णा डांगे स्वगृही परतणार 

सांगलीतील ज्येष्ठ नेते आण्णा डांगे हे आपल्या दोन्ही मुलांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, ते स्वगृही परतणार आहेत.

Supreme Court News: सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरण, आज सुनावणी

परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणात सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. ज्येष्ठ वकील प्रकाश आंबेडकर सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण म्हणजे रडगाणं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभेतील कालचे भाषण हे देवेंद्र फडणवीसांच्या भाषेत रुदाली म्हणजे रडगाणं होतं, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

माणिकराव कोकाटे 22 मिनिटे पत्ते खेळत होते- रोहित पवार

कृषिमंत्री सभागृहात केवळ ४२ सेकंद पत्ते खेळत नव्हते तर तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळत असल्याचा विधानमंडळाच्या चौकशीचा अहवाल असून हा अहवाल मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे देखील सादर केला असल्याची माहिती आहे. सरकार याबाबत खुलासा करेल का? सभागृहात तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळणाऱ्या कृषिमंत्र्यावर हे सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना स्व. अटलजींच्या तर उपमुख्यमंत्री अजितदादांना स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का? असा सवाल रोहित पवार यांनी ट्विट करत केला आहे.

दिवाळीनंतर महापालिका निवडणूक

आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात पंचायत समितीच्या निवडणुका होतील त्यानंतर जिल्हा परिषदे आणि महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. दिवाळीनंतर निवडणुका घेण्याचे संकेत निवडणूक आयोगाने दिले आहेत.

ज्ञानेश्वरी मुंडे घेणार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट

परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्ये प्रकरणात त्यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी ज्ञानेश्वारी यांनी केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ज्ञानेश्वरी मुंडे यांना भेटण्यासठी उद्याची वेळ देण्यात आली आहे.

लाडक्या बहिणीच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांकडून वसुली

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ तब्बल 14 हजार पुरुषांनी घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सरकारचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पावले उचलत लाभ घेतलेल्या पुरुषांकडून वसुली करण्याचे निर्देश दिले आहे.

नितीन गडकरी यांच्या उंची इतका माणूस दिसत नाही, शरद पवारांकडून कौतुक

अर्थतज्ज्ञ चिंतामणराव देशमुख यांच्या नावाने सरहद, पुणे संस्थेच्या वतीने दिला जाणारा 'चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२५' हा पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना माजी केंद्रीय कृषीमंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, आज पार्लमेंटमध्ये आम्हालाही खासदार लोक भेटतात. त्यातले निदान ७०% खासदार मला सांगत असतात, "गडकरींशी मीटिंग आहे, आमच्या तालुक्यातला हा रस्ता, आमच्या मतदारसंघातला हा रस्ता" सबंध खासदारांना त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. कर्तुत्वाने कामाने आणि स्वभावाने ही स्थिती त्यांनी कमावलेली आहे. त्यामुळे सी. डी. देशमुख यांचा जो नावलौकिक होता त्यांना साजेल असं या ठिकाणी व्यक्तीची निवड करायची झाली तर गडकरींइतकं उंचीची दुसरी व्यक्ती आज आम्हाला दिसत नाही. म्हणून मी आज सरहद आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद देतो की, त्यांनी त्यांची योग्य प्रकारे निवड केली. तुम्हा सगळ्यांच्या वतीने मी त्यांना अंत:करणापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद !

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com