Maharashtra Live Updates : सरकारी दवाख्यान्यात बोगस औषधांचा पुरवठा? आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांचीही कबुली

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Maharashtra Political Live updates
Maharashtra Political Live updatesSarkarnama

Prakash Abitkar News : सरकारी दवाख्यान्यात बोगस औषधांचा पुरवठा? आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांचे उत्तर

राज्यातील सरकारी दवाखान्यांना औषधं पुरवणाऱ्या बोगस कंपन्यांचा भांडाफोड झाला असून सरकारी रुग्णालयांना बोगस औषधांचा पुरवठा होत असल्याची कबुली आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांनी दिलीय. त्यांनी ही माहिती विधीमंडळात बोगस औषधांच्या पुरवठ्यावरून पडसाद उमटल्यानंतर दिली आहे.

Anjali Ambedkar News : 'भाजप किंवा भाजपबरोबर असलेले पक्ष सोडून कोणाबरोबरही युती'; अंजलीताई आंबेडकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्यादृष्टीने पक्षाची पुन्हा एकदा बांधणी करणं, कार्यकर्त्यांची संवाद साधनं, कार्यकर्त्यांचा मत जाणून घेणे आणि त्या दृष्टीने पुन्हा एक पक्षामध्ये उत्साह निर्माण करणं यासाठी प्रयत्न करत असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या आणि प्रकाश आंबेडकरांची पत्नी अंजली आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी भाजप किंवा भाजपबरोबर असलेले पक्ष सोडून इतर कोणाबरोबरही आपण युती करायला तयार आहोत. आमची लढाईची भाजप बरोबरची असून कट्टर हिंदुत्ववादाच्या संदर्भातली असल्याचेही त्या म्हणाल्या.

Gopichand Padalkar-Jitendra Awhad News : 'वाह क्या सीन है!', विधानसभेतील राड्यावर सुषमा अंधारे यांची जोरदार टीका

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे गोपिचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये विधिमंडळात तुफान राडा झाला. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुकी केली. यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक पोस्ट करत जोरदार टीका केलीय. त्यांनी, 'वाह क्या सीन है!' ज्या विधिमंडळाने प्रचंड अभ्यासू आणि सुसंस्कृत नेत्यांची भाषणे ऐकली ते आज गुंडागर्दीपर्यंत येऊन पोहचले... हे दुर्दैवी आहे...!! असे म्हटलं आहे.

Gopichand Padlkar : हाणामारीच्या घटनेवर गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी

विधीमंडळाच्या आवारात आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. या प्रकरणी गोपीचंद पडळकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. विधानसभेच्या प्रांगणात जी घटना घडली आहे, ती अत्यंत दुर्दैवी आहे. त्याचे अतिव दुःख विधानसभेचा सदस्य म्हणून मला आहे. विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांच्याकडे याबाबत दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दांत गोपीचंद पडळकर यांनी हाणामारीच्या घटनेवर दिलगिरी व्यक्त केली आहे.

Devendra Fadnavis : विधीमंडळाच्या आवारातील हाणामारीवर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान

विधीमंडळाच्या आवारात घडलेली घटना अतिशय चुकीचे आहे. अशी घटना घडणे, योग्य नाही. विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांनी गंभीर दखल घ्यावी आणि संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी विनंती मी केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात, हे विधानसभेला शोभणारे नाही. म्हणून संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या आवारातील हाणामारीवर दिली.

Gopichand Padlkar : आमदार गोपीचंद पडळकर यांना तातडीने विधानभवानात बोलावून घेतले

विधीमंडळाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. जयंत पाटील आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये चर्चा झाली. त्यानंतर बावनकुळे यांनी गोपीचंद पडळकर यांना तातडीने विधानभवनात बोलावून घेतले आहे.

Uddhav Thackeray : ज्यांनी पास दिले, त्यांच्यावर कारवाई करावी : उद्धव ठाकरे

ते समर्थक आहेत की गुंड आहेत? ही परिस्थिती राज्याची आली असेल तर विधानभवनाला अर्थ काय? ज्यांनी त्यांना पास दिले, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तो कोणीही असली तरी ज्यांनी त्यांना पास दिले, त्याचे नाव समोर आले पाहिजे. कारण हा अधिकार अध्यक्षांचा असतो. त्यांचीही दिशाभूल केला का हाही प्रश्न आहे. अशी मारामारी आणि आमदारांना धक्काबुक्की ही गुंडागर्दी विधानभवानपर्यंत पोचली असेल तर हे फार अवघड आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळातील हाणमारीवर दिली.

Jitendra Awhad : विधीमंडळात ते मलाच मारायला आले होते : जितेंद्र आव्हाड

विधानसभेत भाषण करून बाहेर आलो, मोकळी हवा घ्यायला बाहेर उभा होता. ते मलाच मारण्यासाठी आले होते. विधानसभेत विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आमचा? कुठंतरी मवाल्यासारखं फिरतो, आमच्या आई बहिणीवरून शिव्या देतो. सत्तेचा एवढा माज? असे सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधीमंडळातील कार्यकर्त्यांच्या हाणमारीच्या घटनेवर उपस्थित करत प्रतिक्रिया दिली.

विधानमंडळाच्या आवारात आव्हाड अन् पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधीमंडळाच्या आवारातच हाणामारी झाली आहे. विधीमंडळाच्या आवारात हा अभूतपूर्व प्रसंग घडला आहे. काही वेळापूर्वीच आव्हाड यांना धमकीचा मेसेज आला होता. तसेच, काल आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यात वाद झाला होता.

Uddhav Thackeray Meet Fadnavis : उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी विरोधी पक्षाच्या नियुक्तीबाबत चर्चा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधीमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. या भेटीत त्यांनी हिंदी सक्तीबाबत फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. तसेच, विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाच्या नियुक्तीबाबत या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.

Maharashtra Live Updates : हनी ट्रॅपवरून नाना पटोले आक्रमक

नाशिक येथील हनी ट्रॅपच्या मुद्द्यांवरून काँग्रेस आमदार नाना पटोले आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने याबाबत खुलासा करावा अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

Maharashtra Live Updates : फडणवीसांची ऑफर नाही, या तर टपल्या अन् टिचक्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सोबत येण्याच्या दिलेल्या ऑफरने खळबळ उडाली आहे. पण ही ऑफर नाही. या तर टपल्या आणि टिचक्या आहेत, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Maharashtra Live Updates : आम्हाला कर्नाटकमध्ये जाण्याची परवानगी द्या : मुश्रीफांच्या मतदारसंघातील गावाची मागणी

कोल्हापूर जिल्ह्यात नुकतीच जिल्हा परिषदेच्या गटांची पुनर्रचना झाली. यात कागल तालुक्यातील म्हाकवे गाव सिद्धनेर्ली गटात गेल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. निर्णय बदला किंवा आम्हाला कर्नाटकमध्ये जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Maharashtra Live Updates : जितेंद्र आव्हाड यांना गलिच्छ शिव्या देणारा मेसेज

जितेंद्र आव्हाड यांना गलिच्छ शिव्या देणार मेसेज त्यांच्या मोबाईलवर आल्या. त्यासंदर्भात त्यांनी ट्विट करत माहिती दिली. हा मेसेज मला आता विधानभवनात असतांना आला . महाराष्ट्रात काय सुरू आहे? अशी विचारणा त्यांनी केली.

Maharashtra Live Updates : विधानभा अध्यक्ष दुतोंडी - भास्कर जाधव

भास्कर जाधव आक्रमक झाले. विधानसभा अध्यक्ष विरोधकांना बोलू देत नाहीत. सरकारला पाठीशी घालतात ते दुतोंडी आहेत, असा हल्लाबोल भास्कार जाधव यांनी केला.

Jitendra Awhad : एकनाथ शिंदेंनी पहाटे 3.30 ला फाईलवर सही केली, जितेंद्र आव्हाडांनी केलं कौतुक

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंड भरुन कौतुक केले आहे. एकनाथ शिंदेंनी पहाटे 3.30 ला एका फाईलवर सही केली. पहाटे साडे तीन ही काही सही करण्याची वेळ नाही. पण त्यांनी केली. असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Nashik Congress : नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये काँग्रेसकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. इच्छुक उमेदवाराकडून अर्ज भरून घेण्याचं काम सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शहरातील काँग्रेस भवनात उमेदवारांची गर्दी झाली आहे.

Dipak Kate : दिपक काटेला न्यायालयात सुनावणीसाठी हजर करणार

संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक प्रकरणातील आरोपी दिपक काटेला थोड्या वेळात न्यायालयात सुनावणीसाठी हजर करणार आहेत. न्यायालय परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासन सज्ज आहे. ही सुनावणी अक्कलकोट तालुक्यातील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एम. एम. कल्याणकर यांच्या न्यायालयात होणार आहे.

Suresh Dhas : महादेव मुंडे हत्या प्रकरणात सुरेश धस यांचे खळबळजनक आरोप

महादेव मुंडे हत्या प्रकरणी विजयसिंह बांगर यांनी केलेल्या आरोपांबद्दल विचारणा करण्यात आली असता भाजप आमदार सुरेश धस यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.

गोट्या गिते हा सायको किलर असून त्याने फक्त १२ गुंठ्यासाठी त्याला मारलयं. तो गरीब माणूस होता असं सुरेश धस म्हणाले. यात गोट्या गीते, राजू फड, वाल्मिक कराडचा धाकटा मुलगा या सर्वांची नावे बाळा बांगर जो आकाबरोबर असायचा त्याने माध्यमांसमोर हे सांगितलेले आहे. मी जेव्हा आकाला भेटायला गेलो, तेव्हा एक माणसाचं चमडं, हाडं आणि त्याचे रक्तही यांच्या ऑफिसच्या टेबलवर होते, हे बाळा बांगर बोललेत असं सुरेश धस यांनी सांगितलं आहे.

Nashik accident : नाशिकमध्ये अपघातात ७ जणांचा मृत्यू 

नाशिकमध्ये दिंडोरी- वणी रोडवर मध्यरात्री एक भीषण अपघात झाला. अल्टो कार आणि मोटारसायकल यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाल्याने कार रस्त्याशेजारील नाल्यात उलटली. कार नाल्यात उलटल्यानंतर प्रवाशांच्या नाका तोंडात पाणी गेलं. यामुळे सर्वजण गुदमरले. यातच ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मोटारसायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

Raj Thackeray : बिऱ्हाड आंदोलकांनी घेतली राज ठाकरेंची भेट

महाराष्ट्र राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. नाशिक मध्ये आदिवासी आयुक्तालयासमोर आठ दिवसांपासून विविध मागण्यांसाठी या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. यातील काही आंदोलकांनी आज ठाकरे यांची भेट घेतली व त्यांची समस्या मांडली. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन न्याय मिळवून देऊ असं आश्वासित केल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे.

Beed Mahadev Munde Case : महादेव मुंडेंच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न, ICU मध्ये उपचार सुरू

बीड मधील परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सध्या त्यांच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. महादेव मुंडे हत्या प्रकरणी न्याय नाही मिळाला तर पुन्हा आत्महत्या करणार असल्याचा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. शिवाय परळीतून मुंडेंच्या बंगल्यावरून फोन आल्यानंतर तपास थांबवल्याचा गंभीर आरोप त्यांनी पोलिसांवर केला आहे.

बीडच्या कायदा सुव्यवस्थेला वाली नाही, यशोमती ठाकूरांचा फडणवीसांवर निशाणा

ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन केल्याचा मन हेलावणारा प्रकार घडला आहे. एक महिला आपल्या पतीला न्याय मिळावा म्हणून पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजवत असून देखील पोलिस प्रशासन अजगरासारखे झोपा काढत असेल तर सामान्य माणसाला न्याय कसा मिळणार ? राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब बीडमध्ये सुरु असलेले अराजक कोणाच्या आशीर्वादानं सुरु आहे ! बीडच्या कायदा सुव्यवस्थेला कुणी वाली आहे की नाही ? ज्ञानेश्वरी मुंडे यांचा टाहो ऐका, स्व. महादेव मुंडे यांच्या खुन्यांना जेरबंद करण्यासाठी तातडीने कार्यवाही करा, अशी मागणी काँग्रेसच्या माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

संजय राऊत मानहानी प्रकरणात नारायण राणेंना कोर्टाचा झटका

नारायण राणे यांनी संजय राऊत मानहानी प्रकरणात माझगाव कोर्टाने समन्स बजावले होते. मात्र, या समन्सला आव्हान देणारा अर्ज त्यांनी न्यायलायत केला होता. न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे राणेंना आता कोर्टात हजर राहावे लागणार आहे.

Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवारांना कांग्रेस हायकमांडकडून नोटीस

राज्याच्या पावसाळी अधिवेशनात जनसुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आलं. मात्र, यावेळी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ गटनेता विजय वडेट्टीवार यांनी या विधेयकाला विरोध का केला नाही? असा सवाल उपस्थित करत त्यांना कांग्रेस हायकमांडकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. जनसुरक्षा विधेयकाला सभागृहात विरोध का केला नाही याबाबतचं उत्तर या नोटीसमधून मागण्यात आलं आहे.

Shivsena UBT : पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारीवरून ठाकरे गटाची टीका

पुण्यातील तळजाई टेकडीवरील तरुणींवर झालेल्या हल्ल्यावरून ठाकरे गटाने आवाज उठवला आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुण्यात सात नवीन पोलीस ठाणी सुरू होत आहेत, अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून करण्यात आली आहे. राज्यकर्त्याच्या आदेशानुसार पोलीस गुन्हेगारांच्याच पाठीशी उभे राहत असतील तर नवीन कितीही पोलीस ठाणी सुरू झाली तर त्याचा काय उपयोग? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

Raj Thackeray : 18 जुलै रोजी राज ठाकरे मिरा भाईंदरमध्ये सभा घेणार

मराठी आणि हिंदी भाषेच्या वादानंतर मिरा-भाईंदरमध्ये मनसेकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या यशस्वी मोर्चानंतर त्याच भागात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे 18 जुलै रोजी सभा घेणार आहेत. त्यामुळे ते मराठीच्या मुद्द्यावरून या सभेत काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Suresh Dhas : कृषी अधिकाऱ्याच्या पत्नीच्या नावानं 78 कंपन्या, सुरेश धसांचा गौप्यस्फोट

भाजप आमदार सुरेश धस यांनी पीक विम्यावरून कृषी संचालक विनय आवटे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 2016 ते 2020 दरम्यान पंतप्रधान पिकविमा योजनेत कृषी आयुक्तालयातील अधिकारी आणि विमा कंपन्यांनी संगनमताने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप धस यांनी विधानसभेत केला. तर या प्रकरणाची चौकशी एसआयटीच्या माध्यमातून करावी अशी मागणीही त्यांनी केली.

MNS Politics : मनसे नेते प्रकाश महाजन मुंबईकडे रवाना

मनसे नेते प्रकाश महाजन यांनी नाशिक येथील शिबिराला त्यांना न बोलवल्यामुळे त्यांनी पक्षावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मनसेच्या नेत्यांकडून त्यांची मनधरणी करण्यात आली. अशातच आता अमित ठाकरे यांनी त्यांना मुंबईला भेटण्यास बोलावलं आहे. त्यामुळे प्रकाश महाजन हे छत्रपती संभाजीनगरहून मुंबईकडे रवाना झाले आहेत.

प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ल्याशी संबंध नाही - जन्मेजयराजे भोसले

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये हल्ला करत त्यांच्या वंगण फासण्यात आले होते. त्यानंतर गायकवड हे ज्या कार्यक्रमासाठी गेले होते त्याचे आयोजक जन्मेजयराजे भोसले यांच्यावर टीका करण्यात येत होते. गायकवाड यांनी देखील जन्मेजयराजे भोसले यांनी सहकार्य केले नसल्याचे म्हटले. त्यावर या घटनेनंतर मी प्रवीण गायकवाड यांची भेट घेऊन माफीही मागितली होती. मात्र तरीही त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर तो आम्ही दूर करू,’ असे जन्मेजयराजे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com