Maharashtra Politics Live Update : विलास घुले हत्या प्रकरण; आरोपींवरील कठोर कारवाईच्या मागणीसाठी कुटुंबीयांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व राजकीय व प्रशासकीय घडामोडी वाचा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

शेतीचा वाद विकोपाला; पुतण्याने तलवारीचा वार करत काकाच्या हाताचे बोट छाटले

बीड मध्ये शेतीचा वाद इतक्या टोकाला गेलाय ज्यात पुतण्याने आपल्या काकावर तलवारीचा वार करत हाताचे बोट छाटले आहे. तर पुतण्याने चुलत भावावर देखील तलवारीनेच गंभीर हल्ला केलाय. घटना बीड तालुक्यातील रुई शहाजानपूर गावात घडली आहे. या प्रकरणी रात्री उशिरा बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

जिल्ह्यात आज पावसाचा 'रेड अलर्ट'; २ ते ५ जुलै 'ऑरेंज अलर्ट'; नागरिकांना सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १ जुलै २०२६ रोजी जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. तसेच २ जुलै ते ५ जुलै कालावधीत जिल्ह्यासाठी 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. ​घाटावर आणि कोकणात या काळात दरडी कोसळण्याचा आणि सखल भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा मोठा धोका आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

तौहीद खान हत्या प्रकरणी धनंजय मुंडेनी विधिमंडळात उठवला आवाज

बीड जिल्ह्यातील परळी येथील तौहीद खान या तरुणाची 28 मे रोजी निर्गुण हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली होती. खान कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी अनेक नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कुटुंबीयांची सांत्वन पर भेटी घेतल्या. दरम्यान आज माजी मंत्री धनंजय मुंडेनी पावसाळी अधिवेशनात तौहीद खान हत्याकांड प्रकरणी विधिमंडळात आवाज उठवला. तसेच खान कुटुंबीयांना शासनातर्फे आर्थिक मदत मिळावी आणि या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.

गडचिरोलीच्या प्रगतीची पावलं पुढे पडताहेत याचा आनंद : अमृता फडणवीस

गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीच्या प्रगतीकडे लक्ष देत आहेच. पण या जिल्ह्याच्या सर्वांगिन प्रगती आणि लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लॅायड्स मेटल्स ही कंपनी मोठे योगदान देत आहे याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस यांनी दिली. गडचिरोलीत लॅायड्स मेटल्सच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत विविध प्रकारचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवक-युवतींना त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमानंतर त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या.

विलास घुले हत्या प्रकरण; आरोपींवरील कठोर कारवाईच्या मागणीसाठी कुटुंबीयांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणात सर्व आरोपीवर कारवाई करावी, या मागणीसाठी बुधवारी(ता.1 जुलै) सकाळपासून घुले कुटुंबीयांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरु केलं होतं. पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर घुले कुटुंबीयांनी आंदोलन स्थगित केलं आहे.  

हवामान विभागाकडून मुंबईकरांचं टेन्शन वाढवणारी अपडेट, पुढील तीन तास मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत बुधवारी (ता.1 जुलै) सकाळपासून धो धो पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले असून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याचदरम्यान, आता मुंबईकरांचे टेन्शन वाढवणारी अपडेट हवामान विभागानं दिली आहे. पुढचे तीन तास मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना बाराही महिने आम्ही दिवसा वीज देणार

Mumbai news : शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक आनंदाची बातमी दिली आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 12 ही महिने आम्ही दिवसा वीज देऊ, सध्या स्थितीमध्ये आम्ही राज्यातील 75 टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज देऊ शकतो. तर हे वर्ष संपेपर्यंत आम्ही 100 टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करणार आहोत, अशी घोषणा यावेळी फडणवीस यांनी केली आहे. सुरुवातीला आठ तास दिवसा शेतीसाठी वीज पुरवठा करू, त्यानंतर शेतीला दिवसा 12 तास वीज उपलब्ध करू दिली जाईल असेही यावेळी फडणवीस यांनी म्हटले आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला भारतीय हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट

कोल्हापूर जिल्ह्याला भारतीय हवामान खात्याने आज ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुर जिल्ह्यात दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. एकीकडे धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस पडत असल्याने पाण्याची आवक देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. तर आता कोल्हापूर शहरातील काही भाग आणि ग्रामीण भागात पडणाऱ्या या पावसामुळे शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळाला आहे.

संभाजीनगरमध्ये HSRP नंबर प्लेट न बसवणाऱ्यांवर आजपासून कारवाईचा बडगा 

ANC: ज्या वाहनधारकांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवले नाहीत, त्यांच्यावर आजपासून कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. एचएसआरपी बसविण्यासाठी काल ३० जून ही शेवटची मुदत होती. त्यात छत्रपती संभाजीनगर RTO कार्यालयाच्या अंतर्गत दिवसभरात १ हजार ११६ वाहनधारकांनी नोंदणी केली. मात्र, तब्बल १ लाख ६८ हजार वाहनधारकांनी या नंबर प्लेटकडे पाठ फिरविली आहे. त्यासाठी त्यांनी नोंदणीही केलेली नाही. त्यामुळे असे वाहनधारक कारवाईच्या रडारवर आहेत. आजपासून अशा वाहनावर कारवाई केली जाणार आहे. ही नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनधारकांना १ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. ३० जूनपूर्वी जुन्या वाहनधारकांनी एचएसआरपी बसविण्यासाठी नोंदणी करून अपॉइंटमेंट घेतल्यास, अशा वाहनांवर दंडाची कारवाई होणार नाही. ही नंबर प्लेट नसेल तर आरटीओ कार्यालयात वाहन हस्तांतरण, पत्ता बदल करणे, कर्जबोजा चढविणे, कर्जबोजा उतरविणे, वाहनांची पुनर्नोदणी, वाहनांत बदल करणे, परवाना नूतनीकरण कामे केली जाणार नाहीत.

Balasaheb Thorat : लोकशाही सक्षमीकरणासाठी मतदार यादीची अचूकता महत्त्वाची; बाळासाहेब थोरात

लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी मतदार यादीची अचूकता महत्त्वाची असते. प्रत्येक बूथवर कार्यकर्त्यांनी सजग राहून जबाबदारीने काम करावे. मतदारांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करणे ही प्रत्येक लोकशाहीवादी कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. त्या अर्थाने मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

GST Collection : जूनमध्ये GST संकलन 1.94 लाख कोटींवर, महाराष्ट्र अव्वल...

देशाच्या जून 2026 मध्ये वस्तू आणि सेवा कर (GST) संकलनात भरीव वाढ नोंदवली गेली असून, एकूण जीएसटी महसूल 1 लाख 94 हजार 812 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत ही 13.9 टक्क्यांची वाढ आहे. जून 2025मध्ये जीएसटी संकलन 1.71 लाख कोटी रुपये होते. राज्यनिहाय जीएसटी संकलनात महाराष्ट्राने पुन्हा एकदा अव्वल स्थान कायम राखले आहे. राज्याने 9 टक्क्यांच्या वाढीसह 30 हजार 714 कोटी रुपयांचे कर संकलन केले.

Sangali Update : शक्तिपीठ महामार्ग विरोधासाठी शेतकरी थेट मुंबईला धडक देणार

सांगली जिल्ह्यातून शक्तिपीठ मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध वाढत असून आक्रमक झालेले शेतकरी बांधव शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आता थेट मुंबई गाठणार आहेत. आक्रमक शेतकरी आता थेट 7 जुलैला मुंबई आझाद मैदान या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधव शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत.

Beed Crime : विलास घुले हत्या प्रकरण; आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाईची मागणी, घुले कुटुंब चढलं पाण्याच्या टाकीवर

विलास घुले हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाईसाठी घुले कुटुंबीय गावातील पाण्याच्या टाकी वरती चढत आंदोलन सुरू केलं. सौरव बजरंग सोनवणे व उर्वरित आरोपी यांना तात्काळ अटक करावी. रमेश घुले यांच्याबद्दल सोशल मीडियावरती खोटी माहिती प्रसारित करून बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. कदम नामक महिलेने केलेल्या खोट्या आरोपाची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. या सर्व मागण्या स्वतः पोलिस अधीक्षक यांनी आंदोलन ठिकाणी येऊन मान्य कराव्यात, तोपर्यंत रमेश घुले, उमेश माने व विलास घुले यांच्या पत्नी टाकीवरून खाली उतरणार नाहीत, असा पवित्रा घेतला आहे.

Sangali Update : सांगलीच्या आटपाडी इथल्या तरुणाला आसाममध्ये 55 कोटीचे सोने तस्करीत अटक

सांगलीच्या आटपाडी येथील एका तरुणास आसाम मध्ये सोने तस्करी करताना अटक करण्यात आली आहे. अक्षय बनसोडे असे या तरुणाचं नाव असून तो आटपाडीचा असल्याचा आसाम पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याच्याकडून तब्बल 55 कोटी रुपयांचा सोन्याचे बिस्कीट जप्त करण्यात आले आहेत.

Ahilyanagar News : निकृष्ट दर्जाच्या खतांच्या विक्रीप्रकरणी 'कृषी गौरव फर्टिलायझर्स'वर कृषी विभागाची कारवाई

निकृष्ट दर्जाच्या खतांच्या विक्रीप्रकरणी मे. कृषी गौरव फर्टिलायझर्स, घोडेगाव (ता. नेवासा) या आस्थापनेवर कृषी विभागाने कारवाई करून 21 लाख 80 हजार 486 रुपये किमतीचा 2 हजार 34 गोण्यांचा बेकायदेशीर खतसाठा जप्त केला आहे. तसेच, संबंधित आस्थापनेचा खत विक्री परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला असून, मालक किरण चंद्रकांत दौंडकर यांच्याविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे यांनी दिली.

Shetkari Karjmukti Yojana : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पात्र शेतकरी खात्यांचा तपशील पोर्टलवर अपलोड

राज्य शासनाने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांचा आत्मविश्वास वाढविणे तसेच शेती क्षेत्राला नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कृषी कर्जमुक्ती योजना' जाहीर केली आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील 1 लाख 92 हजार 282 पात्र शेतकरी खातेदारांचा तपशील शासनाच्या पोर्टलवर अपलोड केला आहे.

Shivsena News : ठाकरे गटाला आणखी धक्का? शिंदे गटाच्या हालचालींना वेग

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना सातत्याने आपली ताकद वाढवत आहे. काही दिवसातच ठाकरे गटातील काही महत्त्वाच्या नेत्यांनी साथ सोडल्याने पक्षासमोर आव्हाने निर्माण झाली आहेत. दरम्यान, केंद्रातील मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोर धरत असून पुढील काही दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते, अशी माहिती समोर येत आहे.

Sachin Ahir : शिंदे सेनेत प्रवेशानंतर आमदार सचिन अहिर यांच्या सुरक्षेत वाढ

शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर आमदार सचिन अहिर यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. उपसभापती पदासाठी त्यांनी शिंदे सेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. गेल्या काही दिवसांत ठाकरे गटाला शिंदे सेनेकडून सलग राजकीय धक्के बसले आहेत. बदललेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सचिन अहिर यांच्या सुरक्षेबाबत विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

JEE-NEET परीक्षांमध्ये मोठे बदल; कोचिंगवरील अवलंबित्व कमी करण्याची तयारी

JEE आणि NEET परीक्षांच्या स्वरूपात बदल करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. शिक्षण मंत्रालयाच्या समितीने प्रवेश परीक्षा शालेय अभ्यासक्रमाशी अधिक जोडण्याची शिफारस केली आहे. यामुळे डमी शाळांवर नियंत्रण मिळवणे, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना आळा घालणे आणि विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण कमी करणे शक्य होणार आहे.

नवी मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; एमआयडीसी परिसर जलमय, वाहतुकीला फटका

नवी मुंबईत रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे तुर्भे एमआयडीसी परिसरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले. काही ठिकाणी 1 ते 1.5 फूट पाणी जमा झाल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. पाण्याचा निचरा मंदावल्याने रस्ते जलमय झाले असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

व्यावसायिक गॅस सिलेंडर दरात कपात

व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्याचा निर्णय पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला आहे. 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात 183.50 रुपयांची कपात झाली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून केली जाणार आहे. तर पाच किलोच्या लहान गॅस सिलेंडरच्या दरातही 13 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

बाल गुन्हेगारांचं वय 18 वरून 16 होणार

बाल गुन्हेगारांचे वय १८ वरून १६ करण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे. गंभीर गुन्हे आणि अंमली पदार्थांच्या तस्करीत अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग पाहता राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. बाल गुन्हेगारांचं कायदेशीर वय 18वरून 16 वर्षे करण्यासाठी केंद्र सरकारकडे विनंती करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे... गुन्हेगारी टोळ्या कायद्याच्या संरक्षणाचा गैरवापर करून मुलांकडून गुन्हे करून घेत आहेत.

काँग्रेसच्या टार्गेटवर विश्वास नांगरे पाटील, विचारले सहा प्रश्न

सकल हिंदू समजाच्या मंचावर जात भाषण केल्यानंतर वादात सापडलेल्या IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले होते. आपण कुठल्याही सेवा नियमांचे उल्लंघन केले नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यांच्या उत्तरानंतरही काँग्रेसने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवत सोशल मीडियामधून त्यांना सहा प्रश्न विचारले आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप नगरसेवकांसाठी नवीन नियम

पक्षाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या नगरसेवकांविरोधात भाजपचे वरिष्ठ नेते आक्रमक झाले आहेत. पक्षशिस्त न पाळणाऱ्यांविरोधात थेट कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. महापालिकेतील पक्षातील पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रस्तावांना आणि निर्णयांना स्वपक्षातीलच नगरसेवकांनी जाहीरपणे विरोध दर्शवल्याने पक्षाची मोठी नाचक्की झाली होती. या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीने नगरसेवकांसाठी एक प्रकारे नवा 'नियम'च काढला आहे.

खताच्या काळाबाजार, साठेबाजीविरोधात कारवाई; सात विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल

शेतकऱ्यांना दर्जेदार खते रास्त दरात उपलब्ध व्हावीत तसेच खतांचा काळाबाजार, कृत्रिम टंचाई, साठेबाजी आणि चढ्या दराने विक्रीला आळा घालण्यासाठी कृषी विभागामार्फत पुणे विभागात (पुणे, अहिल्यानगर व सोलापूर) विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे. या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खत विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली असून १०७ खत विक्री परवाने निलंबित, ६ परवाने रद्द तसेच ७ विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे (एफआयआर) दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई कृषी आयुक्त सुरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) श्री. सुनील बोरकर यांच्या निर्देशानुसार करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com