Maharashtra Politics Live : टीईटी पेपरफुटीतील आरोपींवर मकोकातंर्गत कारवाई करण्यात येणार: दादा भुसे

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व राजकीय व प्रशासकीय घडामोडी वाचा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर
Maharashtra Political Live updates
Maharashtra Political Live updatesSarkarnama
Published on
Updated on

टीईटी पेपरफुटीतील आरोपींवर मकोकातंर्गत कारवाई करण्यात येणार: दादा भुसे

नीटच्या पेपरफुटीचं प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली असतानाच टीईटीचाही सावळागोंधळ उडाला आहे. राज्य सरकार आणि शिक्षण खात्याचा घोळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून टीईटीचाही पेपर फुटला. या पेपरफुटी प्रकरणात राज्य सरकारने दोषींविरोधात कडक पावलं उचलली आहेत. टीईटी पेपरफुटीतील आरोपींवर मकोकातंर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याप्रकरणी एसआयटी गठीत केल्याची माहिती दिली. 

चेंबूर येथे विद्यार्थ्यांच्या बसवर अचानक मोठे झाड कोसळले, महापौरांकडून कारवाईचा इशारा 

मुंबईतील चेंबूर येथे विद्यार्थ्यांनी भरलेल्या शाळेच्या बसवर अचानक मोठे झाड कोसळले. या दुर्घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर परिसरात एकच धावपळ,आक्रोश होता.नागरिक, अग्निशमन दल आणि बचाव पथकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले होते. यानंतर महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटलं

सावकारीचा परवाना देण्यासाठी लाच स्वीकारताना  सहाय्यक निंबधकासह तिघांना अटक

खाजगी सावकारीचा परवाना देण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच मागितली. त्यापैकी तेरा हजार रुपये स्वीकारताना माजलगांव येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात लाचलूचपत विभागाच्या पथकाने छापा मारला. सहाय्यक निबंधकासह तिघांना या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

सामूहिक अत्याचार प्रकरणातील 14 संशयित आरोपी न्यायालयात हजर

जळगाव जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या महिलेवरील सामूहिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात अटक केलेल्या 11 आरोपींना न्यायालयात हजर केले असून त्यांना पाच दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. तर या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण 14 आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यापैकी तिघे अल्पवयीन असल्याने त्यांना बालन्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 23 जागांसाठी 255 उमेदवारी अर्ज दाखल

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 23 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळाली. एकूण 580 अर्जांची विक्री झाली असून त्यापैकी 255 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शेवटच्या दिवशीच 160 अर्ज दाखल करण्यात आले.

लग्नासाठी धर्मांतराची अट घातल्याने तरुणाची आत्महत्या; कोल्हापूरच्या तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल

लग्नासाठी धर्मांतराची अट घातल्याने सांगली शहरातील खणभाग येथील दुर्वांक प्रमोद शेवाळे (वय १९) या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कोल्हापूरच्या तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१ जुलैपासून HSRP नसलेल्या वाहनांवर कारवाई; ३० जूनपर्यंत आगाऊ नोंदणी केलेल्या वाहनांना दिलासा

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने तसेच वाहनांचा वापर करून होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित व नोंदणीकृत सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार HSRP बसविण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ निश्चित करण्यात आली. पण आता १ जुलै २०२६ पासून HSRP न बसविणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, ३० जून २०२६ पर्यंत HSRP बसविण्यासाठी आगाऊ नोंदणी (अपॉइंटमेंट) केलेल्या वाहनधारकांना कारवाईतून सवलत देण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादकांसाठी क्रांतिकारी पाऊल

गेल्या काही वर्षांत हवामान बदल, अवकाळी पाऊस आणि वाढत्या कीड-रोगांमुळे जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी वेळोवेळी बैठका घेऊन आढावा घेतला. बागायतदारांचे उत्पादन व उत्पन्न वाढवण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा आणि काजू उत्पादकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित 'स्मार्ट' शेती प्रायोगिक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नियोजनातून तसेच डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या समन्वयातून कृषी विभाग सिंधुदुर्ग मार्फत राबवल्या जाणाऱ्या या प्रायोगिक प्रकल्पाद्वारे जिल्ह्यातील शेती क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जाणार आहे.

'विकसित भारत रोजगार व आजीविका मिशन (ग्रामीण)' चा पालघर जिल्ह्यात २ जुलै रोजी शुभारंभ

ग्रामीण रोजगार व्यवस्थेला नवे स्वरूप देणाऱ्या 'विकसित भारत रोजगार व आजीविका मिशन (ग्रामीण) – VB-G RAM G' अधिनियम, २०२५ ची महाराष्ट्रात १ जुलै २०२६ पासून अंमलबजावणी सुरू होत असून, त्यानिमित्त २ जुलै २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत जनसंमेलन व योजना शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या निर्देशानुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

Laxman Hake उद्या रोहित पवारही भाजपमध्ये जातील, लक्ष्मण हाकेंचा दावा

लक्ष्मण हाके यांनी महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणावर जोरदार टीका केली. "उद्या रोहित पवारही भाजपमध्ये जातील, अंबादास दानवेही तिकडे असतील. मी हे बाँड पेपरवर लिहून देतो," असा खळबळजनक दावा त्यांनी केला. यावेळी त्यांनी राजकारणात पैसा आणि सत्तेसाठी पक्षांतर होत असल्याचा आरोप करत लोकशाहीचा बाजार मांडल्याची टीका केली. तसेच सरकार समाजात जातीजातींमध्ये आणि समाजामध्ये भांडण लावत असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला.

राहुल नार्वेकरांच्या भेटीचं गूढ उलगडलं! रामदास आठवलेंनी सांगितलं नेमकं कारण

राहुल नार्वेकर यांच्या भेटीमागचं नेमकं कारण काय? केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी स्वतः यावर खुलासा केला आहे. आपल्या मतदारसंघातील झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय लोकसंख्येच्या आधारे आरक्षणात उपवर्गीकरण करण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटणारच होता, असंही मोठं विधान आठवलेंनी केलं.

चेंबुरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळलं

मुंबईतल्या चेंबुरमध्ये एका शाळेच्या बसवर झाड कोसळलं. शाळेतून विद्यार्थी स्कूल बसने घरी जात असताना रोड नंबर 11वर ही घटना घडली.या दुर्घटनेत 10 विद्यार्थी गंभीर झाले असून एक विद्यार्थी बसमध्ये अडकला होता. या विद्यार्थ्याला सुखरुप बाहेर काढण्यात आलंय.

महाराष्ट्रातील अनेक भागात पाच दिवस मुसळधार पाऊस

कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्याच्या काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पुढील चार दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळू शकतो, असा अंदाज आहे. राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे असतील, असे विभागाने म्हटले आहे.

Aaditya Thackeray : रोज आरत्या करायच्या का?

माझी आणि सचिन अहिर यांची रोज भेट व्हायची. त्यांना सगळं काही आम्ही दिलं. अजून किती द्यायचे. यांच्या रोज आरत्या करायच्या का, असा संतप्त सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरेंनी केला.

Sachin Ahir news : टीकेला योग्यवेळी उत्तर देईन

आमदार सचिन अहिर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर उध्दव ठाकरेंच्या नेत्यांकडून टीका सुरू करण्यात आली आहे. या टीकेला योग्य व्यासपीठावर योग्यवेळी उत्तर देईन, असे अहिर यांनी स्पष्ट केले आहे.

Eknath Shinde news : विकेट पडतच राहतील

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. एकत्रित पत्रकार परिषदेत शिंदे यांनी यापुढेही विकेट पडत राहतील, असे सूचक विधान केले आहे.

आदित्य ठाकरेंचे मोठे विधान; हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन देवेंद्र फडणवीस

आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या राजकारणावर थेट टीका केली आहे. हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन देवेंद्र फडणवीस असल्याचे त्यांनी म्हटले आहे. निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना डावलून बाहेरच्या लोकांना पदे दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मराठी पंतप्रधानांचे पंख छाटण्याचे काम सुरू असल्याचेही ते म्हणाले.

चौथीच्या गणिताच्या पुस्तकात मोठ्या चुका; बालभारतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

राज्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर चौथीच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकातील अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. नव्या अभ्यासक्रमानुसार प्रकाशित झालेल्या पुस्तकात गणिततज्ज्ञ रामानुजन यांच्या निधनाच्या तारखेसह विविध माहितीमध्ये चुका आढळल्याने पालक, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम करणाऱ्या या त्रुटींमुळे बालभारतीच्या संपादन आणि पडताळणी प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

शाळेत मोबाईल आणल्याची शिक्षा; विद्यार्थ्यांसमोर 100 हून अधिक फोन केले नष्ट

चीनमधील हुनान प्रांतातील चेनझोऊ येथील एका बोर्डिंग शाळेने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई केली. शाळेत मोबाईल वापरण्यास बंदी असतानाही काही विद्यार्थ्यांनी फोन आणल्याने प्रशासनाने 100 पेक्षा जास्त मोबाईल विद्यार्थ्यांसमोर हातोड्याने फोडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून शाळेच्या निर्णयावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

विधानपरिषद उपसभापतीपदासाठी मविआचा उमेदवार निश्चित; अंबादास दानवेंची घोषणा

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार आणि शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक जमू अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा अर्ज आज दाखल होणार असल्याची माहिती अंबादास दानवे यांनी दिली.

ठाकरेंना आणखी एक धक्का; आमदार सचिन अहिर शिंदे गटात दाखल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. आमदार सचिन अहिर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाची ताकद कमी झाल्याची चर्चा सुरू असून राज्यातील राजकीय घडामोडींना नवं वळण मिळालं आहे.

Pratap Sarnaik News : राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उत्पन्न न वाढल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; प्रताप सरनाईक यांचा इशारा

राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. एक महिन्यानंतर प्रत्येक अधिकाऱ्याच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल. उत्पन्नात अपेक्षित वाढ झाल्याचे दिसले नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनासह बदली, पदावनती यांसारखी शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.

SC Reservation News : सर्वपक्षीय आमदारांची उपवर्गीकरणाविरोधात एकजूट; विधानसभेत स्थगन प्रस्ताव येण्याची शक्यता

अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विषयावर पक्षीय राजकारण विसरून अनूसुचित जातीचे सर्वपक्षीय आमदार एकत्र आले आहे. 15 आमदारांनी निवेदन सादर केल्यावर मुख्यमंत्र्यांनी याविषयी लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, उपवर्गीकरणाविरोधात मंगळवारी महामोर्चा धडकणार असून याविषयावर विधानसभेत स्थगन प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.

SIR Ahilyanagar : मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी प्रशासन सज्ज; हलगर्जीपणा करणाऱ्यावर फौजदारी होणार

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात ‘विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर)’ जाहीर करण्यात आला. 30 जूनपासून प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ होत आहे. राष्ट्रीय कर्तव्य आहे, यामध्ये कोणत्याही स्तरावर हलगर्जीपणा किंवा शासकीय कामात अडथळा आणल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा मतदार नोंदणी अधिकारी किरण सावंत यांनी दिला. सोशल मीडियावरून चुकीच्या अफवा पसरवणाऱ्यांवरही सायबर कायद्यान्वये कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले.

Venezuela Earthquake : भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाला भारताने पाठवले मदत साहित्य, वैद्यकीय उपकरणे आणि फिरते रुग्णालय पोहोचले

‘ऑपरेशन आमिस्ताद’ अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाला भारताने पाठवलेले मदत साहित्य, वैद्यकीय उपकरणे आणि फिरते रुग्णालय पोहोचले आहे. या मानवतावादी मदतीमुळे व्हेनेझुएलातील मदतकार्याला बळ मिळेल, असा विश्वास परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केला. जयशंकर यांनी ‘एक्स’वर यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी म्हटले की, भारताची मदत व्हेनेझुएलात पोहोचली आहे. फिरते रुग्णालय, मदत साहित्य, औषधे आणि वैद्यकीय उपकरणांमुळे भूकंपानंतर सुरू असलेल्या मदतकार्याला गती मिळेल. जयशंकर यांनी या मदतीचे काही फोटोही शेअर केले आहेत.

Ayodhya News : श्रीराम मंदिरात जाण्यासाठी निघालेले काँग्रेसचे अजय राय यांच्यासह प्रतिनिधीमंडळाला पोलिसांनी केलं स्थानबद्ध

काँग्रेसचे प्रतिनिधीमंडळ अयोध्येत प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी जाणार होते. पण, चढाव्यातील चोरीमध्ये गुंतलेल्या भाजप सरकारने उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय अन् प्रतिनिधीमंडळातील इतर सदस्यांना हाऊस अरेस्ट केलं आहे. अखेर या चढावा चोरांना प्रभू श्रीरामांच्या भक्तांची इतकी भीती का वाटत आहे? आता भाजप-आरएसएसच ठरवणार का की कोण प्रभूंचे दर्शन घेईल आणि कोण नाही? कोट्यवधी देशवासियांच्या भावनांचा सौदा करणाऱ्या या भाजप-आरएसएसच्या चढावा चोरांनी लक्षात ठेवावे. भगवान रामांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. तुमची ही खालच्या पातळीची कृती आम्हाला रोखू शकणार नाही, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

CBSE Pattern : त्रिभाषा सूत्राच्या अनुषंगाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी

त्रिभाषा सूत्राच्या अनुषंगाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ‘‘सध्या दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांना हे सूत्र लागू होणार नाही, असे मंडळाकडून सांगण्यात आले. याशिवाय सातवी ते नववीत असलेल्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन (दहावीत गेल्यावर) तिसऱ्या भाषेची बोर्डाची परीक्षा देण्यापासून सवलत देण्यात आली आहे.

Voting SIR : मेघालयात आजपासून घरोघरी मतदारांची पडताळणी

मेघालयमध्ये आजपासून (ता. 30) मतदारयादीच्या विशेष सखोल फेरपडताळणी (एसआयआर) मोहिमेंतर्गत मतदारांची घरोघरी जाऊन पडताळणी सुरू होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. निवडणूक आयोगाने सन 2005ची मतदारयादी आधारभूत मानली असून, या यादीत नाव असलेल्या मतदारांना स्वगणनेचे अर्ज वितरित करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 30 जून ते 29 जुलै या कालावधीत सर्व मतदारसंघांतील घरांना भेटी देतील.

NEET EXAM : ‘नीट’ प्रकरणातील 10 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

‘नीट-यूजी 2026’ पेपरफुटी प्रकरणातील 10 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत दिल्ली न्यायालयाने सोमवारी 11 जुलैपर्यंत वाढ केली. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) सुरू आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 13 आरोपींपैकी 10 जणांची न्यायालयीन कोठडी सोमवारी संपल्याने त्यांना ‘राऊज् एव्हेन्यू’ न्यायालयासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते. यश यादव, मांगीलाल बिवाल, दिनेश बिवाल, विकास बिवाल, धनंजय लोखंडे, तेजस शाह, शुभम खैरनार, मनीषा वाघमारे, मनीषा हवालदार आणि डॉ. मनोज शिरूरे यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली.

HSRP NUMBER PLATE : नंबर प्लेटसाठी आज शेवटची मुदत

राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविण्यासाठी आता फक्त एकच दिवसाची मुदत उरली आहे.. आज शेवटची मुदत आहे

STATE SIR: राज्यात आजपासून मतदारयाद्यांची विशेष फेरतपासणी

राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीची अर्थात SIR मोहीम आजपासून सुरू होत आहे. निवडणुक कर्मचारी घरोघरी गणना अर्जाचे वाटप करणार आहेत.

Nashik: TCS प्रकरण, पीडित तरुणीचे सक्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड

नाशिकच्या TCS कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं शोषण आणि धर्मांतरण प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. पीडित तरुणीचे सक्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचे तपासात उघड झाले आहे. धर्मांतरासाठी वर्षभरापासून आरोपींनी नियोजनबद्ध कट रचल्याचा दावा एसआयटीकडून न्यायालयात केलेल्या चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे

Maharashtra Rain update:पुढील ४८ तास मेघगर्जना, विजांचा कडकडाट

भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुणे जिल्ह्यासह राज्यातील २४ जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. पुढील ४८ तास मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील तीन दिवस पुण्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com