Maharashtra Politics Live Updates : भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार, गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया आली समोर

Sarkarnama Headlines Updates : प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Gunratna Sadavarte
Gunratna SadavarteSarkarnama
Published on
Updated on

भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार, गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया आली समोर 

गुणरत्न सदावर्ते यांनी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला डिवचलं आहे. ते म्हणाले, माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला आहे, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा, भगतसिंह कोश्यारी यांच्यासारख्या एका अभ्यासू व्यक्तीला पुरस्कार मिळाला तर शिवसेना ठाकरे गटाला का टोचत आहे? असं म्हटलं. तसेच ज्यांना शिमगा आणि दिवाळीतला फरक कळत नाही, असे अविचारी लोक आहेत. राऊत काहीही बोलतात, तेही संविधानिक पदावर राहिलेल्या व्यक्तीबद्दल बोलतात, अशी टीका सदावर्तेंनी केली आहे.

'न्याय देवतेने आदेश दिला म्हणून मी शरण गेलो', विकास गोगावले यांचे मोठं विधान 

जामिन झाल्यानंतर सोमवारी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत विरोधकांना समज देताना मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी मोठं विधान केलं आहे. एक केस झाली म्हणून विकास गोगावले गप्प बसणारा नाही, विकास गोगावलेच्या अंगात भरत गोगावले आणि सुषमा गोगावलेचं रक्त आहे. कार्यकत्याच्या वाट्याला गेलल आपल्याला सहन होत नाही. न्याय देवतेने आदेश दिला म्हणून मी शरण गेलो, असं थेट विधान विकास गोगावले याने केलं आहे.

गिरीश महाजनांवर प्रकाश आंबेडकर आक्रमक, वनरक्षक माधवी जाधव यांनाही दिले आश्वासन

मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये प्रजाकसत्ताक दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणामुळे वादाला तोंड फुटलं असून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव वगळून केलेल्या भाषणावर वनरक्षक कर्मचारी माधवी जाधव यांनी आक्षेप घेतला होता. ज्यानंतर राज्यभरात पडसाद उमटले असतानाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी या प्रकरणानंतर वनरक्षक माधवी जाधव यांच्याशी संपर्क साधत त्यांना धीर दिला आहे. तसेच आपण या प्रकरणाचा कायदेशीर पाठपुरावा करण्याचे आश्वासन जाधव यांना दिले आहे.

आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने धुळ्यात महाजन यांचा निषेध

नाशिक येथे प्रजासत्ताक दिनी मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने महिला कर्मचारीने घेतलेल्या आक्षेपाचे पडसाद धुळ्यातही उमटले. धुळ्यात आंबेडकरी अनुयायांनी पूर्णकृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा समोर मंत्री गिरीश महाजन यांचा फोटोला जोडे मारून त्यांच्या फोटोचे दहन केले. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी करण्यात आलीय.

उबाठाच्या सात नगरसेवकांचा व्हिडिओ व्हायरल

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 11 नगरसेवक निवडून आलेत. मात्र यामधील चार नगरसेवक अद्यापही गायब असल्याने उबाठाच्या सात नगरसेवकांनी आपला गट स्थापन केलाय . गटनेता उमेश बोरगावकर, प्रतोद संकेत भोईर याच्यासह उर्वरित पाच नगरसेवकांनी अज्ञात स्थळी राहणे पसंत केले. आज प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन करून त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये उबाठाचे गटनेते उमेश बोरगावकर यांनी आम्हाला मशाल चिन्हावर जनतेने निवडून दिले, त्यामुळे आम्ही जनता आणि पक्षाच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे सांगितले आहे.

संभाजी भिडे गुरुजी यांचे वादग्रस्त विधान

शरद पवार हे राष्ट्रद्रोही आहेत, अस विधान संभाजी भिडे गुरुजी यांनी केलं आहे. भिडे गुरुजी यांची धारातीर्थी यात्रा ही रायगडच्या कर्जत मधील लोहगड, भीमगड, अशा गडकिल्ले मोहिम साठी सुरू आहे. यावेळी त्यांनी शरद पवारांवर जहरी टीका केलीय. शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोही. ते जातिवंत बदमाश असून अशा लवासाची कीड काढून काढून टाकली पाहिजे अस विधान त्यांनी केलं आहे

जिल्हा परिषद निवडणूकीतील अर्ज माघार घ्या, पैसे वाया घालवू नका - मंत्री चंद्रकांत पाटलांचा विरोधकांना खोचक सल्ला...

राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या योजनामूळे सगळेच खुश आहेत, याचे परिणाम महानगरपालिका निवडणुकांमध्ये पाहायला मिळाले, त्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये विरोधकांनी आपले अर्ज माघार घेऊन पैसे वाचवावेत, असा खोचक सल्ला भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना दिला आहे. ते सांगलीमध्ये भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारसभेते बोलत होते.

कल्याण कोळशेवाडी बेपत्ता नगरसेवक प्रकरणी पोलिसांची बाजू स्पष्ट

कल्याण कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी, उमेश बळीराम म्हात्रे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा देवदर्शनासाठी बाहेर गेलेला असून तो त्यांच्या संपर्कात आहे. मात्र काही जणांनी त्याला बेपत्ता असल्याचे पोस्टर लावून बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Republic Day :  बुलडाण्यात ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला चारही मंत्र्यांची दांडी

प्रजासत्ताकदिनाच्या ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला बुलडाण्याचे पालकमंत्री मकरंद जाधव, सहपालकमंत्री संजय सावकारे हे गैरहजर राहिले, तर केंद्रीय मंत्री प्रताप जाधव आणि आकाश फुंडकर हे जिल्ह्याला मंत्री लाभले आहेत. मात्र ते जिल्ह्यात असूनही ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले, त्याबद्दल जिल्ह्यातून नाराजी व्यक्त केली जात आहे

Ambadas Danve : उदय सामंतांनी माझ्या शिवसेना प्रवेशाची प्रोसेस समजावून सांगावी : अंबादास दानवे

विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची प्रोसेस सुरू झाली आहे, असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. त्यावर उदय सामंत यांंनी माझ्या शिवसेना प्रवेशाची प्रोसेस समजावून सांगावी, असे आव्हान दिले आहे.

Bhagat Singh Koshyari : सदावर्तेंनी आगीत तेल ओतले; कोश्यारींना दिलेले पद्मभूषण योग्यच

केंद्र सरकारने माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण दिल्याबद्दल टीका होत असताना ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी कोश्यारी यांना दिलेला पद्म पुरस्कार योग्य असल्याचे समर्थन केले आहे. त्यामुळे कोश्यारी यांना दिलेल्या पुरस्काराच्या वादात सदावर्ते यांनी तेल ओतल्याची भावना व्यक्त होत आहे.

Ganesh Naik Vs Eknath Shinde : नामोनिशाण मिटवण्याची धमकी देणाऱ्या गणेश नाईकांवर शिंदेसेनेचे मंत्री तुटून पडले

भाजपश्रेष्ठींनी परवानगी दिली यांचे नामोनिशाण मिटवून टाकू, असा इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. त्यावर शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी नाईकांवर पलटवार केला आहे. गणेश नाईकांना शिंदेंचं थेट नाव घेणं अवघड जात असेल. पण एक निश्चितपणे सांगतो, वारंवार चॅलेंज देण्याचा प्रयत्न केला, तर आम्हीही शांत बसणार नाही, हे नाईकांनी ध्यानात ठेवावे, असे उत्तर शिरसाट यांनी दिले, तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘एकनाथ शिंदे हे प्रत्येकाला उत्तर द्यायला सक्षम आहेत. त्यामुळे कोणी कितीही वल्गना केल्या तरी शिंदे हे ठाणे सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहेत. बोलणं सोप असतं. पण करणं कठीण असतं. पण ते शिंदेंनी ते करून दाखवलं आहे,’ असा टोला लगावला.

Buldhana : झेंडावंदनाची तयारी करत असतानाच बुलडाण्यात मुख्याध्यापकाचा मृत्यू

बुलडाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातील मोहेगाव जिल्हा परिषद शाळेत आज प्रजासत्ताक दिनाच्या झेंडावंदनाची तयारी सुरू असतानाच मुख्याध्यापक दिलीप राठोड हे चक्कर येऊन कोसळले. शाळेतील सहकाऱ्यांनी त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे मोहेगावमधून हळहळ व्यक्त होत आहे.

'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषाने दिल्ली दुमदुमली; महाराष्ट्राच्या चित्ररथातून दिसली 'आत्मनिर्भर' संस्कृती!

दिल्लीतील कर्तव्यपथावर यंदाच्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राची शान. महाराष्ट्रातील गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा दर्शवणारा भव्य चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाला. रंगीबेरंगी सजावट, लोककलेचे दर्शन आणि गणरायाची भक्ती यामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

भारतीय वायूदलाचे शौर्य! कर्तव्यपथावर 'ध्रुव' हेलिकॉप्टरकडून 'ऑपरेशन सिंदूर'च्या स्मृतींना उजाळा

कर्तव्य पथावर ‘ऑपरेशन सिंदूर’ची भव्य झलक पाहायला मिळाली. प्रहार फॉर्मेशनमध्ये भारतीय सेनेचे ध्रुव अ‍ॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर आकाशात झेपावले असून त्यावर ‘ऑपरेशन सिंदूर’चा झेंडा फडकत होता. यासोबतच सेनेचे रुद्र एएलएच-डब्ल्यूएसआय आणि हवाई दलाचे एएलएच मार्क-IV हेलिकॉप्टरही सहभागी झाले. राजपूत रेजिमेंटने दमदार मार्च केला. ड्रोन वॉरफेअर आणि सूर्यास्त्रसारख्या अत्याधुनिक शस्त्रांचीही प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.

भारतीय वायूदलाचा दिमाख! कर्तव्य पथावर Mi-17 हेलिकॉप्टर्सकडून गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव

दिल्लीतील कर्तव्य पथावर १२९ हेलिकॉप्टर युनिटच्या चार एमआय-१७ 1वी हेलिकॉप्टरांनी आकर्षक ध्वज रचनेत आकाशात झेप घेतली. या हेलिकॉप्टरमधून कर्तव्य पथावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

कर्तव्यपथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे. त्यानंतर आता चित्ररथांचे संचालन सुरु झाले आहे.

Yogi Adityanath Vs Avimukteshwaranand : उत्तर प्रदेशमध्ये योगी यांच्याविरुद्ध सगळा संतसमाज एकवटला

मौनी अमावस्येला अविमुत्तेश्वरानंद गंगास्नानाला जात असताना त्यांना पालखीने जाण्यास मज्जाव करून भक्तगणांवर उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या लाठीमाराने तेथील राजकारण ढवळून निघाले आहे. पवित्र मणिकर्णिका घाटावर हातोडा चालवणाऱ्या सरकारविरोधात अगोदरच हिंदूंमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला असताना शंकराचार्यांना आव्हान देत योगींनी स्वतःसह भाजपच्या पायावर धोंडा मारल्याचे मानले जात आहे. योगी यांच्याविरुद्ध सगळा संतसमाज एकवटला आहे.

Mumbai Crime : 'धुरंधर' चित्रपटातील अभिनेत्याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक

मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी प्रसिद्ध अभिनेता नदीम खान याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. नदीमवर त्याच्या घरात काम करणाऱ्या 34 वर्षीय महिलेने तब्बल 10 वर्षे लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. नदीम खान हा 'धुरंधर' या चित्रपटामुळे चर्चेत होता. पीडितेने असाही आरोप केला आहे की, या १० वर्षांच्या काळात तिने दोनदा गर्भपात करण्यासही भाग पाडले.

India EU Trade Deal : देशातील सर्वात मोठ्या कराराची उद्या घोषणा; 'मदर ऑफ ऑल डील्स'?

भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असलेल्या युरोपियन युनियनसोबत मुक्त व्यापार कराराची घोषणा मंगळवारी भारत-युरोपियन युनियन शिखर परिषदेत केली जाईल. प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होण्यासाठी युरोपियन युनियनचे सर्वोच्च नेते सध्या दिल्लीत आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी यासंदर्भातील माहिती दिली.

Congress Vs CPIM : शशी थरूर माकप प्रवेशाची चर्चा

काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्याबरोबर माकपमध्ये प्रवेश करण्यासंबंधी चर्चा सुरू आहेत. परंतु केरळमधील डाव्या आघाडीचे निमंत्रक टी. पी. रामकृष्णन यांनी रविवारी फेटाळले. शशी थरूर गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसवर नाराज असल्याच्या चर्चा आहे.

Republic Day Wishes 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे इथं ध्वजारोहण झालं. अहिल्यानगर जिल्ह्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.

Satara Crime : कराडमध्ये कोंबड्यांचे शेड सील, 55 कोटीचा अमली पदार्थ जप्त

कराडच्या पाचुपतेवाडी इथून पुण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली. डीआरआय विभागाने ड्रग्ज बनवले जात असलेले कोंबड्यांचे शेड सील केल असून याप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या बाबा मोरे याला अटक केली आहे. पथकाने येथून अंदाजे 55 कोटीचा अमली पदार्थ तयार करण्याचा कच्चा माल व साहित्य ताब्यात घेतल्याचे सूत्रांकडून माहिती मिळते आहे.

Nagpur Update : ताडोबातील लोहखनिज खाणीला परवानगीमुळे व्याघ्र अधिवास धोक्यात; अनिल देशमुखांकडून पुनर्विचाराची मागणी

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य व्याघ्र मार्गिकेत प्रस्तावित लोहखनिज खाणीला राज्य वन्यजीन मंडळाने दिलेल्या परवानगी विरोधात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Mumbai Politics : रायगड, नाशिक पालकमंत्रीपदाचा तिढा कायम; शिवसेना अन् राष्ट्रवादी माघार घेण्यास तयार

रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्यांवर एक वर्षे झाला, तरी तोडगा निघाला नाही. एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस माघार घेण्यास तयार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील यावर तोडगा काढता आलेला नाही.

M K Stalin : तमिळनाडूमध्ये हिंदीला स्थानल नाही; मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन

तमिळनाडूतील हिंदीविरोधी आंदोलनादरम्यान प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहून, 'द्रमुक'चे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी, 'या राज्यात हिंदी भाषेला कोणतेही स्थान नाही', असे ठणकावून सांगितले.

Republic Day Wishes : प्रजासत्ताक दिनासाठी युरोपियन परिषद आणि आयोगाच्या अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित

देशाच्या 77 वा प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून, युरोपियन परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्ता आणि युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला व्हाॅन उपस्थित राहणार आहे. देशाच्या 77 वा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात, देशाची विकासयात्रा, सांस्कृतिक विविधता आणि लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन होणार आहे. 'आॅपरेशन सिंदूर' दरम्यान तैनात करण्यात आलेल्या प्रमुख शस्त्रप्रणालीच्या प्रतिकृतीचा समावेश असणार आहे.

Republic Day Wishes 2026 : देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन, सर्वत्र उत्साहाचं वातावरण

देशात 77 वा प्रजासत्ताक दिन आज सर्वत्र साजरा होत असल्याने देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. राष्ट्रपती देशाचे संविधानिक प्रमुख असतात आणि ते देशाचे प्रथम नागरिक मानले जाते. प्रजासत्ताक दिन म्हणजे देशावर संविधान लागू झाल्याचा उत्सव आहे. म्हणूनच यादिवशी तिरंगा फडकवण्याचा मान देशाच्या राष्ट्रपतींना दिला जातो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थित ध्वजारोहण होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com