Manoj Jarange News : मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीहून निघाल्यानंतर त्यांचा मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे होता. मध्यरात्री दोन वाजता त्यांनी मुक्कामाच्या ठिकाण मराठा बांधवांशी संवाद साधला.
'उपोषणाचा त्रास होतोय, उपोषणात दौरा चांगला नाही. आरक्षण महत्त्वाचे आहे, दौरा महत्त्वाचा नाही. खोपालीपर्यंत जायचा तर माणूस खाऊन पिऊन असला पाहिजे. मी पोलिसांना सांगून पटोद्याहून थेट मुंबईला जाईल.', असे सुतोवाच जरांगे पाटील यांनी केले.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, तुम्ही पाटोद्यातच थांबा मी एकटा मुंबईला जातो. कोणत्या मार्गाने जाणार हे पोलिसांना सांगतो. मला वाटलं फक्त पाच गाड्या माझ्यासोबत असतील. पण तुम्ही येवढे जण सोबत याल वाटलं नव्हतं. तुम्ही पाटोद्यातच थांबा. मी एकटा पुढे जातो.
मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यानंतर सभेमधील मराठा बांधवांनी आम्ही देखील खोपोलीपर्यंत येणार, असे मोठ्याने सांगितले. त्यावर जरांगे पाटलांनी मग तुम्ही जावा मी परत आंतरवाली सराटीत जातो, असे भावनिक साद घालत, आपल्यासोबत कोणी येऊ नका, असे म्हटले.
जरांगे पाटील म्हणाले, हे मी करतोय ते कोणासाठी करतो, माझ्या समाजासाठी करतोय. माझ्या लेकराबाळांसाठी काही करत नाही. समाजाच्या लेकरांच रक्त सांडल नाही पाहिजे. मी येताना बायकोला सांगितलं आहे की, मला काही झालं तर समाजाला काही बोलू नको, कुणाकडून काही घेऊ नको, भीक मागून खा पण समाजाला बोल लावू नको.
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळत आहे. आंतरावली सराटीमध्ये उपोषण करत असताना ते सलाई, पाणी घेत होते. मात्र, आंतरावली सराटीतून निघण्याआधीच त्यांनी उपचार घेण्याचे बंद केले आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळत असल्याचे सांगितले जात होते. पाटोदा येथील सभेत त्यांनी झोपूनच मराठा बांधवांशी संवाद साधला. दरम्यान, आंतरवाली सराटीमधून निघाल्यांतर बीड येथे त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.