

भोंदू अशोक खरात याच्या कबुलीनंतर शिवनिका संस्थानचे सचिव नामकर्ण आवारे यांना सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे. सिन्नरच्या जगदंबा माता पतसंस्थेत खरातने उघडलेल्या ३२ खात्यांना नामकर्ण आवारे यांची सहमती असल्याचे तपासात समोर आले आहे. नामकर्ण आवारे हे सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचे चेअरमन असून या अटकेनंतर सिन्नरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
राज्यातील छतावरील सौरऊर्जा प्रकल्प बसविलेल्या सर्व वीज ग्राहकांना ‘ग्रीड सपोर्ट चार्ज’ भरावा लागणार असल्याची चर्चा सुरू असताना महावितरणने मोठी घोषणा केली आहे. ज्यामुळे राज्यातील 99 टक्के सौर ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. महावितरणने याबाबत भूमिका स्पष्ट करताना, राज्यातील एकूण ३ कोटी १७ लाख वीज ग्राहकांपैकी केवळ ४४ हजार २४६ ग्राहकांनाच हा अधिभार लागू झाल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परकीय चलन वाचविण्यासाठी पेट्रोल-डिझेल, खाद्यतेल, सोने खरेदीवर काटकसर करण्याचे आवाहन केल्यानंतर राज्य सरकारने मोठी पावले उचलली आहेत. दरम्यान आता मुख्यमंत्री फडणवीस देखील ॲक्शन मोडवर आले असून विरोधकांना थेट सुनावले आहे. त्यांनी, मंत्र्यांच्या ताफा कमी करण्यासह त्यांच्या विदेश दौऱ्यावर निर्बंध घातले असून विरोधकांना या उपाययोजनांचे पालन करायचे नसेल तर किमान याबाबत थट्टा-मस्करी करु नये, असे म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. तसेच याच बैठकीत पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रासाठी देखील महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली असून यात नागपूर विमानतळासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मोदी सरकारने २०२६-२७ च्या हंगामासाठी १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
महापालिकेच्या अर्थसंकल्पात विकासकामांच्या निधीवरून आता राजकीय ठिणगी पडली आहे. सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांवर निधीची उधळण होत असताना, दुसरीकडे राष्ट्रवादी आणि इतर विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना मात्र 'दुजाभाव' सहन करावा लागत असल्याचा आरोप होत आहे. या विरोधात आता स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आवाज उठवला असून, त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून 'समान निधी' देण्याची मागणी केली आहे.
शरद पवार यांच्या पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच किर्तनकार संग्राम भंडारे यांच्यासह दहा ते पंधरा गोरक्षकांनी हल्ला केला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला नेत्यावर मंगळवारी पहाटे हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. धुळ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रिता बाविस्कर यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे. धुळ्यातील कथित गोरक्षकांनी हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे.
मुंबईत नीट पेपरफुटीप्रकरणी युवक काँग्रेसकडून आंदोलन केले जात आहे. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कालही दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावर महाराष्ट्रही काम करणार आहे. विरोधकांनी त्याची थट्टा करू नये. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागला आहे. आपण प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत थोडा बदल केला तरी फरक पडेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी हे विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम आणि भवानीपूर मतदारसंघातून निवडून आले होते. आता त्यांनी नंदीग्राम मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ते आता भवानीपूर मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी असतील.
नीट पेपरफुटीचे पुणे कनेक्शन समोर आले आहे. ब्युटी पार्लर चालविणाऱ्या एका महिलेला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नीटचे विद्यार्थी हेरून त्यांना सीबीआयने ताब्यात घेतलेल्या एका आरोपीपर्यंत पोहचविण्याचे काम ही महिला करत होती, असा संशय पोलिसांना आहे.
गेल्या काही दिवसांपासून टाटा समूहाची ज्वेलरी क्षेत्रातील आघाडीची कंपनी 'टायटन'च्या शेअर्सवर मोठा दबाव दिसून येत होता. पण अवघ्या चार दिवसांत या शेअरमध्ये मोठी घसरण झाल्यानं गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे. विशेषतः दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांची संपत्ती या घसरणीमुळे 2800 कोटी रुपयांहून अधिक कमी झाली.
पश्चिम आशियातील तणाव आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन वापराबाबत संयम आणि काटकसर करण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर विविध राज्य सरकारांनीही पावलं उचलण्यास सुरवात केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात मंत्र्यांच्या वाहन ताफ्यात 50 टक्के कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. मोहन यादव यांनीही राष्ट्रीय हितासाठी इंधन बचतीचं आवाहन करत वाहन रॅली बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनीही स्वतःच्या ताफ्यात कपात केली असून शक्य तिथे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यावर भर दिला जात आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हरित रोखे काढून भांडवल उभारणाऱ्या नाशिक महापालिकेला केंद्र सरकारकडून तब्बल 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज निधी मंजूर झाला आहे. या निधीमधून नाशिकमध्ये निर्मल गोदावरी प्रकल्प, शुद्ध गोदावरी अभियान, रामकालपथ प्रकल्पाचा दुसरा टप्पा आणि वाहतूक व्यवस्थापन सुधारणा यांसारख्या विविध विकासकामांसाठी आर्थिक मदत उपलब्ध होणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी हा निधी महत्त्वाचा ठरणार असल्याचं नाशिकच्या महापौरांनी सांगितलं.
होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील इराणच्या 33 पैकी 30 क्षेपणास्त्र तळ अजूनही सक्रिय आहेत. हा तोच प्रदेश आहे, जिथून जगातील सुमारे 20% तेलपुरवठा होतो. जर तणाव पुन्हा वाढला, तर अमेरिकेची युद्धनौका आणि तेलवाहू जहाजे धोक्यात राहू शकतात. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणची लष्करी शक्ती नष्ट झाल्याचा दावा केला होता. पण आता अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या अहवालामुळे ट्रम्प यांच्या दाव्यावरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना वर्षभर सोने खरेदी न करण्याचे आवाहन केल्यानंतर 24 तासांच्या आतच केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. सोन्या-चांदीच्या आयातीवरील सीमा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे आता भारतात सोने, चांदी आणि इतर मौल्यवान धातूंची आयात करणे महाग होणार असून, याचा थेट परिणाम बाजारपेठेतील किमतींवर होणार आहे. सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्क 6% वरून 15% पर्यंत वाढवले आहे. सरकारने सोने आणि चांदीच्या आयातीवर 10% मूलभूत सीमा शुल्कासह 5% उपकर आकारला आहे. कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकरासह सीमा शुल्क 15% पर्यंत पोहोचले आहे.
देशातील जनतेला इंधन बचतीचे आवाहन करत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः एक मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या निम्मी केली आहे. याबाबत त्यांनी आपल्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या 'स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप'ला आदेश दिले आहेत. वडोदरा आणि आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा यांच्या शपथविधीसाठी गेलेल्या गुवाहाटी दौऱ्यात पंतप्रधानांच्या ताफ्यात ही कपात दिसून आली. ताफ्यात इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर वाढवावा, मात्र त्यासाठी नवीन खरेदी करू नये, असे निर्देश एसपीजीला देण्यात आले आहेत.
सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी न्यायालयांच्या आधुनिकीकरणासाठी न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन केली आहे. 40 ते 50 हजार कोटी रुपयांच्या निधीतून ई-न्यायालय उपक्रम आणि आधुनिक संकुले उभारली जाणार आहेत. खटल्यांचा निकाल गतीमान करण्याचा सरकारचा प्लॅन आहे.
केंद्राच्या सूचनांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मंत्री आणि अधिकाऱ्यांचे सर्व नियोजित परदेश दौरे रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. आधी मंजूर झालेले दौरेही थांबवण्यात येणार आहेत. अभ्यास, बैठका आणि विविध कामांसाठी होणारे विदेश दौरे सध्या स्थगित करण्यात येणार असून मंत्र्यांच्या ताफ्यांचाही आढावा घेतला जाणार आहे.
समाजवादी पक्षाचे दिवंगत संस्थापक मुलायमसिंह यादव यांचे धाकटे चिरंजीव आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांचे सावत्र बंधू प्रतीक यादव यांचे मंगळवारी लखनौमध्ये निधन झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर आपल्या स्वतःच्या वाहनांच्या ताफ्याचा आकार कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी आपल्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या 'विशेष सुरक्षा गटाला' (SPG) आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच देशभरातील नागरिकांना पुढील वर्षभरासाठी सोनं खरेदी करू नये, असं आवाहन केलं होतं. मोदींच्या आवाहनानंतर बुधवारी (ता.१३) केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्क वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी सोने-चांदीवरील आयात शुल्क ६ टक्के होते ते वाढवून आता १५ टक्के केले जाणार आहे. या वाढीव किमती आजपासूनच लागू होणार आहेत.
TCS कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय देणं MIM नगरसेवक मतीन पटेल यांना भोवलं. छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून आज घरावर बुलडोझर कारवाई करत घर जमीनदोस्त करण्यात आलं आहे.
मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे आज रेल्वे भरती आंदोलन प्रकरणाच्या सुनावणीसाठी ठाणे न्यायालयात हजर राहणार आहेत.
नाशिकच्या TCS कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला आश्रय देणाऱ्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून बुलडोझर कारवाई करण्यात येणार आहे. ज्या घरात निदा खानला लपवलं होतं ते घर बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधल्याचा ठपका ठेवत हि तोडाक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.