Political News Live Updates: दिल्ली कार स्फोट प्रकरणाचा तपास 'NIA'कडे दिला; केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

Delhi Car Blast 2025 Live Updates : दिल्लीत सोमवारी (ता.10) संध्याकाळी मोठा स्फोट झाला आहे. यामध्ये 8 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी आहेत. या घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करत जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली आहे
Union Home Minister Amit Shah officially hands over the Delhi car blast case documents to NIA officials for further investigation.
Union Home Minister Amit Shah officially hands over the Delhi car blast case documents to NIA officials for further investigation.Sarkarnama

दिल्ली कार स्फोट प्रकरणाचा तपास 'NIA'कडे दिला; केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय 

लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ एका गाडीत झालेल्या स्फोटात एकूण 12 जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहेत. या प्रकरणाचा तपास NIA, अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेकडे द्यायचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयानं आज घेतला.

महाराष्ट्रात एटीएसची मोठी कारवाई,मुंब्य्रात छापेमारी,दोन जणांची कसून चौकशी सुरू

देशाची राजधानी दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली होती. या स्फोटानंतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांना वेग आला आहे. देशात विविध ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातही एटीएसनं मोठी कारवाई केली आहे. एटीएसच्या पथकानं मुंब्र्यात छापेमारी करत दोन जणांची कसून चौकशी सुरू केली आहे. या दोघांकडून इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

काँग्रेसचा माजी मंत्री सुनील केदार अन् जिल्हाध्यक्ष बैस यांना मोठा दणका

काँग्रेसने माजी मंत्री सुनील केदार आणि जिल्हाध्यक्ष अश्वीन बैस यांना मोठा झटका दिला आहे. केदार व बैस यांनी नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. आता पक्षाने त्यांना बुधवारी विधानसभा प्रभारी आणि जिल्हा निवड मंडळातील सदस्यांच्या उपस्थितीत बैठक आणि त्यात घेतलेल्या निर्णयांची माहितीसह गुरुवारी मुंबईत बोलावलं आहे. यासंदर्भात पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी बैस यांना पत्र पाठवलं आहे.

' मी ही निवडणूक लढवू शकत नाही...', आरक्षणाची सोडत जाहीर होताच तेजस्वी घोसाळकर यांचं मोठं विधान

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे. यानंतर काहीवेळातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी मोठं विधान केलं आहे.त्यांनी माझ्या वार्ड क्रमांक 1 मध्ये नागरिक प्रवर्ग म्हणजेच ओबीसी आरक्षण घोषित झालं आहे. मी ओबीसी प्रवर्गातील नसल्यामुळे ही निवडणूक लढवू शकत नाही, ही गोष्ट माझ्यासाठी अत्यंत दुःखद असल्याचं घोसाळकर यांनी नमूद केलं आहे.

बीएमसी निवडणूक – काँग्रेस उमेदवारी अर्जांना मुदतवाढ

बीएमसी 2026 निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारी अर्जांच्या वितरणास मुदतवाढ

12 ते 14 नोव्हेंबर 2025 दरम्यान अर्ज उपलब्ध

वेळ : दुपारी 12 ते सायं. 5 | ठिकाण : राजीव गांधी भवन, मुंबई काँग्रेस कार्यालय

इच्छुक उमेदवारांकडून मोठा प्रतिसाद; आतापर्यंत 1200+ अर्ज विकले

प्रवक्ते व माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांची माहिती

माजी नगरसेवकांना वर्चस्वाची संधी! पनवेल महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर

पनवेल महापालिका निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत मंगळवारी जाहीर झाली. ७८ प्रभागांपैकी २१ जागा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) राखीव आहेत, तर सहा जागा अनुसूचित जातींसाठी आरक्षित असल्याने माजी नगरसेवकांसाठी ही बाब दिलासादायक ठरली आहे.

भाजप खासदार निशिकांत दुबेंचं टेंशन वाढणार? नाशिक कोर्टाचे आदेश

नाशिक पोलिसांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश नाशिक न्यायालयाने दिले आहेत. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात आज याप्रकरणी सुनावणी पार पडली. मनसेचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडेंनी न्यायालयात धाव घेतली होती. राज ठाकरेंना पटक पटक के मारंगे असं दुबेंनी विधान केलं होतं. दुबेंच्या विधानामुळे मराठी माणसाचा अपमान झाल्याचा दावा करत कोंबडेंनी दुबेंना नोटीस बजावली होती. नोटीशीला उत्तर न दिल्याने कोंबडेंनी नाशिक न्यायालयात दावा दाखल केला होता. पुढील सुनावणी दरम्यान पोलीस काय अहवाल सादर करणार ? याकडं आता लक्ष लागून राहिलं आहे.

Akola News : अकोला दंगलप्रकरणी स्थापन SIT वर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आधीच्या आदेशावरच दिली स्थगिती

13 मे 2023 रोजी झालेल्या दंगलीप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या SIT वर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आधीच्या आदेशावरच स्थगिती दिली आहे. 11 सप्टेंबर रोजी दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने तपासाची निष्पक्षता राखण्यासाठी SIT मध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायांतील अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचे निर्देश दिले होते. या आदेशावर महाराष्ट्र सरकारने हरकती घेत, गणवेशधारी पोलिस अधिकाऱ्यांकडे धर्म किंवा जात या दृष्टिकोनातून पाहणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. सरकारने न्यायालयास सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने  इच्छेनुसार स्वतःच्या अधिकाऱ्यांसह नवे SIT गठीत करावे, मात्र धर्माच्या आधारावर नियुक्तीचा निकष रद्द करावा. मुख्य न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने महाराष्ट्र सरकारचे हे म्हणणे मान्य करत आदेशावर स्थगिती दिली.

NCP News : सुशांत गणेश जाबरे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती

महाड तालुक्यातील युवा चेहरा आणि कुणबी समाजातील सुशांत गणेश जाबरे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. पक्षप्रवेशानंतर अवघ्या काही आठवड्यांतच मिळालेली ही जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणात्मक हालचालीचा भाग मानली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत जाबरे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

Arun Gujrati : शरद पवारांचे जिवलग मित्र अरूण गुजराती अजित पवारांच्या राष्ट्रवादीत

शरद पवारांचे जिवलग सहकारी, माजी विधानसभा अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते अरुण गुजराती यांनी अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. अरुण गुजराती हे शरद पवार यांचे चार दशकांपासूनचे निष्ठावंत शिलेदार मानले जातात. त्यांनी काँग्रेस पक्षातून शरद पवारांसोबत राजकारणाची सुरुवात केली आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेपासून ते पक्षाशी घट्ट नातं जोडलं. गुजराती यांनी मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष अशा विविध पदांवर काम केलं आहे. तसेच चोपडा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून त्यांनी दोन कार्यकाळ पूर्ण केले होते.

पुण्यातील मुंढवा येथील 40 एकर जमीन अनियमितपणे खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली असून महिनाभरात या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकरणात आरोपी असलेल्या शीतल तेजवानीला तातडीची सुनावणी देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. सुनावणी घेण्यास दोन ते चार आठवड्यांचा अवधी लागणार असल्याचं उच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Devendra Fadnavis : ज्योतिर्लिंगांचा सर्वसमावेशक विकास आराखडा असावा

आज मुंबई येथे पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर, हिंगोली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औंढा नागनाथ व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र घृष्णेश्वर या ज्योतिर्लिंगांच्या विकासासंदर्भात सादरीकरण बैठक पार पडली. राज्यातील भाविक नियमितपणे ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी येतात, हे लक्षात घेऊन श्री क्षेत्र भीमाशंकर, श्री क्षेत्र औंढा नागनाथ व श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगांचा सर्वसमावेशक विकास आराखडा असावा. मंदिर परिसरात सुरू असलेली विकासकामे गतीने पूर्ण करून प्रस्तावित कामांचे योग्य नियोजन करा. भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी अत्याधुनिक एकात्मिक सुरक्षाप्रणाली कार्यरत करून भाविकांसाठी उत्कृष्ट दर्जाच्या सेवा सुविधा तयार करण्यासाठी गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

Cabinet Meeting : हिंगोली जिल्ह्यातील दोन साठवण तलावांसाठी २१४ कोटींची तरतूद

हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस साठवण तलाव प्रकल्पासाठी ९० कोटी ६१ लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता. हिंगोली जिल्ह्यातील सुकळी साठवण तलाव (ता. सेनगाव) प्रकल्पासाठी १२४ कोटी ३६ लाख रुपयांच्या तरतुदीस मंजुरी

नंदुरबार नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दुसऱ्या दिवशी 2 नामनिर्देशन पत्र दाखल...

नंदुरबार नगरपरिषद निवडणुकीला आता वेग आला असून आज दुसऱ्या दिवशी 2 उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला आहे. पण पहिल्या दिवशी एकही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. मात्र आज 2 उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केल्याने आता प्रत्यक्ष निवडणुकीला वेग आल्याचे समोर आले आहे. नंदुरबार नगर परिषदेसाठी 20 प्रभाग असून 41 नगरसेवक पदासाठी एक नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत 128 पैकी 64 पदे महिला नगरसेवकांसाठी राखी

आगामी महापालिका निवडणुकांसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेची जात निहाय आरक्षण सोडत आज जाहीर झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एकूण 32 प्रभागात 128 नगरसेवकांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. या वेळी महापालिकेत प्रथमच 128 पैकी 64 पद ही महिला नगरसेवकांसाठी राखीव असणार आहेत. त्यापैकी अनुचित अनुसूचित जातीचे 20 जागा असून 10 जागा अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राजीव असणार आहेत. अनुसूचित जमातीच्या तीन जागा असुन दोन जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. नागरिकांचं मागासवर्ग प्रवर्गातील 34 जागा असुन 17 जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. सर्वसाधारण प्रवर्गाती साठी एकूण 71 जागा असून यापैकी 35 जागा ह्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत

कणकवलीत शहर विकास आघाडीचा नवीन फॉर्मुला? ठाकरे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी आणखी नवी रणनीती

कणकवली नगरपंचायत निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून शहरात नेत्यांच्या घरी बैठकांना जोर आला आहे. कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजप विरोधात शहर विकास आघाडीचा नवा फार्मूला प्रत्यक्षात उतरणार असल्याची चिन्हे दिसू लागली असून त्या दृष्टीने ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा कणकवलीचे माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तसेच काही स्थानिक संघटनांचे कार्यकर्ते एकत्र आले आहेत. यामुळे आता शहर विकास आघाडी स्थापन होण्याच्या हालचालींना वेग आला असून या बैठकीला संदेश पारकर यांच्यासह युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व इतर पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते.

चंद्रपूर मनपासाठी आरक्षण सोडत;  63 पैकी 33 जागा महिलांसाठी राखीव

चंद्रपूर महानगरपालिकेसाठी आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. एकूण 63 जागांसाठी ही सोडत काढण्यात आली. स्थानिक प्रियदर्शिनी सभागृहात विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. या निवडणुकीत महिलांचा बोलबाला असणार, हे आता स्पष्ट झाले. यासाठी महिला उमेदवारांची शोधाशोध घेताना राजकीय पक्षांची चांगलीच त्रेधा उडणार आहे.

भाजपच्या सांगण्यावरून महापालिकेत एक टक्का ओबीसी आरक्षण घटवल्याचा ठाकरे सेनेचा आरोप

नांदेड महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज पार पडला. या कार्यक्रमात ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला. या आरक्षण सोडतीमध्ये ओबीसीचा एक टक्का कमी करण्यात आला आहे. भाजपच्या दबावाखाली महानगरपालिका आणि निवडणूक आयोग काम करत असल्याचा आरोप ठाकरे सेनेचे महानगरप्रमुख प्रकाश मारावर यांनी केला आहे. महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आरक्षण सोडतीमध्ये मनमानी कारभार केल्याचा आरोप देखील मारावर यांनी केला आहे.

Ahilyanagar Crime : स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची संगमनेर अन् पारनेरमध्ये मोठी कारवाई

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी संगमनेर आणि पारनेर इथं वेगवेगळी कारवाई करत, मोठा मुद्देमाल जप्त केला. संगमनेर इथं कारवाई करताना गोवंशीय जनावराची कत्तल करणाऱ्याकडून सुमारे 12 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पारनेरच्या खडकवाडी इथं वाळू चोरांविरोधात कारवाई करताना, 15 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी ही माहिती दिली.

Shri Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये 'हाय अलर्ट'; भाविकांची तपासणीनंतरच दर्शनासाठी प्रवेश

दिल्ली इथं लाल किल्ल्या समोर झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना सुरक्षेच्या कारणास्तव सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरामध्ये देखील कडक सुरक्षा पाहायला मिळत आहे. श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांना मंदिरामध्ये प्रवेश देताना पूर्णपणे तपासणी करून सोडले जात आहे.

Ahilyanagar Politics Update : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना धक्का

अहिल्यानगर महापालिकेच्या 17 प्रभागांचे आरक्षण काढण्यात आले असून अनेक दिग्गज नेत्यांना याचा धक्का बसला आहे. इच्छुक पुरुष उमेदवारांचे प्रभाग महिला राखीव झाल्याने अनेक ठिकाणी आता महिला राज येण्याची शक्यता आहे. महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांच्या हाताने आरक्षणाच्या चिठ्ठी काढण्यात आल्या. 24 नोहेंबरपर्यंत हरकती घेण्याची तारीख तर, 2 डिसेंबरला अंतिम आरक्षण जाहीर होईल.

Ahilyanagar Update : शनिशिंगणापूर इथल्या देवस्थान परिसरात पोलिस बंदोबस्तात वाढ

दिल्ली इथल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असून, अहिल्यानगरच्या देशातील प्रसिद्ध शनिशिंगणापूर इथल्या शनि देवस्थान परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिस प्रशासनाकडून भाविकांच्या वाहनांची आणि भाविकांची कसून तपासणी केली जात आहे. शिर्डी पाठोपाठ शनिशिंगणापूर इथं देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे या देवस्थानच्या ठिकाणी पोलिसांनी विशेष लक्ष केलं आहे.

Prakash Ambedkar : महाविकास आघाडीचे प्रमुख सूत्रधार हे पंतप्रधान नरेंद्र मोदीच; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर अत्यंत मोठा आरोप केला. महाविकास आघाडीचा प्रमुख सूत्रधार हे पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहे. मोदींच्या इशारावरच महाविकास आघाडी पुढचे कार्यक्रमास राबवले जातात, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. आपल्याला भाजपने अनेकदा युतीची खुली ऑफर दिली होती. मात्र आपण आपली विचारधारा सोडली नाही, असे आंबेडकर यांनी म्हटले.

Delhi Blast : दिल्ली स्फोट प्रकरणावर प्रकाश आंबेडकर यांची मोठी प्रतिक्रिया

दिल्ली स्फोट प्रकरणावर प्रकाश आंबेडकर यांची मोठी प्रतिक्रिया दिली. आंबेडकरांनी थेट सरकारच्या सुरक्षा यंत्रणेवर ताशेरे ओढले. या स्फोटामागे बाह्यशक्ती किंवा अंतर्गत शक्तीचा हात आहे का? याचा सखोल तपास झाला पाहिजे. सर्व गोष्टी पूर्णपणे उघड झाल्या पाहिजे, अशी मागणी आंबेडकरांनी केली. दरम्यान, देशात ठिक-ठिकाणी झालेल्या स्फोटाचा उल्लेख करताना आंबेडकरांनी RSSच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले.

Shirdi Update : शिर्डीच्या प्रवेशद्वारावर वाहनांची कसून तपासणी; दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट

राजधानी दिल्लीतील स्फोटानंतर देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. जगप्रसिद्ध असलेल्या साईच्या शिर्डीत देखील सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असून शिर्डीच्या प्रवेशद्वारावरच वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिर्डी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.

Vishal Patil : मी अपक्ष खासदार, तरीही मंत्री, अधिकारी मला घाबरतात; खासदार विशाल पाटील

मी अपक्ष खासदार असलो, तरी मंत्री, अधिकारी मला घाबरतात, असं विधान सांगलीच्या अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी केलं आहे. तसेच पालकमंत्र्यांच्या बरोबर दिसण्यावरून आपल्यावर टीका होते. पण त्यांच्याकडे जिल्ह्याच्या तिजोरीच्या किल्ल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या शेजारी गेल्याशिवाय किल्ल्या कशा मिळणार नाहीत, असेही विधान विशाल पाटलांनी केलं आहे.

BJP News: भाजप माजी आमदार भीमराव धोंडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Beed News: बीडच्या आष्टी मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे शक्ती प्रदर्शन करत उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी प्रवेश करणार आहेत.

Sharad Pawar : लाल किल्ल्याजवळील भीषण स्फोटावर शरद पवारांची तीव्र प्रतिक्रिया

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ बाहेर झालेल्या भीषण कार स्फोटात किमान ८ जणांचा मृत्यू झाला असून, २५ हून अधिक जखमी झाल्याचे पोलिस सूत्रांनी पुष्टी केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घटनेबद्दल तीव्र चिंता आणि दुःख व्यक्त केले आहे. तसेच या घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. शरद पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वर पोस्ट करत म्हटलं आहे,“ दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळील सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नल परिसरात झालेल्या कार स्फोटातील जीवितहानी अत्यंत दुःखद आहे. मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि जखमी नागरिकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो.

PunePolice : आंदेकर टोळीवर कारवाई 

पुण्यातील आंदेकर टोळी पुन्हा पोलिसांच्या रडारवर असून या टोळीने अनधिकृतपणे बांधलेलं वारकरी भवन पाडण्यास सुरूवात करण्यात आली आहे. पुणे पोलिस आणि महापालिका याच्याकडून ही कारवाई करण्यात येत आहे.

PMC News: पुणे महापालिकेची आज आरक्षण सोडत

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत आज सकाळी ११ वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे काढण्यात येणार आहे. आरक्षणाचे प्रारूप १७ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे. हरकतींसाठी आठवडाभर मुदत दिली जाणार आहे. महापालिकेची प्रभागरचना आणि मतदारयादीचे काम अंतिम टप्प्यात असून, निवडणुका जानेवारी अखेर होण्याची शक्यता आहे. महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

Delhi Red Fort Car Blast : दिल्ली ब्लास्टच्या आधीचे CCTV फुटेज आले समोर

देशाची राजधानी दिल्ली येथे काल सायंकाळी एका कारमध्ये मोठा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. हा ब्लास्ट एका आय-20 कारमध्ये हा झाल्याचं समोर आलं आहे. अशातच आता कार ब्लास्टच्या आधीचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. ज्यामध्ये कारमध्ये दहशतवादी डॉ. उमर तोंडावर काळा मास्क लावून बसल्याचं दिसत आहे. या सीसीटीव्ही फुटेमध्ये ब्लास्टच्या आधी आय-20 कार गर्दीतून जाताना दिसत आहे. कारच्या आतमध्ये एक व्यक्ती काळा मास्क लावून कार चालवत असल्याचं दिसत आहे. तर मास्क लावलेली ही व्यक्ती दहशतवादी मोहम्मद उमर असल्याचं सांगितलं जात आहे.

Shivsena News : शिवसेना पक्ष आणि चिन्हाची उद्यापासून अंतिम सुनावणी

ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय उद्यापासून अंतिम सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांचे खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे.

Delhi Bomb Blast Updates : स्फोट झालेल्या गाडीत मृतांच्या शरीराचे अवयव सापडले

Delhi Bomb Blast News : दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरणाच्या संदर्भात डीसीपी उत्तर राजा बांठिया यांनी माहिती देताना सांगितलं की, 'ज्या गाडीत स्फोट झाला त्या गाडीत काही मृत शरीराचे अवयव आहेत. फॉरेन्सिक टीम ते गोळा करत आहे.'

Sanjay Rathod : मंत्री संजय राठोड यांना मातृशोक

राज्याचे जलसंधारण व मृद मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मातोश्री प्रमिलाबाई दुलीचंद राठोड वय 88 वर्षे यांचे यवतमाळच्या कळंब तालुक्यातील मूळगावी पहूर येथे निधन झाले.

लाल किल्ल्यासारख्या संवेदनशील परिसरात घडलेली दुर्दैवी घटना फार चिंताजनक - शरद पवार

दिल्लीतील स्फोटानंतर जेष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळील सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नल परिसरात एका कारमध्ये झालेल्या स्फोटात झालेली जीवितहानी अतीव दुःखद आहे. मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो व ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याप्रती सहवेदना व्यक्त करतो. तसंच, जखमी नागरिकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो. तसंच लाल किल्ल्यासारख्या संवेदनशील परिसरात घडलेली ही दुर्दैवी घटना फार चिंताजनक आहे. माझी देशाचे पंतप्रधान व गृहमंत्र्यांना विनंती आहे कि, सदर घटनेबाबत सखोल चौकशी करावी. त्यायोगे येणारा चौकशी अहवाल देशासमोर ठेवून अशा दुर्घटना रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या यंत्रणा सुरक्षेच्या दृष्टीने ठोस पावलं उचलतील अशी अपेक्षा व्यक्त करतो, असं पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.

Nagpur News : दिल्ली बॉम्बस्फोटानंतर नागपूरच्या संघ मुख्यालयाची सुरक्षा वाढवली

दिल्ली बॉम्बस्फोटानंतर नागपूरच्या संघ मुख्यालय येथील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यासह नागपूरचे संवेदनशील स्थान असलेल्या दीक्षाभूमी , मुख्य रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाढवली आहे.

दिल्लीतील कार ब्लास्ट हा आत्मघाती हल्ला असल्याची सूत्रांनी माहिती

लाल किल्ला येथील कार ब्लास्ट हा आत्मघाती हल्ला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बॉम्बस्फोटात पुलवामा येथील रहिवासी उमर मोहम्मद याचे नाव समोर आले आहे. उमर मोहम्मद गाडी चालवत असल्याचा संशय आहे. उमर मोहम्मद हा व्यवसायाने डॉक्टर असून तो उमर हा जैश-ए-मोहम्मद मॉड्यूलशी संबंधित आहे. सात दहशतवाद्यांना काल पोलिसांनी अटक केली होती आणि त्यांच्याकडून २९०० किलो स्फोटके जप्त करण्यात आली होती. तर उमर मोहम्मद गाडीत होता. त्याने त्याच्या दोन साथीदारांसह हल्ल्याची योजना आखली. सूत्रांच्या माहितीनुसार, फरीदाबादमध्ये अटक झाल्यानंतर घाबरून उमर मोहम्मदने हल्ल्याची योजना आखली. त्याच्या साथीदारांसह त्याने गाडीत डिटोनेटर ठेवले आणि हे दहशतवादी कृत्य केलं. हल्ल्यात ANFO (अमोनियम नायट्रेट आणि इंधन तेल) वापरण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे.

दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईतही अलर्ट जारी

दिल्लीत काल संध्याकाळी झालेल्या स्फोटानंतर मुंबई पोलिसांनी देखील शहरात खबरदारीचा अलर्ट जारी केला आहे. सणासुदीचा काळ आणि वर्षाचा शेवट जवळ येत असल्याने, मुंबई पोलीस आधीच सतर्क असून संपूर्ण शहरात सुरक्षा तपासण्या केल्या जाणार आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांने दिली.

दिल्लीतील स्फोटाच्या आधीची सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना मिळाली

दिल्ली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मिळवले आहे ज्यामध्ये संशयिताची कार पार्किंग क्षेत्रात प्रवेश करताना आणि बाहेर पडताना दिसत आहे. फुटेजवरून असे दिसून येते की संशयित त्यावेळी एकटाच होता.

Delhi car Blast Alert : पिंपरी चिंचवडमध्ये हायअलर्ट

दिल्ली कार ब्लास्टनंतर पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त आणि नाका बंदी केली आहे. तसेच महामार्गावरून आणि रस्त्यावरून ये जा करणाऱ्या चार चाकी वाहनांची पोलीस तपासणी करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com