

मराठा समाजासाठी महत्त्वपूर्ण असणारी ‘सारथी संस्था’ व ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ’ पद्धतशीरपणे, टप्याटप्प्याने कमजोर करून बंद करण्याचे षङ्यंत्र सुरू असल्याचा आरोप अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे. तसेच त्यांनी मंत्री छगन भुजबळ हे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाबद्दल चुकीचा प्रचार करत असल्याची टीकाही केली आहे.
पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणात भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काशिनाथ चौधरी यांच्यावर आरोपांची राळ उडवली होती. त्याच काशिनाथ चौधरी यांनी रविवारी नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर भाजपने केलेल्या आरोपांचे काय झाले? असा प्रश्न आता जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विचारीत आहेत.
सोलापुरातील बार्शी तालुक्यात हडपसर-हैद्राबाद एक्सप्रेस रेल्वेने ट्रॅक्टर उडवल्याचे समोर आले आहे. हा अपघात बार्शी तालुक्यातील खांडवी शेंद्री स्टेशनच्या परिसरात झाला असून फाटक न लावला गेल्यामुळे झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बुलढाण्यानंतर वंचित बहुजन आघाडीने जालन्यात राजकीय डाव टाकत नवी खेळी खेळली आहे. वंचित बहुजन आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या मोर्चे बांधणीला वेग दिला असून भाजपला पराभूत करण्यासाठी जेथे जमेल तेथे महायुती आणि महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्यास सुरूवात केली आहे. बुलढाण्यातील काँग्रेसशी हात मिळवणी केल्यानंतर आता जालन्यात दोन पक्षांसोबत युती केली आहे. जालन्यातील परतुर नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती झालीय.
पालघर जिल्ह्यात आज (ता. १६ नोव्हेंबर) विविध पक्षांतील तब्बल पाच हजार कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. हे सर्व मातब्बर नेते आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार हेमंत सावरा यांच्या विचारांवर विश्वास ठेवून हे लोक भाजपमध्ये आले आहेत, त्यामुळे आगामी पंधरा वर्षे तरी आम्हाला कोणी सत्तेपासून दूर हटवू शकणा नाहीत, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष भारत राजपूत यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षाचा इतिहास सर्वांना माहिती आहे. त्याबाबत मला जास्त काही बोलायचं नाही. काँग्रेसनी कोणाला मारलं, कुणाला झोडलं आणि कोणाला ठेवलं, हा काँग्रेस पक्षाचा इतिहास आहे, त्यामुळे खासदार वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या तोंडाला आवर घालावा. त्या ज्या लढत आहेत, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, अशा शब्दांत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काँग्रेस पक्षाच्या वर्षा गायकवाड यांना प्रत्युत्तर दिले आहे.
नवी मुंबईतील नेरुळमध्ये गेली चार महिन्यांपासून झाकून ठेवलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी अनावरण केले. या वेळी पोलिस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वादही झाला. अमित ठाकरे हे कोपरखैरणे हे मनसे शाखेच्या उद्घाटनासाठी आले होते. त्या वेळी त्यांना हा पुतळा झाकून ठेवलला आढळून आला, त्यामुळे त्यांनी पुतळ्याचे अनावरण केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इंदापूरमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ते उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपसह शरद पवार गट, शिवसेना सर्व पक्ष एकत्र झाले आहेत.
उल्हासनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे. ठाकरे गटाच्या माजी महापौर विद्याताई निर्मले यांनी भाजपात प्रवेश केला आहे, विद्याताई निर्मले यांच्यासोबतच शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका शितल मंडारी यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे. भाजपने शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसला देखील धक्का दिला आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक गोदुमल कृष्णानी यांनी आणि शिवसेना शिंदे गटाचे सह संपर्कप्रमुख विजय जोशी यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात जोरदार इनकमिंग सुरू असल्यानं या निवडणुकीत भाजपची ताकद वाढल्याचं दिसून येत आहे.
नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणूकीचा अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महायुतीबाबत महत्वाचे विधान केले आहे. उद्या कुठल्या ठिकाणी युती होणार हे स्पष्ट होईल असे फडणवीस म्हणाले. तसेच एखाद्या ठिकाणी महायुती नाहीच झाली तरी आपल्यासमोर लढणारे पक्ष आपले मित्रपक्ष आहेत, हे लक्षात ठेवूनच लढाई करायची आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते बोलत होते.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुणे शहर काँग्रेसला नवीन शहराध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. पूर्वीचे शहराध्यक्ष कायम राहणार असून नवीन शहराध्यक्षांवर चार मतदारसंघांची जबाबदारी असल्याची शक्यता आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निवडणुकीसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत, भास्कर जाधव, अनिल देसाई, किशोरी पेडणेकर, सुनील प्रभू, आणि अंबादास दानवे यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांवर स्टार प्रचाराची जबाबदारी आहे.
पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा (De-Novo) कार्यक्रम सुरू असून प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यास भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ३ डिसेंबर व अंतिम मतदार याद्या तयार करण्यास १२ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे मतदान अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची मुंबईत बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला मनसेचे वरिष्ठ नेते उपस्तित आहे. मुंबई महापालिकेच्या प्रत्येक वार्ड ची चाचपणी मनसेकडून करण्यात येत आहे.
बिहारमध्ये सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. अमित शाह आणि जे पी नड्डा यांच्यात बैठक संपन्न झाली. या बैठकीत राजपूत आणि ओबीसी असे दोन उपमुख्यमंत्री देण्याचा निर्णय झाल्याची माहिती सुत्रांच्या हवाल्याने देण्यात येत आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय झाला नाही.
अमरावतीत तीन दिवसांपूर्वी इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरचे फलकाविरोधात भाजप खासदार अनिल बोंडे यांनी आवाज उठवला होता. आता यावरून खासदार बोंडे यांना धमकी वजा इशाऱ्याला हैदराबादमधून ई-मेल आला आहे. इस्लामिक इंफ़ॉर्मेशन के खिलाफ आपने जो ज़ुबान इस्तेमाल की, उसने हैदराबाद के मुस्लिमों के दिलों में ऐसी आग लगा दी है कि यहाँ का माहौल अब बेहद गर्म और तनावपूर्ण हो चुका है। हम आपको सिर्फ इतना कहते हैं, आपने जो आग लगाई है, उसका धुआँ अब बहुत गाढ़ा हो चुका है। आपकी हर हरकत यहाँ के मुस्लिम समाज को एक खुले ज़ख्म की तरह महसूस हो रही है। इसलिए, अपनी ज़ुबान और अपने बयान पर सख़्त काबू रखिए। असे मेलमध्ये म्हणण्यात आलं आहे. याप्रकरणी खासदार खासदार अनिल बोंडे यांच्या कार्यालयाकडून अमरावतीच्या राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
'कोणी स्वतःला बाहुबली समजू नका. अनेकांना आम्ही निवडून आणलंय.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी समझनेवाले को इशारा काफी म्हणत', प्रफुल्ल पटेल यांनी निशाणा साधला आहे. निवडणुकीसाठी पैसे लागतात. मात्र, पैशाच्या पुढं कुणी म्हणत असेल की, मी निवडूनच आलो तर, असं होत नाही. जितके पैसे लागतात ते खर्च करावंच लागतात आणि ते होणारच आहे. फक्त पैशाच्या आधारावर कोणी निवडून येत नाही. लोक पैसे घेतात आणि त्यांना जिथे वोट मारायचं असेल तिथेच मारतात समझनेवाले को इशारा काफी है! असेही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले.
आम्ही जर मान वाकडी केली असती, तर टांगा पलटी घोडे फरार, या वाक्यप्रचाराचा वापर करीत मंत्री भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा खासदार सुनील तटकरे यांच्या विजयात शिवसेना आमदारांचा वाटा दाखवून दिला आहे. रायगड जिल्ह्यात झालेल्या राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीवर बोलताना होते. निवडणूक आहे, अस कारण सांगत गोगावले यांनी शब्द आवरते घेतले.
'आम्ही गुवाहाटीला गेलो, खूप टीका आमच्यावर झाली. 50 खोके अन् एकदम ओके, अजूनही या टीकेने कान खणकतात, गद्दार काय आम्हाला म्हटलं जातं. मात्र आम्ही भगव्याच्या छताखाली ऐकून घेतलं,' अशी आठवण मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितली.
जळगाव शहरातील कांचन नगर परिसरात गेल्या अनेक दिवसापासून विकास न झाल्याने आता थेट महापालिकेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा कांचन नगरातील नागरिकांनी यावेळी दिला. प्रशासनाने रस्त्याचे काम पूर्ण केले नाहीत, म्हणून आता थेट नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे. नगरसेवक आमच्याकडे प्रचार करेल त्याला आम्ही या परिसरात विकास केला नाही, म्हणून प्रचार करू देणार नाही, असा थेट पवित्रा या नागरिकांनी घेतला आहे.
महापालिकेच्या निवडणुकीबाबत राजकीय चर्चांवर, विरोधकांवर टीका करताना, शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मोजक्या शब्दात टोलेबाजी केली. यह पब्लिक है, सब जानती है, कुणीही काहीही बोलो, जनता जनार्दनच ठरवणार की महापौर कुणाचा बसणार, असा फिल्मी-स्टाईल टोला लगावला.
आपला पक्ष बुडाला तरी चालेल, पण दुसऱ्याचा पक्ष घेऊन बुडायचं, हा ट्रेंड रायगडच्या राजकारणात एका कुटुंबाच्या माध्यमातून आला असल्याची टीका अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांचे नाव न घेता केली. आम्ही महायुतीचा धर्म पाळण्यास तयार आहोत पण बदलत्या राजकारणात काही उलटफेर झालं तर त्यांनी आम्हाला दोष देऊ नये असा इशाराही आमदार दळवी यांनी दिला.
योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मी केलेल्या कामाची दखल घेण्यात आलेली नाही, त्यामुळे मी राजीनामा दिला आहे. विधानसभेला माझा पराभव झाल्यानंतर पक्षातीलच लोक खेळी करू लागले. याबाबतची पक्षश्रेष्ठींना मी वेळोवेळी माहिती दिली होती. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही म्हणून मी काल राजीनामा दिला आहे, अशी नाराजी योगेश क्षीरसागर यांनी व्यक्त केली.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केला आहे. माजलगाव मतदारसंघातील माझ्या विरोधकांसोबत परळी तालुक्यातील नाथरा येथील फार्म हाऊसवर मुंडेंनी बैठका लावल्या होत्या. याबाबतची चर्चा संपूर्ण मतदारसंघात आहे, असं सोळंके यांनी म्हटलं आहे.
सांगलीत उत्तम मोहिते मर्डर प्रकरणातीलआरोपींची सांगली पोलिसांनी धिंड काढली आहे. शहरातल्या इंदिरानगर, गारपीर चौक परिसरामध्ये पोलिसांनी आरोपी गणेश मोरेसह टोळीची धिंड काढली आहे.
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची धामधूम सुरु असताना आता आणखी एका नव्या पक्षाची एन्ट्री झाली आहे. नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) असं या पक्षाचं नाव आहे. ईशान्य भारतातील मेघालय राज्यात 2013 साली लोकसभेचे माजी अध्यक्ष पी ए संगमा यांनी या पक्षाची स्थापना केली होती.
अमरावतीच्या मेळघाटमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. कारण ठाकरेसेनेचे मेळघाट विधानसभा प्रमुख सुनील चौथमल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे, खासदार अनिल बोंडे, माजीमंत्री प्रवीण पोटे, आमदार केवलराम काळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे.
ऐन नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावरती उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते योगेश क्षीरसागर यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे सार्वजनिक न्यासाच्या अध्यक्षपदी उध्दव ठाकरेच असणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय सरकारने काढला आहे. तर आदित्य ठाकरे यांची सदस्य म्हणून पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असून ते आज येथील वसंतराव नाईक पुतळ्याचं अनावरण आणि भाजपच्या नव्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.