
एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार आमदार चंद्रकांत रंघुवंशी भाजप उमेदवाराला धमकी देत असल्याचा आरोप भाजप माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी केला. भाजप उमेदवाराला फोडण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख आणि विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडून साम-दाम दंड भेदाचा वापर करत आहेत. नंदुरबार नगर परिषदेत नगराध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार अविनाश माळी यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचं डॉ. हिना गावित यांनी आरोप केला.
महापालिकेसाठी महायुती कशी होईल, यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. त्या-त्या ठिकाणची स्थानिक परिस्थिती पाहून, त्या ठिकाणचे पदाधिकारी युतीचा निर्णय घेऊन वरिष्ठांना कळवतील आणि त्यानंतर वरिष्ठ महापालिका निवडणूक युतीचा शेवटचा निर्णय घेतील, असे रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं.
सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर अणदूर जवळ क्रुझर गाडीचे टायर फुटून अपघात झाला असून, पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या अपघातात सात ते आठ जण गंभीर जखमी असून, त्यांना सोलापूर इथं उपचारासाठी हलवलं आहे. क्रुझरचा टायर फुटल्यानंतर पलटी होत जात ट्रॅक्टरला जाऊन धडक मारली.
शिर्डीत नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्याना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून अपक्ष उमेदवाराला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. माजी उपनगराध्यक्षाच्या कुटुंबाने मारहाण केल्याचा आरोप असून शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी खैरे कुटुंबाची भेट घेतली असून, अर्णव हा भाषा वादाचा बळी आहे. तुमच्या मुलांच्या राजकीय भविष्य घडवण्यासाठी मराठी मुलाचा बळी घेणार का? असा सवाल चित्रा वाघ यांनी ठाकरे बंधूंना केला आहे. अर्णवचा बळी घेतला, काय मिळवलं हे करून, त्या मुलाची काय अवस्था केली, त्याची काय चूक होती, कोण जबाबदारी घेणार, असे प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केले आहेत.
वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून अमरावती महापालिकेच्या फायर ब्रिगेड कर्मचाऱ्याची आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बडनेरा झोनमध्ये कार्यरत असलेले राजेश मोहन, असे विष प्राशन करून आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. राजेश मोहन यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे मनपा कर्मचारी संतोष केंद्रे व लक्ष्मण पावडे या दोन कर्मचाऱ्यांवर ॲट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हे दाखल करून अटकेची मागणी करण्यात येत आहे. मृत्यूपूर्वी कर्मचाऱ्यांचा संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काल रात्रीपासून अमरावतीच्या शव विच्छेदन गृहाबाहेर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातुश्री कमलताई गवई यांच्यासह नातेवाईक आणि आझाद समाज पार्टीच ठिय्या आंदोलन सुरू आहे.
काही दिवसापूर्वी सुरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. त्यानंतर सुरज चव्हाण यांचं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील पद काढून घेण्यात आलं. मात्र पुन्हा त्यांना राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्तेपदावर नियुक्ती केल्यामुळे छावा संघटनाक्रम झाली आहे. आज लातूर जिल्ह्यातील औसा इथं होणाऱ्या सभेत छावा संघटनेचे कार्यकर्ते अजित पवारांना याचा जाब विचारणार होते. सभेत गोंधळ होण्याची देखील शक्यता असल्याने, विजयकुमार घाडगे पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर बस स्थानकावरील सार्वजनिक स्वच्छतागृह, हॉटेलचे किचन तसेच पाणपोईची पाहणी केली. सार्वजनिक स्वच्छतागृह तसेच पाणपोईवर अस्वच्छता असल्याने डेपो मॅनेजरला नोटीस काढण्याचा आदेश दिला. अस्वच्छतेवरून मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. पाणपोईवरील अस्वच्छता पाहून अधिकाऱ्याला पाणी पिऊन दाखवा अशा शब्दात झापले. प्रवाशांना सुविधा देणं हे आमचं काम आहे मात्र त्यात कसूर करणाऱ्यांवर कारवाई करणार, असे मंत्री प्रतास सरनाईक यांनी म्हटले आहे.
नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शिंदे यांच्या चार जाहीर सभा होणार आहेत. डहाणू, जव्हार, पालघर आणि वाडा अशा चार ठिकाणी शिंदे जाहीर सभा घेणार आहेत.
दबाबतंत्र, गुंड वापरुन भाजपने 100 नगरसेवक बिनविरोध निवडून आणले आहेत. पोलीस बळाचा वापर करुन भाजपने हे काम केले आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
मुंढवा जमीन व्यवहारप्रकरणी आज महसूल विभागाची चौकशी पुणे आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. यातील अनेक कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी यांनी बनवले आहेत. त्या संदर्भाने तपास होणार.
पुण्यातील नवले पुलावर नुकताच भीषण अपघात झाला होता, यात 8 जणांचा मृत्यू झाला होता. याला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. आज या पुलावर दशक्रिया विधी आंदोलन करण्यात आले. ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच ठिकाणी स्थानिक नागरिक प्रशासनाचा दशक्रिया विधी करीत आहेत.
भाजपचे तथाकथित संकटमोच गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरात दडपशाहीने वंचितसह समविचारी पक्षाच्या उमेदवारांना सत्तेचा गैरवापर करत दडपशाही मार्गाने बळजबरी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला भाग पाडले गेलं, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. दडपशाही आणि गुंडगिरी करून लोकशाहीची हत्या करू पाहणाऱ्या, लोकशाहीला घातक असणाऱ्या गिरीश महाजन यांच्यासारख्या बेफाम मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा घेऊन, त्यांचे असले चाळे खपवून घेतले जाणार नाहीत असा स्पष्ट संदेश द्यावा, असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे.
आगामी माहपालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत आनंदराज आंबेडकर यांच्या रिपल्बिकन सेनेची युती झाली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, आनंदराज आंबेकर यांनीकुठल्याही अटीशर्ती न ठेवता शिवसेनेशी युती केली. माझ्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे हीच त्यांची एकमेव मागणी होती. ही युती सत्तेसाठी नाही, तर दलित, वंचित, शोषित आणि अन्यायग्रस्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झाली आहे.
माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी माजी मंत्री, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वक्तव्य केले आहे. त्याला ठाकूर यांनी प्रत्युत्तर देत काळ्या दगळावरची पांढरी रेष आहे, आम्ही काँग्रेस सोडणार नाही. पण रवि राणा आणि नवनीत राणा यांना भाजप फेकून देईल हे मात्र निश्चित आहे, असे म्हटले आहे.
भाजपमुळे जळगाव शहराची दुरवस्था झाल्याची टीका सुरेश जैन यांनी केली आहे. ते म्हणाले, जळगावला सिंगापूर करायचे होते. जळगावचे पॅरिस करण्याचे स्वप्न पाहिले जात होते. मात्र आजही शहर कुठे पोहोचले आहे? त्याची काय अवस्था आहे? सिंगापूर आणि पॅरिस झाले नाही मात्र जळगाव हे आता एक खेडे झाले आहे.
अमित शाहांना भेटून आलेले एकनाथ शिंदे हे अस्वस्थ आहेत.त्यांचे 35 आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र 'सामना'मधून करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढणाऱ्या महिलेच्या कारचा अंबरनाथमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून निवडणूक लढणाऱ्या महिला उमेदवार किरण चौबे या गंभीर जखमी झाल्या आहेत. या अपघातात अंबरनाथ महानगरपालिकेचे दोन कर्मचारी आणि एका पादचारी नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. किरण चौबे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.