
महाड येथील गोगावले आणि तटकरे समर्थकांमध्ये मतदानदिनी झालेल्या राड्याप्रकरणी विकास गोगावले यांच्यासह महेश गोगावले आणि विजय मालुसरे यांच्यावर 21 विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बोलताना मंत्री भरत गोगावले यांनी तटकरे यांच्यावर थेट आरोप केले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संजय गायकवाड यांच्या मते, निवडणूक आयोगाने मतमोजणीचे निकाल लांबवण्याची गरज नव्हती, कारण यामुळे स्थानिक प्रशासकीय कामे २० दिवसांसाठी थांबली आहेत. ही कृती अयोग्य असून, महाराष्ट्रातील केवळ तीन-चार नगरपालिकांमधील समस्यांसाठी २९० हून अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल थांबवणे योग्य नाही. गायकवाड यांनी आयोगावर मतदार याद्यांमधील बोगस, खोटी आणि मृत नावे न काढण्याचा आरोप केला आहे.
ठाण्यापाठोपाठ आता नवी मुंबईतही शिंदे सेनाला उद्धव सेनेने खिंडार पाडले आहेत. जिल्हाध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर येत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदे सेनेला जेरीस आणण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे.
शिरूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठापणाला लागली असून, दोन्ही बाजुनं निवडणूक प्रतिष्ठेची झाली. मतदान संपल्यानंतर माऊली कटकेंनी मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदान केंद्रात प्रवेश करुन आचारसंहितेचा भंग केल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अशोक पवारांनी केला. तर दुसरीकडे, हा केवळ पराभवाच्या भीतीतून केलेला स्टंट असल्याचा पलटवार आमदार माऊली कटकेंनी केला.
'बाहेरून येऊन कोणी महाडमध्ये दादागिरी करणार असेल, तर महाडकर खपवून घेणार नाही,' असा मंत्री भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांचे नाव न घेता टोला लगावला आहे. आमच्यावर जे आरोप करत आहेत, त्यांची पार्श्वभूमी तपासावी. जे झालय त्याला आम्ही सामोरे जातोय, पोलिसांना सहकार्य करू, असे मंत्री गोगावले यांनी म्हटले.
भाजपच्या उमेदवाराने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अरुण निमजे यांना विट फेकून मारली. यात निमजे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे गडचांदुर शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली. भाजपचे उमेदवार सुरज पांडे याने हा हल्ला केला. यात निमजे यांच्या डाव्या बाजूच्या कानाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले आहे.
नाशिकच्या येवला तालुक्यातील पारेगाव इथले शेतकरी प्रणव पाटे सकाळी शेतात पाणी भरायला आले, असता त्यांना आकाशातून एक मीटर असलेली बलून सारखी वस्तू शेतात आढळली. शेतकऱ्याने तातडीने याची माहिती प्रांताधिकाऱ्यांना दिल्यानंतर घटनास्थळी पोलिस व महसूलचे अधिकारी पोहोचले, असता त्यांनी त्या सर्व वस्तू ताब्यात घेतल्या. चौकशी अंती आकाशात पडलेली वस्तू ही हवामान विभाग तापमान मोजण्यासाठी, अशा प्रकारचे बलून हवेत सोडत असल्याचे समोर आल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
पिंपरी चिंचवड इथल्या हिंजवडी फेज -1 मधील एका इंटरनॅशनल नामांकित स्कूलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मर्सिडीज इंटरनॅशनल स्कूलच्या ई-मेलवर धमकीचा मेल आल्यानंतर शाळा प्रशासनाने तात्काळ पिंपरी चिंचवड पोलिसांना माहिती दिली आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांचे बीडीडीएस पथक आणि डॉग स्कॉड पथक घटनास्थळी दाखल झाले असून स्कूलची कसून तपासणी सुरू केली आहे.
राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या लग्नाच्या समारंभानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत, मंत्री आशिष शेलार एकत्र आले होते. फडणवीस अन् राऊत यांच्या १५ ते २० मिनिटं चर्चा झाली. खासदार राऊत यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खराब आहे. त्याची चौकशी फडणवीस यांनी केल्याचं समजतं. मात्र, या भेटीचे फोटो अन् व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
लातूर जिल्ह्यातील रेनापुर नगरपंचायतच्या निवडणुकीला स्थगिती देत निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात, राजकीय पक्षांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस यासह इतर पक्षांच्या उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी रेनापुर बंदची हाक दिली आहे. दरम्यान सकाळपासून रेनापुर शहरातील बाजार कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. रेनापुर नगरपंचायतीसाठी निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया ही 20 डिसेंबरला ढकलल्याने, राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी संताप व्यक्त केला.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा नंदुरबार आणि नवापूर नगर परिषदेसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. उशिरापर्यंत अनेक मतदान केंद्रावर मतदान सुरू होतं. निकालाची तारीख पुढे ढकलल्याने आता या सर्व मतपेट्या नंदुरबारच्या वखार महामंडळाचा गोडाऊनच्या स्ट्रॉंग रूममध्ये काटेकोर अशा सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आल्या आहेत. स्ट्रॉंग रूम परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळत असून काल झालेल्या मतदानात सरासरी 70 टक्के मतदान हे झालेलं आहे. मतमोजणी ही 21 डिसेंबरला होत असल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
ठाण्यातील संजय गांधी उद्यान इथल्या येऊर पंचवटी बंगल्यात भानू प्रताप सिंग नावाच्या केअरटेकरची किरकोळ वादातून हत्या झाली. मित्रासोबत पार्टी करत असताना झालेल्या किरकोळ वादातून मित्रांनीच हत्या केली.
राज्यातील सर्व नगरपालिका आणि नगर पंचायतींची मतमोजणी एकाच दिवशी, म्हणजे 21 डिसेंबर रोजी होईल, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला. या निर्णयावर ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून निवडणूक आयोगासह सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. 'मतदार याद्यांमधील घोळ, काही ठिकाणच्या निकालांवर असलेली सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार, 12 जिह्यांमधील निवडणूक प्रक्रिया ‘नियमबाह्य’ झाल्याची निवडणूक आयोगानेच दिलेली कबुली, उच्च न्यायालयाने पुढे ढकललेली मतमोजणी अशा गटांगळ्या खात महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगर पंचायतींची निवडणूक सुरू आहे. जी मंडळी निवडणूक घोटाळा करूनच सत्तेवर आली आहेत, त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचा पुरता खेळखंडोबा झाला आहे. मतदान आणि मतमोजणी 19 दिवस पुढे गेल्यामुळे लोकशाहीसाठी रात्रच नव्हे; दिवसही वैऱ्याचा असणार आहे, असं सामनामध्ये लिहिलं आहे.
नाशिक तपोवन येखील वृक्षतोड व्हावी असं आमचं कुणाचंही मत नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तर जास्तीत जास्त झाडं वाचवण्याचा प्रयत्न करू असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तर पर्यावरण आणि कुंभमेळा दोन्ही गोष्टी महत्वाच्या असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या चौकशीसाठी समिती स्थापन साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली समीती स्थापन करण्यात आली असून या समीतीकडून वीएसआयची चौकशी केली जाणार आहे.
पुण्यातील कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळ सध्या फरार असून आता पोलिसांनी त्याच्याविरोधात इंटरपोलकडून ब्लू कॉर्नर नोटीस बजावली आहे. अशातच आता पोलिसांकडून घायवळ विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजाविण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
चंद्रपूरच्या गडचांदूर येथे एका मतदाराने चक्क ईव्हीएम फोडल्याची घटना समोर आली आहे. राम दुर्गे असं ईव्हीएम मशीन फोडणाऱ्या मतदाराचे नाव आहे. आपण नगारा चिन्हा समोरील बटन दाबल्यावर कमळाचा लाईट लागल्याचा दावा करत या मतदाराने ईव्हीएम फोडल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, पोलिसांनी राम दुर्गे यांना ताब्यात घेतलं आणि त्या ठिकाणी नवीन ईव्हीएम लावून मतदानाची प्रक्रिया सुरू केली.
चंद्रपुरात निवडणुकीत मदत केली नाही म्हणून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने भाजप कार्यकर्त्याला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी थेट राजुरा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला. यावेळी राजुरा मतदारसंघाचे भाजप आमदार देवराव भोंगळे देखील उपस्थित होते.
नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशामुळे निवडणुकीचा खेळखंडोबा झाला आहे, राज्यातील निवडणुका हा पोरखेळ झाला आहे. राज्य सरकार आणि निवडणूक आयोग यासाठी जबाबदार आहे, सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. ओबीसीला २७ टक्के आरक्षण दिले हे सरकारला दाखवायचे होते, हे सरकार कोणत्या दिशेने काम करते? उद्याची मतमोजणी २१ डिसेंबरला गेली. निवडणूक आयोग सरकारच्या हाताचे बाहुले झाले आहे, त्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे, असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अटकर करण्याची मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. कोरेगाव भीमा आयोगासमोर हजर न राहिल्यामुळे ठाकरेंच्या विरोधात अटक वॉरंट काढा, अशी मागणी आंबेडकर यांच्या वतीने वकिलाने केली आहे.
नगपंचायत निवडणुकीसाठी मतदान होताच महापालिका निवडणुकीसाठी हालचाल सुरु करण्यात आल्याची सुत्रांची माहिती आहे. 15 डिसेंबर ते 10 जानेवारी या कालावधीत महापालिका निवडणुक होण्याची शक्यता आहे.
ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे वयाच्या 93व्या वर्षी निधन झाले. सुराणा यांनी भूदान चळवळीत भाग घेतला होता. समाज प्रबोधन संस्थेचे सचिव आणि समाजवादी पक्षाच्या राज्य शाखेचे सचिव म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.
नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी झालेल्या मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. मंगळवारी रात्री उशीरा मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये इंदापूरमध्ये 79.89% टक्के तर, दौंडमध्ये 59.32 टक्के मतदान झाले आहे. मंचरमध्ये 74.19%, माळेगाव 77.19%, जेजुरी 78.06%, वडगाव 74.85,सासवड 67.02 टक्के मतदान झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.