

आषाढी वारीला विठ्ठल रुक्मिणीच्या महापूजेचा मान हा मुख्यमंत्र्यांना असतो, तर कार्तिक वारीला विठ्ठलाच्या महापूजेचा मान हा उपमुख्यमंत्र्यांना असतो. मात्र यावर्षीपासून उपमुख्यमंत्र्यांबरोबर दोन जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना महापूजेमध्ये सहभागी होता येणार आहे. सध्या याबाबत मंदिर प्रशासनाकडे शिक्षण मंत्री दादा भुसे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सूचना केली असून यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डाॅक्टर युवतीने केलेली आत्महत्या ही आत्महत्या नसून ही संस्थात्मक हत्या असल्याचा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांनी आज ट्वविट करत या प्रकरणावर भाष्य केलं होतं. यावरून आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहूल गांधींकडून पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हणत जोरदार टीका केली आहे.
अमरावती जिल्ह्यात माजी खासदार नवनीत राणा आणि काँग्रेसच्या नेत्या तथा माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यात वाद वाढला आहे. अशातच नवनीत राणा यांनी पाठवलेल्या दिवाळी भेटीवरून यशोमती ठाकूर चांगल्याच भडकल्या. त्यांनी काही विचित्र लोक या राजकारणामध्ये आलेले असून त्यांनी अमरावतीचे नाव अतिशय खराब केले आहे. ते एकदम हलकटपणाची वागणूक देत असल्याची टीका केली आहे.
धुळे जिल्ह्यात भाजपबरोबर युती संदर्भात मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपबरोबर ती होणारच आहे. पण युती होईलच असेही काही नाही हा स्थानिक नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर अवलंबून असलेला विषय आहे.
फलटण जिल्हा सातारा येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असताना जीव गमावलेल्या पीडितेच्या कुटुंबियांची आमदार धनंजय मुंडे यांनी भेट घेतली. शारीरिक व मानसिक अत्याचार करणाऱ्या सोबतच त्यांना आपल्या कर्तव्यात चुका करून बनावट रिपोर्ट देण्याबाबत दबाव टाकून उलट त्यांनाच चौकशीच्या फेऱ्यात अडकवणारे लोक देखील तिच्या मृत्यूस जबाबदार आहेत, असे माझे स्पष्ट मत असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल भदने पोलिसांना शरण आला आहे. त्याला आज कोर्टासमोर हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पीडिने तळहातावरील सुसाईड नोटमध्ये भदनेवर आरोप केले होते.
कथित मतचोरीविरोधात विरोधकांकडून १ नोव्हेंबरला मुंबईत मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. विरोध निराश झाले आहे. निवडणुकीतील पराभवाआधीचे हे कव्हर फायर आहे. त्यांची नोट चोरी थांबल्याने वोट चोरीचा मुद्दा काढण्यात आल्याचा टोला फडणवीसांनी लगावला.
भारतीय निवडणूक आयोगाकडून सोमवारी दुपारी ४.१५ वाजता दिल्लीत पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. तमिळनाडू, केरळ पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमध्ये आयोगाकडून मतदारयाद्यांच्या पुनर्पडताळणीचा निर्णय घेण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे.
धनंजय मुंडे यांनी आत्महत्या केलेल्या डाॅक्टर युवतीच्या घरी सांत्वनपर भेट दिली. ती बीड जिल्ह्याची आहे म्हणून हिणवण्यात आलं. एका विशिष्ट समूहाची जातीची आहे, म्हणून सुद्धा हिणवण्यात आलं. ज्या चार-पाच पुढाऱ्यांनी काही महिन्यापूर्वी या बीड जिल्ह्याला बदनाम केलं. त्यावेळी बीड जिल्ह्यातील सर्व अठरापगड जाती बदनाम होत होत्या. त्याला हेही कुठेतरी कारणीभूत आहे. कोसोदूर पोट भरण्यासाठी गेलेले लोक किती हिणवणं सहन करत असतील, याचा विचार आज या लोकांनी केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.
शिवसेनेचे पुण्यातील स्थानिक नेते रवींद्र धंगेकर यांची मंत्री प्रताप सरनाईक यांनी पाठराखण केली आहे. ते म्हणाले, "रवींद्र धंगेकर शिवसेनेचा आक्रमक चेहरा आहे. त्यांनी अनेक खाच-खळगे खाल्ले आहेत. पुण्याच्या राजकारणाची त्यांना चांगली जाण आहे."
नांदेड जिल्ह्यातील उमरी इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी घोषणाबाजी करणाऱ्यांवर उमरी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. कैलास सूर्यवंशी सह इतर सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. उपमुख्यमंत्री पवार यांचे भाषण सुरू असताना या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला होता. त्यामुळे काही वेळ अजित पवार यांना आपलं भाषण थांबावं लागलं होतं.
येत्या 28 तारखेला प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नागपुरात भव्य मोर्चा काढणार आहे. त्यापूर्वीच बच्चू कडू यांना मुख्यमंत्र्यांकडून बैठकीचा निमंत्रण आलं आहे. त्यामुळे बच्चू कडू सरकारच्या बैठकीला जाणार का? यावर कडू यांनी हे कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन उद्या सायंकाळी 5 वाजता ठरवू, असं म्हटलं आहे. या बैठकीला 38 खात्यांचे सचिव यासह मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री हेही उपस्थित राहणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा केवळ जयघोष करून चालणार नाही, तर त्यांच्या गडांचे रक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाची आहे, असा प्रभावी संदेश खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी रविवारी किल्ले भुदरगड इथं दिला. खासदार नीलेश लंके यांच्या ‘आपला मावळा’ संघटनेतर्फे सुरू असलेल्या गडसंवर्धन आणि स्वच्छता मोहिमेचा आठवा टप्पा हजारो तरुण-तरुणींच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. खासदार छत्रपती शाहू महाराज, आमदार जयंत पाटील आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्ही. बी. पाटील यांच्या हस्ते झाला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील घटक पक्षांमध्ये युती कायम राहणार की, नाही यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर अद्याप कुठल्याही प्रकारची घोषणा झालेली नाही. त्यामुळे धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासमोरच भाजप विरोधात लढा देणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.
रायगडमध्ये जोरदार पाऊस सुरू असून, आठवडाभरापासून पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. परतीच्या पावसाच्या सरींचा जोर वाढल्याने भात शेतीचे मोठं नुकसान झालं आहे. भात पिकांच्या शेतात पाणी साठले आहे. यामुळे पिकं खराब झाली आहेत. पावसाचा जोर कमी होत नसल्याने काही भागात भात कापणीच्या कामांचा खोळंबा देखील झाला आहे.
डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी गोपाळ बदणे दोन दिवसात पंढरपूरहून सोलापूरला गेला होता. मग बीडला घरी जाऊन आला, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्याने काल रात्री उशिरा थेट पोलिस चौकीत हजेरी लावली. बदणे सोलापुरच्या काही पोलिसांच्या सोशल मीडियावरून संपर्कात होता, अशी माहिती आहे. बदणेच्या कुटुंबायांना त्याला हजर न झाल्यास नोकरीतून बडतर्फ करणार असल्याचं कळल्यानंतर बदणेला पोलिस चौकीत हजर झाला, अशी माहिती आहे.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर सारंगी महाजन यांनी सडकून टीका केली आहे. गोपीनाथ यांचे खरे वासरदार त्यांचे कार्यकर्ते आणि बीडमधील जनता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे बहीण-भाऊ केवळ जमिनी लाटण्यासाठी एकत्र आले, असून माझी जमीन देखील त्यांनी लाटल्याचा खळबळजनक आरोप सारंगी महाजन यांनी केला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोहोळ-धंगेकर वादावर प्रतिक्रिया दिली. “मुरलीधर मोहोळ यांना गैरसमज झाला आहे. मी दोन्ही पक्षांबद्दल बोललो होतो. महायुतीमध्ये मिठाचा खडा पडेल असं दोन्ही बाजूंच्या लोकांनी बोलू नये, वागू नये. “रवींद्र धंगेकर बोलत असताना ते उचित आहेत, असं मी कधीच म्हटलं नाही. आम्ही महायुतीत आहोत, त्यामुळे प्रत्येकाने संयम ठेवायला हवा.
रविंद्र धंगेकर यांना तुम्ही काही सल्ला दिला आहे का? असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता, मी त्यांना सांगितलं आहे की आपल्याला महायुतीमध्ये दंगा करायचा नाही. मी आता तो (जैन बोर्डिंगचा) विषय संपवलेला आहे. धंगेकर यांना ज्या काही गोष्टींची माहिती मिळाली, त्यावरून ते बोलत होते, अशी माहिती शिंदे यांनी दिली. तसेच आपली महायुती आहे. आपल्याला विरोधकांच्या हातात कुठलेही कोलित द्यायचे नाही, असा सल्लाही धंगेकर यांना दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.
मी जरांगे पाटलांच्या विरोधात बोलले नाही. लोकसभा निवडणुकीतील माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला. मी जरांगे यांना देखील सांगू इच्छिते. मी कधीही निझामाचे गॅझेट असे बोलले नाही. आपल्या समाजामधील दरी मिटवूयात. जे गोपीनाथ मुंडेंचे व्यक्तिमत्व आहे तेच माझे व्यक्तिमत्त्व आहे, असे वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी परळी येथे आयोजित दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमातून केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी गंभीर आरोप करत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या जावयाने रमाकांत तांदळे या शिक्षकाच्या नावावर कर्ज काढून ते भरण्यास नकार दिल्याने आता निवृत्त झालेल्या या शिक्षकावर आत्महत्येचा प्रयत्न करण्याची वेळ आली. हे शिक्षक आज मृत्यूशी झुंज देत असतानाही पोलीस या प्रकरणाची दखल घेत नसतील तर हे ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या पोलिसांच्या ब्रीदवाक्याला साजेसं आहे का? असा संतप्त सवाल रोहित पवारांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूवरुन सुरु असलेल्या राजकारणावरुन विरोधकांना फटकारले. तसचे, 'रणजितसिंह चिंता करु नका, आम्ही पुर्ण ताकतीने तुमच्या पाठीशी आहोत', असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा उल्लेख केला.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आता स्थानकाच्या नाव बदलाला मंजुरी मिळाल्यानंतर स्थानकावरील औरंगाबाद नावाचे सर्व फलक पुसून काढत त्यावर छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानक असे नाव लिहिले जात आहे. 'औरंगाबाद' रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘छत्रपती संभाजीनगर' रेल्वे स्थानक असे करण्यात आले आहे. या स्थानकाचा नवीन स्थानक कोड 'कॅप्शन' असा असेल. त्यामुळे 'औरंगाबाद' रेल्वे स्थानकास आता पुढे 'छत्रपती संभाजीनगर' रेल्वे स्थानक या नावाने ओळखले जाईल आणि स्थानकाचा कोड CPSN असा राहील.
रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर आणखी एक सनसनाटी आरोप केला आहे. मोहोळ यांनी त्यांच्या केंद्रीय उड्डाण राज्यमंत्रिपदाचा विशाल गोखले यांच्यासाठी गैरवापर केला. केंद्रीय मंत्री असलेल्या मोहोळ यांनी विशाल गोखले यांना हवाई प्रवासासाठी अत्यंत स्वस्त दरात प्रायव्हेट जेट उपलब्ध करुन दिले होते. या प्रायव्हेट जेटच्या वापरासाठी विशाल गोखले यांना एरवी 200 कोटी रुपये भरावे लागले असते. मात्र, मुरलीधर मोहोळ यांनी हस्तक्षेप केल्यामुळे फक्त 2.30 कोटींमध्ये तडजोड झाली. या सगळ्यामुळे मुंबई फ्लाईंग क्लबचे तब्बल 197 कोटी रुपयांचे नुकसान झाले, असा आरोप धंगेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचे भूमिपूजन होणार आहे. तसेच ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने’ अंतर्गातील 2 अत्याधुनिक खोल समुद्रातील मासेमारी जहाजांचे उद्घाटन होणार आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिला प्रकरणाच्या अनुषंगाने आज त्यांच्या कुटुंबीयांची कवडगाव मध्ये भाजप आमदार सुरेश धस यांनी भेट घेतली. माध्यमांशी संवाद साधताना या प्रकरणांमध्ये जे जे लोक दोषी आहेत त्यांच्यावर कठोर शिक्षा झाली पाहिजे त्याचबरोबर बदने बनकर याव्यतिरिक्त आणखी या प्रकरणांमध्ये कोण लोक सहभागी आहेत त्यांचे देखील चौकशी झाली पाहिजे आणि या प्रकरणाचा छडा लागला पाहिजे आणि या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे त्याचबरोबर मी स्वतः मुख्यमंत्र्याची भेट घेणार असल्याचे देखील भाजपा आमदार सुरेश धस यांनी सांगितले आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात आता कॉंग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केला आहे. ही आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे. त्यांनी याप्रकरणी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला. राहुल गांधींनी एक्सपोस्ट केली आहे.
आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. त्यांच्या दिल्ली दौऱ्यामागे भाजपने दिलेल्या स्वबळाचा नारा हे कारण असल्याचे बोलले जात आहे.
फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या तरुण महिला डाॅक्टरच्या कुटुंबीयांशी खासदार सुप्रिया सुळे फोन द्वारे संवाद साधला. या प्रकरणांमध्ये जोपर्यंत हा तपास शेवटच्या आरोपी पर्यंत जात नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि सर्वांना शिक्षा झाली पाहिजे असा विश्वास यावेळी त्यांनी पीडीत कुटुंबीयांना दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (रविवारी) फलटण येथे कृतज्ञता मेळाव्यासाठी येत आहेत. या मेळाव्या मध्ये फलटण मधील विविध विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटन ते कणार आहेत. माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी या विषयी माहिती दिली. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तसेच पर्यटन मंत्री शंभूराज देसाई हे देखील उपस्थित राहणार आहेत.
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केली. याच महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची सांत्वनपणर भेट मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमधील तिच्या गावी जाऊन घेतली आहे.
इंदापूर बस स्थानकावर मध्यरात्रीच्या सुमाराला अचानक उभ्या असलेल्या एसटीला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आग एवढी भीषण होती की संपूर्ण एसटी जळून खाक झाली आहे. एसटीत 50 प्रवासी होते सुदैवानं कोणालाही दुखापत झाली नाही.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये स्थानिकच्या निवडणुकात शिंदेंचे आमदार संतोष बांगर यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. हिंगोली नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार असा निर्धार त्यांनी केला. त्यावर भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी आमदार यांना उद्देशून 'ईट का जवाब पत्थर से दिया जायेगा' असा इशारा दिला आहे.
भाजप आमदार सुरेश धस आज महिला डॉक्टर कुटुंबाची भेट घेणार आहेत. साधारण साडे आठ वाजता सुरेश धस बीडला जाऊन महिला डॉक्टर कुटुंबियांची भेट घेणार आहेत.
फलटण रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्येनंतर काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे पीडित डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेणारआहेत. यासाठी त्या आज बीडला जाऊन मयत महिला डॉक्टर कुटुंबाची सांत्वनपर भेट घेणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.