साहित्य संमेलन १४४ वर्षांपासून घालमोड्या दादांचेच ; उद्धघाटनापूर्वी सूप वाजले!

मी बहिष्काराचे हत्यार उचलल्यावर ठराव मंजूर झाला, बोर्ड काढला गेला, पण कुणीही प्रमुख महिला तिकडे फिरकल्या नाहीत, कारण आपण विधवा होऊ अशी त्यांना भीती होती.
hari narake
hari narakesarkarnama

पुणे : साहित्य संमेलन अन् वाद हा नवीन विषय नाही, साहित्यापेक्षा साहित्यबाह्य विषयावर संमेलनं गाजत असतात, तसेच यंदाही होत आहे. नाशिकमध्ये (Nashik) येत्या ३ ते ५ डिसेंबरमध्ये दरम्यान होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Sahitya Sammelan) होत आहे. हे संमेलन आधीच अनेक कारणांमुळे गाजत असतांना यात ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके (hari narake) यांनी उडी घेतली आहे. त्यामुळे नाशिक येथील संमेलनाचे उद्धघाटनापूर्वीच सूप वाजले आहे.

प्रा. हरी नरके यांनी फेसबूक पोस्ट शेअर करीत मागील साहित्यसंमेलनात त्यांना आलेला अनुभव शेअर केला. साहित्यसंमेलनातील राजकारणावर त्यांनी भाष्य केलं आहे. त्यांना आलेले कटू अनुभव त्यांनी मांडले आहेत. अ.भा.मराठी साहित्य संमेलन कायम वादग्रस्त का ठरते? याबाबत नरके यांनी भाष्य केलं आहे.

''संमेलन वादग्रस्त बनवणे ही माध्यमांची गरज असते. मनोरंजन करण्यासाठी, वाद घडवून आणले जातात, सुपाऱ्या देऊन कोंबडे झुंजवले जातात. आयोजक आणि महामंडळ त्याला आता पुरेसे सरावलेले असतात. त्यांना त्याचे फारसे कौतिक राहिलेले नाही. प्रचंड लोकप्रियता आणि अफाट प्रसिद्धी यांचे बायप्रोड्क्ट म्हणजे हे वाद असतात. ते व्हायलाच हवेत यासाठी व्यवस्था काम करीत असते. १९९६ नंतर २५ वर्षे मी मसाप, महामंडळ नी साहित्य संमेलन यांचा नाद सोडला,'' असे हरी नरके यांनी म्हटलं आहे.

hari narake
मोदींनी नाकारल्यानंतर दहा मिनिटांतच कुंटे बनले मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार !

आपल्या फेसबूक पोस्टमध्ये हरी नरके म्हणतात..

१९९६ साली आळंदीला भरलेल्या संमेलनाचा मी कार्याध्यक्ष होतो. विश्वनाथ कराड स्वागताध्यक्ष होते. शांताबाई अध्यक्ष तर लताबाई उदघाटक होत्या. मी तेव्हा मसापचा पदाधिकारी म्हणून महामंडळात काम करीत होतो. अशाप्रकारे महामंडळ नी आयोजक संस्था अशा दोन्ही ठिकाणी काम करीत असल्याने वाद न होता संमेलन पार पाडण्यासाठी आटोकाट प्रयत्न करूनही वाद झालेच. संमेलन मिळावे म्हणून अहमदनगरचे यशवंतराव गडाख नी मित्रवर्य अरुण शेवते प्रयत्नशील होते. मी मसापवर पुणे जिल्ह्यातून निवडून गेलेलो असल्याने मला आळंदीच्या बाजूने मत द्यावे लागले. त्यातनं नगरकर चिडले नी सलोख्याचे संबंध त्यांच्याबाजूने कटू झाले.

जोगळेकर व्हीनस प्रकाशनाच्या पाध्येंसाठी अडून बसले

प्रकाशक म्हणून सुगावाच्या विलास वाघ यांचा सन्मान व्हावा यासाठी मी आग्रही होतो तर मसापचे जोगळेकर व्हीनस प्रकाशनाच्या पाध्येंसाठी अडून बसले होते. संमेलनात विलास वाघांचा सन्मान झाला. दलित, आदिवासी, ग्रामीण अशा सगळ्या प्रवाहांना सामील करून घ्यावे, यासाठी मी झगडत होतो, तर महामंडळाचे शंकराचार्य आपले सोवळे सोडायला तयार नव्हते. आजही त्यात बदल झालेला नाही. नेमाडे,पठारे अशा दिग्गजांना संमेलनाला बोलवावे यासाठी महामंडळ उदासीन होते. आजही असते. आपापल्या साहित्य संस्थेच्या मतदारांना संमेलनात स्टेजवर मिरवता यावे याचीच दक्षता घेण्यात सर्व गर्क असतात.

ती उमेद कायमचीच हरवली

त्यामुळे ४०० निमंत्रितांमध्ये अवघे ४ दर्जेदार नी उरलेली सुमारांची सद्दी म्हणून तेच ते वक्ते व कवी असे वर्षानुवर्षे चालुय. ज्यांना संधी मिळते ते आपल्या गुणवत्तेवर खूष असतात. ज्यांना मिळत नाही ते चडफडतात नी पुढच्या वर्षी तरी मला बोलवा म्हणून महामंडळाकडे वशीला लावतात. साहित्य आणि सांस्कृतिक व्यवस्था आहे तशीच राहते. ती बदलण्याची कुणालाच पडलेली नाही. ती उमेद कायमचीच हरवली गेलीय. कोकण मराठी साहित्य परिषदेला मान्यता मिळावी म्हणून मी जंगजंग पछाडूनही हट्टी जोगळेकरांमुळे यश आले नाही. ज्यांच्यासाठी मी भांडलो व मुख्य प्रवाहाशी पंगा घेतला त्या मधुभाई व कोकण साहित्य परिषदेनेही त्याची जाणीव ठेवली नाही.

सारा थँक्सलेस उद्योग

एकेका कवी आणि वक्त्यासाठी आग्रही राहून त्यांना निमंत्रित केले, पण ज्यांना बोलावता आले नाही ते संतापले नी माझ्यावर कायमचे डुख धरून बसले. ज्यांना बोलावले तेही आपल्या केवळ गुणवत्तेच्या जोरावर आपण संमेलनाला निमंत्रीत केले गेलोत अशी समजूत करून घेऊन आमची ओळख विसरले. एकूण हा सारा थँक्सलेस उद्योग असतो. बहुसंख्य साहित्यिक आत्मकेंद्री, अप्पलपोटे नी आत्ममग्न असतात. (अपवाद असतात,आहेत...)

आळंदीत मुख्य मंदिराच्या अजान वृक्षाखाली महिलांना प्रवेश नव्हता. तिथला फलक काढून टाकावा व स्त्रियांना प्रवेश मिळावा म्हणून मी आलंदीतल्या महामंडळ बैठकीत अडून बसलो.तेव्हा एकट्या पूर्वाध्यक्ष नारायण सुर्वेंनी मला पाठींबा दिला, बाकी सारे महिलांच्या विरोधात होते, अगदी महिला प्रतिनिधीही!

मी बहिषकाराचे हत्यार उचलल्यावर ठराव मंजूर झाला, बोर्ड काढला गेला, पण कुणीही प्रमुख महिला तिकडे फिरकल्या नाहीत, कारण आपण विधवा होऊ अशी त्यांना भीती होती. ज्या आधीच विधवा होत्या किंवा अविवाहित त्याही घाबरून तिकडे बसायला आल्या नाहीत. काही भगिनींना दादापुता करून तिकडे नेले व बंदी मोडून काढली, पण आज तिकडे महिलाबंदीचा बोर्ड नसला तरी महिला जात नाहीतच. संमेलनात कार्यक्रम,भोजन, व्यवस्था चांगली ठेवूनही काही रुसलेच.

संमेलन वादग्रस्त बनवणे ही माध्यमांची गरज

एकूण काय? असे लक्षात आले की संमेलन वादग्रस्त बनवणे ही माध्यमांची गरज असते. मनोरंजन करण्यासाठी, वाद घडवून आणले जातात, सुपाऱ्या देऊन कोंबडे झुंजवले जातात. आयोजक आणि महामंडळ त्याला आता पुरेसे सरावलेले असतात. त्यांना त्याचे फारसे कौतिक राहिलेले नाही.

साहित्य संमेलन अतिरेकी कंपूचे प्रसिद्धीचे व रोजगारहमीचे उद्योग

प्रचंड लोकप्रियता आणि अफाट प्रसिद्धी यांचे बायप्रोड्क्ट म्हणजे हे वाद असतात. ते व्हायलाच हवेत यासाठी व्यवस्था काम करीत असते. १९९६ नंतर २५ वर्षे मी मसाप, महामंडळ नी साहित्य संमेलन यांचा नाद सोडला. पर्यायी म्हणून भरणारे विद्रोही साहित्य संमेलन वगैरे हे बारक्या, संकुचित आणि अतिरेकी कंपूचे प्रसिद्धीचे व रोजगारहमीचे उद्योग असतात, ते तर महामंडळापेक्षाही अधिक जातीयवादी नी टोळीबाज असतात. आहेत. एकूणात गेली १४४ वर्षे हे व तेही (विद्रोही वगैरे) संमेलन घालमोडया दादांचेच राहिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com