लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर काल जाहीर झालेल्या एक्झिट पोल ने अनेकांचा गोंधळ उडवून ठेवला आहे. लोकसभेच्या लातूर मतदार संघात काही संस्थांनी महाविकास आघाडीचे शिवाजी काळगे विजयी होणार असा अंदाज व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे काही संस्थांनी भाजप महायुतीचे सुधाकर शृंगारे विजयाची हॅटट्रिक करतील असे म्हटले आहे. त्यामुळे दोघांच्याही समर्थकांचा गोंधळ उडाला असून सोशल मीडियावर दावे प्रतिदावे करणाऱ्या पोस्टचा अक्षरशा पाऊस पडत आहे.
अनुसूचीत जातीसाठी राखीव असलेल्या या जागेसाठी खरी लढत भाजपा(BJP) व काँग्रेस या दोन उमेदवारातच झाल्याने ही निवडणुक थेट झाली आहे. भाजपाकडून खासदार सुधाकर शृंगारे हे तर काँग्रेसकडून डाॕ. शिवाजी काळगे या प्रमुख उमेदवारात लढत झाली असली तरी वंचित विकास आघाडीचा उमेदवार नरसिंग उदगीरकर किती मताधिक्य घेणार हे पण महत्वाचे राहणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गत दोन टर्म मध्ये विजय संपादन केलेल्या भाजपला यावेळी विजयाची अपेक्षा आहे. 2014 व 2019 मध्ये मोदी लाटेत लातूर लोकसभेत भाजपने विजय संपादन केला. भाजपने सुधाकर शृंगारे यांच्यावरच पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांना परत संधी दिली. तर काँग्रेसने जातीय समीकरणे जुळविण्यासाठी व या मतदारसंघात बहुसंख्य असलेल्या लिंगायत समाजाची मते खेचून आणण्यासाठी लिंगायत मधीलच पोटजात असलेल्या माला जंगम समाजाचे डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली आहे.
लातूर लोकसभा(Latur Loksabha) मतदारसंघात महायुतीचे वर्चस्व असल्याने ही जागा जिंकणे भाजपसाठी प्रतिष्ठेचे असणार आहे. तर काँग्रेसचा बालेकिल्ला अशी या मतदारसंघाची परत एकदा ओळख निर्माण करण्यासाठी काँग्रेसची ही अस्तित्वाची लढाई मानली जात होती. भाजपसाठी सुरुवातीला सोपी वाटणारी लातूर लोकसभेची निवडणूक महाविकास आघाडीचे उमेवार डॉ. शिवाजी काळगे यांच्यामुळे अतिशय चुरशीची झाली.
महाआघाडीची प्रचाराची धुरा आमदार देशमुख बंधूनी सांभाळली तर सुधाकर शृंगारे यांची माजी मंत्री आमदर संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांभाळली. या अटीतटीच्या लढतीत लातूर मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार डाॕ. शिवाजी काळगे हेच निवडून येतील, अशी सध्या जोरदार चर्चा आहे.
गावागावातील मतदारही आम्ही त्यांनाच पसंती दिली म्हणून सांगत आहेत. तर ही निवडणूक देश पातळीवरील असल्याने मतदारानी केंद्रातील सक्षम नेतृत्व नरेंद्र मोदीकडे(Narendra Modi) पाहून मतदान केलेले आहे तेंव्हा ही जागा भाजपचं जिंकेल आणि हॅटट्रिक साधेल, अशी चर्चा भाजप कार्यकर्ते करत आहेत.
सध्या सोशल मीडियावर काँग्रेस व भाजपा कार्यकर्त्यांत विजय आमचाच होणार म्हणून दावे-प्रतिदावे करत जुंपली आहे. शिवाय एक दोन एक्झिट पोलने काँग्रेस व भाजपा असा अंदाज व्यक्त केला असल्याने लातूरच्या जागेचा सस्पेन्स कायम आहे. कोण निवडून येणार हे 48 तासातच उलगडणार आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.