Marathwada NCP News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राज्याचे आणि मराठवाड्याचे राजकारण एका वेगळ्या वळणावर आले आहे. विशेषतः मराठवाड्यात नव्याने जम बसवून संघटनात्मक ताकद वाढवल्यानंतर अजित पवारांच्या अचानक जाण्याने मराठवाड्यातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये पोरकं झाल्याची भावना आहे. या भावनिक विचारासह भविष्याची चिंता आता या सर्वांना सतावू लागली आहे. अजित पवार यांच्या खंबीर आणि दमदार नेतृत्वाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मराठवाड्यात आपली ताकद वाढवली.
नुकत्याच झालेल्या नगरपालिका, महापालिका निवडणुकीत हे दिसूनही आले. राज्यात नंबर एकचा पक्ष असलेल्या भाजपच्या खालोखाल यश मराठवाड्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मिळवले आहे. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 11 नगराध्यक्ष आणि तब्बल 301 नगरसेवक निवडून आले आहेत. नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशीव जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादीचा प्रभाव अधिक दिसून आला. जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले नसले तरी पक्षाचे अस्तित्व जाणवते.
अजित पवारांच्या बारामती, पिंपरी चिंडवडच्या धर्तीवर विकासाचे आश्वासक शब्द यावर मतदारांनी मोठा विश्वास दाखवला. यातून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादीने मोठी झेप घेतली. नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर, परभणीत राजेश विटेकर, विजय भांबळे, धाराशिवमध्ये राहूल मोटे, सुरेश बिराजदार, लातूरमध्ये सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, संजय बनसोडे, बीडमध्ये प्रकाश सोळंके, धनंजय मुंडे, विजयसिंह पंडीत तर हिंगोलीमध्ये राजु नवघरे, मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे विक्रम काळे या विश्वासू सहकाऱ्यांवर अजित पवारांनी पक्षाची पाळेमुळे पुन्हा घट्ट केली.
इकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवत अजित पवारांनी राष्ट्रवादीला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत गंगापूरमध्ये नगराध्यक्ष आणि जिल्ह्यात नगरसेवक निवडून आणण्यात महत्वाची भूमिका निभावली होती. महापालिका निवडणुकीत पक्षाला यश मिळाले नसले तरी 90 वर उमेदवार मैदानात उतरवत राष्ट्रवादीने इतर पक्षांना आपली दखल घेण्यास भाग पाडले. जिल्हा परिषद निवडणुकीत मोठ्या आत्मविश्वासाने राष्ट्रवादी काँग्रेससमोर जात असतानाच अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने पक्ष काहीसा खचला आहे.
मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्री, आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक आणि अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नव्यानेच पक्षात आलेले माजी आमदार भीमराव धोंडे, सुरेश जेथलिया, शिवाजी चोथे व इतरांचे काय? असाही प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. मराठवाड्यात आतापर्यंत राष्ट्रवादीचे नेते म्हणून धनंजय मुंडे यांचे नाव घेतले जायचे. परंतु गेल्या वर्षभरापासून बीड जिल्हा आणि राज्यात घडलेल्या अनेक घडामोडीनंतर धनंजय मुंडे यांना बाजूला करण्यात आले होते. अजित पवार यांनी स्वतः बीड आणि मराठवाड्यात लक्ष घातले होते. आता पुन्हा मराठवाड्यात पक्षाचे नेतृत्व कोणाकडे जाणार? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.